गृह कर्जाचा तणाव हलका करण्यासाठी त्याच तोडीची गुंतवणूक

गृह कर्जाचा तणाव हलका करण्यासाठी

होम लोनचं आणि दर महिन्याला येणाऱ्या इ. एम. आय. चं टेन्शन बाजूला ठेऊन, आपल्या स्वमालकीच्या घरातच राहून, कर्जाच्या रकमेचं मुद्दल आणि व्याज, आर्थिक नियोजनातून कसं उभं करता येईल ते वाचा या लेखात.

आपण नोकरीला लागलो कि आपलं पहिलं स्वप्न असतं, ते म्हणजे शक्य तितके लवकर आपले स्वतःचे घर विकत घेण्याचे.

अशावेळी नोकरीच्या सुरवातीच्या काळात पैशाची थोडीफार जमवाजमव केल्यानंतरही, प्रत्येकालाच गृह कर्ज घेण्याची गरज भासतेच.

काही जण गृह कर्जाच्या मोठाल्या मासिक हप्त्याने घाबरतात.

माझा स्वतःचा अनुभव आहे कि आपण गृहकर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे कारण ८.१५ ते ८.४० % इतक्या कमी व्याजाने, तेही अगदी २०-२५ वर्षे मुदतीचे गृह कर्ज, गृहनिर्माण कर्ज कंपनी आपल्याला देते.

२०-२५ वर्ष इतक्या दीर्घ मुदतीमध्ये भरावयाचा कर्जाचा हप्ता नक्कीच आपल्याला तणावाखाली ठेवतो.

बऱ्याच वेळा असे होते कि आपण तणावाखाली फक्त घराचे हप्ते भरत राहतो व आपल्याकडून आपल्या भावी आयुष्यासाठी म्हणजेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा आपल्या निवृत्ती नियोजनासाठी आपल्याकडून काहीच बचत होत नाही.

असे होते कि २० वर्षात आपल्या मालकीची स्थावर मालमत्ता तयार झाली मात्र तणावामुळे इतर काहीच बचत न झाल्याने इतर काही संपत्ती निर्माण करण्यात आपण मागे पडलो.

आता आपल्या उतार वयात थोडीफार संप्पती बनवण्यासाठी म्हणा किंवा आपण घर कर्जावर भरलेले व्याज परत मिळवण्याकरिता आपल्याला जीवन विमा कंपन्या व म्युच्युअल फंड मदत करतात.

कसे ते आपण जाणून घेऊ.

गृह कर्ज घेतल्यानंतर पहिला तणाव म्हणजे, आपल्याला काही झाल्यास कर्जाचे हप्ते कसे फेडले जातील.

गृह निर्माण कर्ज कंपनी म्हणजे ती सहसा बँकच असते, घराचा ताबा घेऊन आपल्या कुटुंबावर आपत्ती ओढवेल का हि भीती निर्माण होते.

हि भीती घालवण्याकरिता ताबडतोब गृह कर्ज रकमेच्या साधारण दुपटीपेक्षा जास्त रकमेचा मुदतीचा विमा म्हणजे टर्म इंश्युरन्स घ्यावा.

मुदतीच्या विमा मध्ये विम्याचा हप्ता खूप कमी असतो मात्र सुरक्षा कवच खूप मोठे असते.

आपल्याला काही वाईट झाले तरी आपल्या पश्चात विमा कंपनी आपल्या गृह कर्ज हप्त्यांची काळजी घेईल तसेच उर्वरित विमा रकमेतून आपल्या कुटुंबाच्या इतर घर खर्चाची व्यवस्था होऊन जाईल.

आता आपण पाहू म्युच्युअल फंड कसे आपल्याला मदत करतील.

समजा आपण २५ लाखाचे २० वर्ष मुदतीचे कर्ज घेतले. जे आपल्याला गृहनिर्माण कर्ज कंपनी किंवा बँकेने ८.२०% व्याजाने दिले. आपण आपला मासिक हप्ता पहिला तर तो साधारण रु २१,२२३ असेल. आता आपण पुढील २० वर्षात गृहनिर्माण कर्ज कंपनी ला मुद्दलाचे रु.२५ लाख व व्याजाचे रु. १३ लाख असे एकूण रु. ३८ लाख परत करणार.

आपण काय करायचे तर आपला जो गृह कर्जाचा हप्ता आहे त्याच्या १० टक्के म्हणजेच फक्त रु २,१०० ची इक्विटी म्युच्युअल फंडात एस. आई. पी. चालू करायची व ती घरकर्जाची मुदत संपे पर्यंत म्हणजेच पुढील २० वर्ष चालू ठेवायची.

म्युच्युअल फंडाचा मागील इतिहास पहिला तर इक्विटी फंडातील एस. आई. पी. ने अगदी १५% ते १८% किंवा त्याहून जास्त परतावा दिला आहे.

आपण जरी येणाऱ्या काळात मुद्दाम कमी असा १२% परतावा गृहीत धरला तरी आपल्या छोट्याशा रु. २,१०० च्या एस. आई. पी. ची रक्कम २० वर्षात वाढून रु १९ लाख होऊ शकते. म्हणजेच आपल्याला गृह कर्जावर भरलेले व्याज परत मिळवल्याचे समाधान व आपल्या हाती काही संपत्ती निर्माण करू शकल्याचे अधिक समाधान.

दीर्घकालीन एस. आई. पी. मध्ये आपल्याला चक्रवाढ वाढीचा फायदा अधिक होतो.

समजा आपण आपले गृह कर्ज २० वर्ष मुदतीचे केले तर आपला गृह कर्जाचा मासिक हप्ता साधारण रु. १९,६३८ होईल.

आपण आपली रु. २१०० ची एस. आई. पी. २५ वर्ष चालू ठेवली तर एस आई पी तील वाढ रु. ३५ लाख होईल. म्हणजेच गृह कर्जावरील मुद्दल व व्याज दोन्ही आपण परत मिळवू शकतो.

तसेच आपल्या उतार वयात चांगली संपत्तीही निर्माण झालेली असेल.

आपण जर का शिस्तबद्ध पद्धतीने थोडा आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन घेतला म्हणजेच, आपले उत्पन्न हे दरवर्षी वाढत असते त्या प्रमाणात जर आपण एस. आई. पी. ची रक्कमही वाढवली तर.

आजकाल म्युच्युअल फंड आपल्याला स्टेप अप एस. आई. पी. ची सेवा देतात. रु २१०० ने चालू केलेली एस आई पी आपण दर वर्षी ठराविक रकमेने वाढवू शकतो.

जर आपण आपली एस आई पी ची रक्कम दरवर्षी किमान रु ५०० ने वाढविली आणि पुढील २० वर्षात म्युच्युअल फंडाचा १२ % परतावा गृहीत धरला तर आपली एस. आई. पी. ची रक्कम वाढून रु. ५० लाख होऊ शकते.

म्हणजेच मुलांचे उच्च शिक्षण, लग्न, निवृत्ती नियोजन अशी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चांगली संपत्ती निर्माण केल्याचे समाधान.

इथे आपण एक लक्षात घेतले पाहिजे कि आपला देश जेव्हा आर्थिक महासत्ता होईल त्यानंतर मिळणार परतावा हा थोडा कमी होईल.

त्यामुळे वरील आकडेवारी फक्त ढोबळ अंदाज बांधण्यासाठी वापरावी. आपल्या आर्थिक सल्लागाराकडून आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार व्यवस्थित नियोजन करून घ्यावे.

कारण या छोट्या छोट्या नियिजनातून तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती बळकट करणे निश्चितच साध्य होईल.

आपले स्वतःचे तणावमुक्त गृह-कर्जाने आणि तेही मालकी हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा.

धन्यवाद.

(लेखक निलेश तावडे हे आर्थिक नियोजनकार आहेत.)

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

  1. माझे होम लोन चालू आये दोन वर्ष पासून आता मला एस आय पी चालू करायची काय करावं लागेल सर प्लीज डेटल्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.