१९७१ च्या भारत पाकिस्तान युध्दातली एक हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

१९७१ च्या भारत पाकिस्तान युध्दातली एक हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

विंग कमांडर अभिनंदन वर्तमानला पाकिस्तानात झालेली अटक आणि त्यानंतर जोशपूर्ण वातावरणात भारतात झालेलं स्वागत आपल्याला आठवतंय, पण फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे आणि त्यांच्या पत्नी दमयंती सुभेदार तांबे यांची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आपल्याला माहीत आहे का?

४९ वर्षांपासून आपल्या पतीची वाट पाहणाऱ्या एका धाडसी स्त्रीची ही कहाणी तुम्हाला नक्कीच इंस्पायर करेल..

सध्या कोरोनाच्या विळख्यात आख्खे जग बुडाले आहे.. घरात बसणे ही जणू एक शिक्षा झाली आहे..

पण तरीही आपण नशीबवान आहोत.. आपल्या घरी आपली माणसे आहेत.. नातेवाईक त्यांच्या घरी सुखरूप आहेत..

काही स्त्रिया तर आपला पती घरातून काम करतो आहे आणि आपल्याला सतत दिसतो आहे म्हणून वेगळ्याच आनंदात आहेत..

आता काही ठिकाणी या विपरीत सुद्धा परिस्थिती आहेच, पण असो….

आजचा आपला विषय वेगळा!!

आपल्या पतीचा सहवास, तोही नवीन नवीन लग्न झालेले असताना कोणाला हवासा नसेल..??

पण अवघ्या विशीत लग्न झालेल्या आणि आता वयाची एकाहत्तरी ओलांडलेल्या, पती विरहात तब्बल ४९-५० वर्षे काढत असलेल्या दमयंती सुभेदार – तांबे ह्या स्त्रीची कहाणी वाचून तुमच्या अंगावर काटाच येईल..

होय १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात आपल्या हरवलेल्या पतीची, ‘फ्लाईट लेफ्टनंट विजय वसंत तांबे’ ह्यांची त्या आजही वाट पहात आहेत..

कोण आहेत ह्या दमयंती सुभेदार – तांबे..??

दमयंती तांबे ह्या माहेरपणीच्या दमयंती सुभेदार..

त्यांचे आई वडील उत्तरप्रदेशातील प्रयागराजचे..

त्यांचे वडील वकील, तर आई शाळेतील मुख्याध्यापिका..

दमयंतीचा जन्म तिथलाच.. विद्यार्थी जीवनात त्या तीन वेळा नॅशनल लेव्हल बॅडमिंटन चॅम्पियन देखील झाल्या आहेत..

शिक्षणानंतर लगेचंच साल १९७० च्या एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे ह्यांच्याशी झाला..

आता नवीन विवाह झालेला असताना प्रत्येक स्त्री आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्य व्यतीत करायची गोड-गुलाबी स्वप्न नक्कीच पहाते..

मात्र नवरा सैनिक असेल तर त्यांचे आयुष्य सामान्य स्त्रियांपेक्षा खूप वेगळे असते..

सैन्याच्या कुठल्याही खात्यात कार्यरत असलेली व्यक्ती क्वचितच घरी राहते.. त्यांची सतत पोस्टिंग होत असते..

कधी कुटुंबाला सोबत नेता येते तर कधी एकट्यानेच पोस्टिंगवर हजर राहायचे असते..

त्यातून लेफ्टनंट तांबे एयरफोर्स मध्ये असल्याने साहजिकच लग्नानंतर आपल्या पोस्टिंगवर रुजू झाले..

नुकतेच लग्न झालेले असले तरी पती सैन्यात असल्यावर सैनिक पत्नीला हृदयावर दगड ठेवूनच जीवन जगावे लागते..

सुट्टीला घरी आलेला नवरा आपला आणि इतर वेळी तो शूर पुत्र मायभूमीचा..!!! हे प्रत्येक सैनिक पत्नी जाणतेच..

पण नियतीचा खेळ कधी सुखद, कधी दुःखद तर कधी क्रूरही असतो..

१९७० मध्ये लग्न केलेल्या तांबे दंपतीला १९७१ च्या डिसेंम्बर मध्येच एकमेकांपासून दुरावले जाऊ ह्याची कल्पनाही नसेल..

अवघ्या दीड वर्षाच्या संसारनंतर दोघांची ताटातूट होईल असे कोणाच्या ध्यानीमनीही नसेल..

१९७१ च्या डिसेंम्बर मध्ये भारत पाकिस्तानात युद्ध सुरू झाले.. त्यात एअरफोर्स मध्ये असलेले लेफ्टनंट तांबे पाकिस्तानी धर्तीवर कोसळल्याने पकडले गेले..

युद्धाच्या नियमांप्रमाणे बघायला गेले तर.. युद्धाचा निकाल काहीही असो दोन्ही देशातील सैनिक युद्धबंदी हे युद्धानंतर त्यांच्या देशांकडे रवाना करण्याचा नियम आहे..

त्यामुळे टेलिग्रामद्वारे आपल्या पतीच्या स्टेटसची माहिती कळून सुद्धा दमयंती निश्चिन्त होत्या..

त्यांना विश्वास होता की लेफ्टनंट तांबे लवकरच भारताकडे सुपूर्द केले जातील.. आणि ते घरी येतील..

पण पाकिस्तान हा कायमच एक रडीचा डाव खेळणारा देश आहे हे आपण जाणतोच..

तेव्हाही भारतातील सैनिक जे पाकिस्तानात युद्धबंदी म्हणून पकडले गेले त्यांचा काहीही हिशेब भारताला दिला गेला नाही..

आजच्या घडीला ह्या घटनेला जवळजवळ ५० वर्षे होत आली आहेत..

आणि वयाच्या विशीपासून आपल्या नवऱ्याची वाट पाहत असलेली दमयंती आता वयाने सत्तरी पार झाली असली, तरी तिने आशा सोडलेली नाहीये..

दमयंती तांबे ह्यांनी पाकिस्तानात अडकलेल्या आपल्या पतीला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत..

त्या सांगतात, सुरुवातीला त्यांना सगळे सोप्पे वाटले.. युद्ध नियमांना अनुसरून सगळेच युद्धबंदी परत येतील ह्यावर त्या विसंबून राहिल्या..

मात्र बरेच महिने, वर्ष कसल्याच हालचाली झाल्या नाहीत म्हटल्यावर त्यांना कळून चुकले की आता त्यांनाच खूप मेहनत घ्यावी लागणार पतीला परत आणायला..

दरम्यान १९७२ मध्ये त्यांना खेळात उत्तम कामगिरी मुळे अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले..

मात्र हे कौतुक पाहायला त्याचे पती त्यांच्याजवळ नव्हते..

पुढे सासऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी जे. एन. यु. मध्ये स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून नोकरी सुरू केली..

स्पोर्ट्स ऑफिसर बनल्यामुळे त्यांना संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना भेटणे जरा सुकर झाले..

त्यांनी स्वतःच्या जोडीदाराला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले.. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही..

३-४ वर्षे अशीच गेल्यावर दमयंतीना निराशेने कवटाळले.. त्यांना कोणताच मार्ग दिसेना..

पतीची ख्याली खुशाली देखील कळेना.. त्यातच त्यांना समजले की ढाकातील एका वर्तमानपत्रात भारतातून पकडलेल्या सैनिकांच्या नावाच्या यादीत लेफ्टनंट तांबे ह्याचेही नाव आहे..

१९७५ साली त्यांना ही बातमी मिळाली आणि त्यांना हायसे वाटले..

आशेचा एक जरी किरण दिसला तर माणूस पुन्हा जोमाने प्रयन करायला लागतो..

दमयंतीच्या बाबतीतही असेच झाले.. चार वर्षांनी का होईना पण आपल्या जोडीदाराची पुन्हा भेट होईल हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना..

त्यांनी पुन्हा प्रयत्न चालू केले.. भारत सरकार कडे अर्ज केले, सैनिकांना परत आणण्यासाठी पाऊले उचलली जावीत ह्यासाठी विनवण्या केल्या..

ह्यात आणखी काही वर्षे उलटली..

१९७९ साली केंद्रीय मंत्र्यांनी काही भारतीय युद्धबंदी अजूनही पाकिस्तानात अडकले असल्याची कबुली दिली..

दोन्ही देशांच्या संगनमताने १९८३ साली ज्यांचे नातेवाईक बंदी आहेत त्यांना त्या देशात जाऊन भेटण्याची परवानगी मिळाली..

आपल्या पतीला १२ वर्षानंतर पाहता येणार…!! ह्यापेक्षा आनंददायी काय असू शकेल..??

म्हणजे इतक्या वर्षांची प्रार्थना देवाने ऐकली की केलेली पुण्य कामी आली..??

पण दमयंतीच्या नशिबात ह्यातले काहीच नव्हते..

पाकिस्तानातील मुलतान ह्या शहरात जायला मिळणार, पतीला पाहायला मिळणार म्हणून तिचा आनंद गगनात मावत नव्हता..

मात्र भारतातून एका तपाच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानात नवऱ्याला भेटायला जाऊ शकणाऱ्या पत्नीच्या हाती फक्त निराशा आली..

थातुरमातुर कारणे देऊन पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी भारतातून येणाऱ्या ह्या सगळ्या आशावादी लोकांना, कैद्यांशी भेट होणे नाकारले..

ही डील पाकिस्तानने अचानक रद्द केली..

दमयंतीजींना त्यावेळी किती दुःख झाले असेल ह्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.. किती अवघड ते जीणे..

नवरा पाकिस्तानात युद्धकैदी म्हणून अडकलेला असताना एकटीने इकडे भारतात चरितार्थ चालवायचा, नवऱ्याला कधी ना कधी भेटता येईल ह्या आशेवर एकेक दिवस ढकलायचा..

मात्र अशा व्यक्तीवर नशीबालाही दया येऊ नये..!!! इतके का नियतीने कठोर व्हावे..??

अर्थात, हे कमी होते कदाचित म्हणून नशिबाने पुन्हा दमयंतीला परीक्षेला उभे केले..

२००७ साली पाकिस्तान सरकारने १५ जणांना युद्धकैद्यांना भेटण्याची परवानगी दिली..

लाहोर च्या जेल मध्ये असलेले कैदी दाखवलेही गेले.. मात्र त्यात लेफ्टनंट तांबे नव्हते..

त्यामुळे उरलेल्या कराची, रावळपिंडी, सुक्कुर, फैसलाबाद इत्यादी जेलच्या जेलर्सनी फक्त कैद्यांचे रेकॉर्ड दाखवले..

तेही उर्दू मध्ये लिहिलेले.. कोणत्याही कैद्याला पहायची परवानगी ह्या १५ जणांना मिळाली नाही.. पुन्हा घोर निराशा पदरी पडली..

सगळेच दुःखी मनाने पुन्हा मायदेशी आले.. वर्षे अशीच वाया जात राहिली..

आणि पुन्हा भेटता येण्याची, बघता येण्याची अंधुकशीही आशाहि मावळली..

तेंव्हापासून त्या आपल्या नोकरीत कार्यरत राहिल्या..

फिजिकल एज्युकेशन च्या डेप्युटी डिरेक्टर पदाचा भार सांभाळत आलेल्या दमयंती २०१३ ला रिटायर्ड झाल्या.

आणि सध्या वॉर विडो संस्थेच्या म्हणजेच शहिदांच्या विधवांच्यासाठी असलेल्या संस्थेच्या जनरल सेक्रेटरी आहेत..

आपल्या पतीला युद्धात गमावलेल्या शहिदांच्या विधवा जे आयुष्य जगतात तेच आयुष्य, पती जिवंत असूनही दमयंतीच्या वाटेला आले..

आता ५० वर्षांनंतर हे ही कळायला मार्ग नाही की आपला जोडीदार जिवंत आहे की नाही.. असे आयुष्य काढणे किती अवघड असेल..??

पण आजही पतीला भेटायचे अशी महत्वाकांक्षा दमयंती मनाशी बाळगून आहेत..

त्यांनी त्यांचे आयुष्य नातेवाईकांच्या साथीने व्यतीत केले खरे मात्र मनातून पतीच्या आठवणीशीवाय एकही दिवस गेला नाही असे त्या सांगतात..

त्यांचा पती इतिहासजमा झाला असला तरी कोणत्यातरी जन्मात पुन्हा भेट होईल ह्या आशेवर त्या जगत आहेत..

अशा असामान्य धैर्याच्या दमयंती तांबेजींना मनाचेtalks चा सलाम..!!

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.