लॉकडाउन किचन!!

लॉकडाउन

त्या दिवशी निर्मला किचनमध्ये मुलांच्या फर्माईश चे भजे तळत होती…

तेवढ्यात महेशरावांनी गच्चीवरून फोन करून ऑर्डर सोडली, “अगं ए, तळणं चालुचये तर फ्रीझमधून ब्रेडचा पुडा काढून मला सँडविच पण कर…”

आणि ते सगळं झाल्यावर चहा टाकणं हे काही वेगळं सांगण्याची गरज नव्हतीच…

घामाच्या धारांनी भिजून निघालेली निर्मला दिवसभर मोबाईल हातात घ्यायची सवड मिळत नसल्याने संतापली तर होतीच😡

२१ दिवसांच्या लोकडाऊनचे थोडे थोडके दिवसच अजून कसे बसे ढकलून झाले होते.

पुढच्या राहिलेल्या दिवसांचे डोंगर तिला रडकुंडीला आणत होते…

तेवढ्यात हॉलमध्ये मुलांच्या गोंधळात तिला ऐकू आलं… “मेरे प्यारे भाईयो और बहेनो….”

आता मात्र मुलांच्या गोंगाटाला एक शिवी हासडून तिने कान टवकारले👂…

सकाळ ३ एप्रिल ची होती…

५ एप्रिलला ९ वाजून ९ मिनिटांनी दिवे लावायचे एवढंच तिने मुलांच्या गोंगाटातून कसं बसं ऐकलं…

आणि शेवटी अनुमान लावलं की ९ वाजून ९ मिनिटांनी ९ दिवे लावायचे….

तेवढ्यात महेशराव ते ज्याला ‘वर्क आउट’ म्हणतात, ते सगळं आटोपून गच्चीवरून खाली आले.

मग संधी साधून निर्मलाने एक पिशवी त्यांच्या हातात देऊन सांगितलं, “जा आधी बाजारात जाऊन ९ दिवे घेऊन या…”

अजून काही माहीत नसल्याने महेशरावांनी विचारलं, “का आता दिव्याचं काय करायचं?”

निर्मला रागातच, “जे सांगितलं ते करा दुकानात दिवे संपून जातील!!”

महेशराव, “अगं, आधी अंघोळ तर करू दे!!” असं काहीसं प्रेमाने म्हणत बाथरूम च्या दिशेने सटकतात…

मुलांना तळलेले गरमागरम भजे देऊन तो ९ दिव्यांचा काय चक्कर आहे ते व्हॅट्स ऍप ग्रुपवर विचारण्यासाठी ती हातात मोबाईल घेते.

तेवढ्यात, आंघोळ आटोपून आलेले महेशराव सँडविच आणि चहाची फर्माईश सोडून सांगतात, “अगं, दिवे आणायची काहीही गरज नाही. मोबाईलचा टॉर्च लावला तरी चालेल!! असं सांगितलं मोदींनी”

महेशरावांनी बाथरूममध्ये असतांनाच व्हाट्सएप युनिव्हर्सिटी चा फेरफटका मारून बातमी काढलेली असते.

सगळ्यांच्या सगळ्या फर्माईशी आटोपून काकुळतीला आलेली निर्मला… काहीतरी आता वेगळं करायचं म्हणून खुश होते…

५ एप्रिल रात्रीचे ८ वाजून ५५ मिनिटं होतात…. निर्मला हळूहळू एक एक लाईट बंद करायला सुरुवात करते.

जमतील तितके टॉर्च घेऊन सगळ्यांना खिडकीत उभे राहायला सांगते…

लॉक डाऊन झाल्यापासून तिच्या किचन शिवाय काहीहि आधार नसल्याने एव्हाना सगळ्यांनी तिचं ऐकायची सवय लाऊन घेतलेलीच असते…

९ मिनिटं संपतात… हळूहळू महेशराव एक एक लाईट लावून मुलांजवळ येऊन टीव्हीवर सगळीकडे कोरोना दिवाळी कशी साजरी झाली ते बघायला लागतात.

निर्मलाचा टॉर्च मात्र अजून विझलेला नसतो… मुलं आणि मुलांच्या बाबाच्या दिशेने बघत ती सुरू होते,

मेरे प्यारे पतीदेव और पतीदेव के दुलारो…. तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डर पूर्ण करून मी आता थकले.

आज रात्री १२ वाजेपासून घरात माझा लॉक डाऊन सुरू होईल.

उद्यापासून प्रत्येकाने आपापलं काम आपल्या हाताने करायचं.

किचन आता फक्त इमर्जन्सी मध्येच सुरू राहील. ते पण फक्त माझ्या आदेशाने.

सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि तेही मी ठरवलेले जिन्नस… इथे सगळं नीट चालावं असं वाटत असेल तर माझे आदेश गप गुमान पाळायचे… आज रात्री बारावाजे पासून माझे नियम सुरू होतील.

नियम मान्य नसतील तर बाहेर जायचं… बाहेर पोलिस आहेच…

आईचा हा आवेश बघून मुलं बाबांकडे आशेने पाहू लागली. पण बाबांनी त्यांची शस्त्रं आधीच म्यान करून ठेवलेली असतात.

महेशरावांनी नजरेनेच मुलांना शांत बसायला सांगून त्याच नजरेने तिच्या लॉक डाऊनच्या ओर्डरवर वर सही केलेली असते…

आणि हे पाहून विजयी मुद्रेने सोफ्यावरचा मोबाईल उचलून ती बेडरूमच्या दिशेने कूच करते….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.