वजन कमी करणे स्त्रियांसाठी इतके अवघड का आहे? त्याची कारणे आणि उपाय

सुपरपॉवर असलेल्या ह्या ‘स्त्री’ चा एक खास शत्रू आहे बरं.. तो म्हणजे ‘वजन’.. हा काही केल्या हार मानत नाही.. काही अंडरवेट तर काही ओव्हरवेट..

‘नित्यनेमाने वूमन्स डे’ आला कि ‘वूमन एम्पॉवरमेंटच्या’ गप्पा आपण खूप मारतो. पण स्त्री सशक्त तेव्हाच होईल, जेव्हा ती खऱ्या अर्थाने सदृढ असेल. आपलं वजन आणि आपण यांचे गणित समजून घेण्यासाठी हा लेख तुमच्यासाठी..

वो स्त्री है..!! वो कुछ भी कर सकती है.. हा सिनेमातला डायलॉग स्त्रियांसाठी किती चपखल बसतो नाही..?!

खरंच काय करू शकत नाहीत स्त्रिया..?? अगदी दुर्गेप्रमाणे ८ हात नसले तरी काम मात्र अष्टभुज असल्यासारखे करतात..

सगळ्या आघाड्यांवर पुरून उरतात.. थकतात, चिडतात, रडतात पण पुन्हा उठतात आणि कामाचे डोंगर उचलतात.. म्हणूनच स्त्री शक्तीला आपल्याकडे सगळेच नमन करतात..

इतकी सुपरपॉवर असलेल्या ह्या ‘स्त्री’ चा एक खास शत्रू आहे बरं.. तो म्हणजे ‘वजन’.. हा काही केल्या हार मानत नाही.. काही अंडरवेट तर काही ओव्हरवेट..

कमी वजनी स्त्रिया एक वेळ कधी ना कधी अंगाने भरतील पण.. वजनदार स्त्रियांची करूण कहाणी काय सांगावी..??

साडी बेढब दिसते, जीन्स होत नाही, थंडीत स्वेटर घालावा तर मूठभर घेर वाढतो, फॅशन तर कोणतीच करता येत नाही..

आयुष्य त्या सलवार कुर्त्या मध्ये संपेल की काय असे वाटत राहते..

फिरायला जावं तर मैत्रिणींबरोबर गप्पाटप्पाच जास्ती होतात, जिमला जावं तर रोज जायचा कंटाळा.. म्हणजे नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असा काहीसा प्रकार असतो..

सडपातळ बांध्याच्या मॉडेल्स आणि त्यांनी घातलेले सुंदर पोशाख हे तासंतास न्याहाळण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही..

कारण कधी कधी वजन इतके वाढलेले असते की आपल्या साईझचा कपडा सुद्धा बाजारात मिळणे मुश्किल होऊन बसते.

काही जणी नवऱ्याबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर व्यायाम सुरू तर करतात पण पुढे पुढे सगळे ढेपाळते. कारण नवऱ्याचे वजन तर पटापट कमी होताना दिसते आणि आपला काटा आपल्या वजनाच्या इतका प्रेमात पडतो.. की त्यावरून हटता हटत नाही..

शेवटी आपण वजन कमी करायचा नाद सोडून देतो आणि शरीराची आबाळ करून घेतो..

वाचायला मजेदार वाटेत असलं तरी.. ह्या सगळ्या घटनांशी आपण नक्कीच रिलेट करू शकतो..

पण काय कारण असावं ह्या मागे..?? एरवी कोणत्या कामात मागे न राहणाऱ्या स्त्रियांना, का बरे वजन कमी करणे इतके अवघड होऊन बसते..?

ह्याची काही वैज्ञानिक कारणं बघू..

१. मेटाबॉलिझमचा गोलमाल: वजन कमी करायचं असेल तर मेटाबॉलिझम उत्तम हवे हे गणित आपण सगळेच जाणतो.. मात्र पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये मसल्स म्हणजेच स्नायूंची कमतरता असते..

त्यामुळे आराम करताना ही तुम्ही किती कॅलरीज जाळू शकता हा शरीराचा मेटाबॉलिक रेट सगळा खराब होतो..

हा मेटाबॉलिक रेट संपूर्णपणे तुमच्या मसल मास वर म्हणजेच स्नायूंच्या संख्येवर अवलंबून असतो. आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये मसल्स पेक्षा चरबी म्हणजे फॅटच जास्ती असते..

ह्या फॅट मुळे स्त्रियांचे मेटाबॉलिझम वजन कमी करायला लागणाऱ्या संख्ये पेक्षा खूपच कमी असते.. हा गोलमाल तुमची वजन कमी करण्याची प्रोसेस अगदीच संथ करतो.. आणि तुमचे वजन हलताना तुम्हाला दिसत नाही..

२. बाळंतपणानंतर वजन वाढणे: वजन वाढण्याचे अत्यंत कॉमन असे कारण म्हणजे बाळंतपण.. नऊ महिने डोहाळे 🤰म्हणून आणि नंतर बाळाला पोषण म्हणून घरातल्या मावश्या, काकू, आज्या आणि मातोश्री (दोन्ही कडच्या) आपल्याला साजूक तुपात न्हाऊ घालतात..

पोळी भाजी भात आमटी, लाडू, खीर असे कोणतेही पदार्थ असो त्यात वाटीभर तूप असतेच.. त्यातून व्यायाम जणू वर्ज्याच..

बाळाला सांभाळावे, झोप घ्यावी की व्यायाम करावा..? आपण कोणी सेलिब्रिटी 💃 असतो तर आपल्याकडे नॅनी असती..

पण तशी परिस्थिती नसल्यामुळे आईला, बाळाला सांभाळणे कर्माप्राप्त असतेच🤱.. त्यामुळे रुटीन मधून व्यायाम 🏋🏼‍♀️पहिला हद्दपार होतो..

मात्र बाळसेदार चरबी तेवढी सगळी कडून वाढत जाते.. स्तनापानातून जरी कॅलरीज बर्न होत असल्या तरी आहार आणि व्यायामाच्या तुलनेत त्या कमीच असतात..

वजन कमी करण्यास त्याचा फारसा फायदा नाही..

३. मेनोपॉझ: मेनोपॉझ मध्ये स्त्रियांचे पोट सुटते.. गमतीत त्याला मेनो’पोट’ही म्हणता येईल.. मेनोपॉझ मुळे खूपसे हार्मोन्स शरीरातून कमी होतात त्यामुळे मेटाबॉलिझम कमी होते.. आणि वजन घटण्याचे गणित उलटे पडते..

४. PCOS ची व्याधी: पाच ते दहा टक्के स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास असतो.. कधीही येते, कधीही जाते तर कधी कधी वेळेत येतच नाही..

ह्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील हार्मोन्स संतुलित नसणे.. पण हे हार्मोन्स असे का वागत असावेत..?

डॉक्टर कडे तपासणी केल्यास बऱ्याच जणींना PCOS (polycystic ovary syndrome) ची व्यथा असते.. ह्यामुळे त्यांचे हार्मोन्स सतत बदलतात आणि वजन घटवण्यास अडथळा आणतात..

इतके सगळे प्रॉब्लेम्स स्त्रियांना असले तरी त्या अतिशय हसतमुखाने आयुष्य जगताना दिसतात. ह्या व्याधी पुरुषांमध्ये नसल्याने त्यांना वजन कमी करणे तितकेसे अवघड नसते. पण म्हणून स्त्रियांनी वजन कमीच करायचे नाही का..??

वजन कमी करण्याबद्दलचा वाचकांच्या खूप पसंतीचा असलेले एक लेक मनाचे Talks वर पूर्वीच प्रकाशित झालेला आहे. त्याची लिंक लेखाच्या शेवटी दिलेली आहे. जिज्ञासूंनी नक्की वाचावी.

खरे तर इतके त्रास असताना स्त्रियांनी अत्यंत चुणचुणीत राहणे गरजेचे आहे. फिटनेस मंत्र जर स्त्रियांनी जपला तर त्या इतरांबरोबर स्वतःचेही आयुष्य सुंदर, आनंदी करू शकतात..

काय काय करता येईल ते आम्ही सांगतो.. मात्र तुम्ही नाद सोडू नका.. घरातली स्त्री मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त असेल तर घरदार आपसूकच सशक्त होईल.

https://www.manachetalks.com/12645/womens-health-tests-marathi/

चला तर कोणकोणते व्यायाम प्रकार आणि सकस आहार आपल्याला फिट ठेऊ शकेल त्यावर थोडी माहिती घेऊ..

१. रेसिस्टन्स आणि वेट ट्रेनिंग सुरू करा: हे व्यायाम प्रकार आपले आपल्याला करणे थोडे अवघड असते. त्यासाठी जिम लावणे किंवा पर्सनल ट्रेनरचे मार्गदर्शन असणे गरजेचे आहे.

हा व्यायाम प्रकार केल्याने आपल्या शरीरातील स्नायूंची शक्ती वाढते आणि संख्याही वाढते.

हे मसल्स जितके वाढतील तितका मेटाबॉलिझम रेट वाढणार आणि तुमची अनावश्यक चरबी कमी होऊन तुम्ही सडपातळ पण सुदृढ शरीरयष्टी कमावणार..!!

हे रेसिस्टन्स ट्रेनिंग लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे असते कारण जसजसे आपले वय वाढत जाईल तसतसे आपले स्नायू कमजोर होतात, कमी होतात आणि मेटाबॉलिझम सुद्धा कमी होऊन जाते.

ह्यामध्ये तुम्हाला डंबेल्स मारणे, वजन उचलणे, पुश अप्स, स्क्वॉट्स करणे, ग्रुप एक्सरसाईझ करणे अशा बऱ्याच कसरती कराव्या लागतील. ह्या कसरती शरीरासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.

कधी कधी स्त्रियांना वाटते ही वजनं कशाला उचलायला हवीत..?? आम्हाला काय पहिलवान बनायचं आहे की काय.?

पण वजन उचलल्याचे पहिलवानच बनले जाते हि चुकीची कल्पना आहे. वजन उचलायचा व्यायाम तुमचे मसल्स वाढवणार, मेटाबॉलिझम वाढवणार आणि शेवटी तुम्हाला हवा तसा रिझल्ट देणार.. हे लक्षात ठेवा..

अशा पद्धतीने वर्कआउट शरीरातील साखरेचे प्रमाणही घटवते त्यामुळे मुधुमेहींना किंवा मधुमेह रोखण्यासाठी सुद्धा हे उत्तम व्यायाम प्रकार आहेत..

२. खाबूगिरी थांबवून जरा सकस आहार घ्या:

“मी तर फार फुडी आहे..”

“मला की नाही डायट वगैरे जमत नाही बुवा..”

“कसं काय आवडीचे अन्नपदार्थ सोडून द्यायचे..??”

“मी तर रोज वॉक घेते.. मग मी कशाला डायट करू?”

“सगळे खाल्ले पाहिजे, डायट वगैरे सगळे झूट असते..”

हे डायलॉग आज पर्यंत आपण सगळ्यांनीच मारले आहेत.. पण हे काही फार हुशारीचे लक्षण नाही हं..

आपला आळशीपणा आणि हावरटपणा (सॉरी हं, मनाला लावून घेऊ नका 😜मैत्रीण बोलतेय समजा) लपवण्यासाठी वापरले जाणारे हे बहाणे आहेत..

स्वतःच्या जिभेवर कंट्रोल नाही ठेवला तर नंतर पस्तावायची वेळ येते.. बीपी, शुगर, हृदयरोग आणि असंख्य आजार आपल्याला चिकटतात..

त्याबरोबर आयुष्यही घटण्याची शक्यता असते.

मैत्रिणींनो.. त्यामुळे वेळीच सावधान व्हा..!! पुरुषांपेक्षा जास्ती शारीरिक प्रॉब्लेम असल्यामुळे स्त्रियांना आहारात देखील जास्ती मेहनत घ्यावी लागते.

बारीक होण्यासाठी पुरुषांना दिवसाला १५०० कॅलरीज लागतात तर स्त्रियांना फक्त १२०० कॅलरीज घेणे योग्य असते. जर तुम्ही हाय इंटेनसिटी व्यायाम करत असाल तरच कॅलरीजची संख्या वाढवली जाते.

बरं पण १२०० कॅलरीज घ्यायच्या म्हणजे एकावेळी ४ सामोसे खाल्ले की झाल्या तितक्या कॅलरीज.. मग काय हवे ते खायचे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे.

१२०० हेल्दी उष्मांक हवेत.. जे अन्न पटकन पचेल, ज्याचे चरबीत रूपांतर होणार नाही असेच अन्न घेणे म्हणजे डायट..

आणि एक महत्वाचे म्हणजे दुसऱ्या मैत्रिणीला दिलेला डायट चार्ट तुम्हाला लागू होत नाही.

प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे त्यांचा आहार असतो. कोणाला शाकाहारी तर कोणाला मांसाहारी दिलेला असतो. त्यामुळे डायट घेताना योग्य सल्ल्यानुसार घेतल्यास उत्तम.. चुकीचा डाएट घेतल्याने तुम्हाला निकाल मिळणार नाही तर तुमचा निकाल लागण्याची शक्यताच जास्ती असेल..

ह्या दोन गोष्टींवर तुम्ही जरा व्यवस्थित लक्ष दिले तर तुम्हाला हवी तशी ड्रीम फिगर तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकाल.. पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या..

३. लॉंग टर्म प्लॅन करा: व्यायाम आणि डायट करून झटपट निकाल हवा असेल तर तो मिळतो.. मात्र ही ऍक्टिव्ह लाइफस्टाइल एकदा सोडली की पुन्हा आधीच्या आकारापेक्षाही जास्त आपण फुगू शकतो हे विसरता कामा नये..

फिटनेस हा लाईफ लॉंग प्लॅन आहे.. आज व्यायाम केले की आयुष्यभरासाठी आपण स्लिम ट्रिम राहणार नाही.. हे सतत करणे क्रमप्राप्त आहे.

हेल्दी डायट देखील रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे.. बारीक झाल्यावर पुन्हा जंक फूड, फॅटी फूड चे सेवन सुरू केले तर काही खरे नाही..!!

आयुष्य भर काही करायचे असेल तर… पण नेमके इथेच सगळे कच खातात.. तसे करता कामा नये. चांगले डायट म्हातारपणी सुद्धा कामाला येते.

प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम ह्याची गरज वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळी असते. आणि तशी फॉलो करत गेल्यास आपल्याला निरोगी आयुष्य मिळते..

जर व्याधी विरहित आयुष्य हवे असेल तर तुम्हाला नक्कीच एक हेल्दी लाईफस्टाईल निवडावी लागेल..

कारण अवघड असले तरी स्त्रियांसाठी काहीच अशक्य मात्र नाही.. आम्हाला माहीत आहे तुम्ही नक्कीच करु शकाल.. आणि इतर स्त्रियांना जागृत करून निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तेजन देऊ शकाल..!! म्हणून

वूमन एम्पॉवरमेंट आपण स्वतःपासून सुरू करूया..!! थोडं स्वतःसाठी जगुया.. चला वजन घटवूया..!!

वाचण्यासारखे आणखी काही:

वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “वजन कमी करणे स्त्रियांसाठी इतके अवघड का आहे? त्याची कारणे आणि उपाय”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय