राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन गगनभरारी घेण्याचे तीन मूलमंत्र

राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन गगनभरारी घेण्याचे तीन मूलमंत्र

अपयशयाच्या, संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन पुन्हा गगनभरारी घेण्यासाठी नेमकी गुरुकिल्ली काय, हे वाचा आजच्या लेखात.

कधीकधी आयुष्य असा यू-टर्न घेत की त्यातून बाहेर पडताच येत नाही आणि आपण खूप मागे पडतो.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातही असे मागे येण्याचे क्षण, प्रसंग येतात. पण अपयशयाच्या, संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन पुन्हा गगनभरारी घेण्यासाठी नेमकी गुरुकिल्ली काय, हे वाचा आजच्या लेखात.

‘’या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे गाणं आपण खुपदा ऐकलेलं असेल. खूप छान आणि सकारात्मक विचार यातून प्रेरणा देतातच.

मला नेहमी अशी आयुष्याच्या, जगण्याच्या आनंदी छटा चितारणारी गाणी ऐकायला खूप आवडतात.

कारण माझ्या पडत्या काळात, अनेक वाईट प्रसंगात जेंव्हा माझ्या मनावर नकारात्मक विचार घोंगावू लागतात तेंव्हा त्यांना पिटाळून लावण्याचे काम, ऊर्जा ही गाणी मला देतात.

आयुष्यात पुढे जायचं असेल तर या गोष्टीची खूणगाठ मनाशी जरूर बांधा.

आपल्या आयुष्यात खूप वादळे येत असतात, कमी-अधिक प्रमाणात ती प्रत्येकाच्या जगण्यात असतातच.

पण त्यातून बाहेर पडताना खूप त्रास होतो आणि काहीवेळा आपले आधीचे आयूष्य असते तसे ते नॉर्मल राहत नाही. काही बदल तर होतोच.

पण पुन्हा नॉर्मल आयुष्याकडे वळण्यासाठी आपण काय केले पाहिजे, याची माहिती आपल्याला कोणी सांगत नाही.

सहानुभूती देणारे लोक लगेच गोळा होतात पण त्यातून बाहेर काढणारे हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतात.

त्यामुळे स्वतःच त्यावर मात करत पुन्हा आपल्या आयुष्याला नवा अर्थ देण्यासाठी आणि पुन्हा नेहमीचं आनंदी आयूष्य जगण्यासाठी काय करायला हवं आणि काय टाळायला हवं हे आजच्या लेखात आपण पाहुयात.

1) भूतकाळात जास्त रमू नका, आभार आणि क्षमा यांची ताकत ओळखा

अनेकदा काही दुर्धर आजारपण अचानक अंगाशी येतं आणि मग त्यातून आपण कधी बाहेर येऊ की नाही आपण जिवंत राहू की नाही इथपर्यंत विचारांचे वादळ आपल्या मनात, मेंदूत घोंघावू लागतात.

भूतकाळात आपण रमू लागतो, आपण काय गमावले आणि काय कमावले याचा हिशोब मांडायला लागतो. पण त्यावेळी आपल्या समोर असणार्‍या वर्तमानाला आपण पाहत नाही आणि त्यापालीकडे असणार्‍या भविष्यकाळच्या आशेच्या किरणांचीही आपल्याला तमा राहत नाही.

निराशेच्या खोल गर्तेत आपण बुडायला लागतो. पण हे आपल्या वर्तमानासाठी योग्य आहे का? तर नक्कीच नाही.

‘हर पल यंहा जी भर जियो, जो है समा कल हो न हो’ बरोबर ना?…..

आयुष्याच्या फुलपंखी बागेत विहार करताना काहीवेळा काटे तर पायात टोचणारच पण तोच पाय किती वेळ धरून ठेवायचा?

म्हणून आपला खूप वेळ भूतकाळात रामण्यात न घालवता तो वर्तमानातील चांगल्या होऊ घातलेल्या गोष्टींवर विचार करण्यात, संकटातून मार्ग काढण्यात घालवा.

त्यातून धडा नक्की घ्या पण त्यात रमू नका. आयुष्याचे क्षण तुमच्या हातात आहेत ते जाऊ देऊ नका. आयुष्यात कधीच रिटेक नसतो.

आपल्या जीवनाचा सिनेमा जर हिट व्हावा, असे वाटत असेल तर पुढे सकारात्मकतेने वाटचाल करा. तेच हिताचे आहे.

‘कोशिश करनेवालोंकी, कभी हार नाही होती’ हे लक्षात ठेवा. तेव्हा प्रयत्न करा आणि तुमचे ध्येय गाठा.

आज आपण बरेचजण कोरोंनाच्या काळात भूतकाळातच रमतोय, हेच करतोय, नाही का? पण तसे करून आपली प्रगति आपणच थांबवतोय. त्यातून मार्ग काढत आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करा.

यासाठी मी एक उदाहरण देते. माझ्या एका मैत्रिणीला कर्करोग झाला होता. ज्यावेळी तिला हो गोष्ट कळली तेंव्हा ती कोसळलीच. तिची मनस्थिती बिघडू लागली.

ती अधिकच भूतकाळत रमू लागली. स्वमग्न होऊ लागली. चिडचिड, राग, संताप तिच्यातील सकारात्मकता संपवू लागला.

तिची नोकरी गेली, कुटुंबात कलह निर्माण होऊ लागले आणि इतरांचा तिरस्कार वाटू लागला. ती वर्तमानातील आनंदाला मुकू लागली.

त्यामुळे तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आणि तिला उगीचच सहानुभूती मिळू लागली, जी तिला नको होती.

कणखर असणार्‍या तिला जेव्हा तिची चूक समजली तेंव्हा तिने तिच्या कर्करोगाकडे केवळ उपचार हेच औषध न पाहता मानसिक संतुलन हीसुद्धा महत्वाची शक्ति असल्याचे जाणवून घेतले.

आपण जेंव्हा अश्या प्रसंगातून जातो तेंव्हा केवळ बाह्य उपचारांची तर गरज असतेच पण अंत्यंतिक गरज असते ती तुमच्या सकारात्मक मानसिकतेची.

तुमच्या जीवनाबद्दल कृतज्ञता भाव बाळगा-आपण रोज काहीनाकाहीतरी करण्याची इच्छा बाळगतो. मग ती पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या करतो. आपण नेहमी एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपण काय म्हणतो?

‘धन्यवाद’, हो ना? मग ज्या ईश्वराने इतके सुंदर जीवन आपल्याला दिलाय त्या जीवनाचे आपण कधी आभार मानतो का? नाहीच.

कारण आपण कधी तसा विचारच करत नाही. आयुष्य ही खूप छान देणगी आपल्याला मिळाली असून तिच्याशी कृतज्ञ भाव असलाच पाहिजे.

रात्री झोपताना आपण उद्या कोणती कामे करायची, ते ठरवतो.

दिवसभरात एखादी चांगली गोष्ट आपल्या बाबतीत घडली असेल तर आपल्याला खूप आनंदी वाटते, आपण खुश होतो. मग त्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटू लागतं.

तसेच प्रत्येक उगवणार्‍या दिवसाला तुम्ही धन्यवाद द्या, रात्री झोपताना ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडून झाल्या असतील त्याबद्दल त्या गोष्टी करण्याची संधि देवाने दिल्याबद्दल आभार माना आणि ज्या वाईट गोष्टी, विचार तुम्ही केला असेल तर त्याबद्दल क्षमाही मागा.

यामुळे तुमच्या आचरणात, वर्तनात, भावनेत आमुलाग्र बदल होईल.

माझी आजी काही संकट आले की देवाचे आभार मानायची कारण त्यातूनच आपण घडतो, असा तिचा समज.

मग त्यातून मार्गही आपोआपच निघायचे. आभार आणि क्षमा हे दोन भाव माणसाला स्वाभाविकृत्या कणखर बनवतात. तुम्हाला साथ करणार्‍या कुटुंबातील सदस्यांचे आभार माना. त्यामुळे ते कायम तुम्हाला मदतच करतील.

2) अनुभावातून व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन करा

कोणतेही संकट किंवा घटना आपणहून घडत नाहीत तर त्याला अनेक करणे असतात. कधी आपल्या आसपासच्या माणसांचे स्वभाव, त्यांच्या भावना तर कधी आपल्याच चुका त्याला जबाबदार असतात.

आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक प्रसंगातून आपण कसे वागतो, कसे त्याकडे पहातो, त्याला कसे सामोरे जातो याची जणू परिक्षाच चाललेली असते.

कधी आपण त्यात पास होतो तर कधी नापास. पण त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू तयार होत असतात.

आपली वैयक्तिक मूल्ये पारखली जातात.

याचे एक उदाहरण पहा, एका मुलाला सतत फुशारक्या मारायची सवय असते. अमुक वेळी मी असे करेन किंवा मी असतो तर अश्या रीतीने ते प्रकरण हाताळले असते.

अश्या बतावण्या तो करत असतो पण प्रत्यक्षात जर तशी परिस्थिति त्याच्यावर ओढवली तर मात्र त्याची तंतरते आणि तो काहीही न करता रडत बसतो.

त्यामुळे त्याच्या आधीच्या बोलण्याची काहीच किंमत राहत नाही, उलट त्याची चेष्टा होते.

आपली स्वतःची काही तत्वे, मूल्ये असतात. जसे की स्वाभिमान, खोटेपणा न करणे, मदत करणे इत्यादि. आपल्यावर येणार्‍या प्रसंगातून या मूल्यांची जोपासना आपण कशी करतो यावर आपल्या व्यक्तित्वाची ओळख होत असते.

त्यामुळे कोणताही प्रसंग आला तरी आपली जीवनमूल्ये कधीही सोडू नका.

3) स्वतःबद्दल अपराधीभाव बाळगू नका

अनेकवेळा संकट आल्यावर लोक म्हणतात, ’मलाच का अशी वेळ आली? मलाच का हा आजार झाला? माझीच का पगारवाढ झाली नाही?.  हे तुम्हीही कधीतरी म्हणाला असलाच ना?

याचे उत्तर कदाचित तुमच्याकडेच असेल. पण असा अपराधभाव बाळगून काही साध्य होणार नाही.

याउलट तुम्हाला तुमचीच घृणा वाटेल आणि तुम्ही स्वतःला कोसत बसाल. असे करू नका.

जी परिस्थिति आली आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला लागा.

कोणत्याही गोष्टीसाठी, चुकीसाठी अपराधी वाटत असेल तर त्यातून धडा घ्या आणि ती पुन्हा न करण्याची खूणगाठ मनाशी बांधा.

स्वतःवर प्रेम करा तरच तुम्ही इतरांवर प्रेम करू शकाल. यासाठी माला इथे एक शेर नक्की लिहावसा वाटतो.

हौसलें बुलंद कर, रास्तोपें चल दे, तुझे तेरा मुक़ाम मिल जाएगा, बढ़ कर अकेला तू पहल कर, देखकर तुझको काफ़िला खुद बन जायेगा

मागे पाहण्यापेक्षा नेहमी समोर पाहायला शिका. कारण मागचा भूतकाळ तर परत येत नाही.

पण हातात असणार्‍या वर्तमानाच्या मुठीला घट्ट पकडून ठेवता येतच ना!!

वर्तमानात जगा उज्ज्वल भविष्याची, नव्या आयुष्याची सोनेरी पहाट कदाचित तुमचीच असेल.

या लेखात सांगितलेल्या मुद्यांचा नक्की विचार करा आणि त्यानुसार वागण्याचा पॅटर्न फॉलो जरूर करा. हे जीवन सुंदर आहे, याची अनुभूति तुम्हाला येईलच. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा 👍

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.