कठीण प्रसंगात सुद्धा आनंदी ठेवणाऱ्या नऊ सवयी

कठीण प्रसंगात सुद्धा आपल्याला आनंदी ठेवणाऱ्या नऊ सवयी

वाईट दिवस तुमच्या आयुष्यात येणे तुम्ही अडवू शकत नाही मात्र त्या वाईट दिवसांचा तुमच्यावर होणारा परिणाम कसा वाईट नसेल हे ठरवणे मात्र नक्कीच तुमच्या हातात असते. ह्या लेखात सांगितलेल्या ९ गोष्टी आचरणात आणून तुम्ही वाईट दिवसांचा सामना अगदी हसतमुखाने करू शकता.

आयुष्यातला प्रत्येक दिवस काही सारखा नसतो. कधीतरी सगळे तुम्हाला हवे तसे, तुमच्या मनाप्रमाणे घडते तर कधीतरी तुमच्या मनासारखे, तुम्हाला हवे तसे काहीच घडत नाही.

असे दिवस तुम्हाला मानसिक दृष्ट्या थकवा देऊन जातात. तुमच्या मनाप्रमाणे झाले नाही की तुम्हाला राग येतो, उगीच चिडचिड होते किंवा कधीतरी काहीच न करता, कोणाशीच न बोलता एकट्यानेच बसावेसे वाटते.

बऱ्याचदा असे वाईट दिवस मग कंटाळवाणे होऊन जातात आणि तुमची कामे सुद्धा अशात मागे पडतात. तुम्ही तुमचा मूड खराब करून घेता आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावर, तुमच्या घरातल्यांवर होतो.

अशा वेळेला इतरांनी कितीही समजावले तरी तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसता. मग अशा वेळेला काय केले पाहिजे?

मित्रांनो, वाईट दिवसाला तोंड कसे द्यायचे हे आपल्याच हातात असते. स्वतःला समजावणे अवघड असते, आपल्याला ते जमतेच असे नाही म्हणूनच या लेखात आम्ही अशा ९ टिप्स देणार आहोत ज्याच्यामुळे तुमचा वाईट दिवसाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि तुमच्या मनासारखे घडत नसेल तरी तुम्ही निराश न होता परिस्थितीशी सामना करून त्यातून मार्ग काढायला शिकाल.

१. झाले गेले विसरुनी जावे पुढे पुढे चालावे:

तुम्ही बऱ्याचदा तुमच्या मनात अनेक गोष्टी ठरवून ठेवता. एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या दिवसाकडून ठराविक अपेक्षा असतात आणि या अपेक्षांना जरा सुद्धा तडा गेला तर तुम्ही निराश होता.

तुमच्या मनाप्रमाणे घडले नाही तर तुमची चिडचिड होते. पण असे करणे योग्य नाही. आयुष्यात आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे असा काही नियम नाही.

कधी आपल्या मनासारखे झाले नाही तरी त्याचा फार विचार न करता पुढे चालत राहणे हेच योग्य असते. आपण जर आपल्या अपेक्षाभंगाबद्दलच विचार करत बसलो तर कधीच समाधानी होणार नाही.

याचा अर्थ असाही नाही की आपण स्वतःकडून किंवा इतरांकडून काहीच अपेक्षा ठेवायच्या नाहीत आणि आहेत त्याच्यात समाधान मानून, आहे त्या परिस्थितीच जगायचे.

पण फार अपेक्षांचे ओझे न बाळगता, स्वतःवर व इतरांवर आपल्या अपेक्षा न लादता सुद्धा हळूहळू यश कसे प्राप्त करायचे हे आपण शिकले पाहिजे.

‘जे होते ते चांगल्यासाठीच होते’ हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

एखादी हवी असलेली गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर त्यामागे नियतीचे काहीतरी प्रयोजन असेल आणि कदाचित आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगली गोष्ट आपल्याला मिळणार असेल असा विचार केला तर आपल्याला वाईट दिवसावर मात करायला नक्की सोपे जाईल.

२. वेळ द्या व घ्या:

एखाद्या नवीन कामाला सुरुवात केली की लगेच आपल्याला त्यात यश मिळेल असे नसते. तसेच आपण जर एखादी नवीन गोष्ट शिकायला सुरुवात केली तर लगेच आपली त्याच्यात मास्टरी होईल असे नसते.

एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही तर खचून न जाता आपण आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. मोठ्या-मोठ्या संतांना सुद्धा ध्यान करण्यासाठी खूप वर्षांची साधना लागते.

यश हवे असेल तर अधिरता तर चालत नाहीच शिवाय त्यासाठी न थकता, न कंटाळता अनेक महिने किंवा अनेक वर्षसुद्धा प्रयत्न सुरु ठेवावे लागतात.

त्यामुळे जर एखाद्या दिवशी आलेल्या अपयशामुळे तुम्ही खचून जात असाल व तुमच्या ध्येयापासून विचलित होत असाल तर नेहमी लक्षात ठेवा की अपयश ही यशाची पहिली पायरी असते.

धीराच्या पोटी फळे रसाळ गोमटी…

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले असतील व त्यासाठी आपली उर्जा व वेळ घालवला असेल, खूप कष्ट केल्यानंतर आपल्याला यश मिळाले असेल तर त्या यशाचा आनंद काही औरच असतो.

आपल्या कष्टाने, घाम गाळून, रक्त आटवून मिळवलेल्या यशाचे फळ गोडच लागणार हे नक्की.

३. अपयशाचा सामना करा:

अपयश हे अटळ असते. प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक माणसाला अपयशाला तोंड द्यावेच लागते. असे म्हणतात की जोमाने पुढे जायचे असेल तर चार पावले मागे यायची तयारी हवी. (‘कठीण प्रसंगात चार पावले मागे येऊन आपले इप्सित कसे साध्य करावे’ याबद्दल सांगणाऱ्या लेखाची लिंक सर्वात शेवटी दिलेली आहे.)

त्यामुळे आपल्याला यश मिळाले नाही तर त्याबद्दल सतत तक्रार करण्याने परिस्थिती सुधारणार नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

याउलट आपल्या मनासारखे झाले नाही तर आपले काय व कुठे चुकते याचा आपण आढावा घेतला पाहिजे. आपल्या चुकांमधून आपणच धडे घेतले पाहिजेत.

एकदा झालेली चूक परत होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी. त्यासाठी आपल्याला आपल्या चुकांकडे त्रयस्थपणे बघता यायला हवे.

अपयश आल्यामुळे हार न मानता झालेली चूक सुधारून पुढे जाणे यातच शहाणपण आहे. थोडक्यात अपयशामुळे हरून न जाता सशक्त बना.

आगीच्या झळीमुळेच सोन्याची झळाळी वाढते

बऱ्याचदा असे होते की एखाद्या वादळानंतरच आपल्याला आपली क्षमता कळते. कठीण प्रसंग आल्याशिवाय आपण किती खंबीर आहोत हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे अशा कठीण प्रसंगांकडे आपण एक संधी म्हणून बघायला हवे.

४. अपयशाचे आभार माना:

तुमच्या आयुष्यात एकामागोमाग एक वाईट गोष्टी घडत आहेत? मग निराश न होता त्या गोष्टींचे आभार मानायला लागा कारण वाईट प्रसंगातून गेल्यावरच चांगल्या प्रसंगाची गोडी वाढते.

वाईटाला सामोरे गेल्यावर आपण आपल्या आयुष्यातल्या इतर चांगल्या गोष्टींसाठी मनात आपोआप कृतकृत्य होतो.

तसेच खूप प्रयत्न करून सुद्धा तुमच्या पदरी निराशाच येत असेल तरी धीर सोडू नका. जर तुम्हाला हवे असलेले सगळे अगदी सहज मिळत गेले तर मिळाल्याची किंमत तर तुम्हाला राहणार नाहीच शिवाय तुम्हाला स्वतःला सुधारण्यासाठी किंवा स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काही वावच उरणार नाही.

अशाने एक व्यक्ती म्हणून तुमची प्रगती थांबेल. त्यामुळे पुढच्या वेळेला अपयश आले तर त्यामुळे निराश न होता, अपयशाचे आभार मानून चिकाटीने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल सुरूच ठेवा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे

न थकता न कंटाळता प्रयत्न करत राहिलो तर अशक्य असे काहीच नसते. अवघड परिस्थतीशी सामना करून, येणाऱ्या संकटावर मात करून, मनापासून प्रयत्न करत राहिलो तर यश हे आपलेच असते.

५. रडणे स्वाभाविक आहे:

आपल्याकडे बऱ्याचदा असा एक गैरसमज असतो की रडणे हे कमकुवत माणसाचे लक्षण आहे.

आपल्याला सुद्धा वाटत असते की आपण रडलो तर त्याचा अर्थ आपण सगळ्यांपेक्षा मागे पडलोय की काय किंवा आपण खचून गेलोय की काय असा होतो.

पण हा आपला मोठा गैरसमज असतो. रडणे ही अत्यंत स्वाभाविक क्रिया आहे त्यामुळे आपण स्त्री असो वा पुरुष, आपल्याला जर आपल्या भावना अनावर झाल्या तर मोकळेपणाने रडता यायला हवे.

त्यासाठी रडणे म्हणजे दुर्बळ असणे हा गैरसमज मनातून पुसून काढायची गरज आहे. अनेक भावना मनात कोंडून ठेवून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा वेळोवेळी रडण्याने आपण या भावनांना वाट मोकळी करून देत असतो आणि आपल्या मनाची एकप्रकारे स्वच्छताच करत असतो.

६. सतत काळजी करू नका:

आपली अजून एक वाईट सवय म्हणजे प्रचंड प्रमाणात विचार करणे. विचार करून करून आपण आहे त्या परिस्थितीतल्या सगळ्या शक्यता उगाचच पडताळून बघत असतो.

यामुळे आपण विनाकारण आपली कल्पनाशक्ती वापरून नको नको ते विचार करतो. प्रत्यक्षात तसे काही घडणार नसतेच पण आपल्या विचारांनी मात्र आपण खचले जाऊ शकतो.

यामुळे दोन गोष्टी होतात, एक म्हणजे आपण वेळ वाया घालवतो आणि दुसरे म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीचा सुद्धा गैरवापर करतो. ज्या गोष्टींबद्दल आपण काहीच करू शकत नाही, ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्याबद्दल विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यावर लक्ष देऊन आपण आपल्यात सुधारणा आणू शकतो.

भित्र्यापाठी ब्रम्हराक्षस

लहानपणी एक गोष्ट सांगितली जायची, अंधारात चालताना जो अंधाराला घाबरून सतत मागे बघून चालतो त्याच्यामागे भूत लागते. यातील अंधश्रद्धेचा भाग सोडून दिला तर आपल्याला समजते की सतत नकारात्मक विचार करत राहणे किंवा एखाद्याबद्दल सतत मनात भीती बाळगणे यामुळेच आपण समस्यांना नकळतपणे ओढावून घेत असतो.

आयुष्यात पुढे जायचे असल, वाईट दिवसांमुळे खचून जायचे नसेल तर अशा आवश्यक नसलेल्या भीतीवर आणि काळजीवर आपल्याला मात करता आली पाहिजे.

७. सगळ्यांना अडचणी असतातच:

आपल्या तुलनेत एखाद्याचे आयुष्य सोपे वाटत असेल तर त्यामुळे मनात निराशा बाळगून उपयोग नसतो. हल्ली सोशल मिडियावर सगळेच आपल्या आयुष्यातला आनंद फोटो किंवा पोस्टच्या रूपाने इतरांना सांगत असतात.

त्यातले सत्य किती आणि देखावा किती हे आपल्याला माहीत नसते व आपण ते जाणून घेण्यात आपला वेळ खर्च करणे सुद्धा योग्य नाही.

त्यामुळे, “त्यांच्या घरचे फोटो बघा किती ‘हॅप्पी फॅमिली’ वाले असतात नाहीतर आपलं मेलं आहेच रोजचं रडगाणं”…. असं वाटायचं सोडूनच द्या…

लोकांच्या आनंदात आनंद नाही झाला तरी त्यांच्या आनंदाने दुख: होणे हे अयोग्य आहे. असे म्हणतात ‘दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते’ त्यामुळे लोक कितीही खुश असली तरी प्रत्येक माणूस कोणत्यातरी पातळीवर लढतच असतो हे कळणे महत्वाचे असते.

अडचणी कोणाचीच पाठ सोडत नाहीत तशी आपली सुद्धा सोडत नाहीत आणि त्यामुळे सगळ्यांपेक्षा आपण काही वेगळे नाही हे मान्य केले पाहिजे.

प्रत्येक चमकणारी वस्तू म्हणजे सोने नव्हे

दाखवायचे म्हणून दाखवण्यासारखे खूप असते. खोटे वागून इतरांना भुरळ घालणारे सुद्धा असतात. पण आपण शहाणपण दाखवून खरे खोटे ओळखणे हे आपल्या हातात असते.

दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर किंवा ऐकण्यात आलेल्या सगळ्या कथांमध्ये तथ्य असते असे नाही. खऱ्या-खोट्यातला फरक ओळखायला शिकलो तर अशा छोट्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होणारच नाही.

८. मदत मागा:

सगळ्यांनाच सगळे काही जमते असे नसते. काही वेळेला आपल्याला न जमणारी एखादी गोष्ट असते, ती ओळखून योग्य वेळी आपण दुसऱ्या माणसाची मदत न लाजता मागितली पाहिजे.

मदत मागणे म्हणजे आपला पराभव मान्य करणे किंवा आपली कमतरता दुसऱ्यापुढे उघड करणे असा होत नाही.

बऱ्याचदा आपल्या अडचणी एखाद्या जवळच्या व्यक्तीला सांगून त्याच्याशी चर्चा केली तर आपलेच मन हलके होते आणि आपण जर एखाद्या तणावातून जात असू तर आपल्या मनावरचा भार हलका होतो.

त्यामुळे जेव्हा कधी परिस्थितीमुळे गांजून गेल्यासारखे वाटेल किंवा धीर सुटत चालला आहे असे वाटेल तेव्हा संकोच न करता मदत मागणे यातच शहाणपणा आहे.

९. खुश राहणे हा तुमचा हक्क आहे:

आयुष्यात प्रत्येक क्षणी काहीतरी चांगले घडतच असते. आपण फक्त ते बघायला शिकले पाहिजे.

एखाद्या कंटाळवाण्या दिवसानंतर जर घरी गेल्यावर तुमच्यासाठी आयता चहा आला तर ती त्या दिवसातली चांगली गोष्ट असू शकते.

इतकेच काय, आज सकाळी जाग आल्यावर आपल्याला काहीच शारीरिक तक्रारी नाहीत ही सुद्धा एक उत्तम गोष्ट आहे.

बऱ्याचदा या अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करता. पण जेव्हा तुम्हाला खचून गेल्यासारखे वाटेल तेव्हा याच गोष्टी प्रयत्नपूर्वक आठवून बघा.

यामुळे एखाद्या अडचणीशी दोन हात करताना जर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी मनात आणल्या तर आयुष्य सोपे जाऊ शकते.

जगात सगळ्यांना खुश असण्याचा हक्क आहे, त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे.

लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!!’ असं म्हंटल होतं ना मग त्याच धर्तीवर तुम्ही म्हणा ‘खुश राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!!’

वाईट दिवस आपल्या आयुष्यात येणे आपण अडवू शकत नाही मात्र त्या वाईट दिवसांचा आपल्यावर होणारा परिणाम कसा वाईट नसेल हे ठरवणे मात्र नक्की आपल्या हातात असते. ह्या ९ गोष्टी आचरणात आणून तुम्ही वाईट दिवसांचा सामना अगदी हसतमुखाने करू शकता एवढे मात्र नक्की.

Image Credit: picsart.com

वाचण्यासारखे आणखी काही:

कठीण काळात आजमावून बघा लेखात सांगितलेली ‘एक पाऊल मागे घेण्याची कला’

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “कठीण प्रसंगात सुद्धा आनंदी ठेवणाऱ्या नऊ सवयी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.