लॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..?? वाचा या लेखात..

लॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..??

शाळांना सुट्ट्या लागणे हे प्रत्येक आईला एक मोठे काम वाटते.. कारण सध्याची पिढी ही पटकन बोर होते..

मात्र आपल्या लहानपणी सुट्ट्या लागल्यावर आपण मामाच्या गावाला जायचो, गावभर हुंदडायचो, कोणाकडेही जेवायचो.. झोपायला तेव्हडे घरी यायचो..

बच्चेकंपनीचा गोतावळा मोठा असल्याने सगळे मिळून संध्याकाळी दिवे लागणीला श्लोक, पाढे म्हणण्यात 2 तास आरामात जायचे..

रात्री आज्जीची गोष्ट, मामाच्या भुताच्या गोष्टी ह्यामध्ये झोप लागून जायची.. दिवसभराच्या दमणुकीमुळे गाढ झोपी जायचो.. ते दुसऱ्या दिवशी मामीच्या हातचा नाश्ता खायलाच उठायचो..

हल्ली सुट्ट्या लागल्यावर मेच्या गर्मीत कोणी कोणाकडे जात नसते.. आया आपल्या मुलांना तर्हेतर्हेच्या शिबिरांमध्ये गुंतवून टाकतात..

बाहेर अंगणात, पार्क मध्ये क्रिकेटचा खेळ रंगतो.. दिवसा पत्ते कॅरम असतातच.. मुलांचा दिवस मस्त जातो.. आईला चहा, नाष्टा, जेवण ह्याचा मात्र घाट असतो..

पण सध्याच्या परिस्थितीत कोणालाच काही सुचेनासे झाले आहे.. कोरोनाचे जगभर तांडव चालू आहे.. आशा परिस्थितीत भारत सरकारने सुद्धा पूर्ण २१ दिवसांचे लॉक डाऊन सांगितले आहे.. कदाचित पुढेही वाढू शकतो..

आता मोठेही घरात बसून वैतागलेले दिसत आहेत.. तर लहानग्यांची काय कथा..??

सतत कंटाळा येत असलेल्या पिढीला ह्या लॉकडाऊन च्या काळात कसे बिझी ठेवायचे हा खूप मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे..

कारण मुलांना मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला पाठवायचीही सोय राहिली नाहीये.. प्रत्येकाने आपापल्या घरात राहणेच योग्य आहे.. मग करावे तरी काय आता…?

आम्ही ह्यावर काही हटके उपाय शोधले आहेत बघा तुमच्या लेकरांना आवडतायत का..

१. डुडलिंग आर्ट शिकवा: गुगल वर डुडलिंग आर्ट आहे सर्च करून पहा.. हा एक अत्यंत वेगळा कलेचा प्रकार आहे.. मोठ्या चित्राच्या आत नक्षीकाम करायचे..

काही मॉडर्न डिझाइन तर काही पारंपरिक.. कदाचित हातावरची मेहेंदी हा सुद्धा डुडलिंग चा प्रकार असावा असे वाटते.. ही आर्ट एक दिवसात संपत नाही..

आऊट लाईन काढली की त्यात नक्षीकाम करायला खूप वेळ लागतो.. त्यामुळे मुले हे करताना बरेच तास बिझी राहू शकतात.. रोज थोडं थोडं पूर्ण करत राहिले तर ४-५ दिवसात एखादे सुंदर डूडल तयार होईल..

२. ब्लॉक पैंटिंग करायला शिकवा: भेंडी, बटाटा, आल्याचा काप असे चित्र विचित्र आकार घेऊन रंगात बुडवून ते कागदावर चितारायला शिकवा.. त्यातून खूप सुंदर चित्र तयार होईल..

३. वारली पेंटिंग: वारली पेंटिंगचे सॅम्पल गुगल वर खूप मिळतील.. हा आर्ट फॉर्म देखील मुलांना बराच काळ गुंतवून ठेवू शकतो.. हवे तर बागेतल्या कुंड्यांवर करण्यास सांगा.. निरस कुंड्या एकदम सुंदर दिसायला लागतील..

४. कणिक मॉडेलिंग: क्ले आणायला बाहेर जाता येत नसेल तरी घरात स्वयंपाक करताना थोडी कणिक घट्ट मळून मुलांना द्या.. त्याचे वेगवेगळे आकार, त्यांना करण्यास उद्युक्त करा..

५. गॅसविराहित पाककला शिकवा: रोज संध्याकाळी स्नॅक्सचा मेनू मुलांकडून करून घ्या ज्यात गॅस ची गरज पडणार नाही.. चाट, मसाला पापड, भेळ आणि इतर अनेक रेसिपी तुम्हाला नेट वरून मिळतील..

मुलांनाही काही तरी नवीन शिकल्याचा आनंद होईल.. सोबत पोळ्या लाटायला, कुकर लावण्यासाठी डाळ तांदूळ कसे धुवायचे, भाज्या कश्या निवडयायच्या ह्याचेही क्लास घेऊनच टाका..

६. काही मैदानी खेळ, जुने खेळ घरातच खेळवा: टिपरी पाणी असे काहीसे नाव असलेला खेळ आठवतोय..?? १,२,३, ४-५, ६, ७-८ असे रकाने आखून त्यात एक फरशीचा तुकडा टाकून लंगडी घालत आपण खेळायचो..

तो मुले घरातही खेळू शकतात.. सागरगोटे, पट (द्यूत), काच पाणी असे जुने खेळ घरात असल्यास तेही शिकवा.. मुलांना नवीन गेम्स मिळतील आणि तुमचे जुने दिवसही परत येतील जणू.. 😊😊

७. ओरिगामी: ह्यासाठी घोटीव कागदच असले पाहिजेत असेही नाही.. वर्तमानपत्राचे चौकोन कापून ठेवा.. बाकी इंटरनेट आहेच तुम्हाला ओरीगामीचे नवनवीन पॅटर्न शिकवायला.. मुलांना पेपर बॅगही बनवायला शिकवूनच टाका.. नंतर उपयोगाला येतील..

८. पपेट शो करायला सांगा: मुले गोष्टीची पुस्तके वाचतातच.. त्यांच्या कडे बरीच खेळणीही असतात..

मग २-३ दिवस प्रॅक्टिस करायला सांगून एक पपेट शो करायला सांगा.. आणि त्यांच्या मित्रमंडळींना लाईव्ह करा.. किती उत्साहात नव नवीन पपेट शो बघायला मिळतील..

९. भेटकार्डे बनवून ठेवायला सांगा: पुढील येणाऱ्या सणांसाठी, कोणाच्या वाढदिवसा साठी, स्वतःच्या वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी वेगवेगळी भटकार्डे, आमंत्रण पत्रिका तयार करायला सांगा.. मुलांना घरातील निरुपयोगी वास्तूंपासून सुद्धा कला करायला शिकवा..

१०. एखाद्या विषयावर भाषण देण्यास सांगा: मुलांना शाळा नसल्यामुळे सध्या शाळेत होणाऱ्या कोणत्याच ऍक्टिव्हिटीज नाहीत. जर तुमच्या मुलांना स्टेज ची भीती वाटत असल्यास आता मस्त संधी आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांवर बोलायला सांगा..

नाटुकले करायला सांगा.. व्हिडीओ रेकॉर्ड करा.. त्यांना दाखवून त्यांना चुका सांगा.. त्यांची संभाषण कला उत्तम होण्यास त्यांना टिप्स द्या.. जेणे करून पुढे शाळा सुरू झाल्यावर एका नव्या कॉन्फिडन्ससहित मुले सगळ्यांसमोर स्टेज वर उभे राहू शकतील..

११. घरातली एक फूटभर भिंत त्यांना वॉल पेंटिंग साठी द्या: घरात अक्रेलीक कलर असल्यास मुलांना गॅलरी मधील एखादी भिंत पेंटिंग करण्यास द्या..

निबंध लिखाण, चित्रकला, हस्तकला असे अनेक नित्यक्रम त्यांना देऊ शकता.. त्याच सोबत बाग काम शिकवा..

मेथ्या पेरून घरीच मेथीची भाजी कशी उगवते, मिरच्या, कोथिंबीर अशी रोपे उगवण्यास शिकवा.. झाडांना पाणी घालणे, निगा राखणे ह्यात मुले खूप मग्न होऊन काम करतात.. त्यांना घरीच कंपोस्ट बनवण्याच्या कामात सामील करून घ्या..

मुलांना सतत टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर पुढे बसवण्यापेक्षा अशा हटके गोष्टींमध्ये एंगेज करा..

कोरोना संपला ना की मग सोसायटीच्या सगळ्या मुलांनी केलेल्या ऍक्टिव्हिटीज चे प्रदर्शन भरवा.. त्यांच्या कला गुणांना शाबासकी द्या.. त्यांना प्रोत्साहित करा..

आयुष्यात अशा संकटांना तोंड देण्यास मुलांना तयार करा.. त्याचबरोबर घरात बसूनही खूप काही करता येऊ शकते हे मुलांना कळू द्या.. तुमच्या मुलांना ह्या पैकी कोणत्या ऍक्टिव्हिटी आवडतात ते आम्हालाही आवर्जून सांगा..!!

चला तर मग घरात बसून मुलांच्या कोरोनाच्या सुट्ट्याही सन्मार्गी लावूयात..!!

कोरोना व्हॅकेशनची ऍक्टिव्हिटी 😍- मुलांचे कुठलेही कलागुण दाखवणारे व्हिडीओ करून आम्हाला पाठवा निवडक व्हिडीओ पेजवर पोस्ट करू… यात एखादं भाषण करतानाचा व्हिडीओ असू शकतो, गोष्ट सांगतानाचा किंवा गाणं गातानाचा, डान्स करतानाचा… वगैरे वगैरे

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.