असा बनवा तुमच्या वैयक्तिक विकासाचा आराखडा!!

असा बनवा तुमच्या वैयक्तिक विकासाचा आराखडा!!

व्यवसाय, नोकरी किंवा आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर माणसाला पुढेच जायचं असतं, पण वास्तवात किती जण असे पुढे जात असतात. म्हणजे विकास करू शकतात!! तुमच्या व्यवसायात या वर्षी तुमचा टर्न ओव्हर ५० लाखांचा असेल तर पुढच्या वर्षी एक करोड करण्यासाठी, किंवा नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी काही विशेष गोष्टी तुम्ही करता का?… अशाच वैयक्तिक विकासाचा आराखडा कसा बनवता येईल ते या लेखात वाचा.

वाढ हा माणसाचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे. निसर्गातील कोणतीही वनस्पती, प्राणी आज आहे त्यापेक्षा दुसऱ्या दिवशी मोठी झालेली असते.

आपण सुद्धा जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आकाराने, उंचीने वाढत जातो. ह्या आपोआप होणाऱ्या शारीरिक वाढीबरोबर आपल्याला इतर गोष्टीत सुद्धा वाढ हवी असते.

आपण आहोत त्या पेक्षा जास्त चांगले होणे किंवा जास्त यशस्वी होणे ही प्रत्येकाची इच्छा असते.

आता ही वाढ कोणत्याही गोष्टीत असू शकते म्हणजे नोकरीत आपण आज आहोत त्या पेक्षा मोठ्या पदावर जाणे किंवा आपले शरीर आज आहे त्यापेक्षा अधिक पिळदार दिसणे किंवा आपला व्यवसाय आज आहे त्यापेक्षा जास्त मोठा असणे असे काहीही असू शकते.

आपण जे काही ठरवू, जे काही आपल्यासाठी महत्वाचे असेल त्यात आपला विकास होणे गरजेचे आहे. वैयक्तिक विकासाचे आठ टप्पे आज आपण अभ्यासणार आहोत.

हे टप्पे ध्यानात घेऊन जर तुम्ही तुमच्या ‘विकासाचा आराखडा’ बनवला, तर तुमच्या ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांचा सामना कसा करता येईल… याबद्दल तुम्हाला पूर्वकल्पना असेल.

१. आपले उद्दिष्ट ठरवा

आपण आयुष्यात अनेक गोष्टी करत असतो. कुणी नोकरी, उद्योग करत असतो, कुणी कलाकार असतो तर कुणी खेळाडू. एकाचवेळी आपण ह्यातल्या एकापेक्षा जास्त गोष्टी सुद्धा करत असतो.

अशावेळी कोणत्या क्षेत्रात प्रगती करणे आपली प्राथमिकता आहे हे ठरवणे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. अर्जुनाला जसा बाण चालवताना फक्त माशाचा डोळा दिसत होता तसे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आपले उद्दिष्ट दिसायला हवे.

जोपर्यंत आपण आपल्याला काय हवे आहे हे स्पष्ट ठरवत नाही तोपर्यंत आपण ते मिळवण्यासाठी कोणताही आराखडा बनवू शकत नाही. आपल्या समोर आपले उद्दिष्ट स्पष्ट असायला हवे, तरच आपण त्यापर्यंत पोहोचू शकतो.

२. आपल्या उद्दिष्टामागचे कारण शोधा

एकदा का आपल्याला काय हवे आहे हे ठरले की पुढची पायरी आहे की, आपल्याला ते का हवे आहे ह्याचा शोध घेणे. आपले जे काही उद्दिष्ट असेल त्यामागचे कारण सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.

उदाहरणार्थ, जर तुमचं उद्दिष्ठ प्रमोशन मिळवायचं असेल तर त्या मागे कारण कुणासाठी येत्या दिवसांत आपलं नवीन घर घेणं असेल, एखाद्या अविवाहित मुलाचं लवकरात लवकर प्रमोशन मिळवण्याचं कारण लग्नासाठी चांगल्या प्रकारे सेटल होणे असेल….

ध्येय गाठण्याचं कारण जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ध्येयाच्या दिशेने घोडदौड करताना तुमचा उत्साह आपसूकच तुम्हाला रिचार्ज करेल.

आणि जेव्हा असं ठोस कारण तुम्हाला रिचार्ज करेल तेव्हा ध्येयाकडे तुम्हाला कोणी ढकलणार नाही तर तुम्ही स्वतः ध्येयाकडे ओढले जाल, आकर्षित व्हाल.

३. अडथळ्यांचा विचार करून ठेवा आणि त्यांना आव्हान म्हणून स्वीकारा

आपण आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यात नक्कीच काही ना काही अडथळे येतातच. आपण आपल्या प्रगतीचा आराखडा ठरवताना आपल्यासमोर येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करणे सुद्धा महत्वाचे आहे.

सकारात्मक विचार असावा हे सुद्धा महत्वाचे असते पण त्याचबरोबर येणाऱ्या अडचणी माहीत असणे आणि त्यासाठी तयार असणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.

जर आपण आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणी माहीत करून घेतल्या तर त्या टाळण्यासाठी आपण उपयोजना करू शकतो.

जर आपण अडथळ्यांचा विचार न करताच आपला प्रवास सुरु केला तर अचानक समोर येणारे अडथळे आपल्यासाठी फार मोठे संकट ठरू शकतात. त्यामुळे अडथळ्यांचा विचार करून त्यासाठी तयार असणे गरजेचे आहे.

आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडथळे माहित करून घेतले तर त्या अडथळ्यांना आव्हान म्हणून स्वीकारण्याचा दृष्टिकोन जर तुम्ही तुमच्या अंगी भिनवला तर ठरवलेले कुठलेलं उद्दिष्ठ गाठणं हे तुमच्यासाठी कठीण असूच शकणार नाही.

४. आवश्यक असणारी मदत घ्या

आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी नीट जमेलच असे नसते. काही गोष्टीत आपल्याला कुणाचीतरी मदत घेणे गरजेचे असते.

अगदी यशस्वी माणसे सुद्धा प्रत्येक गोष्ट आपली आपणच करावी असा अट्टाहास करत नाहीत, उलट ज्या त्या कामांना योग्य तो माणूस शोधून त्यांच्याकडून उत्तमरीत्या आणि वेळेत ते काम करून घेणे याकडे त्यांचा कल असतो.

आजकाल बरीच प्रेरणादायी पुस्तके उपलब्ध असतात. या व्यतिरिक्त इंटरनेटवर सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी उपयुक्त असे अनेक लेख असतात.

आपण अशाच एखाद्या पुस्तकाचा किंवा लेखकाचा आदर्श ठेऊन एक प्लॅन आखू शकतो. वेळोवेळी या पुस्तकांचा किंवा लेखांचा आधार घेऊन आपल्या प्लॅनप्रमाणेच आपली प्रगती होत आहे ना?

प्रगती अशीच सुरू कशी ठेवायची? किंवा ती होत नसेल तर त्यासाठी काय सुधारणा केली पाहिजे? या सगळ्याचा आढावा आपण घेऊ शकतो.

तुम्हाला समजा असे एकही पुस्तक आवडले नाही किंवा एकाही लेखातून प्रेरणा मिळाली नाही तर काय करायचे?

अशा वेळेस आपण आपल्या ओळखीच्या एखाद्या यशस्वी माणसाचा आदर्श समोर ठेऊ शकतो. यशस्वी होण्यासाठी त्या व्यक्तीने काय केले? त्याच्या कामाची पद्धत काय होती हे आपण आपल्या डोळ्याने बघितलेले असेल त्यामुळे त्यानुसार आपण आपले वागणे बदलू शकतो.

५. आपण बरोबर मार्गावर आहोत ह्याची खात्री करा

एखादे ध्येय मनात ठेवणे व त्यावर काम करणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास का?….. तर नाही….

हा फक्त व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू आहे. ध्येय ठरवण्यापासून, ते साध्य होण्यात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. आणि बहुतेकदा या अडचणींचा उगम आपल्याच मनातून झालेला असतो.

कंटाळा, उत्साहाचा अभाव अशा खूप गोष्टी असतात. एखाद्या वेळेला खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्या पदरात सुरुवातीला अपयशच येते अशावेळेस बऱ्याचदा खचून जायला होते.

अशा वेळी खचून न जाणे ही खरी कसोटी असते. आपण जे ठरवले आहे त्याप्रमाणे आपले वागणे आहे का? आपले प्रयत्न योग्य दिशेला सुरू आहेत का?

आपल्या कंटाळ्यावर किंवा आळशीपणावर आपण मात केली आहे का? हे आपण वेळोवेळी पडताळून बघितले पाहिजे.

६. नोंदी ठेवण्याची सवय लावा

आपल्याला जे करायचे आहे, जे करून झाले आहे या सगळ्याची नोंद आपल्या डोक्यात ठेवणे बऱ्याच वेळा कठीण जाते.

आपल्याला काय करायचे आहे, आपले पुढचे पाऊल काय असणार ह्याचा विचार करण्यात आपली बरीच शक्ती वाया जाते. अशावेळी आपण आपल्याला जे काही करायचे आहे ते सगळे, जर लिहून काढले, ‘टू डु लिस्ट’ तयार ठेवली तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.

ह्यामुळे आपण बरोबर मार्गावर आहोत का हे आपल्याला समजते त्याच बरोबर वेळोवेळी आपल्याला आपली प्रगती तपासता येते. आपल्याला करायची असलेली कामे सतत समोर दिसली तर त्यातून आपल्याला प्रेरणा सुद्धा मिळते.

७. लहान लहान यश सिलिब्रेट करा

आपल्या प्रवासात अगदी लहान लहान टप्पे ठरवून त्यावर काम करणे महत्वाचे आहे. अगदी लहान लहान उद्दिष्टे समोर ठेऊन त्यावर आपण काम केले पाहिजे. एखादे उद्दिष्ट आपण प्राप्त केले की त्याचा आनंद सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे.

आपण बरोबर मार्गावर आहोत, आपल्याला यश मिळते आहे हे विचार सुद्धा प्रवासात महत्वाचे असतात.

त्यामुळे अगदी लहान लहान यश सुद्धा आपल्याला साजरे करता आले पाहिजे आणि त्यासाठी स्वतःला आपण बक्षीस दिले पाहिजे. ह्यातून आपला आत्मविश्वास टिकून राहतो आणि मोठे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपली ऊर्जा सुद्धा वाढते.

८. वेळोवेळी आपल्या प्रगतीचा मागोवा घ्या

आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने जात असताना आपला प्रवास हा खूप लांबचा असतो. बऱ्याचदा काही काळानंतर आपल्या प्रवासाचा वेग मंदावतो किंवा आपण रस्ता भरकटतो.

त्यामुळे आपण आपल्याला हवे ते मिळवू शकत नाही. ह्यासाठी एका ठराविक वेळानंतर आपण आपली प्रगती तपासत राहिले पाहिजे.

आपण जे ठरवले आहे त्या प्रमाणे आपला प्रवास होतो आहे का? आपण बरोबर मार्गावर जात आहोत का? ह्या सगळ्याची उत्तरे आपण वेळोवेळी थोडे थांबून शोधली पाहिजेत तरच आपण आपल्याला हवं त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो.

आपल्या आयुष्यात आपल्याला हवे ते सगळे मिळवण्यासाठी आपले प्रयत्न तर गरजेचे असतातच पण त्याच बरोबर गरजेचे असते ते प्रयत्नांची दिशा योग्य असणे, प्रयत्नांनाच आराखडा सुरुवातीपासूनच आपल्या समोर स्पष्ट असणे.

मित्रांनो, या आठ टप्प्यांचा नीट विचार करून आपल्या वैयक्तिक विकासाचा आराखडा जर तुम्ही बनवला तर असामान्यरित्त्या यशस्वी लोकांच्या यादीत सुद्धा एक दिवस तुमचे नाव झळकू शकते…

लेख कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा, तुमच्या मित्र मैत्रिणींना दिलेल्या पर्यायाचा वापर करून लेख शेअर करायला विसरू नका… तुमच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि मनस्वी धन्यवाद.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.