विसरभोळेपणा हि समस्या असेल तर वाचा, गोष्टी लक्षात ठेवायचे १५ सोपे उपाय

गोष्टी लक्षात ठेवायचे १५ सोपे उपाय

रोजच्या व्यवहारात, वागण्या/बोलण्यात विसरभोळेपणाची जर तुमची अडचण असेल. मुलांनी भरपूर अभ्यास करून केलेला अभ्यास त्यांच्या नीट लक्षात राहत नसेल तर या लेखात सांगितलेले उपाय करण्याची सवय ठेवा.

कधी कालच भेटलेल्या माणसाचे नाव विसरला आहात?

आज ऑफिसमधे द्यायचा रिपोर्ट तयार करायचं लक्षात ठेवले असून सुद्धा काही कारणाने विसरायला झाले?

काल दुपारी जेवायला डब्यात काय होते हे विसरायला होते?

मित्राची जन्मतारीख माहीत असून सुद्धा कधी कधी ऐन वेळेला विसरला आहात? लग्नात कोणा एका नातेवाईकाच्या “काय? ओळखले का?” या प्रश्नाला गोंधळून गेला आहात?

आपला मुलगा/मुलगी भरपूर अभ्यास करून सुद्धा ऐन वेळी लक्षात राहत नसल्याची तक्रार आहे का तुमची?

यातल्या एका पेक्षा जास्त प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे!

रोजच्या जगण्यातल्या धाकधुकीमुळे अशा गोष्टी, तारखा, माणसांचे चेहरे किंवा नावे लक्षात न राहणे हे साहजिकच आहे.

दिवसभर आपल्याला अनेक माणसे भेटतात, त्यांच्या संदर्भात भरपूर माहिती आपल्याला मिळते, कामाची माहिती आपण गोळा करत असतोच वेगवेगळ्या विचारांचे ही काहूर मनात असते.

अशा सगळ्या गोंधळात नेमक्या माणसाचा चेहरा आणि त्याचे बरोबर नाव हे लक्षात ठेवणे म्हणजे अवघड काम होऊ शकते.

बऱ्याचदा या विसराळूपणामुळे आपल्याला गोत्यात आल्यासारखे होते. समजा कालच एका नवीन माणसाशी तुमची ओळख झाली, तुम्ही त्याच्याबरोबर कॉफी पिऊन छान गप्पा मारल्यात आणि आज तोच माणूस समोर आला तर तुम्हाला त्याचा चेहरा तर आठवतो, कालच्या गप्पा सुद्धा आठवतात पण नाव मात्र अजिबात आठवत नाही!

साहजिकच या मुळे आपल्याला खजिल व्हायला होईल पण या विसरभोळेपणाचा दोष आपण स्वतःला सुद्धा देऊ शकत नाही कारण आपला आपल्या स्मरणशक्तीवर फारसा ताबा नसतो.

पण जर तुम्ही अशा विसरभोळेपणामुळे त्रस्त असाल तर काळजी करू नका. या लेखात दिलेल्या युक्त्या तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवून, पाठांतर लवकर होण्यासाठी फायदेशीर ठरतील.

या युक्त्या आचरणात आणून अनेकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश प्राप्त झाले आहे.

स्मरणशक्ती वाढवण्याचे हे उपाय नेमके कोणते आहेत ते बघण्याआधी आपण मुळात का आणि कसे विसरतो हे बघूया!

आधी समजून घेऊ विसरण्यामागचं विज्ञान

१८८५ मध्ये, हर्मन एबिंगहाउस नावाच्या शास्त्रज्ञाने एक सिद्धांत मांडला होता ‘फोर्गेटिंग कर्व’. या कर्वमध्ये आपण काही पाठांतर करून काही काळ गेल्यावर आपल्या किती लक्षात राहते हे समजते.

१८८५ मध्ये जरी हा सिद्धांत मांडला गेला असला तरी तो कालबाह्य झाला नाही.

२०१५च्या विश्लेषणात असे लक्षात आले आहे की हर्मन एबिंगहाउसचा हा सिद्धांत अत्यंत योग्य होता.

तुम्हाला वाचून धक्का बसेल पण ‘फोर्गेटिंग कर्व’ असे सांगतो की पाठांतर केल्याचा अवघ्या दुसऱ्याच दिवशी आपल्या लक्षात फक्त त्या पाठांतराच्या ३० टक्केच माहिती असते!!

यामागचे कारण समजायला सोपे आहेच शिवाय हे कारण जाणून घेतल्यावर पाठांतर करायच्या युक्त्या तुमच्या चटकन लक्षात येतील.

सुरुवातीला जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपल्या मेंदूला जी माहिती मिळते ती महत्वाची आहे का नाही हे समजत नाही व त्यामुळे किती माहिती साठवून ठेवायची हे मेंदूला कळत नाही.

त्यामुळे ती सगळी माहिती ‘शॉर्ट टर्म मेमरी चेंबर’ मध्ये साठवली जाते. जेव्हा परत परत या नवीन शिकलेल्या गोष्टीची किंवा नवीन मिळालेल्या माहितीची आपल्याला उजळणी होते तेव्हा कालांतराने ती माहिती ‘शोर्ट टर्म मेमरी चेंबर’ मधून ‘लॉंग टर्म मेमरी चेंबर’मध्ये जाते.

तुमच्या लक्षात आलेच असेल कि या मागे सगळ्यात मोठा हात एकाच गोष्टीचा आहे आणि ती म्हणजे ‘उजळणी.’

चला तर मग, आपण पाठांतर करायच्या १५ सोप्या युक्त्या जाणून घेऊया:

१. तीन वेळा मनात उजळणी करा

ही अत्यंत सोपी युक्ती आहे. कोणतीही गोष्ट तीन वेळा म्हणायची सवय लागली की ती गोष्ट दीर्घकाळासाठी लक्षात राहते. उदाहरणार्थ, नवीन माणसाशी ओळख झाली व त्या माणसाने आपले नाव सांगितले की ते नाव तीन वेळा म्हणायचे (मनात उजळणी करायची) जेणेकरून आपल्या मेंदूच्या लक्षात येईल की ही महत्वाची माहिती आहे.

२. नवीन माहितीचा जुन्या माहितीशी संदर्भ जोडा

तुम्हाला नवीन एखादी माहिती लक्षात ठेवायची असेल तर तुमच्या चांगली लक्षात असलेल्या एखाद्या जुन्या माहितीशीच संदर्भ जोडल्याने मदत होऊ शकते.

म्हणजे बघा, तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा एटीएमची पिन तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या जन्मतारखेशी निगडीत असलेली ठेवता का?

तशी ठेवली तर ती लक्षात राहते.. का? कारण सोपं आहे. या महत्वाच्या तारखा तुमच्या ‘लॉंग टर्म मेमरी चेंबर’ मध्ये आधीपासूनच असतात त्यामुळे हा नवीन पासवर्ड किंवा पिन तुमच्या स्मरणात दीर्घकाळासाठी राहणार असते.

(हे फक्त उदाहरण आहे पासवर्ड, ATM पिन याबाबत सुरक्षिततेची गोष्ट ध्यानात ठेऊन हे करावे)

३. लिहून काढा:

एखादी गोष्ट लिहून काढली की ती लवकर लक्षात राहते असे म्हणतात. पण यात बऱ्याचदा एक अडचण अशी असते की आपल्याजवळ पेन व कागद नसतो.

अशा वेळेला काय करायचे? तर, आपल्याला ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या आपल्या फोनच्या ‘नोट्स’मध्ये लिहून काढायच्या आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा नजरेखालून घालायच्या.

यामुळे दोन फायदे होतील- एक लिहिण्यामुळे आणि दुसरी लिहिलेली माहिती परत वाचल्यामुळे.

४. ठराविक काळानंतर उजळणी केली जाईल याकडे लक्ष ठेवा:

वरती सांगितलेल्या संशोधनाचा महत्वाचा मुद्दा उजळणी हाच होता. एखादया नवीन गोष्टीची किंवा माहितीची, थोडक्यात पाठांतराची काही ठराविक काळाने उजळणी करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

यात अधिक महत्वाचा मुद्दा असा आहे की ही उजळणी नेमकी कधी व किती काळाने करावी? याच संशोधनातून असे निदर्शनाश आले आहे की उजळणी ही मूळ पाठांतराच्या २० मिनिटे, ५० मिनिटे, ९ तास आणि ५ दिवस अशा ठराविक काळानंतर केली तर पाठांतर पक्के होते.

५. पाठांतराच्या मागची संकल्पना समजून घ्या:

केवळ घोकण्याने सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात असे नाही. काही गोष्टी पाठांतराने नव्हे तर त्यातील आशय समजून घेऊन लक्षात ठेवायच्या असतात.

आपले शाळेचे दिवस आठवले तर ही युक्ती पटकन लक्षात येईल. इतिहासाचे एखादे उत्तर दहा वेळा घोकले तरी पाठ होत नसत, पण ज्यावेळेला आपण त्या उत्तरामागची गोष्ट एखाद्या कथेसारखी ऐकून, त्यातले सगळे संदर्भ समजून घेत असू तेव्हा आपल्याला ते उत्तर पटकनच नाही तर आयुष्यभरासाठी लक्षात राहत असे.

६. दोन गोष्टी एकत्र पाठ करा:

बहुतेकवेळा आपला हाच प्रयत्न असतो की एखादी गोष्ट पाठांतरासाठी घेतली की ती संपूर्ण पाठ होईपर्यंत प्रयत्न करत राहायचे. दरम्यान दुसरी कोणतीच गोष्ट पाठांतरासाठी घ्यायची नाही.

ही पद्धत चुकीची आहे असे जर सांगितले तर सगळ्यानाच आश्चर्य वाटेल पण संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की एका वेळेला दोन वेगळ्या गोष्टी शिकायला किंवा पाठांतराला घेतल्या तर काम लवकर होते.

७. गोष्टी सांगायची सवय आत्मसाद करा:

गोष्टी आपल्या मनात खोलवर रुतून बसतात व त्याचमुळे आपल्या लक्षात राहतात. आपल्या आजूबाजूच्या करमणुकीच्या कोणत्याही माध्यमाचे उदाहरण घ्या, प्रत्येकात गोष्ट आहेच मग ते सिनेमे असू देत, गाणी, व्हिडीओ किंवा अजून काही.

त्यामुळे पुढच्या वेळी कशाचे पाठांतर करत असाल तर त्याच्या संदर्भात मनात एक कथा गुंफा आणि बघा त्याचा पाठांतराला किती फायदा होईल.

८. रेकॉर्ड करा:

ही पाठांतराची अजून एक प्रभावी युक्ती आहे. तुम्ही काही पाठ करायचा प्रयत्न करत असाल तर ते तुमच्याच आवाजात रेकॉर्ड करा आणि फावल्या वेळात ते ऐका.

ही युक्ती अशी आहे की ती दीर्घकाळ करायची सुद्धा गरज भासत नाही. १५ ते २० मिनिटे स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेले ऐकले की ते अगदी पक्के लक्षात राहते.

९. तुकड्या तुकड्याने पाठांतर करा:

ही एक सोपी युक्ती आहे. समजा तुम्हाला दहा अंकी मोबाईल नंबर पाठ करायचा असेल तर दहाच्या दहा अंक एकावेळेस पाठ करायचा आटापिटा न करता तो नंबर तुकड्या तुकड्याने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा.

म्हणजे दहा अंकांची विभागणी करून पाच-पाच अंकांचे दोन समूह केले की पटकन पाठ होतात. अशारीतीने कोणत्याही माहितीची विभागणी केली व प्रत्येक विभागणीवर लक्ष केंद्रित करून हळूहळू पाठांतर केले तर ते जास्त उपयुक्त ठरू शकते.

१०. महत्वाच्या शब्दांवर लक्ष द्या:

ही युक्ती ‘पाठांतराच्या मागची संकल्पना समजून घेणे’ या मुद्याच्या जवळ जाणारी आहे. एखादी मोठी गोष्ट पाठ करताना त्यातल्या महत्वाच्या शब्दांवरच लक्ष केंद्रित करून तेच शब्द ‘कीवर्ड’ सारखे लक्षात ठेवले तर फायदा होतो.

११. जोरात घोकणे:

तुम्हाला पाठ करायचे शब्द किंवा अंक जर तुम्ही जोरात म्हटले तर तीन फायदे होतात. एक तर तुम्ही जे पाठ करायचे आहे ते वाचत असता, तेच तुमच्या तोंडाने मोठ्यांदा म्हणत असता व त्याच वेळेला कानाने ते ऐकत असता.

या तीन क्रियांचा फायदा होऊन तुमच्या पाठांतरावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. असे करताना जर तुम्ही एकीकडे तीच गोष्ट लिहून काढायचा प्रयत्न केला तर ते सोन्याहून पिवळे होईल व एखादी जादू झाल्यासारखे पाठांतर होईल.

१२. योग्य प्रमाणात झोप घ्या:

आश्चर्य वाटले असेल ना? पण यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. आपल्या झोपेचा आणि स्मरणशक्तीचा खूप महत्वाचा संबंध आहे.

खरेतर एका संशोधनातून असे समोर आले आहे की झोपायच्या थोड्या वेळ आधीच काही पाठांतर केले असेल तर ते जास्त लक्षात राहते. शिवाय योग्य प्रमाणात झोप घेणे हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहेच.

१३. स्वतःला आव्हान द्या:

बहुतेक लोकांचा असा समज असतो की पाठांतर म्हणजे वाचन आणि बोलणे आणि म्हणूनच त्यांचे पाठांतर होत नाही.

आपण बऱ्याचदा एखादी गोष्ट दिवसभर लक्षात ठेवायचा प्रयत्न करत असतो पण नेमकी योग्य वेळ आली की ती विसरतो! या साठी काय करता येईल?

स्वतःला दिवसाच्या मधेच, अगदी कामाच्या गडबडीत असताना आव्हान द्या आणि तुम्ही पाठ करायचा प्रयत्न करत असलेली एखादी गोष्ट आठवून बघा.

यासाठी आजूबाजूचे वातावरण पाठांतराला योग्य असलेच पाहिजे असे नाही.. हे तुम्ही कुठेही, अगदी डबा खाताना किंवा लिफ्टमधून जाताना, बसमध्ये असताना सुद्धा करू शकता.

१४. तानापिहिनिपाजा:

बालपण आठवले? इंद्रधनुष्याचे रंग पाठ करताना आपल्याला शाळेत शिकवलेला हा सोपा उपाय!

एखादे वाक्य पाठ करायचे असल्यास त्यातील शब्दांची पहिली अक्षरे घेऊन काहीतरी अर्थपूर्ण वाक्य किंवा लक्षात राहील असा शब्द तयार केला की पाठांतर तर सोपे होतेच शिवाय ते स्मरणात ठेवायला फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत.

१५. ‘टू डू लिस्ट’ अप्लिकेशनचा वापर करा:

आपल्या हातात दिवसभर आपला स्मार्टफोन असतोच. त्याचा वापर आपण या ना त्या कामासाठी दिवसभर करत असतोच. याच फोनचा वापर आपली स्मरणशक्ती वाढवायलादेखील होऊ शकतो.

आपल्याला करायच्या असलेल्या कामांची यादी किंवा आपल्या खरेदीची यादी करून ‘स्टिकी नोटिफिकेशन’ ला ठेवले की ते आपल्या फोनच्या स्क्रीनवर २४ तास समोर दिसेल ज्यामुळे दिवसातून अगणितवेळा आपली त्यावर नजर फिरेल.

असे झाल्यावर विसरण्याचा प्रश्नच येत नाही, हो ना?

तुम्हाला जर तुमच्या घरचे किंवा मित्रमंडळी ‘विसरभोळे’ म्हणून चिडवत असतील तर या युक्त्या नक्की अमलात आणा आणि बघा तुमचे पाठांतर सोपे होईलच शिवाय स्मरणशक्ती सुद्धा वाढेल!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!