नकारात्मक लोकांना कसे सामोरे जावे? ते वाचा या लेखात

नकारात्मक लोकांना कसे सामोरे जावे

लेखन: मुग्धा सचिन

दिवसभर आपल्याला अनेक बरी-वाईट माणसं भेटत असतात, काही आपल्या कामाच्या निमित्ताने किंवा काही अगदी आपली घरातलीच माणसं सुद्धा असतील. या माणसांच्या बोलण्याचा, वागण्याचा आपल्यावर आपल्या नकळत अगदी सूक्ष्मसा का होईना पण परिणाम होतच असतो. यातल्या काही लोकांच्या वागण्याचा त्रास मात्र कधी कधी असह्य होऊन जातो. त्यासाठी काय करायचं ते वाचा या लेखात.

प्रिय मी,

हो, प्रिय मीच..

मलाच हे पत्र मीच लिहित आहे. नाहीतरी दिवसभर आपण आपल्या इच्छेने आणि इच्छेशिवाय सुद्धा किती लोकांशी या ना त्या माध्यमाने बोलत असतो पण स्वतःशी बोलायला वेळ कुठे असतो?

तसं बघायला गेलं तर मनातल्या मनात अनेकदा स्वतःशी संवाद होत असतो, कामावर जाताना प्रवासात म्हणा किंवा सकाळी कामांच्या गडबडीत म्हणा आपण अनेकदा स्वतःशी बोलत असतो पण ते घाईघाईत.

आपल्या दिवसभराच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला स्वतःशी बोलायला असा खास वेळ आपण ठेवतच नाही हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून आज हा स्वतःलाच पत्र लिहायचा घाट घातला.

त्याचं काय आहे, दिवसभर आपल्याला अनेक बरी-वाईट माणसं भेटत असतात, काही आपल्या कामाच्या निमित्ताने किंवा काही अगदी आपली घरातलीच माणसं सुद्धा असतील.

या माणसांच्या बोलण्याचा, वागण्याचा आपल्यावर आपल्या नकळत अगदी सूक्ष्मसा का होईना पण परिणाम होतच असतो.

आपल्याला भेटणाऱ्यापैकी माणसांचा सकारात्मक दृष्टीकोन असेल तर त्यांच्या आल्यावर, आपल्या व्यक्तिमत्वावर चांगलाच परिणाम होणार असतो त्यामुळे या पत्रात मी त्यांच्याबद्दल फार बोलणार नाही.

या पत्राचा मुख्य हेतू आहे तो आपल्या आजूबाजूला, आपल्या संपर्कात येणाऱ्या नकारात्मक लोकांवर बोलण्याचा.

वर लिहिलं तसं काही अपरिहार्य कारणाने आपला अनेक लोकांशी संपर्क होत असतो आणि ते त्यांच्या आयुष्यातली नकारात्मकता त्यांच्या वागण्या-बोलण्यातून हळूहळू आपल्या आयुष्यात ढकलत असतात.

साधारणतः आपल्या हे लक्षात सुद्धा येत नाही, आपण अगदी सहज, हळूहळू त्यांच्या नकारात्मक उर्जेला आपल्या आत प्रवेश करू देत असतो.

पण अशी ही आपल्या नकळत आपल्यात आलेली नकारात्मकता साठत जाते आणि एकेदिवशी प्रमाणाबाहेर गेली की गडबड होते.

आपल्या बाबतीतही असचं झालं ना?

न टाळता येण्यासारखी लोकं आजूबाजूला आहेत!!

कधी कामाच्या किंवा कधी इतर काही कारणाने आपला त्यांच्याशी संपर्क होत असतो आणि दर वेळेला आपल्याला टोचून बोलणे, कमी लेखणे, आपल्या कामात काहीतरी खुसपट काढणे या सारख्या त्रासदायक गोष्टी ते करत असतात.

सुरुवातीला दुर्लक्ष केलं तरी काही काळ गेल्यावर दुर्लक्ष करून भागत नाही.

मग आपल्याला त्यांच्या सगळ्याच बोलण्याचा, वागण्याचा आणि काहीवेळा असण्याचा ही त्रास होऊ लागतो.

आपलीच चिडचिड होत राहते. ही वेळ आली तर असं समजायला हरकत नाही की त्यांच्या नकारात्मक उर्जेला आपण आपल्या आत घर करून राहायला परवानगी दिली आहे.

यात सगळ्यात मजेचा भाग म्हणजे या नकारात्मक लोकांच्या हे गावी सुद्धा नसतं की त्यांच्या वागण्या-बोलण्याचा आपल्यावर असा परिणाम होऊन, आपल्याला त्यांच्या प्रत्येक गोष्टीचाच त्रास होणार असतो.

थोडक्यात, ते काही समस्या निर्माण करत आहेत हेच मुळात त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडून बदलाची अपेक्षा ठेवणं हेच केवळ मूर्खपणाचं लक्षण आहे.

आता आपल्यापुढे सगळ्यात मोठी समस्या काय आहे? की ही लोकं टाळता न येण्यासारखी असल्यामुळे आपल्यालाच यांच्यावर मात करायला काहीतरी उपाय शोधून काढावा लागणार आहे. या साठी काय करायचं?

१. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या रोजच्या छोट्या-छोट्या बोलण्याने, आपल्या चुका काढण्याने किंवा आपण एखादे काम करू शकू का नाही? अशा प्रकारच्या बोलण्याचा आपल्यावर अजिबात परिणाम होऊ द्यायचा नाही.

त्यांची नकारात्मकता त्यांच्यात असलेली ‘खोट’ आहे असं समजून त्यांच्या बोलण्याचा आपल्याशी काहीच संबंध नसून ती त्यांच्यातलाच कोणत्या तरी दोषाची किंवा कमतरतेची सावली आहे असं समजून मनाला निगरगट्ट करणे.

२. त्यांना काही समजावून सांगायच्या भानगडीत न पडणे ही दुसरी महत्वाची गोष्ट.

नकारात्मक उर्जेच्या कवचाखालीच काही लोकं वावरत असतात. या कवचाला फोडायला न जाता, त्याच्याकडे दुर्लक्ष करून, त्याची दखलच न घेता पुढे जाणं हेच शहाणपणाचं असतं.

त्यामुळे त्यांना चार समजुतीच्या गोष्टी सांगणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखंच असतं.

३. “अमुक-तमुक म्हणतो की मला हे जमणार नाही, आता मी मुद्दाम त्याला करूनच दाखवणार!” सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा.

किती वेळा आपल्या नकळत आपण स्वतःशी हे वाक्य बोलतो?

कोणालातरी दाखवायला स्वतःला सिद्ध करायची गरज आपल्याला नसते हे आपण आधी मान्य केलं पाहिजे.

असं वागून आपण एकप्रकारे आपल्याच अहंकाराला खतपाणी घालत असतो आणि अहंकार सुद्धा एक प्रकारची नकारात्मक उर्जाच आहे, नाही का?

४. आपल्याला आपली आवडीची लोकं भेटली की आपल्याकडे बोलायला, त्यांना सांगायला बहुतेक वेळा एकच गोष्ट असते, ती म्हणजे या नकारात्मक, आपल्याला त्रास देणाऱ्या किंवा असं म्हणू आपण ज्यांना आपल्याला त्रास द्यायची परवानगी देतो अशा लोकांबद्दल तक्रारी करणे!

सतत त्याच लोकांबद्दल बोलून, त्यांच्याबद्दलच विचार करून आपण आपल्या आत नकारात्मकता जोपासत असतोच शिवाय आपल्या नकळत ती आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरवत सुद्धा असतो.

आता ज्या प्रकारच्या लोकांपासून आपण सुटका करून घ्यायला बघत आहोत त्याच प्रकारच्या लोकांच्या कळपात आपण शामिल होणं योग्य आहे का?

तर एकूण सांगायचं इतकच होतं की काही गोष्टी जशा करणं भाग असतं तसचं काही लोकांना ‘फेस’ करणं ही भाग असतं.

त्यांच्या वागण्याचा आपल्याला त्रास न होऊ देता पुढे कसं जायचं हे आपल्यावर असतं.. आणि बऱ्याचदा असा स्वतःशी घातलेला संवाद हे करण्यात फायदेशीर ठरतो.. हो ना?

तुझीच,
मी….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.