ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांची प्रेरणादायी कहाणी

ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांची प्रेरणादायी कहाणी

जगामध्ये अशक्य असे काहीच नसते.

आपले ध्येय निश्चित असले की जगण्याचा आनंद आपोआप मिळत जातो.

जगामध्ये नावलौकिक मिळवायचा असेल तर उच्च ध्येय निश्चित करणे, त्याचा पाठपुरावा करत अविरत कष्ट करणे आणि ते साकार करणे हे ज्याला जमते, तोच असामान्य होऊन इतिहास घडवतो.

जगामधील लोकांच्या समस्या कोणत्या आहेत, त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कश्या सोडवता येतील, त्यांचे दैनंदिन जीवन कशा प्रकारे सुखकर करता येईल, यांचे सोल्युशन जो माणूस शोधून काढतो तोच यशस्वी होतो.

अशाच एका ध्येयवेड्या व्यक्तीचा जीवनप्रवास पाहूया.

Manachetalks

४ जानेवारी १८०९ साली एका मुलाचा जन्म झाला.

पॅरिस पासून २० किमी अंतरावर वसलेल्या कुपवरी गावामध्ये सायमन ब्रेल आणि मोनिक यांनी या बाळाचे नाव ठेवले लुईस…

लुईसच्या वडिलांचा चामड्याच्या व्यवसाय होता. घराजवळच त्यांचा कारखाना होता.

लुईसचे बालपण मजेत जात होते. चालायला लागल्यावर तो आपल्या वडिलांच्या कारखान्यात खेळत असे.

एकदा खेळता खेळता लुइसच्या डोळ्याला तीक्ष्ण अश्या अवजाराने जखम होते.

आई-वडील छोट्या लुईला तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जातात. डॉक्टर त्याच्या डोळ्याला पट्टी लावून पुढील उपचारासाठी पॅरिसला पठावतात.

परंतु ती जखम अजून चिघळत जाउन डोळा निकामी होतो. नियतीच्या मनात भलतेच असते. निकामी झालेल्या डोळ्याचा संसर्ग चांगल्या डोळ्याला होऊन तो डोळा सुद्धा निकामी होतो.

वैद्यकीय भाषेमध्ये याला ‘Sympathetic Ophthalmia’ म्हणतात. या सर्व आजारामध्ये दोन वर्षे उलटून जातात. वयाच्या पाचव्या वर्षी लुईची दृष्टि पूर्णपणे निघून जाते.

लुइच्या लक्षात हे सर्व येत नसे. ‘आपणास सर्व अंधार दिसत आहे’, असे तो आई वडिलांना सांगून प्रश्नांचा भड़ीमार करायचा.

आई वडीलही त्याच्या उपचारासाठी खुप प्रयत्न करायचे, त्याची समजूत घालायचे. त्या काळात तितकेसे उपचारही उपलब्ध नव्हते.

मात्र आई वडिलांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.

छोटा लुई काठीच्या (केन) सहाय्याने इकडे तिकडे फिरायला शिकु लागला.

लुई लहानपणापासून हुशार, चाणाक्ष होता. आणि अंगी सतत काही तरी नवीन करण्याची वृत्ती होती. यामुळे तो लोकांमध्ये आवडता होऊ लागला.

याची दखल गावातल्या पाद्रीने घेतली. त्याला योग्य मार्गदर्शन करून, त्याचे पुढील शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.

ब्रेल ने दहा वर्षांपर्यंतचे शिक्षण कुपवरी मध्येच पूर्ण केले.

अभ्यासातील त्याच्या हुशारीमुळे त्याला पॅरिस मधील पहिल्या अंधांच्या शाळेमध्ये (National Institute for Blind Youth) प्रवेश मिळाला.

या शाळेचे संस्थापक ‘व्हालेन्टिन हॉय’ हेच या शाळेतील सर्व अंध मुलांना शिकवत असत.

त्यांनी हॉय प्रणाली नावाची अंधांना वाचता येईल अशी पद्धत विकसित केली होती. यामध्ये जाड़ कागदावर लॅटिन अक्षरे एम्बोस केलेली असत.

हाताच्या बोटाने स्पर्श करुन ती अक्षरे वाचता येत असत. परंतु ही प्रक्रिया खुप क्लिष्ट होती. शिवाय अशा प्रकारची पुस्तके फारच थोड़ी होती.

परंतु ब्रेलने आपले शिक्षण चिकाटीने पूर्ण करुन, तो त्याच शाळेमध्ये १८३३ मध्ये गणित आणि इतिहासाचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला.

या सर्व काळामध्ये त्याच्या ज्ञानार्जनामध्ये त्याला अनेक समस्या आल्या.

याच समस्यांनी पुढे जाऊन त्याला संशोधन करण्यास प्रवृत्त केले. स्पर्शाने अक्षरे ओळखून ज्ञान मिळवता येते हे त्याला आता चांगले समजले होते.

यामध्येच पुढे जावून संशोधन करायचे स्वप्न त्याने पाहिले. अंधांना सुद्धा सामान्य माणसाप्रमाणे जगण्याचा, ज्ञान मिळवण्या अधिकार आहे. त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळाले पाहिजे असे ब्रेल नेहमी म्हणत असे.

असं म्हणतात की एक ज्ञानेन्द्रिय काम करेनासे झाले की माणूस अधिक उमेदीने जीवन जगतो, त्वेषाने स्वप्न पूर्ण करतो.

असेच काहीसे ब्रेल च्या बाबतीत झाले. संगीतवाद्यांची आवड़ ब्रेलला लहानपणापासून होती.

शाळा सुटल्यावर ब्रेल ऑर्गन वाजवण्यासाठी विशेष मेहनत घेत असे. पुढे जाऊन त्याने त्यात नैपुण्य मिळवले.

तारुण्यातच त्याने फ्रान्स मधील उत्तम ऑर्गन वादकाचा मान मिळवला.

आता ब्रेलने संपूर्ण जगाला आपल्या दैदीप्यमान कामगिरीने दिलेल्या अमूल्य योगदानाविषयी पाहू.

अंधांना ज्ञान मिळवता यावे, त्यांना जास्तीत जास्त वाचन करता यावे, यासाठी सुलभ लिपीची गरज आहे हे ब्रेल च्या लक्षात आले.

एम्बोस केलेली अक्षरे खुप क्लिष्ट, खर्चिक होती. त्यामुळे यामध्ये सुधारणा करणे गरजेचे होते.

मनात ध्येय असले की मार्गही मिळत जातात.

एकदा फ्रेंच आर्मीमधील चार्ल्स बार्बर बरोबर ब्रेलची ओळख झाली. चार्ल्सने सैनिकांना रात्रीच्या वेळी संदेश वाचण्यासाठीची प्रणाली विकसित केली होती.

यामध्ये डॉट्स, सांकेतिक चिन्ह यांचा वापर करुन अक्षरे स्पर्शाने समजून घेतली जात.

यापासुन प्रेरणा घेऊन ब्रेल ने स्वतःच्या प्रणालीचा शोध लावला. कठोर परीश्रम घेऊन 1824 मध्ये ब्रेल ने सहा बिंदुपासुन तयार होणाऱ्या लिपीचा शोध लावला.

पुढे 1829 पर्यन्त त्यात छोटेमोठे बदल करुन ते प्रकाशित केले.

ज्या अवजाराने आरीने डोळ्याला मार लागला होता त्याचा वापर करुन सहा बिंदूंची प्रणाली जी बोटाच्या एका स्पर्शात सफाईदारपणे वाचता येत अशी विकसित केली.

त्याने पुढे संगीतावरील प्रेमामुळे गाण्यांचे नोटेशन ब्रेललिपीमध्ये विकसित केले. 1839 साली या सर्वांवर पुस्तके प्रकाशीत केली.

आज जगामध्ये हीच प्रणाली मुळ धरून संशोधने होत आहेत. अंधाना इतर सामान्य माणसाप्रमाणे ज्ञान मिळवण्यासाठी ब्रेल ने विकसित केलेल्या प्रणालीचे जगात अनन्य साधारण महत्त्व आहे.

मात्र या दैदीप्यमान यशाने उजळून निघालेल्या ब्रेलचा पुढील आयुष्यातील प्रवास खूपच खड़तर झाला.

मुख्याध्यापकांनी तो त्यांच्या वरचढ ठरत असल्यामुळे त्याला कामावरुन काढून टाकले.

वयाच्या ३६ व्या वर्षी त्याला क्षयरोगाने ग्रासले. पुढील १४ वर्षे तो क्षयरोगाशी सामना करीत होता.

परंतु त्याकाळी क्षयरोगाचे औषध नसल्याने १८५२ मध्ये त्याने जगाचा निरोप घेतला.

पुढे १८५४ साली ब्रेल लिपीचा फ्रांसमध्ये अधिकृतपणे वापर सुरु झाला.

त्यानंतर १९१३ मध्ये युरोपीय शिक्षक परिषदेमध्ये ब्रेल प्रणाली मांडण्यात आली व इतर युरोपीय भाषेमध्ये वापरली गेली.

१९१६ मध्ये इंग्लिश भाषेमध्ये ती विकसित करुन संपूर्ण जगामध्ये वापरली गेली.

आताच्या संगणक युगामध्ये ब्रेल कॉम्पुटर टर्मिनल, रोबोब्रेल विकसित झाले आहे. दोन शतकापासून ब्रेल ने लावलेला शोध अंधांचे जीवनस्तर उंचावत आहे.

आज लुई ब्रेल यांना मरणोत्तर अनेक सन्मान, पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे कुपवरी येथील जन्मस्थान ऐतिहासिक संग्रहालय  म्हणून नावरूपास आले आहे.

एनसायक्लोपेडिया ब्रिटानिकाने जागतिक दर्जाचे १०० प्रभावशाली संशोधक यांच्या यादीत ब्रेल यांना स्थान दिले.

४ जानेवारी हा ब्रेल यांचा जन्मदिवस ‘जागतिक ब्रेल डे’ म्हणून साजरा केला जातो.

‘द सिक्रेट ऑफ’ ब्रेल हा सिनेमा त्यांच्या आयुष्याविषयी, कारकिर्दीविषयी निर्माण केला गेला.

अश्या या ध्येयवेड्या संशोधकाचा जीवनप्रवास आपणास नक्कीच प्रेरणा देईल. जीवनात नवी उमेद निर्माण करेल, समाजासाठी काहीतरी उपयुक्त निर्मितीसाठी उद्युक्त करेल हीच सदिच्छा!

धन्यवाद!

लेखन: डॉ. निखिल माळी
(नेत्ररोग तज्ज्ञ)

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.