श्रीमंत होण्यासाठी तुमची संपत्ती नाही तर ‘अर्निंग ऍबिलिटी’ वाढवा

श्रीमंत होण्यासाठी तुमची संपत्ती नाही तर 'अर्निंग ऍबिलिटी' वाढवा

तुम्ही स्वतःला स्वतःला नीट ओळखलंत ना, तर पैसाच तुमच्याकडे धाव घेईल. हे स्वतःला नीट ओळखणं म्हणजे नक्की काय? तेवढं समजून घ्या ह्या लेखातून.

आपलं करिअर आपण सुरू केलं असो किंवा नसो. पण आपलं शिक्षण पूर्ण झालं की पैसा कमवायचे विचार डोक्यात घोळायला लागतात ना?

आपल्या घरची मंडळी पण आपल्या नोकरी व्यवसायाच्या निवडीसाठी आपल्याला सपोर्ट करायला लागतात.

आपली आवड काय, आपली साईड कोणती त्यावर आपण नोकरी किंवा व्यवसायाची निवड करतो. मनाशी काही स्वप्न बाळगतो, आणि ती पुरी करण्यासाठी सुरू होते आपली धडपड.

याउलट कधी कधी असाही होतं कि अगदी इंजिनिअरिंग किंवा फार्मसी, मॅनेजमेंट सारखे उच्च आणि महागडे शक्षण घेऊन फक्त स्वतःला न ओळखू शकल्याने ती मुलं पडेल ते आणि मिळेल ते काम करायला तयार होतात.

कोणी म्हणतं मोठी स्वप्न बघा, तर कोणी म्हणतं अंथरून पाहून पाय पसरा, तर कोणी म्हणतं झेपेल तेवढं करा, लहान तोंडी मोठा घास नका घेऊ.

मग प्रश्न पडतो की नक्की करायचं काय? ऐकायचं कोणाचं? निर्णय कसा घ्यायचा? अशी द्विधा मनस्थिती आपल्या पैकी बऱ्याच जणांची झाली असेल ना?

कारण प्रवाहाच्या विरुद्ध गेलो आणि नुकसान झालं तर?

घरचा चालू व्यवसाय सोडून नोकरी करायला लागलो आणि नोकरीच गेली तर? अशा शंका मनात येतात. कारण काम सुरु केले तर पुढे ते कसे होईल याची शाश्वती नसते.

मित्रांनो, सगळ्या निगेटिव्ह वातावरणात आपण निगेटिव्ह व्हायचं नाही हे लक्षात घ्या.

जे लोक त्यांचे निगेटिव्ह विचार आपल्यावर थोपवतात ते यशस्वी झालेले आहेत का? ह्याचा विचार आपण प्रत्येक निर्णय घेण्याच्या टप्प्यावर करायचा

आपलेच लोक असतात म्हणून त्यांना एकदम तोडून टाकायचं नाही. त्यांना मान तर द्यायचा. पण आपले विचार सकारात्मक ठेवायचे. म्हणजे जे लोक अनुभवातून यशस्वी झालेत त्यांच्याकडून कानमंत्र मिळवा.

आता ह्या लेखाचं मोठं सिक्रेट तुमच्यासमोर मी ठेवतोय. “कानमंत्र” म्हणा हवं तर ह्याला. तरी चालेल.

पण त्या आधी एक सांगा की सर्व सामान्य लोक सगळ्यात मोठी संपत्ती कशाला मानतात? भरपूर पैसा?, जमीन जुमला?, मोठ्ठा बँक बॅलन्स?, नक्की कशाला मानतात मोठी संपत्ती??

आणि तीच संपत्ती मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपड करतात.

मित्रांनो, पैसा, जमीन जुमला, मोठा बँक बॅलन्स, ही खरी आणि मोठी संपत्ती नाही.

सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमच्यात असलेली “अर्निंग ऍबिलिटी” म्हणजेच “पैसा मिळवण्याचं कौशल्य” हे कौशल्य तुमच्याकडे जितकं चांगलं असेल तीच तुमची खरी संपत्ती आहे हे लक्षात घ्या.

ही कमाई करण्याची क्षमता, टॅलेंट, हे प्रत्येकाकडे असते. पण प्रत्येक व्यक्ती त्या क्षमतेचा योग्य वापर करतोच असं नाही. म्हणजेच त्या क्षमतेला आपण ओळखत नाही.

श्रीमंत लोक, मध्यम वर्गीय, आणि गरीब, असे हे तीन फरक आपल्याला जे दिसतात ते ह्याच क्षमते मुळे.

श्रीमंत लोक पैसे कमावण्यात खूपच एक्स्पर्ट असतात, मध्यम वर्गीय ऍव्हरेज असतात, आणि गरीब हे पैसे कमावण्याच्या टॅलेंट पासून खूप दूर असतात, ते कष्ट च करत राहतात.

गरीब, श्रीमंत यातला नक्की फरक काय आहे माहित आहे का? तो आहे तुमची “अर्निंग ऍबिलिटी” म्हणजेच “पैसा कमावण्याची क्षमता” ज्याच्याकडे ही क्षमता जास्त असेल तो चांगली कमाई करतो.

तुम्ही, नोकरी करत असाल, किंवा व्यवसाय करत असाल, सेल्स क्षेत्रात असाल, किंवा मार्केटिंग क्षेत्रात असा, आज जे काही काम तुम्ही केलं, त्यापेक्षा जास्त आणि चांगलं काम मी उद्या कसं करीन ह्याचा विचार रोज करा.

ह्यावर्षी तुम्ही तुमच्या क्षेत्रात जितकी प्रगती केली त्यापेक्षा जास्त प्रगती पुढच्या वर्षात कशी कराल ह्याचा विचार सतत तुमच्या डोक्यात चालू ठेवा.

आजच्या पेक्षा उद्याचा दिवस मला जास्त चांगला कसा करता येईल, त्यासाठी मला कोणाचं मार्गदर्शन मिळवता येईल, काय नवीन शिकून घेता येईल, काय वाचून मला आयडिया येईल?

असं रोज आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी काय करता येईल ते करा. आपोआप उद्याचा दिवस आजच्या पेक्षा प्रगतीचा ठरेल. तुमची “अर्निंग ऍबिलिटी” म्हणजेच “पैसा कमावण्याची क्षमता” आपोआप वाढत जाईल.

म्हणजे आज आपण जे काही काम करतोय त्यात “बेस्ट” बनायचं. सेल्स मध्ये असाल तर त्यात बेस्ट बना, व्यवसायात असाल तर तो व्यवसाय तुमच्या नसा नसात भिनायला पाहिजे.

गृहिणी असाल तरी नवनवीन गोष्टी शिकून घेता येतील. शिकलेल्या गोष्टींना व्यवसायाच्या रूपात बदलून स्वतःची ओळख निर्माण करून उंच झेप घेता येईल.

म्हणजे सगळी माहिती मिळवून तुम्ही एक्स्पर्ट व्हायचं. हे मला माहिती नाही…… ते मला जमत नाही…….… असं कधीच नाही होऊ द्यायचं.

एकदम परफेक्ट, मास्टर व्हायचं आपापल्या क्षेत्रात!!

ह्या “बेस्ट” होण्याचं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला सहज कळेल.

आपल्या भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान ‘विराट कोहोली’. तो आधी एक बॅट्समन होता, पण त्याने आपल्या बॅटिंग मध्ये रोज सराव करून करून बदल केला.

सगळ्या प्रकारच्या बोलर्सना कसं तोंड द्यायचं ते नीट निरीक्षण केलं, अभ्यास केला, सगळं सगळं शिकून त्यात एक्स्पर्ट झाला.

म्हणजेच त्याने त्याची बॅटिंग करण्याची क्षमता वाढवत नेली. फिटनेस ची काळजी घेतली, फिल्डिंग चा सराव केला, डावपेच शिकून घेतले, म्हणजे त्याच्यातल्या टॅलेंट ला त्याने चांगली धार लावली, आणि सर्वगुण संपन्न झाला. म्हणून तो आज टीमचा कप्तान झाला.

टीमचा कप्तान तर झालाच पण त्यामुळे त्याला जगात प्रसिद्धी मिळाली, मान्यता मिळाली, आदर मिळाला, शिवाय भरपूर पैसा मिळवून देणाऱ्या असंख्य टी. व्ही. वरच्या जाहिराती मिळाल्या.

क्रिकेट मधले असंख्य पुरस्कार मिळाले, मिळत आहेत, तो जितका ह्या त्याच्या कौशल्याचा वापर जास्त करेल तितका त्याला पैसा मिळत जाईल.

बघा आता तो पैशाच्या पाठीमागे धावत नाही. तर पैसा त्याच्या पाठीमागे येतोय. ही त्याची क्षमता जेंव्हा कमी होईल तेंव्हा ह्या पैशाचा ओघ कमी होईल.

पण तोपर्यंत त्याच्याकडे इतका पैसा असेल की त्याला पुढची काहीच काळजी करण्याचं कारणच राहणार नाही.

मग तुम्ही तुमच्यातली ही ‘अर्निंग ऍबिलिटी’ कशी वाढवाल?????

तर तुम्ही जे काही काम आत्ता करताय त्यात एक्सपर्ट व्हा. आणखी माहिती मिळवण्यासाठी वाचन वाढवा, इंटरनेट सारखं आयुध आज तुमच्या हातात असताना माहिती कुठून मिळवायची? हा प्रश्नच एकदम क्षुल्लक होऊन जातो हे आधी समजून घ्या.

माहिती देणारी सेमीनार्स अटेंड करा. हवंतर एखादा कोर्स करून संपूर्ण ज्ञान घ्या. त्या कामात अगदी निपुण व्हा. त्यासाठी होणारा हा खर्च नसून तुमची ती इन्व्हेस्टमेंट आहे असं समजून खर्च करा.

केलेला खर्च असो नाहीतर दिलेला वेळ असो, तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्यासाठी करणार आहात. त्याचा फायदा तुम्हालाच पुढे होणार आहे.

तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाचा ५% हिस्सा तुम्ही तुम्हाला स्वतःला तुमच्या क्षेत्रात एक्स्पर्ट करण्यासाठी खर्च करा. म्हणजे आपल्या कामात अपडेट राहण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकाव्या लागणार असतील तर मागे पुढे पाहू नका.

स्वतःवर केलेला खर्च तुमच्या उन्नती साठी करायचा आहे. तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी करायचा आहे. नवीन काही शिकण्यासाठी करायचा आहे.

आपण खूप मोठी मोठी स्वप्न पाहतो. पण ती स्वप्न साकार करायला, नवनवीन गोष्टी शिकून घ्यायचे आपण किती प्रयत्न करतो?

ही एक हास्यास्पद गोष्ट आहे, की स्वप्न खूप मोठी बघायची पण स्वतःला घडवण्यासाठी अजिबात कष्ट घ्यायचे नाहीत.

आपल्याला सर्वगुण संपन्न व्हायला थोडा वेळ द्यावाच लागतो, गरज पडेल तेव्हा तज्ञांकडून शिकण्याची सुद्धा तयारी ठेवावीच लागते, कष्ट ही घ्यावेच लागतात हे लक्षात घ्या.!

मोठं व्हायचं तर स्वतःला आधी मोठं करा. स्वतःवर मेहेनत घ्या, म्हणजेच तुमची क्षमता वाढवा, कौशल्य वाढवा.

हीच तुमची खरी संपत्ती आहे. ती मिळवलीत की तुम्हाला पैशाच्या मागे धावायला लागणार नाही, पैसाच तुमच्याकडे धाव घेईल. जमीन जुमला खरेदीसाठी तुमचे तुम्ही सक्षम असाल, बँक बॅलन्स तर मोठाच राहीलच.

आयुष्यात तुमची स्वतःची प्रगती, आर्थिक प्रगती, मानसिक प्रगती साधायची असेल तर तुम्ही तुमची ‘अर्निंग ऍबिलिटी’ वाढवा, क्षमतांचा विकास करा. स्वतःला सक्षम बनवा. एक्सपर्ट बनवा, बेस्ट बनवा.

आधी “Be”, म्हणजे स्वतःला सक्षम बनवा, बेस्ट बनवा. एक्सपर्ट बनवा.

नंतर Do, म्हणजे जे काही काम करायचंय ते करायला लागा. मन लावून काम करा. कामात स्वतःला झोकून द्या.

आणि त्यानंतर Have, म्हणजे जे काही हवं आहे ते मिळवा. ही Be — Do — Have फिलॉसॉफी वापरून आयुष्यात यश मिळवा.

याउलट दुसरी Have-Be-Do ही फिलॉसॉफी कधीही वापरू नका. म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसा आला पाहिजे, म्हणजे मी पैसेवाला होईन आणि मग मला पाहिजे ते करता येईल. मित्रांनो, असं कधीच होणार नाही.

तुम्हीच एक विचार करा की तुम्ही एखादी नोकरी शोधायला गेलात तर तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला काय काय येतं?

म्हणजे तुम्ही कशा कशात एक्स्पर्ट आहात? जर तुम्ही एक्स्पर्ट नसाल तर तुम्हाला ती नोकरी मिळणार नाही.

दुसरी कोणती तरी नोकरी नाईलाज म्हणून तुम्हाला करावी लागेल. किंवा उद्या तुमच्या कामासाठी तुम्ही एखादा माणूस कामावर ठेवाल तर तो किती एक्सपर्ट आहे, हे जाणूनच तुम्ही त्याला नोकरीवर ठेवाल ना?

म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या कामात एक्सपर्ट असणं!!

बघा अशी सुद्धा उदाहरणं असतात कि एखाद्या इंजिनिअरिंग करून एम. बी. ए. केलेल्या उमेदवारापेक्षा फक्त आय. टी. आय. झालेला उमेदवार एखाद्या कम्पनित आपल्या कामाने मॅनेजमेंटची मनं जिंकतो कारण आपल्या कामात प्राविण्य मिळवून त्याने आपली ‘पैसे कमावण्याची क्षमता’ वाढवलेली असते.

सगळीकडे असंच आहे. एक्स्पर्ट असला तर जास्त पगार द्यायला सुद्धा लोक तयार असतात. पण कच्चा लिंबू असेल तर नको म्हणतात. म्हणून सक्षम व्हा, आणि सिद्ध करा स्वतःला.

हीच तुमची संपत्ती आहे. तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. पैशाच्या पाठीमागे धावू नका. तोच तुमच्या पाठीमागे धावत येईल.

तुमच्याकडे पैसा धावत आला की मात्र तुम्हाला मिळालेला हा “कानमंत्र” तुमच्या ओळखीच्या लोकांना, मित्रांना, ज्यांना तुम्हाला मदत करायची आहे, जे सक्षम नाहीत, अशा लोकांना जरूर, जरूर द्या.

कारण समाजाचं, देशाचं ऋण आपल्यावर आहे ते काही अंशी तरी आपण हलकं करू शकतो. ही तुमची संपत्ती जेवढी तुम्ही खर्च कराल तेवढी तुमची मिळकत वाढणार आहे हे कायम लक्षात ठेवा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

4 COMMENTS

  1. फारच सुरेख लेख. एक अमूल्य विचार येथे शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद. गुढी पाडव्याच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा

  2. फारच सुरेख लेख. एक अमूल्य विचार येथे शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद. गुढी पाडव्याच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.