कोणालाही न दुखवता राग कसा व्यक्त करावा ते जाणून घ्या ह्या लेखातून.

राग कसा व्यक्त करावा

‘हे मी काय करून बसलो/बसले? मी असं बोलायला नको होतं’ अशा पश्चात्तापाची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का? नक्कीच, आली असणार कधी ना कधी.

यशस्वी आणि निवांत आयुष्य जगण्यात रागाचं व्यवस्थापन, अँगर मॅनेजमेंट हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणून हा लेख शेवट्पर्यंत नीट वाचा.

प्रत्त्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळी असते. काहींना खूप उशिरा राग येतो तर काहींना चटकन..

काही माणसे तर लाकडाच्या भुश्श्याप्रमाणे भडकून जळून मोकळे होतात.. आणि नंतर आपल्या शीघ्रकोपाचे परिणाम भोगत राहतात..

रागामध्ये सारं काही उध्वस्त करण्याची खूप ताकद असते. सगळ्याच धर्मात रागाला आवर घालण्यास सांगितले जाते. राग योग्य ठिकाणी योग्य प्रमाणातच असायला, हवा किंबहुना नसलेला बरा.

सहसा ‘रागीट’ असणे तब्येतीला सुद्धा हनिकारकच आहे. डोकेदुखी, उच्च रक्तदाब, हृदयरोग असलेल्यांनी रागापासून दूरच रहावे.

आपण रागाच्या भरात कोणाला काय म्हणतो आहोत हे आपल्याला समजतही नाही. कित्येक वेळा आपल्या जवळच्या, आवडत्या आणि लाडक्या माणसांना सुद्धा आपण संतापात वाट्टेल ते बोलून जातो आणि नंतर कितीही वाईट वाटले तरी काहीच उपयोग नसतो.

ज्यांच्यावर इतकी माया करतो त्यांना दुखावून आपल्याला सुद्धा नंतर फारच त्रास होतो.

पण राग अनावर झाल्यावर आपण काय बोलतोय ह्याची आपल्याला शुद्धच नसते. आपल्या आयुष्याला वाईट रित्त्या बदलून टाकेल असा राग काय उपयोगाचा?

त्यापेक्षा शांत संयमित स्वभाव राखता आला तर आयुष्यही स्वस्थ आणि आनंदी राहू शकते. आपलेही आणि इतरांचेही..!! हा राग आवरायला शिकणे हे कसब आहे.

उदाहरणार्थ:

सध्याच्या या अवघड महामारीच्या काळामध्ये अख्खे जग होरपळून निघत आहे.. लॉकडाऊन, कर्फ्यु, मृत्यूचे तांडव, वाणसामानाची कमतरता, मित्रमंडळी नातेवाईकांशी भेट किंवा काहीही चर्चा होऊ न शकणे, नोकरी धंदा बंद असणे, भविष्याची चिंता वाटणे, किंवा मुलांना असलेले फ्रस्ट्रेशन बघता चिडचिड होणे, भर्रकन राग येणे सहाजिकच आहे..

आणि हे जगातल्या सगळ्याच माणसांच्या बाबतीत घडत असणार.. कोणीही अशा परिस्थितीतून सुटले नसणार.

त्यामुळे अशा वेळी आधीच जीवाचे भय असताना रागाचा उद्रेक झाला तर किती वाईट परिस्थिती निर्माण होईल? नाही का?

असे पँडॅमिक असो किंवा नसो, आपल्याला कधीही स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवता आलेच पाहीजे.

पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आतल्या आत कुढत राहा.. कारण राग गिळून सहन करत राहणे हे देखील आपल्यासाठी घातकच असते..

आणि त्याचे पर्यावसान तब्येत बिघडण्यात किंवा एकाच वेळी अतिशीघ्रकोपात होते. आणि हे दोनीही घातकच आहे ना..!!

चला तर मग कोणालाही न दुखावता, अगदी स्वतःलासुद्धा न दुखावता आपला राग कसा व्हेंट (मोकळा/व्यक्त) करता येईल ते पाहू……

आपले ‘संतापाशी’ जसे नाते असते त्याप्रमाणे आपल्या भावभावना कार्यरत असतात.

आपले इमोशन्स कसे असतील हे आपल्यातला राग ठरवतो आणि त्यावर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे ‘राग’ का कसा कुठून येतो हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

राग सुद्धा खरे तर एक नैसर्गिक भावनाच आहे. पण हा एकटा येत नसतो. ह्यामागे बऱ्याच भावना सोबतीला असतात.

काळजी, भीती, चीड, द्वेष, चंचलता, दुःख, त्रास आणि वैताग अशा सगळ्या दुय्यम भावना रागात परावर्तित होऊ शकतात..

ह्या भावना दाबल्या किंवा खूप उफाळल्या तर आपला राग उफाळतो हे समीकरण पक्के असते. त्यामुळे ह्या दुय्यम भावनांवर आधी काम करायला सुरुवात करा. कारण ह्याच भावना, आगीत तेल ओतण्याचे काम करत असतात.

ह्या दुय्यम आणि नकारात्मक भावनांवर वेळीच रोक लावला पाहिजे. ह्याच्यासाठी काही सोप्या स्टेप्स पाहू.

१. आपल्या भीतीला (नकारात्मक भावनांना) दाबू नका, सामोरे जा:

प्रत्येकाला कशा ना कशाची भीती / काळजी असते. आणि आपण तिला कायम स्वतःपासून सुद्धा लपवतो. पण जर आपण त्या काळजीला त्या भीतीला सामोरे गेलो तर काय होते?

सामोरं जाण्यासाठी तयार असणं म्हणजे काय? याचं एक उदाहरण बघू…

बॉसने तुम्हाला एखादं प्रोजेक्ट दिलं. पण तुमचं ते काम वेळेत पूर्ण नाही झालं, यावर एकतर बॉस तुमच्यावर रागावेल किंवा तुम्ही काम चांगलं होण्यासाठी, आणखी जास्त वेळेची गरज असल्याचं समजावून देऊ शकलात, तर कदाचित वेळ वाढवून सुद्धा देईल.

या ऍटिट्युड मुळे परिस्थितीबद्दल आणि समोरच्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात सकारात्मक भावना तयार होईल. आणि त्यामुळे समोरूनसुद्धा तोच प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढेल.

कोणाचा किंवा कोण्या वस्तूचा राग येण्याच्या ऐवजी आपल्या मनात करुणा, दया माया निर्माण होईल.

त्यामुळे जरा वेळ काढा, स्वतःला नकारात्मकतेच्या मागे लपायला नाही, तर तिच्याशी लढायला शिकवा.

आपल्याला राग येतो, तो मान्य करा आणि त्यावर उपाय योजना करा.. परिस्थितीपासून तोंड लपवू नका. राग येणे नैसर्गिक आहे.

२. रागाच्या नकारात्मक भावनांचे मूळ शोधा:

राग येतो हे मान्य करता आले, तर आपल्याला आता एक पाऊल पुढे टाकता येईल.

भीती, काळजी, द्वेष अशा नकारात्मक भावना आपल्या मनात घर करून का बसल्या आहेत त्याचे मूळ कारण शोधायला घ्या.

लहानपणातली, तरुणपणातली एखादी घटना, आपले सामाजिक स्टेट्स किंवा इतर काही कारणं आहेत का बघा. ह्या नकारात्मक भावना घालवण्यासाठी आत्मपरीक्षण करा.

आपण कशात यश मिळवले किंवा काय आत्मसात केले तर आपल्यातला न्यूनगंड जाईल ह्यावर विचार करा. आणि त्याप्रमाणे कृतीला लागा.

काहीतरी कारण असणारच नकारात्मकता वाढीस लागण्यामागे, ते शोधून काढले पाहिजे नाहीतर शेवटी रागाला निमंत्रण मिळणारच..!!

३. रागावर नियंत्रण मिळवायचे आहे आणि ते कशाला ह्याचा विचार करा:

आपल्या आयुष्यात काय महत्वाचे आहे? आपली माणसे, आपले काम आणि सगळ्यात महत्वाचे आपली तब्येत. कारण शीर सलामत तो पगडी पचास, नाही का?

मग मनातली नकारात्मकता आपण कशासाठी जपून ठेवतो? त्याने आपल्याला महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर किती वाईट परिणाम होतोय ह्याची पडताळणी केलीये का? नसल्यास जरूर करा..

आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापासून दुरावता कामा नये. म्हणून नकारात्मकता कमी करण्याकडे भर द्या. स्वतःची मूल्यवान तत्वे अबाधित ठेवा. एक सकारात्मक जीवनपद्धती स्वीकारा.

४. मूव्ह ऑन करा म्हणजेच, चलते रहो:

आपल्यातल्या नकारात्मक गोष्टी आपण नक्कीच बदलू शकतो. मात्र सारे जग बदलणे आपल्याला शक्य नाही.

तरीही प्रयत्न सोडायचा नाही.. प्रयत्न चालू ठेवंतच पुढे जात राहायचे.. जगच काय, आपणही एक झटक्यात सुधारत नसतो.

पण तरीही गोष्टी तुमच्या आटोक्या बाहेरच्या असतील तर सगळ्यासकट मूव्ह ऑन करता आले पाहिजे.

कारण नकारात्मकता काढून सकारात्मकता आणणे ही वन टाईम प्रोसेस नाही.. हे आयुष्यभर करावे लागते..

नकारात्मकता भवतालच्या परिस्थितीमुळे येतच राहणार, त्यामुळे राग सुद्धा येणारच..

म्हणून नाकारात्मकतेला सकारात्मकतेत परावर्तित करत गेलो तर रागाला निमंत्रणच मिळणार नाही..

आपल्या मनाला तशी सवयच लावून घ्या. राग ही शेवटची स्टेप आहे.. मनाला समजावून टाका की आपल्याला तिथ पर्यंत जायचेच नाहीये..

संकटे आधीच निपटून टाकायची आहेत. कारण संकटे, बदल, अडचणी सतत येणारच पण मनाची सकारात्मकता घट्ट धरून ठेवता आली पाहिजे.

आपल्या रागामुळे कोणाला दुखावण्यापेक्षा त्याची पाळेमुळे खणून काढून त्यांना सुपीक भावनांमध्ये बदलून टाकले तर रागाला कुठे जागाच मिळणार नाही..

राग, हा रोग नाही तर मनाचा खेळ आहे. त्यामुळे मनाला सकारात्मक कामाला लावणे उत्तम.

त्यासाठी व्यायाम आणि मेडिटेशनची सुद्धा जोड हवी. आपल्यासारखीच दुसऱ्यांनाही संधी देण्याचा मनाचा मोठेपणा शिकायला हवा.

एवढंच नाही, तुमच्या मध्ये जर न्यूनगंड नसेल, तर तुम्हाला कोणाचा राग येणार नाही, समोरच्या व्यक्तीने तिच्या वैचारिक पातळीनुसार काम केले… एवढं जर तुम्ही समजू शकलात, तर राग तुमच्या आसपास सुद्धा भटकणार नाही….

आणि तरीही, आलाच राग तर पुढचा उपायही आपल्याकडे आहेच… त्यासाठी जिज्ञासूंनी ‘रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?’ हा लेख वाचा. खाली त्या लेखाची लिंक दिलेली आहे.

रागातल्याऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?

राग हा आपल्याला नैराश्येच्या खाईत लोटतो मात्र सकारात्मकता अंगी बाणवली तर आपल्याबरोबर आपल्या भवतालच्या लोकांनाही आपण आनंद देतो.

त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवा आणि कायम योग्य रस्त्यावर वाटचाल करा.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.

आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. हे सांगण्याचे कारण असे कि बरेच वाचक आमच्यावर चिडतात.

कि एवढी चांगली माहिती आहे, आम्ही का इतरांना द्यायची नाही? तर नक्की द्या!! पण कॉपी-पेस्ट करून नाही, तर दिलेल्या पर्यायातून शेअर करूनच…

मनाचे श्लोक

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

  1. खुपच छान लेख आहे…….लेखकाचे अभिनंदन तसेच आभार…!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.