तल्लख बुद्धी, प्रचंड स्मरण शक्ती, यासाठी काय करता येऊ शकेल?

तल्लख बुद्धी प्रचंड स्मरण शक्ती

काही लोकांना असामान्य असलेलं बघतो आपण? मग ते असामान्य जन्मजातच असतात का? कि तुमच्या मुलांना वाढवताना त्यांच्यात हि बीज रोवता येऊ शकतील?

तर असेच बुद्धी तल्लख करणारे आणि तुमच्यातली क्षमता वाढवणारे काही उपाय वाचा या लेखात.

तल्लख बुद्धी, प्रचंड स्मरण शक्ती, ह्या गोष्टींना तुम्ही दैवी देणगी मानता का?

कारण अनेक गोष्टी लक्षात ठेवून एकामागे एक सतत काहीतरी करणारी माणसं आपण पाहतो.

वर्तमानपत्रात बातम्या वाचतो, वयाच्या पाचव्या वर्षी एखादा मुलगा भरपूर प्रेक्षक समोर असताना एखाद्या सराईत माणसासारखं वाद्य वाजवतोय, किंवा मस्त आलाप घेऊन गातोय.

अशा मुलांना आपण म्हणतो की इतक्या छोट्या वयात वाद्य वाजवतोय किंवा गातोय म्हणजे दैवी देणगी घेऊन आलाय.

आजकाल छोटी मुलं सुद्धा आपल्याला आयुष्यात कधीच करता आले नाहीत असे सायन्स आधारित प्रयोग करतात, कोणी विमान तयार करून आकाशात उडवून दाखवतात किंवा ड्रोन स्वतः तयार करून त्याला कॅमेरा लावून सगळ्या शहराच्या वरून फिरवून कुठं काय चाललंय त्याची माहिती, फोटो काढून आणतात. ह्याला तुम्ही काय म्हणाल???

विराट कोहोली हा वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळायला लागलाय. लता मंगेशकर वयाच्या तिसऱ्या वर्षी गायला लागल्या, पाचव्या वर्षी लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये लता मंगेशकर यांनी परफॉर्म केलं.

हे टॅलेंट्स असे काही लोकांना अपार उंचीवर नेऊन ठेवतात. मग आपण कुठे कमी पडतोय?

आपण शाळा, कॉलेज अगदी मन लावून अभ्यास करून पूर्ण केलं तरी सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डीनरी नाही झालो. सर्व सामान्य जीवनच जगतो आहोत ना? ह्याचं कारण आपण कधीच शोधून काढलं नाही.

शाळेत रट्टा मारून मारून सगळ्या विषयांचा अभ्यास पूर्ण केला, कॉलेज पूर्ण करून डिग्री घेतली. मग आपलं चुकलं काय?

आपल्याला ठरवून दिलेली शिक्षण पद्धती आपण स्वीकारून त्या पद्धतीने आपल्या शिक्षणाची पूर्तता केली. पण आपल्यात काय विशेष क्षमता आहे, आणि ती कशी वाढेल याचा आपण कधीच विचार केला नाही.

कारण तसं कोणी आपल्याला ओळखून त्या आपल्यातल्या टॅलेंट ला कधी चालना च दिली नाही. खरंय ना? मग आपण एक्स्ट्रा ऑर्डीनरी कसे होणार?

बुद्धीला तल्लख बनवायचं असेल तर काय काय आवश्यक आहे हे समजून घेणं जरुरीचं आहे.

लहानपणी आपली आकलन शक्ती (ग्रास्पिंग पॉवर) चांगली असते. म्हणून त्यावेळी जास्त काही शिकता येतं. चांगलं वाचन, फास्ट लिखाण ह्या सवयी आपण लहान असतानाच लावून घेणं आवश्यक असतं.

म्हणजे मोठेपणी ह्या सवयी आपल्याला चांगल्याच उपयोगी पडतात.

सुंदर, वळणदार अक्षर, ही सुद्धा कला आपण आपल्यात डेव्हलप करू शकतो. आज कॅलिग्राफी म्हणून लोक ही कला शिकायला जातात.

पण जर लहानपणीच ही कला आपण आत्मसात केली असेल तर आपण मोठेपणी ह्यात मास्टरी मिळवू शकतो. त्यात मोठं नाव कमावू शकतो. ती कला आपल्याला चांगलं नाव मिळवून देऊ शकते, त्यात कमाई सुद्धा करता येते.

आता मोठेपणी सुद्धा अशी कला शिकणं काही अवघड नाही. ज्याला हे सहज शक्य आहे त्यांनी ही कला डेव्हलप करायला काही हरकत आहे का? तुमच्यातली ही एक क्षमता तुम्ही ओळखून तुमची बुद्धी ह्या कामी लावू शकता. लोक तुम्हाला टॅलेंटेड माणूस म्हणून मान देतील.

लहानपणीच तुम्ही प्रश्न विचारायची सवय लावून घेतलीत का? सतत प्रश्न विचारले तर तुम्ही आई वडिलांचा किंवा शिक्षकांचा एखादा फटका खाल्ला म्हणून ती सवय बंद केली असेल तर तुमच्यातली उत्सुकता कमी कमी होत गेली.

आणि तुम्ही नवीन काही जाणून घ्यायची क्षमताच घालवून बसलात.

लहानपणी प्रश्न विचारणाऱ्या मुलांना आई वडील किंवा शिक्षक यांच्याकडून योग्य उत्तर मिळालं की त्या त्या विषयाची जाण मुलांना यायला लागते.

आणि बुद्धीला चालना मिळते. अशी मुलं ड्रोन स्वतः तयार करू शकतात. त्यांची स्वतःची बुद्धी तल्लख व्हायला मदत होते.

म्हणून प्रश्न विचारणाऱ्या मुलांना आई वडिलांकडून योग्य उत्तर मिळणं जरुरीचं असतं. मुलांनी प्रश्न विचारावेत म्हणून घरात तसं वातावरण असायला पाहिजे. मुलांना प्रश्न विचारायची भीती वाटायला नको.

मोठं झाल्यावर सुद्धा तुम्ही तुमची आवड असेल ती कला वाढवू शकता. काहीही नवीन शिकणं म्हणजे तुमच्या बुद्धीला चालना देणं. मग दर वर्षी तुम्ही कोणतीही नवीन कला आत्मसात करू शकता, असं तुमच्या बुद्धीला तल्लख बनवू शकता.

नेहमीच्या शिक्षण पद्धती बरोबर काही वेगळं मुलांच्या आवडीचं शिकायला मिळालं तर त्यांचा कल कोणत्या बाजूला आहे हे समजेल.

त्यांचा कल समजण्यासाठी दहावी बारावी झाल्यावर कलमापक चाचणी किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेण्यापेक्षा लहानपणापासून त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू द्या, प्रश्न विचारू द्या, नाही मिळाली तर उत्तरं स्वतःहून शोधू द्या आपोआप त्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे ते समजेल.

तुमच्या मुलाला गणित चांगलं जमत नसेल पण ड्रॉईंग मध्ये तो जर त्याचं कौशल्य दाखवत असेल तर ड्रॉईंग साठी त्याला प्रोत्साहन द्या. त्यात तो मोठी प्रगती करू शकेल.

एखाद्याला गणित चांगलं जमत नाही पण अभिनय उत्तम करू शकत असेल तर त्याला अभिनयाचं चांगलं ट्रेनिंग दिलं तर तो चांगला ऍक्टर बनू शकतो. ते त्याचे टॅलेंट ओळखले गेले पाहिजेत.

काही मुलं अभ्यास चांगला करतात पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायचं त्यांना माहीत नसतं. आई वडिलांनी त्याला अबॅकस (Abacus) शिकायला प्रोत्साहन दिलं पाहिजे.

अबॅकस म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकार, कितीही मोठी संख्या असुद्या तो धडधड बेरीज, वजाबाकी, किंवा गुणाकार भागाकार सहज करू शकतो.

३९७ चा सुद्धा पाढा म्हणायला सांगितला तर धडा धड म्हणू शकतो. ३८४७२९४६७१ × २६८२७५३९२६ असला मोठा गुणाकार किंवा भागाकार कॅलक्युलेटर न वापरता सहज करू शकतो.

त्याची, स्मरण शक्ती, आकलन शक्ती, निर्णय क्षमता, आत्मविश्वास ह्यात जबरदस्त वाढ होते.

म्हणजेच बुद्धीला चांगलीच धार येते. आता यापासून तुमचं मूल गणितज्ञच झालं पाहीजे अशीही काही अपेक्षा ठेऊ नका पण यातून त्याला त्याची क्षमता कळू द्या.

पंधरा सोळा वर्षांचं वय झालं कि मग ऍप्टिट्यूड टेस्ट करण्यापेक्षा लहानपणीच मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट करणं मात्र फायद्याचं ठरू शकतं. मुलगा कसा आहे? आक्रस्ताळी आहे, का शांत आहे, का निरीक्षण करून सगळं आत्मसात करू शकतो, का आपल्या चांगल्या गुणांचं प्रदर्शन करून लोकांच्या आवडीचा होतोय. हे सगळं कळलं की तो कोणत्या साईडला जाईल, आर्टस्, सायन्स, कॉमर्स, का आणखी काही हे आपल्याला समजतं.

मुलं हायपर ऍक्टिव्ह आहेत का निवांत आहे, सोशल, आहे का हुशार आहे हे आपण समजून घेऊ शकतो म्हणून त्याची मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट करून घ्या.

आपल्या क्षमता वाढवणारा एक नवीन विषयही सध्या बराच चर्चेत आहे. तो म्हणजे NLP. म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. न्यूरो म्हणजे मेंदू, ब्रेन. त्याची लँग्वेज, भाषा. प्रोग्रामिंग म्हणजे डिझाइन करणे, आकार देणे. ह्या प्रकाराला आजकाल बरीच प्रसिद्धी मिळतेय. आपल्या मेंदूला एक वेगळी कमांड देऊन मनाची तयारी करून घ्यायची.

मिल्खा सिंग करायचा तशी तयारी!! मिल्खा सिंग रनिंग रेस च्या आधी ती स्पर्धा तोच कसा जिंकणार ह्याची मानसिक तयारी आधीच करून ठेवायचा आणि नंतर शरीराला रनिंग चा सराव द्यायचा.

मानसिक तयारी झाली की शारीरिक क्षमता आपोआप वाढते. हे टेक्निक सगळ्यांनाच उपयोगी पडेल असं आहे.

एक प्रकारचे म्युझिक वाजवून मेंदूला आधी तसं तयार करायचं आणि कोणती ही स्पर्धा जिंकायची. मग एखादी कला शिकताना, महत्वाचं काम करताना सुद्धा तुम्ही तुमची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवू शकता.

आपली मेमरी, स्मरण शक्ती भरपूर वाढवली की विसरणं विसरून जाल. मग ही मेमरी सहज कशी वाढवायची ते आता बघू.

एक ते दहा आकडे. प्रत्येक आकड्याला एक रूप द्यायचं, म्हणजे एक ला म्हणा केक, दोन ला म्हणा फोन, तीन ला म्हणा पिन, चार ला म्हणा कार, असे सगळे दहा अकड्यांना वेगळं रूप द्या आणि ह्या रूपा प्रमाणे एक स्टोरी बनवायची स्टोरी आठवली की ते ते आकडे तुमच्या डोळ्यासमोर येतील आणि कितीही आकडे तुम्ही लक्षात ठेवून धडधड न बघता तुमच्या स्मरणात ठेऊन तोंडाने म्हणून दाखवाल. हे ऐकताना विचित्र वाटेल पण हे सरावाने खरंच शक्य आहे.

थोडक्यात बघा कशी तयार कराल स्टोरी: मी केक खात होतो 1, तेवढ्यात बाहेर कार चा हॉर्न ऐकू आला 4, मी घाबरून बॉक्स ला पिन मारली 3, आणि उठलो तेवढ्यात फोन वाजला 2.

1,4,3,2. असे ते आकडे होते ते स्टोरी मुळे तुमच्या सहज लक्षात राहतील. असे तुम्ही कितीही आकडे स्टोरी बनवून लक्षात ठेवू शकाल.

प्रॅक्टिस करा आणि स्मरण शक्ती वाढवा. कधीच विसरणार नाही अशी तुमची स्मरण शक्ती वाढेल.

मुलांना लहानपणापासून जर फास्ट लिहायची सवय लावून दिलीत तर आयुष्यभर ती त्यांना फारच उपयोगी पडेल.

आता ही सवय कशी लावायची एक नोटबुक द्या त्यांना, आणि दोन पेन्सिल्स, किंवा पेन द्या. डाव्या पानावर डाव्या हाताने चार चा पाढा लिहायला सांगा, आणि उजव्या पानावर उजव्या हाताने अकरा चा पाढा लिहायला सांगा. हेच नाही तुम्ही कोणतेही दोन पाढे सांगा.

प्रॅक्टिस करून करून मुलं दोन वेगवेगळे पाढे दोन वेगळ्या पानावर एकाच वेळी लिहायला लागतील. म्हणजे त्यांचे दोन्ही मेंदू तल्लख होतील.

सुरुवातीला पाहिजे तर पाढया च्या ऐवजी सर्कल एका हाताने आणि स्क्वेअर एका हाताने काढायला सांगा किंवा ट्रँगल आणि सर्कल काढायला सांगा हळू हळू प्रॅक्टिस होत जाईल.

आणि फास्ट रायटिंग करायला लागतील. दोन्ही हाताने लिहू शकतील. एक्स्ट्रा ऑर्डीनरी होतील. तुम्ही पण प्रयत्न करायला हरकत नाही. सवयीने सगळं जमायला लागतं.

बुद्धीला चांगली चालना मिळण्यासाठी मुलांना काही प्रोजेक्ट द्यायचे. ते करायला सांगा. म्हणजे पवन चक्की आपण एखाद्या फोटोत बघतो. पण मुलांना ती करायला सांगा. पवन चक्की चालल्यावर वीज कशी तयार होते हे त्यांना कळेल. त्याचे फायदे कळतील.

मॅग्नेट चा वापर करून त्याचा सी-सॉ बनवायला सांगा. मॅग्नेट कसे काम करते हे त्यांना कळायला लागेल. त्यातून त्यांना दुसरी काहीतरी कल्पना सुचेल आणि मॅग्नेट चे उपयोग करून वेगवेगळे प्रोजेक्ट बनवायला लागतील.

त्यांची निरीक्षण शक्ती वाढेल, कल्पना शक्ती वाढेल, ज्ञानात भर पडेल. निश्चितच मुलांची बुद्धी तल्लख होईल. प्रगती होईल.

मुलांना रोबोटीक किट आणून द्या. मुलं रोबोट बनवायला लागतील. त्यांना त्यांची प्रगती करता येईल. अशी मुलं एक्स्ट्रा ऑर्डीनरी होतील इस्रो सारख्या विज्ञानिक प्रगती करणाऱ्या संस्थेत शास्त्रज्ञ होऊ शकतात.

एक लक्षात घ्या या सर्व गोष्टी लहानपणीच सुरु करा. मोठे झाल्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते करतीलच अशी अपेक्षा ठेऊ नका. सवयी जर काही लागायच्या तर त्या लहानपणीच लागू शकतात.

मुलांच्या आई वडिलांना सुद्धा अशी बुद्धी तल्लख करून त्याचा उपयोग स्वतःच्या व्यवसायात करता येईल. स्वतःचे कोर्सेस चालू करता येतील. महिला घरात राहून असे कोर्सेस सुरू करू शकतील. अर्थार्जन करू शकतील. मग बनवा आपल्या मुलांची बुद्धी तल्लख आणि तुम्ही सुद्धा धार लावा तुमच्या बुद्धीला आणि करून घ्या स्वत:चाही फायदा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Poonam Nikhil Avasarkar says:

    रिअली ग्रेट मी अवलंबन पण केले..फारच छान आणि अवघड दोन्ही आहे पण अशक्य नक्कीच नाही.. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!