मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग

मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला

‘मन’ हे असे वाहन आहे जे घरबसल्या आपल्याला जगाची सैर घडवते.. सगळीकडे फिरवून आणते..

सगळ्यांची चिंता वहाते.. कधी कधी उदास असते तर कधी आनंदी असते..

एंजल आणि सैतान हे मनाचे दोन रहिवासी आपल्याला कधी सुंदर विचारधारा देतात तर कधी वाईट विचारधारा..

मन थकत नाही.. सतत उंडारत राहतं..

मनाचे काम दिवसरात्र चालू असतं.. इतकं की कधी कधी आपल्याला कंटाळा येतो.. कामात असतानाही मन शांत बसू देत नाही..

मग रिकामटेकडे असताना हे मन किती हैदोस घालत असेल..?? त्या सगळ्या विचारांचे एक मोठे विवर तयार होते..

आणि आपण खोल-खोल गोल-गोल त्या गर्तेत बुडत जातो..

कधी ह्या विचारांचा जणू एक मोठा भारदस्त हत्ती बनतो.. आणि त्याचे ओझे आपण वर्षानुवर्षे घेऊन फिरतो..

कधी कधी वाटते कशासाठी हे सगळं आपल्या मानगुटीवर बसलंय..??

सगळे विचार चांगले असो वा वाईट, काढून टाकूयात मनातून.. शांत मन मिळवूया..

मुळात मनाला शांती काय आहे ते माहीतच नसेल तर ते शांत होईलच कसे नाही का..??

विचार आणि भावनांचा अगदी धिंगाणा चालतो मनात.. आणि डोक्याचा भुगा होऊन जातो..

आपण त्या साठी मन कुठे कुठे रमवू पहातो पण त्याचा उपयोग शून्य होतो..

कारण मनाला शांत करण्याची, मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला, आयडिया आपल्याला माहीतच नसते..

त्यामुळे त्या दिशेने प्रयत्न होतच नाहीत.. शेवटी आपण गिव्ह अप करतो.. आणि आलीया भोगासी म्हणून रुटीनला लागतो..

पण मित्रांनो, ही जी मानसिक शांतता असते ना ती मिळवायला फार अवघड नाही..

फक्त एवढंच कि ती आपलीच आपल्याला मिळवावी लागते..

मनाला सगळ्या पाशातून मोकळे कसे करायचे ते आज आपण जाणून घेऊयात ह्या टिप्स मधून..

१. माफी देणे आणि भूतकाळ विसरणे:

‘फोर्गीव्ह अँड फॉरगेट’ हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे दोस्तांनो.. का माहितेय..??

आपण एखादी घटना कधी कधी विसरून जातो.. मात्र ती आठवली की त्याच्या मागचा दोषीही आठवतो.. आपल्याला झालेला मनस्ताप आठवतो.. मन पुन्हा अशांत..!!!

किती दिवस हे मणा-मणाचे ओझे घेऊन जगायचं..??

झालं गेलं विसरून जायला आधी माफ करायला शिकायचं.. आता नक्कीच हे काही तुम्हाला प्रॅक्टिकल वाटत नसेल. पण आता माफ कसे करायचे ते बघा…

आपण माफ करू शकलो, तर सगळे विसरूनही जाऊ शकू..

आणि मग मनात उठणाऱ्या ह्या भूतकाळातल्या कडू आठवणी, बदल्याची भावना आपल्याआपण निघून जाईल..

आणि हो माफ फक्त दुसऱ्यांना नाही तर स्वतःलाही करायला शिका.. आपणही चुकतो.. कोणाला दुखवतो..

त्याची सल आयुष्यभर मनात असते.. आपण पश्चात्ताप करतो तरीही मनात एक दुःख राहते..

एक गिल्ट राहते जी आयुष्यभर आपल्याला छळते.. त्या साठीच स्वतःला माफ करा..

भूतकाळातल्या आपल्या किंवा दुसऱ्यांच्या चुका, त्रास हे आपल्या मनाला सतत टोचण्या देत असतात.. अशा भूतकाळालाही आपल्या वर्तमानात शक्यतो न येऊ देणे हे हितावह असते..

सुखद आठवणी मात्र नेहमी मनात बाळगाव्यात.. गोड गुलाबी आठवणींनी मनाला खूप शांतता लाभेल..

मनाचेTalks च्या आधीच्या एका लेखात पण ‘फर्गेट अँड फर्गिव्ह’ असे लिहिले होते. त्यावर बरेच जणांचे कमेंट्स आणि मेसेजेस असे होते कि चुका करणाऱ्यांना माफ केले तर ते पुढच्या चुका करण्यासाठी मोकळे होतात.

तेव्हा त्यांना माफ करून सोडून देणे हा तर मार्गच चुकीचा आहे!! याने कशी मनःशांती मिळेल??

बरोबर आहे मित्रांनो, पण चुका जर छोट्या असतील तर चुका करणाऱ्यांना समज देऊन त्यातून अलिप्त होणे कधीही चांगले.

पण चुका जर मोठ्या आणि अन्यायाच्या पातळीवर जाऊन केलेल्या असतील तर कायद्याकडे त्या चुका सोपवून अलिप्त होणे हे तुमच्याच हातात असते.

२. व्यायाम, नृत्य आणि मेडिटेशन करणे:

व्यायाम आणि मेडिटेशन हे खूपशा संकटांवर रामबाण औषध आहे.. हे आपण जाणतोच..

नृत्य करणे हा देखील मन मोकळे करण्याचा उत्तम मार्ग आहे.. नाचण्याची आवड असली तर आपण सगळे त्रास विसरून खूप आनंदी होऊ शकतो..

तुम्हाला माहीत आहे का..?? आपल्या शरीराचे काही प्रेशर पॉईंट्स असतात जे आपल्याला बऱ्याच त्रासातून मुक्ती देऊ शकतात.. त्याचेही तंत्र समजून घ्या..

कित्येक शारीरिक दुखण्यांवर आणि मानसिक असंतुलनावर हमखास प्रभावी ठरेल असे असते हे ऍक्यु प्रेशर..

प्रेशर पॉईंट्स योग्य त्या दबावाने दाबल्यास आपल्या मनातले प्रेशर ही हलके होते असे काही अभ्यासांतून सिद्ध झालेले आहे…

याबद्दलचा एक लेख आणि व्हिडीओ लवकरच मनाचेTalks वर तुमच्यासाठी घेऊन येऊ.

३. भरपूर हसा, बोला आणि मनावरचा ताण हलका करा:

हसणे हा एक मानसोपचार आहे.. ‘लाफ्टर इस द बेस्ट मेडिसिन’ म्हणतात हे तुम्ही ऐकलेच असेल..

लाफ्टर थेरपीने मनाला शांती मिळवून देणे सोपे होते..

हसवणाऱ्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये बसून मनाला हस्यतुषारांनी मिळणारा थंडावा द्या..

कॉमेडी सीरिअल, सिनेमे पहा.. लहानमुलांच्या फिल्म्स सुद्धा आपल्याला खूप आनंद देतात.. विचारांच्या वादळाला आपल्या मनापासून दूर ठेवतात..

आणि आपल्या खास मित्राशी किंवा जोडीदाराशी मनातल्या गुजगोष्टी नक्की करा..

मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर मनावरील ताण कसा पटापट हलका होतो हे आपल्याला माहीतच असेल.. मात्र ह्याची रेग्युलर प्रॅक्टिस केलीच पाहिजे.. 😎

४. दुसऱ्या कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठी काही गोष्टी करा:

अगुष्यभर आपण दुसऱ्यांसाठी जगतो. कित्येक गोष्टी आपले मन मारून दुसऱ्यांच्यासाठी करतो..

आपल्या सहनशीलतेमुळे किंवा त्यागांमुळे कोणाचे भले झाले तर आपण त्यात धन्यता मानतो.. हेच सगळ्या, भल्या माणसांच्या आयुष्याचे ध्येय असते..

मात्र हे सगळे करत असताना स्वतःला विसरून कसे चालेल..?? जशी आपली दुसऱ्यांप्रति कर्तव्ये असतात तशीच स्वतःसाठी ही काही कर्तव्ये असतात..

आणि ती जर आपण पूर्ण केली नाहीत तर मनात ते दुःख घर करते.. आणि तेच आपल्याला सतत लागून राहते..

म्हणून स्वतःसाठीही जगा.. स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी काहीही करताना मागे पुढे पाहू नका..

स्वच्छंदी आयुष्य जागा.. मन आपोआप आनंदी राहील..

५. दुर्दैवी वस्तू किंवा नाती दोन्हीला स्वाहा करून टाका:

विखारी नाती आपल्या मनाचा तोल कधीच राखू देत नाहीत.. नको असलेले नाते आपल्याला कायमचे दुःखाच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवते..

आणि मनावर किती तरी आघात करत राहते.. असे एखादे विषारी नाते आपल्या आयुष्यात असेल तर डोक्यात फक्त त्याचेच विचार घोळत राहतात.. इतके की आपण जगणेच विसरून जातो..

त्यामुळे अशी नाती दूरच असलेली बरी.. आपल्याला मानसिक त्रास देणारी व्यक्ती अलगद दूर करून टाका..

सामंजस्याने नाते संपवा किंवा त्यातला कडूपणा संपवता येत असल्यास उत्तम..

अश्याच व्यक्तीशी रिलेटेड घरातले सामान जर तुम्हाला त्रास देत असेल तर ते सुद्धा घरातून टाकून द्या.. काही जुन्या वस्तू, काही वाईट आठवणी देणारी वस्तू सुद्धा घरात नसलेल्या योग्य..

अशा कडवट आठवणी देणारी नाती आणि वस्तू सगळेच हद्दपार करा.. त्यापेक्षा मनाला आनंद देणाऱ्या माणसांशी मैत्री वाढवा..

६. स्वप्नांना कवेत घ्या, मनाला आनंद देणारे छंद जोपासा:

वाईट विचार दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मनाला चॅनलाईज करा.. आपली स्वप्न काय आहेत त्यांची उजळणी करा..

त्या दिशेने मनाच्या विचारांची दिशा वळवा.. स्वप्नांच्या मार्गाला लागल्यावर त्यासाठी लागणाऱ्या स्किल्स शिकण्यात, त्याला लागणारे छंद जोपासण्यात आपला मोकळा वेळ सत्कारणी लागेल.. आणि विचारांच्या वादळाला मनात एन्ट्रीच मिळणार नाही..

७. गुंतणे कमी करा:

कार्य करायचे आणि निघून जायचे ह्या कायद्याने वागा.. कोणत्याच गोष्टीत किंवा माणसात जीव गुंतवू नका..

कशात जीव गुंतला तर अपेक्षा वाढतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर अपेक्षाभंगामुळे मनाला इजा पोहोचते.. मन पुन्हा दुःखाच्या गर्तेत कोसळते..

त्यामुळे कशात गुंतवू नका.. गुंतवायचेच झाल्यास चांगल्या कामात आणि विचारात गुंतवा.. अध्यात्मही हेच सांगते.. आपले कर्म करा आणि अपेक्षा सोडून द्या.. मनःशांती मिळवण्याचा जरासा अवघड असला तरी बढिया मार्ग आहे हा..!!

‘गुंतणे कमी करा’ याचा अर्थ अगदी संन्यासाच्या मार्गाला लागा असेही नाही. पण वेळ येईल तेव्हा अलिप्त होता येणे हे कधीही तुम्हाला जमलेच पाहिजे.

८. कृतज्ञता अंगी बाळगा आणि समोरच्यांना समजून घ्या:

आपल्याला कोणी मदत केली असेल, आपले कोणी भले केले असेल तर अशा व्यक्तीशी, अशा विचारांशी कृतज्ञ राहिले पाहिजे.. आपली कोणाला गरज असेल तर गरजूंना मदत केली पाहिजे..

आपल्याच जवळची व्यक्ती काही कारणाने अयोग्य वागत असेल तर त्यांनाही समजून घेता आले तर ह्याहून चांगले काय असू शकते..??

दुसऱ्यांच्या विचित्र वागण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते ते समजून न घेता जर आपण सुद्धा तसेच वाईट वागत राहिलो तर त्रास आपल्यालाही होतोच..

त्यापेक्षा समोरच्याच्या परिस्थितीत स्वतःला ठेवून पहा. संकटांची तिक्ष्णता समजून येईल..!!

कृतज्ञता दाखवणे आणि मदत करणे ह्या दोन गोष्टी मनाला समाधान देतात..

ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तो विचारांचा वजनदार हत्ती मनातून काढून टाकायला..

त्याचबरोबर आणखीही काही गोष्टी तुम्ही करू शकता.. सकारात्मक लोकांबरोबर राहणे आणि सकारात्मक विचार करणे हे देखील तुम्हाला मनातील वाईट विचारांना काढून टाकण्यास भरपूर मदत करतील..

दर वेळी परफेक्ट असणे महत्वाचे नाही.. महत्वाचे आहे ते म्हणजे मनाला शांत आणि आनंदी ठेवणे..!!

मनाचेTalks च्या वाचकांचे अभिप्राय:

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

5 COMMENTS

  1. खरंच खूप छान लिहिलंय..वाचवून सुद्धा मंन शांत व्हायला लागतं.thanks

  2. अप्रतिम लेखन…. मनाचे talksम्हणजे खरच मनाचे पालन पोषण करणारे पालकच आहे. धन्यवाद!

  3. ekhadyala samjun ghen aani tyat n guntan, its like…. Aagit hath galan pan chatka lagu naye yachi kalji ghen…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.