आहेर

gift box

जोगळेकरांच्या मुलीचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आणि सर्वांनी सुखाचा निश्वास टाकला. ते आमचे जुने शेजारी त्यामुळे घरचेच लग्न होते. रविवारी ते माझ्याकडे आले आणि म्हणाले “भाऊ.. वेळ असेल तर आहेराची पाकिटे फोडूया का?? बऱ्याच जणांचे पैसे द्यायचे आहेत. आलेत तर देऊन टाकू. मीही तयार झालो. इतक्यात दारात विक्रम येऊन उभा. पैश्याचा व्यवहार होता म्हणून विक्रम जवळ असलेला बरा म्हणून विक्रमलाही बरोबर घेतले. आम्ही तिघेही आहेर मोजायला बसलो.

विक्रम एक एक पाकीट फोडत होता आणि रक्कम बाजूला ठेवत होता. अचानक एक पाकीट उघडताना त्याने दणकून शिवी दिली. “च्यायला…..!! ह्या लोकांना पाकीटही नीट चिकटवता येत नाही. दोन हजारचा आहेर आहे पण नोट पूर्ण पाकिटाला चिकटली आहे. आता ही नोट गेली फुकट”.

ह्याला पैश्याची किती काळजी आहे हे मला माहित असल्यामुळे मी पटकन त्याच्याकडून ते पाकीट ओढून घेतले आणि अतिशय हळुवारपणे ती नोट बाजूला केली. एक तिरस्कारयुक्त नजर टाकून विक्रमने आपले कार्य पुढे चालू केले. काही वेळाने अजून एक पाकीट नोटेला चिकटलेले आढळले. आतील नोट पाचशेची होती. ती तर फारच चिकटलेली दिसत होती. यावेळी मात्र त्याने ते पाकीट माझ्याकडे फेकले. मीही अगदी पाणी लावून ती नोट वेगळी केली.

“लोकांना पाकीट कसे भरायचे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे” विक्रम चिडून उद्गारला. पुढे पुढे बरीच पाकिटे आम्हाला अशी सापडली. सगळ्यांच्याच नोटा आम्हाला वेगळ्या करता आल्या नाहीत. पण अशी पाकिटे देणाऱ्याला शिव्या देत आम्ही सर्व पाकिटे पूर्ण केली.

नंतर हिशोब करताना कळले पाचशेच्या पाच नोटा ,दोन हजारच्या सहा नोटा आणि शंभरच्या बारा नोटा पूर्णपणे खराब झाल्या होत्या. विक्रमने बेफिकीरपणे जोगळेकरना सांगितले “काका …सोळा हजार गेले तुमचे. जोगळेकरांनी चेहरा पडून माझ्याकडे पाहिले.

“अरे खूप प्रेमाने आणि आपलेपणाने इतका मोठा आहेर दिला होता त्यांनी मला. मी बऱ्याच ठिकाणाहून कर्ज काढले होते या लग्नासाठी आणि म्हणून विचारतील त्यांना सांगत होतो जमल्यास कॅश घाला गिफ्ट देऊ नका. त्याला प्रतिसाद म्हणून बऱ्याच लोकांनी कॅश दिली पण निष्काळजीपणामुळे माझे खूप नुकसान झाले. पर्यायाने त्यांचेही झाले. जोगळेकर हळहळले.

“खरे आहे काका… मी म्हणालो.” पण यापुढे आपण नक्की काळजी घेऊ आणि इतरांनाही सांगू काळजी घ्यायला कि नुसतेच आहेर देतो म्हणून सोपस्कार समजून ते न देता दिलेल्या पैशांचे किंवा वस्तूचे काहीतरी चीज होईल एवढे निदान आपण बघावे.

“होय काका मीही यापुढे नक्की काळजी घेईन”असे बोलून विक्रमने मोजलेली रक्कम त्यांच्या हाती दिली.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!