सांधेदुखी वर सोपे घरगुती उपाय आणि व्यायाम प्रकार वाचा या लेखात

सांधेदुखी घरगुती उपाय

सांधेदुखी मुळे तुम्ही त्रस्त आहात का..? त्यावर अत्यंत सोपे घरगुती उपाय आणि व्यायाम प्रकार मिळवा या लेखातून..

‘ऊह आह आऊच’ हे सांधेदुखीचे वैश्विक सिम्बॉल म्हणता येतील..

ह्या त्रासावर असणाऱ्या औषधांच्या टीव्ही वरच्या जाहिराती, हेच तीन त्रासदायक शब्द वापरून आपले औषध सांधेदुखी असलेल्यांपर्यंत चपखलपणे पोहचवतात..

खेळाडू, वयस्क माणसे, अवजड काम करणारे कामगार, आयुष्यभर कष्टाचे काम केलेले स्त्री पुरुष, लठ्ठ व्यक्ती इतकेच काय तर कसलेच व्यायाम न करणारे तरणे ताठे सुद्धा, सांधेदुखी ह्या व्याधीने त्रस्त असतात..

थंडीच्या दिवसात ह्याचा त्रास अधिक होतो. आणि उन्हाळ्यातही हा पिच्छा सोडत नाही..

कारण उन्हाळ्यात घरोघरी एयरकंडिशन वापरले जातात.. आणि हा एयरकंडिशन तर सांध्यांचा ‘जानी दुष्मन’च जणू..!!

कारण एसी रूम मध्ये आपले जॉइन्ट्स चांगलेच गारठतात आणि त्यांचा अजून त्रास होतो..

ह्याला वैज्ञानिक भाषेत अर्थरायटीस म्हणतात.. सांध्यांचे स्नायू आकुंचन पावतात आणि सांध्यावर सूज येणे, कडकपणा जाणवणे आणि वेदना होणे असे सांधेदुखीचे प्रकार आपल्याला भोगावे लागतात..

तेल, औषध, मालिश सगळे करून आपण थकून जातो.. डॉक्टर, थेरपिस्ट सगळे सुरूच असते..

कधी आराम मिळतो तर कधी दुखणे भलतेच वाढते.. म्हणजे काही केल्या ही सांधेदुखी आपल्यापासून दूर जाताच नाही..

पण एक सांगू का..?? हे सगळे उपाय चालू असताना तुम्ही काही घरगुती उपाय सुद्धा का नाही करून बघत..??

त्याचे साईड इफेक्टस तर नाहीच पण झाला तर छान फायदाच होऊ शकतो..

काय म्हणता..!! करून बघूया..?? चला तर मग आम्ही सांगतो.. तुम्ही एका..

१. आपला आहार योग्य आहे का..??

हो सगळ्यात आधी आपला आहार सांधेदुखीला मदत करणारा तर नाहीये ना..?? हे नक्की तपासून पहा..

डॉक्टर्स देखील आंबट पदार्थ, अति स्निग्ध पदार्थ जसे की मटण, मास, चिकट पदार्थ जसे की मैदा वगैरे वर्ज्य सांगतात सांधेदुखी मध्ये..

ह्याचे कारण असे आहे की आपले मोठे आतडे ह्या पदार्थांमुळे नीट काम करत नाही.. त्यामुळे हे मोठे आतडे शरीरातील बॅक्टेरिया विसर्जित करण्या ऐवजी रक्तात मिसळायला मदत करते..

आणि आपली इम्युन सिस्टीम आपल्याच टिश्यूज वर हमला करते.. ह्यात नुकसान स्नायूंचे होते.. जॉइन्ट्सवरच्या स्नायूंचे नुकसान झाले तर अर्थरायटीस होतो..

त्यामुळे आहारावर लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे.. आतड्याचे आजार उद्भवू नयेत आणि शेवटी त्यांचे रूपांतर अर्थरायटीस मध्ये होऊ नये म्हणून आहारात पुढील पदार्थ नक्की घेऊ शकता.

  • भाज्या
  • फळे
  • कडधान्ये
  • डाळी
  • आले : ह्यातले जिंजरॉल नावाचे द्रव्य अर्थरायटीस थांबवायला मदत करते..

ह्या सगळ्यांनी युक्त असा सकस आहार घ्या.. ह्यातून मिळणारे एंझाईम्स जॉइन्ट्सना तंदुरुस्त ठेवते..

२. वजनावर नियंत्रण महत्वाचे

अर्थातच..!! तुम्हाला माहीतच असेल, ज्यांचे वजन प्रमाणित वजनापेक्षा खूप जास्त असते त्यांना गुढघेदुखी, कंबरदुखी असे आजार असतात..

कारण जेवढे त्यांचे वजन असते, त्या वजनाचा जास्तीत जास्त भार हा सांध्यांवरच येतो.. आणि सांधेदुखीचे दुष्टचक्र सुरू होते..

व्यायाम करतानाही नंतर खूप त्रास होतो.. म्हणूनच आधीच वजन नियंत्रणात ठेवले तर सांधेदुखी दूरच राहील..

आणि जरी आत्ता वजन खूप असले तरी हळू हळू प्रयत्न करून ते आटोक्यात आणणे तुम्हाला हितावह आहे.. ह्याचे फलित म्हणजे तुमचे सांधे मजबूत राहतील..

३. धान्याचे गरम थंड पॅड्स ने शेकून पहा

गरमीचा शेक सांध्यांचा कडकपणा घालवते आणि थंड शेक त्यांना ताकदवान बनवते.. हे डाळींचे पॅड घरीच बनवू शकता.. किंवा आईस पॅक्स, हॉट वॉटर बॅग्स मेडिकल स्टोअर्स मध्ये उपलब्ध असतात.

मात्र दुखऱ्या जागेवर फक्त १५ ते २० मिनिटे गरम शेक देऊ शकता.. आणि थंडाव्याचा शेक अवघे १०च मिनिटे.. त्या पेक्षा जास्त वेळ धोकादायक ठरते..

४. तळ हात आणि पायावर तसेच दुखऱ्या जॉइन्ट्स ना मसाज द्या

तळ हाताचे प्रेशर पॉईंट्स आणि तळ पायाचे प्रेशर पॉईंट्स ह्यावर दिलेला दाब, हे कित्येक आजारांचे औषध आहे..

ऍक्युप्रेशरमुळे सांधेदुखीसारख्या आजारातही आराम दिला जाऊ शकतो.. प्रेशर पॉईंट्स दाबले गेले की मेंदू पर्यंत निरोप पोचतो आणि मग मेंदूतून जाणारे सिग्नल दुखऱ्या जागेला आराम पोहचवतात.. असे काहीसे ते तंत्र असते..

तसेच दुखऱ्या सांध्यांना घरच्याघरी हलकासा मसाज करता येऊ शकतो.. कित्येक सांधेदुखीच्या रुग्णांना असे केल्याने बराच फरक जाणवतो..

५. ओमेगा ३ असलेले पदार्थ आवर्जून खा

ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे शरीरातील इंफ्लेमेशन बरे करते आणि अर्थरायटीसचा त्रास निर्माण करण्याच्या प्रक्रियेलाही थांबवते असे डॉक्टर्स सांगतात..

इतकेच नाही तर हे ओमेगा ३ शरीराचे मेटाबॉलिझम वाढवतात.. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणारे योद्धे आपले वजन झपाझप कमी करू शकतात..

आणि वजन कमी होणे म्हणजेच अर्थरायटीस होण्याची शक्यता कमी होणे असेही गणित आहेच..

म्हणून हे ओमेगा ३ फॅटी ऍसिड शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.. सगळ्या प्रकारचा सुकामेवा जसे की अक्रोड, बदाम आणि मासे जसे की टुना, सारडीन, रावस ह्यांच्या सेवनाने भरपूर ओमेगा ३ मिळते..

६. व्हिटॅमिन डी चे सेवन उत्तम

जी माणसे दमट किंवा थंड हवामानात राहतात त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असते.. मात्र जे भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा भागात राहतात त्यांच्या मध्ये व्हिटॅमिन ‘डी’ ची डेफिशिएन्सी नसते..

खाद्यपदार्थातून सुद्धा शरीराला भरपूर व्हिटॅमिन ‘डी’ मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला अवोकॅडो, मश्रूम्स, अंडी, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे लागेल..

पण कशासाठी हवे हे व्हिटॅमिन ‘डी’..?? मंडळी व्हिटॅमिन ‘डी’ शरीरातील हाडे मजबूत करते, आपली पाचन शक्ती सुधारते आणि त्यामुळे संधिवात किंवा सांधेदुखी होण्याची शक्यता कमी करते..

त्यामुळे वर दिलेले व्हिटॅमिन ‘डी’ युक्त पदार्थ खाणे गरजेचे आहे. त्याच बरोबर सूर्यप्रकाशात रोज एखादी चक्कर मारणे अतिशय उत्तम..

व्हिटॅमिन ‘डी’ ची खूपच कमतरता असल्यास डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेल्या व्हिटॅमिन ‘डी’ च्या गोळ्या किंवा स्प्लिमेंट्स घेणे ही आपल्यासाठी बंधनकारक आहेच…

७. मेडिटेशन आणि व्यायाम

ह्याशिवाय तर शरीर सुदृढ होऊच शकत नाही.. आजार कोणताही असो.. शरीराला मजबूत करण्यासाठी व्यायाम करणे आणि मनाला मजबूत करण्यासाठी मेडिटेशन (ध्यानधारणा) करणे is a must..!!

सांधेदुखीवर काही खास व्यायामपद्धती असते. त्याची माहिती तुमच्या ट्रेनर कडून किंवा थेरपिस्ट कडूनही तुम्हाला मिळू शकते. सोबतीला इंटरनेटचे व्हीडीओ आहेतच..

लॅपटॉप वरील सततच्या कामामुळे होणारे मान आणि खांद्यांचे दुखणे कोणतेही औषध न घेता फक्त व्यायाम आणि आहाराची काळजी घेऊन पूर्णतः बरे झाल्याचा माझा स्वतःचा अनुभव आहे.

सांधेदुखी घरगुती उपाय

ह्याने शरीरशुद्धी तर होते. पण शरीरातील जुन्या व्याधी दूर होण्यासही मदत होते. जगण्याची पद्धत सुधारते आणि मनही प्रसन्न राहते..

त्यामुळे व्यायाम आणि ध्यान लावण्यावाचून पर्याय नाहीच..

चांगले खा आणि योग्य व्यायाम करा..!! हा मंत्र तुम्हाला कायम सुदृढ ठेवण्यास समर्थ आहे..

तुमच्याकडेही पूर्वपार चालत आलेले, आज्जीबाईच्या बटव्यातले काही उपाय असतील तर तेही जरूर शेअर करा..!!

Image Credit: vrfitnessinsider,

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.