कोवळी कळी

मराठी कथा
mother showing her tummy to daughter

विणाला सर्व आटोपुन झोपायला रात्रीचे १२ वाजलेले होते.. चिडचिड करीतच ती बेडवर आली.. आता इतका उशीर झालाय आणि परत उद्याला लवकर उठायचे..

सकाळची घाई, सर्वांच्या सर्वकाही गोष्टी आटोपून मग घाई घाईतच आपली तयारी करायची, न खाताच निघायचे त्याकडे मात्र कुणाचं लक्ष नसतं.. यांचं सर्व पुरे झाले म्हणजे झालं… कुणाला फिकीर आहे..!!

पुटपुटतच बेडवर पडली.. अभय तिचा नवरा मस्त घोरत होता.. थोडी चीड आली,

हा मस्त इथे घोरत पडलाय आणि मी सतत काम करतेय.. मी सुद्धा जॉब करतेय.. मग मीच इतकं सहन करायचे… कशासाठी? स्त्री नी फक्त पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं… माणसं मात्र काहीही झालं नाही हा अविर्भाव आणून जगतात की काय ? असं वाटतं स्री जन्मा तुझी हीच कहाणी..!!

आज तिला चिडायला कारणंही तसंच होतं. ऑफिस मधून घरी येत नाही तोच सासूबाईंचा आवाज..

अगं आलीस का? उद्या आपल्याला नऊ कन्या जेवू घालायच्या आहेत.

ती बोलली,

अहो आई, मला उद्या सुटी नाही आपण सुटीच्या दिवशी बोलावूयात ना!! म्हणजे मला जरा सर्व व्यवस्थित करता येईल.

सासूबाई बोलल्या,

नाही उद्यालाच आटोप.

“यांना काय जातंय सांगायला.. स्वतः आजारी असल्यासारख्या वागतात. करायचं कुणी तर मग मीच ना..!!”

धुसफुसतच फ्रेश होऊन स्वयंपाकघरात गेली.. आताचा स्वयंपाक नंतर आवराआवर उद्याची तयारी… किती कामं आहेत… तणतणतच भराभर सर्व कामं आटोपली नी उद्याचं प्लॅन करता करताच निद्रादेवीच्या कुशीत सामावली सुद्धा..!

सकाळी लवकर उठुन ती आपल्या कामाला लागली भराभर सर्व उरकवून निघावे…… पण ….

“मी तर स्वयंपाक करून जाईल मग त्या मुलींना कोण वाढणार?”

ही सुद्धा व्यवस्था करावी लागेल म्हणून तिने हाफ डे येणार म्हणून ऑफिस मध्ये फोन केला.. आणि…

हो नऊ कन्या कुठून आणणार ?

हल्ली मुली मिळणेही कठीणच झालंय की.. मुलींचं प्रमाण कमीच.. आणि तिला आठवायला लागले.. लग्नानंतर तिला दिड वर्षातच सृष्टी झाली..

पहिली मुलगीच झाली म्हणून सासूबाईंनी किती धुसफूस केली होती कारण त्यांना मुलगा हवा होता, घराण्याला वारस… काही दिवस जरा नाराजीतच होत्या नंतर शांत झाल्या. नेहमी म्हणायच्या मुलगी काय तर परक्याचं धन…!!!

कोण समजवणार यांना. नवरा शांत…. काहीही बोलायचे नाही आणि आपले कधी आईसमोर मतही मांडायचा नाही त्यामुळे एकटीच या प्रसंगाला सामोरे जायची.

आता तिचे दिवस भरत आले होते केव्हाही प्रसूती होईल असे वाटत असतांनाच तीला हॉस्पिटलला भरती केले होते. दुसऱ्या वेळेसही तिला मुलगीच झाली..

सासूबाईंनी मुलगी झाल्याचं ऐकलं नी नेहमीच्या सवईप्रमाणे नाक मुरडून म्हणाल्या,

झाली ना अजून दुसरी?.. बापाच्या डोक्यावर केस नाही ठेवणार दोन दोन पोरी.. तपासून घ्यायला सांगितले तर ऐकले नाही. घ्या आता आपल्या कर्माची फळं, अन भरा आता दुसऱ्याची घरं…

याप्रकारे दुसरी मुलगी स्वरा हिचं स्वागत झालया.. ती पण सुंदर, गुटगुटीत दिसत होती त्यामुळे तिने सर्वांना लळा लावलाय.. मग आजी कशी सुटणार?

आता आजीशी तिची गट्टी जमली होती आणि काहीवेळ तरी आजी आपल्या मनातील भावना लपविण्याचा प्रयत्न करीत होती.

मनातील आकस तर तसाच होता वंशाचा दिवा मिळाला नव्हता मग झाली कारस्थानं सुरू.. मुलाच्या मनात काही काही भरवून मन कलुषित करायचं… मग सासूबाई आपल्या खुश…

स्वरा होण्याच्या आधी सुद्धा तिचा एक गर्भपात करून घेतलाय कारण पोटात वाढणारा गर्भ मुलीचा होता…. विणा परिस्थिती समोर हतबल होत होती.

समजून हुमजून काहीच करू शकत नव्हती. एक स्त्री असून सुद्धा मीच एका स्री चा बळी दिलाय हीच सल मनात धुमसत होती, मनात पाश्चातापाच्या ज्वाला उसळत होत्या..

नवीन युगात वावरून सुद्धा तिला आपले मत मांडावे हाही अधिकार नव्हता. कधी कधी ती खूप अस्वस्थ व्हायची.. नवरा म्हणजे जणू…. आईचे कुक्कुलं बाळ..!!

त्याबद्दलही तिची तक्रार नव्हती पण स्वतः त्या स्त्री असून सुद्धा दुसऱ्या स्त्री च्या व्यथा जाणू शकत नव्हत्या. आणि त्या कुठल्या अधिकारांनी बोलत होत्या त्या सुद्धा एक दोन नाही तर चक्क पाच पाच बहिणी होत्या भावाची वाट बघत इतक्या मुलीच झाल्यात आणि वडिलांकडच्या सधन म्हणून पाच बहिनीना प्रॉपर्टी वाटप झालेले होते.

त्यामुळे त्यांच्या घरात त्यांचीच चलती होती. त्या म्हणतील तेच व्हायचं.. अभयची बायको म्हणून या घरात आलिया पण तेही त्यांच्याच मर्जीने.. विणा ही अतिशय गरीब घरातील.. दोन बहिणी आणि एक भाऊ असे पाच लोकांचे कुटुंब. वडिलांना प्रायव्हेट नोकरी तेव्हा कसंबसं घर चालायचं..

सासूबाईंना वाटलं ही दिसायला सुंदर असून गरीब घरची पोर आहे म्हणजे आमच्या म्हणण्याप्रमाणे वागणार आणि गरीब घरची म्हटले की माझं ती ऐकणार कारण मुलगा फारसं काही करीत नव्हता.

मुलाला मोठी नोकरी असल्याचे लोकांना खोटं खोटं सांगायचे. आम्हाला काहीही नकोय फक्त मुलगी हवी आहे हे सांगून लवकरच लग्न जमविले आणि विणा चौकशी न केलेल्या विळख्यात ओढत गेली..

आता तो विळखा इतका घट्ट होता की संपूर्ण शरीर त्याने व्यापले होते. काही केल्या हा विळखा सुटायचे नाव घेत नव्हता.. परत तिला मुलासाठी तिसरा चान्स घे म्हणून सांगण्यात आले.

सासूबाई म्हणाल्या, “यावेळेला तू गरोदर राहिली की आपण आधी तुझी सोनोग्राफी करूनच पुढे पाऊल टाकू.. स्वराच्या वेळेस हेच झालं.. तपासलं नाही म्हणून …शेवटी झाली मुलगीच……!!

नुसती जीवाची घुसमट होत होती..आभाळ निवळतही नव्हतं नी बरसतही नव्हतं.

किती दिवस हे सहन करायचं? आणि काय म्हणून मीच नेहमी त्रास घ्यायचा? मलाही भावना आहेत..

एक स्रीची दुसऱ्या स्री सोबत नाळ जुळलेली असते आणि ती नाळच तोडून टाकावी इतके क्रूर असावे का कुणी? स्त्री जन्माला येणं हा काही गुन्हा आहे का?

स्री च नसती तर ही प्रजा असती का? एकीकडे स्री ही देवी आहे समज़ायचे आणि तिची पूजा करायची आणि दुसरीकडे तिची, ही अशी अवहेलना…!!

पण यावेळेस तिने थोडा सय्यम ठेऊन शांतपणे बोलली,

“पुढचे पाऊल म्हणजे? अजून मी काय काय करायचं? तुम्ही सांगायचंय नी मी ऐकायचंय.. हे आता कदापीही होणार नाहीये.……
आई तुम्हीही एक स्री आहात मग स्री बद्दल असा विचार करताय? स्री ही जननी आहे, बहीण आहे, पत्नी आहे अशी कितीतरी तिची रूपं आहेत..

ती सहनशील ,प्रेमळ आहे वात्सल्य तिच्या ठायी ठायी नांदते तर वेळप्रसंगी ती महिषासुर मर्दिनी बनते.. मुलगा काय आणि मुलगी काय? काय फरक पडतोय.. आज मुली कुठल्या क्षेत्रात मागे आहेत. प्रत्येक काम ती चिकाटीने, कसोशीने, जिद्दीने, प्रामाणिकतेनी करते.

मुलांनी काहिही नाही केले तरी चालते का? आज मेरिट लिस्ट मध्ये सुदधा पहिली मुलगीच रहाते. आईवडिलांची काळजी उत्तमरीतीने घेते आणि मुलंच काय करतात हो? आता या विषयावर न बोललेलंच बरं.. मुलगी दुसऱ्या घरी जावून सुद्धा सर्व घर आपलेसे करते.

सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होते. मी सुद्धा मुलगीच ना…!! मी आज नोकरी करून पैसा कमावते, सर्व घर सांभाळते, तुम्हाला हवं नको ते बघते.

मुलींची उत्तम काळजी घेते आणि त्यांना चांगल व्यक्ती बनवण्याची काळजी घेते म्हणजे मला मुलगा नसल्याची खंत नाहीये अभिमान वाटतो मी स्री असण्याचा…!! मुलगा न होता मुलगीच झाली याची खंत न ठेवता मुलीलाच मुलांप्रमाणे वाढवू यात..

आई मी आज शेवटचे सांगते, यावेळेला तुम्ही माझ्यावर कितीही दबाव टाकला तरीही मी “लिंग परीक्षण चाचणी ” करून घ्यायला तयार होणार नाहीये किंबहुना तिसरे अपत्य नकोच मला…

आणि हो…. तुम्ही मला नवरात्रात सांगताय ना नऊ कन्या जेवू घालायला आणि मी निमूटपणे ते सर्व करतेय अगदी आनंदाने…!!

कशासाठी? तर एक सात्विक समाधान मिळतं… गर्भातच ही कोवळी कळी फुलण्याआधीच तिला कुस्करून टाकायचं.. मुलगी म्हणजे घराचं मांगल्य, मुलगी म्हणजे घराचं चैतन्य… ते घराचं चैतन्यच नाहीसे करायचे.. मग कशाला हव्यात नऊ कन्या जेऊ घालायला?

अहो स्री म्हणजे खेळणं का? कुणाच्याही हातात द्यावं आणि त्यांनीही वाटेल तसे खेळावे….!! आजची स्री सक्षम आहे..

स्वतंत्र आहे मग तिच्या पायात ही बेडी अडकवू नका… लहान तोंडी मोठा घास घेतेय याचे वाईट वाटते हो आई….!! पण आज मला हे बोलावेच लागले..माफ करा मला आई…!”

सासूबाई एकदम दचकून जाग्या झाल्यासारख्या झाल्या आणि बोलल्या, “अगं पोरी होय मी चुकलेच गं..!! माझे डोळे तू उघडलेत नाहीतर मी या अंधारातच चाचपडत राहिले असते… खरंच तू आजची स्री शोभतेस.. स्री असून सुद्धा मला स्री ची किंमत कळली नाहीये. यासमोर या घरात कधीच हा विषय निघणार नाहीये…. मुलगा मुलगी हा भेदभाव कधीच ठेवणार नाही.. हवं तर मला माफ कर मी हात जोडते गं.. विणाने एकदम सासूबाईंचे हात पकडले नी दोघीही जणी एकमेकींच्या गळ्यात पडून आनंदाश्रूनी न्हाऊन निघाल्या…

Image Credit: https://www.eyeem.com/

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!