कर्ज घेण्याआधी या दहा गोष्टींकडे लक्ष द्या!!

कर्ज घेण्याआधी या दहा गोष्टींकडे लक्ष द्या

मित्रांनो, सध्याच्या टेक्नॉलॉजिच्या ह्या फास्ट युगात, प्रत्येक माणसाकडे त्याची आर्थिक उद्दिष्ट, ध्येयं, पुरी करण्यासाठी पुरेसा पैसा आहे असं मला वाटतं.

अगदी लक्ष देऊन पैशांचा योग्य वापर केला ना तर आपल्या सगळ्या आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकतील. फक्त थोडं आर्थिक बाबतीत सज्ञान होणं गरजेचं आहे.

म्हणजेच हातात आलेला पैसा कसा आणि किती खर्च करायचा, आणि आपल्या चांगल्या भविष्या साठी शिल्लक राहिलेला पैसा कसा आणि कुठं गुंतवायचा, एवढं समजून घेतलं तर फायनान्शिअल प्रॉब्लेम्स तुमच्यासमोर उभे राहणार नाहीत.

काही माणसांची स्वप्नं मोठी असतात, तशीच खरी आर्थिक उद्दिष्टं सुद्धा मोठी असतात. त्यांच्यात धाडस असतं, काहीतरी मोठं करण्याची जिद्द असते, आणि त्यांची इच्छाशक्ती सुद्धा जबरदस्त असते.

मग ही मोठी स्वप्न, किंवा मोठी उद्दिष्टं गाठायला जास्त पैशांची गरज लागते. अशा मोठ्या गरजा भागवायला सध्या आपल्या समोर बरेच पर्याय सुद्धा आहेत.

सगळ्याच बँका तुम्हाला मदत करायला तयार आहेत. असंख्य फायनान्स कंपन्या तुमच्या समोर अनेक प्रकारचे नवीन नवीन पर्याय घेऊन येत आहेत.

पूर्वी लोन मिळवायचं म्हणजे फारच कठीण काम होतं. पण आता सगळ्या बँका, फायनान्स कंपन्या तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहेत.

नुसत्या तयारच नाहीत तर तुम्ही फक्त इमेल करायची की लगेच तुम्हाला बँकांचे फोन येतात आणि अगदी कमी वेळात तुमच्या कर्जाला होकार देण्याची त्यांची त्यांची तयारी असते.

टेक्नॉलॉजी मुळे ह्या बँका किंवा फायनान्स कंपन्या काही मिनिटातच तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा सुद्धा करतात.

तुमच्यापुढे कमी व्याज दराची, आणि काही मिनिटात लोनची रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्याची ऑफर सुद्धा ठेवतात. फक्त आपण कर्ज हवंय एवढं म्हणायचं.

इतकी तत्पर सेवा आपल्याला ह्या बँका आणि फायनान्स कंपन्या देतात. मग कितीही मोठं तुमचं आर्थिक ध्येय असू द्या. त्याची पूर्तता तुम्हाला सहज करता येईल. कर्ज घेणं इतकं सोपं झालंय.

कर्ज घेतल्या नंतर तुम्हाला काही नियम पाळावे लागतील, ते जर तुम्ही अगदी काटेकोरपणे पाळलेत तर तुम्हाला आयुष्यात कधीही आर्थिक अडचणी येणार नाहीत.

आणि तुम्ही तुमची मोठी स्वप्न सुद्धा सहज पुरी करू शकाल. त्यासाठीच आजचा हा लेख तुम्हाला विशेष उपयोगी ठरणार आहे. मग बघुयात ते दहा नियम.

१:-पहिला आणि अगदी महत्वाचा नियम म्हणजे, तुम्ही कर्ज इतकंच घ्या की त्याची तुम्हाला सहज परतफेड करता येईल.

बँका किंवा फायनान्स कंपन्या तुम्हाला लोन द्यायलाच बसलेल्या आहेत. त्या कितीही लोन देऊ शकतात. पण मिळतंय म्हणून जास्त लोन घ्यायचं नाही, तर आपल्याला गरज आहे तेवढंच लोन घ्यायचं.

कारण त्याची परतफेड सुद्धा आपल्याला करायची असते. मग हे लोन किती घेतलं पाहिजे? तर ते आपल्याला सहज परत करता येईल एवढं.

तुमचं एकूण उत्पन्न किती आहे, त्यातून तुमचे सगळे खर्च वजा करून जी शिल्लक रक्कम असेल त्यातून तुम्हाला ह्या लोन ची परतफेड करायची असते.

त्या रकमेचा अंदाज घेऊन तुम्ही तुम्हाला किती कर्ज घ्यायचं ते ठरवा. म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

समजा तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचंय, तर त्या लोन चा जो हप्ता असेल तो तुमच्या नेट इन्कम च्या १०% इतकाच असायला पाहिजे.

म्हणजे तुम्ही तुमच्या बचतीचे पैसे सुरक्षित ठेऊ शकाल. तुम्ही जर कार घेणार असाल तर त्या कार चा EMI हा तुमच्या नेट इन्कम च्या १५% पर्यंतच असायला पाहिजे.

तुम्ही अशी अनेक प्रकारची लोन घेतली असतील तर त्या सगळ्या लोन चा मिळून हप्ता तुमच्या नेट इन्कमच्या ५०% किंवा त्याच्या आत असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणत्याही आर्थिक अडचणीत सापडणार नाही. असं फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी लोकांचं मत आहे.

२:- कमी मुदातीचं कर्ज घेणं योग्य.

समजा तुम्हाला जर होम लोन घ्यायचं असेल तर बँका तुमच्याकडे धाव घेतात. घरासाठी कर्जाची रक्कम खूप मोठी असते. बँका तुम्हाला २५/३० वर्षाच्या मुदतीवर कर्ज ताबडतोब देते.

पण हे लोन परत करणे आपल्याला फार नुकसानीचं ठरतं. कारण बँका चक्रवाढ व्याजाने आपल्याला कर्ज देतात. हे व्याज कमी मुदतीत परतफेड केल्यास आपण हे नुकसान टाळू शकतो.

कंपाऊंड इंटरेस्ट हे जर तुम्ही समजावून घेतलेत तर तुम्हाला ह्या लॉंग टर्म लोन चा फायदा आणि तोटा कळेल.

समजा तुम्ही बँकेकडून घरासाठी ५० लाखांचं कर्ज घेतलत आणि १० वर्षात परतफेड करायचं ठरवलं, तर तुम्हाला ५० लाख ह्या कर्जाच्या रकमेवर १० वर्षात ९.७५ % व्याज दराने एकूण ५७% व्याज द्यावे लागेल.

हेच कर्ज जर तुम्ही २० वर्षांत परतफेड करायचं ठरवलं तर त्याच ५० लाखावर २० वर्षात कंपाउंड इंटरेस्ट हे १२८% होईल. इतका मोठा फरक व्याजाच्या रकमेवर दिसेल.

म्हणजे व्याजापोटी तुम्हाला जास्त रक्कम भरावी लागते. जेवढी कर्जाची मुदत जास्त तेवढं व्याज जास्त भरावं लागतं. जर तुम्ही २५ वर्षाची मुदत घेतली तर तेच व्याज १६७% होईल. त्यामुळे घर घ्यायचं असेल तर कमी मुदतीत कर्जफेड करणं योग्य ठरतं.

३:-कर्जाची परतफेड करताना मासिक हप्ते वेळेवर भरले जातील ह्याची शिस्त लावून घ्या.

कर्ज घेतल्या नंतर कामाच्या गडबडीत सुद्धा परतफेडीची, म्हणजे हप्ता वेळेवर भरण्याची काळजी प्रत्येकानं घेतलीच पाहिजे.

ही एक शिस्त आहे. हा हप्ता वेळेवर, न चुकता भरला गेलाच पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवा. एक सुद्धा पेमेंट चुकणार नाही, किंवा उशीर होणार नाही हे भविष्यात खूप महत्त्वाचं ठरतं.

तुमचा एक जरी हप्ता चुकला, चुकून भरायचा राहिला, किंवा हप्ता भरायला उशीर झाला तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर होतो. तुमचं नाव खराब होतं.

तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येतो. आणि भविष्यात पुन्हा तुम्हाला कर्ज मिळवायचं असेल तर तुम्हाला ते कर्ज मिळणं कठीण होऊन बसतं.

पुढच्या कर्जाच्या वेळी तुमचा क्रेडिट स्कोअर बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून आवर्जून तपासला जातो. आणि तुमचं नाव खराब असेल तर बँक तुम्हाला कर्ज देत नाही. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नसते. आणि त्यामुळे त्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत.

४:- आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन, किंवा शेअर मार्केट सारख्या गुंतवणुकीसाठी कधीही कर्ज काढू नका.

काही लोकांना आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायची सवय असते. काही लोकांना आपल्याकडे नवीन खरेदी केलेली मौल्यवान वस्तू दाखवून सतत शेखी मिरवायला आवडतं.

मग ती हौस पूर्ण करण्यासाठी सुद्धा काही लोक कर्ज काढून खरेदी करतात आणि लोकांना दाखवतात. पण असं करणं घातक ठरू शकतं.

तुमच्या येण्यापेक्षा देणं वाढतं, म्हणजे अवाक कमी आणि खर्च जास्त होऊन बसतो. आणि त्या कर्जाचे हप्ते भरताना तारांबळ उडते. मग हप्ते चुकतात, आणि नाव खराब होतं.

गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा कधीही कर्ज काढून गुंतवणूक करू नका. समजा तुम्ही शेअर मार्केट मध्ये कोणाच्या तरी सांगण्यावरून मोठी रक्कम कर्जाऊ घेऊन गुंतवणूक केली.

आणि त्या शेअर्स चे भाव एकदम खाली आले तर तुमचं देणं वाढतं आणि ही गुंतवणूक तोट्यात जाते.

फॉरीन च्या टूर साठी लोन काढण्या ऐवजी तुमचे घर घेण्यासाठी डाऊन पेमेंट भरण्यासाठी ते पैसे तुम्ही वापरू शकता.

पण सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला फॉरीन टूर ला पुढच्या वर्षी जायचंय तर स्वतः तेवढ्या पैशांची बचत करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा.

५:- मोठ्या कर्जाच्या रकमेला कव्हर करायला टर्म इन्शुरन्स घ्या.

मोठं घर, किंवा आलिशान कार घेताना कर्जाची रक्कम खूप मोठी असते. आणि परतफेडीची मुदत सुद्धा जास्त असते. आयुष्यात काही बऱ्या वाईट घटना घडत असतात. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येऊ नयेच, पण काही बरं वाईट घडलंच तर ह्या इन्शुरन्स मुळे तुमच्या परिवाराला त्रास होत नाही.

६:- कर्जाच्या हप्त्यांचा समतोल राखू शकेल अशी गुंतवणूक करायला सुरुवात करा.

होमलोन चे मासिक हप्ते म्हणजेच EMI भरता भरता पुढची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा रिटायरमेंट साठी पैसा जमवणं बरेच जणांना अशक्य वाटतं.

आणि म्हणून त्यासाठी गुंतवणुकीचे योग्य नियोजन महत्त्वाचे ठरते. ते नियोजन कसे करायचे या बद्दलची माहिती सांगणारी लिंक या लेखा शेवटी दिलेली आहे.

७:- तुमच्या लोन चे ऍग्रिमेंट चे पेपर्स सह्या करण्या पूर्वी नीट तपासून पहा.

तुम्ही ज्या बँकेकडून, किंवा फायनान्स कंपनीकडून ज्या वेळी लोन घेता त्यावेळी बँक आणि तुमच्यामध्ये एक ऍग्रिमेंट होतं. त्यावर तुम्हाला सह्या करून द्यायच्या असतात.

ह्या ऍग्रिमेंट मध्ये अनेक क्लॉझेस असतात, ते नक्की काय आहेत हे एकदा नजरेखालून घातले की बरं असतं, नाहीतर सह्या केल्यावर आपण काहीच करू शकत नाही.

माझ्या हेगडे नावाच्या मित्राने फायनान्स कंपनीकडून एक लाख पर्सनल लोन घेतलं होतं. हेगडेने अगदी डोळे झाकून साह्य करून दिल्या. आणि त्याच्या लोन ची रक्कम बँकेत जमा झाली. पण ही रक्कम ₹- ९१८००/- च जमा झाली. विचारल्यावर कळलं की ऍग्रिमेंट प्रमाणे आम्ही व्याज आणि इन्शुरन्स चा प्रीमियम आधीच कापून घेतला.

अश्या प्रकारच्या अनेक गोष्टी, दंड, ह्याचा उल्लेख ऍग्रिमेंट मध्ये केलेला असतो. ते जर अपण आधीच समजावून घेतलं तर नंतर डोक्याला त्रास होत नाही.

हे लोन चे सगळे कागदपत्र आपण वकील, किंवा चार्टर्ड अकाउंटंट ह्यांच्याकडून तपासून घेतले तर कायदेशीर बाजू समजतात. म्हणून लोन घेण्या आधी ही माहिती असणं जरूरीचं असतं.

८:- तुमच्या जास्त व्याज दरच्या एखाद्या लोन च्या जागी कुठून कमी व्याज दराचं लोन मिळाल्यास ते रिप्लेस करा.

तुमच्या कडे चालू असलेल्या सगळ्या लोन्स ची लिस्ट करा आणि त्यातलं जे जास्त व्याजाने घेतलेलं लोन आहे ते दुसऱ्या कोणत्या कमी व्याजाने देणाऱ्या बँकेकडून घेऊन जास्त व्याजाचं लोन परत करा. म्हणजे तुमच्या पैशांची थोडीफार बचत होईल.

तसंच आणखी एखादं पूर्ण लोन तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीवर लोन काढून मिटवू शकता. इन्शुरन्स पॉलिसी वरचं लोन कमी दराने मिळते.

तसंच तुमच्याकडे सोनं असेल तर त्यावर पण लोन घेऊन, जास्त दराचं लोन बदलू शकता.

९:- तुमच्या रिटायर्डमेंट नंतरच्या खर्चासाठी वेगळा ठेवलेला पैसा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरू नका.

आपण भारतीय लोक काहीवेळा लोन घेण्याची कटकट नको म्हणून स्वतः बचत करून ठेवलेली रक्कम मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, परदेशातल्या शिक्षणासाठी वापरून टाकतो. पण तसं करू नका.

तुमच्या रिटायर्डमेंट नंतर तुम्हालाच पैशांची जास्त जरुरी असते. तो बचत केलेला पैसा दुसऱ्या कारणासाठी खर्च करू नका. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना बँका वेगळं लोन देऊ शकतात.

पण तुमचा साठवलेला पैसा खर्च केलात तर परत तुमच्याकडे पैसा कुठून येणार? हा विचार करून तुमची पुंजी सुरक्षित ठेवा.

१०:- तुम्ही जेव्हा लोन घ्यायचा विचार कराल त्यावेळी आपल्या घरातल्या मंडळींशी चर्चा करा, पत्नी, मुलांशी विचार विनिमय करा.

आपण जेव्हा असं मोठं लोन घेणार असतो त्यापूर्वी घरातल्या लोकांशी चर्चा जरूर करावी. कदाचित त्या चर्चेतून तुमच्या लोन घेण्यावर दुसरा काहीतरी मार्ग निघू शकेल. पत्नीकडे काही जमा पुंजी असेल तर त्याचा तुम्हाला हातभार लागू शकतो. किंवा दुसरा काही पर्याय निघू शकतो.

घरच्या व्यक्तींना अंधारात ठेऊन आर्थिक उलाढाल केली तर ते तुमचा मानसिक ताण वाढवू शकतं. काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. ह्याची जाणीव ठेवून लोन संदर्भात कोणताही निर्णय घेतला जावा.

असे आहेत हे दहा नियम, जे तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येयाकडे जाण्यासाठी मोलाची मदत करतील आणि आर्थिक संकटांपासून सुरक्षित ठेवतील.

धन्यवाद.

गृह कर्जाचा तणाव हलका करण्यासाठी त्याच तोडीची गुंतवणूक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा .

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

7 COMMENTS

  1. खूप छान माहिती आहे सर
    सर मी सध्या पतसंस्था 400000 कर्जबाजारी आहे त्याच्याबद्दल काय माहिती सांगा सर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.