हातची नोकरी गेली तर काय करायचे? अशा प्रसंगाला सामोरं कसं जाल!!

हातची नोकरी जाणे, ही खूप मोठी आपत्ति अनेकांवर कधीतरी आली असेल.
अशावेळी नेमके काय करायचे? हे मात्र माहीत नसते. कशी करायची त्यावर मात, त्यासाठी आधीपासूनच काय-काय तयारी ठेवायची आणि कशी शोधायची नवीन संधी?
त्याविषयी जाणून घेऊया आजच्या लेखात.
1) इमर्जन्सी फंडाची तजवीज ठेवा- नोकरी जाण्याचा प्रसंग अनेकांवर कधी ना कधी आला असेल. अशा वेळी घरातील खर्च आणि बचत यांचे गणित कोलमडते.
त्यावेळी मानसिकता पण चांगली रहात नाही. आपण नवीन नोकरी शोधण्याच्या मागे लागतो. कधी आपल्या मनासारखी नोकरी मिळत नाही.
सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात अनेक कंपन्यांनी कामगारांना ‘ले-ऑफ’ दिला आहे.
अशा वेळी आपसूकच मनात विचार येतो की आपली नोकरी गेली तर? नोकरीची शाश्वती राहत नाही.
अनेक मोठ्या कंपन्यांनी कामगार कपात केली आहे. त्यावेळी ही भीती मनात येते.
अशा वेळी, तुम्ही मानसिकरित्त्या तयार असता का?… याचे उत्तर ‘नाही’ असेच असेल.
माझ्या मित्राच्या कंपनीतून अनेक जणांना काढण्यात आले. त्यावेळी मित्राला वाटले की तो खूप वर्षे त्या कंपनीत काम करतो आहे, त्याच्यावर विश्वास आहे म्हणून त्याला काढणार नाहीत.
पण, अचानक कंपनीतून त्याला काढण्यात आले. तेंव्हा असे झालेच कसे? याचा विचार करण्यात आणि स्वतःला सावरण्यातच त्याचा बराच वेळ गेला.
वास्तविक, त्याच्या कंपनीत ही प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यावेळी त्याने याचा विचार आधीच करायला हवा होता.
तुम्ही नोकरी जाण्याचा कधी विचार केलाय का?
सध्याची देशाची आर्थिक स्थिति खूपशी बरी नाही. अनेक कारणांनी सॉफ्टवेअर कंपन्या बंद पडल्या आहेत तर काही कंपन्यांनी कामगार कमी केले आहेत.
याशिवाय अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनीही नोकर कपातीचे धोरण स्वीकारले आहे.
जर नोकरी गेली तर मुलांच्या शाळेची फी, घरातील खर्च, बँकेचा हफ्ता, बचत, आजारपण, घराचे भाडे अशा खर्चाचा डोंगर डोळ्यासमोर येतो.
म्हणजेच इमर्जन्सी फंड ची तजवीज तुम्ही केली आहे का? हे महत्त्वाचे.
इमर्जन्सी फ़ंड म्हणजे काय? तो कसा जमवावा?
हा विचार जरूर करा. जर कमी पगाराची नोकरी मिळाली तर, तुम्ही त्यात खर्च भागवण्यासाठी कसे नियोजन कराल, याचाही अंदाज घ्या.
आपल्या कठीण काळाला असे सामोरे जा, जर आपण हेल्मेट नाही घातले तर अपघात होण्याचा धोका जास्त राहतो.
पण, जर आपण ते वापरत असू तर थोडासाही अपघात झाला तरी आपल्या डोक्याला इजा पोचणार नाही. तसेच आपली नोकरी गेली तरी आपल्याकडे काहीतरी ‘आर्थिक सुरक्षा कवच’ नक्की हवे.
जसे की तुमच्या कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी साठवलेली रक्कम, घरभाडे यांसह आर्थिक बोजा सावरण्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे.
हे लक्षात ठेवा की, वेळ कधीच सांगून येत नाही. त्यामुळे तुम्ही त्यासाठी आधीपासून तयार राहिले पाहिजे.
तहान लागल्यावर विहीर खोदाल तर सगळा वेळ विहीर खोदण्यातच जाईल आणि तहान भागणार नाहीच.
तात्पर्य, आलेल्या परिस्थितीचा सामना धैर्याने करा. आधीच त्याची तजवीज करा. खचून जाऊ नका. आपत्ती व्यवस्थापन तयार ठेवा.
आपण पावसाळ्यात पाहतो की, नगरपालिका महापालिका येणाऱ्या संभाव्य पूराची आधीच तयारी करून ठेवतात. आपत्ति व्यवस्थापन करतात.
त्याचप्रकारे आपल्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक संकटाच्या आपत्ति व्यवस्थापनाची तयारी आपण केली पाहिजे.
समजा, तुमची नोकरी गेली तर? तुमच्याकडे निदान पुढील पाच-सहा महीने पुरेल एवढा आर्थिक साठा हवा. त्यामध्ये घरभाडे किंवा स्वतःचं घर असेल तर EMI, मुलांची फी, घरातील इतर खर्च तुम्ही भागवू शकाल.
नवीन नोकरी लागेपर्यंत तुम्हाला त्यातून आर्थिक आधार मिळेल. याचा तुमच्या नव्या नोकरीवरही परिणाम होत असतो.
जर तुमच्याकडे कमी पैसे साठले असतील तर तुम्ही जरा जास्त पगारची नोकरी शोधण्याचा प्रयत्न कराल. पण, ती लागेपर्यंत तुमचा खूप वेळ जाणार.
तुम्ही साठवलेले पैसे खर्च होत राहतील आणि त्यात नवीन भर पडणार नाही. तुमची बचत जर जास्त असेल तर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात कमी पगारची नोकरी लगेच स्वीकारू शकता.
बचतीचा आणखी एक फंडा म्हणजे गुंतवणूक. तुम्ही सोने, मासिक भिशी किंवा इतर तत्सम ठिकाणी पैसे गुंतवू शकता.
बरेच जणांचा हाही प्रश्न असतो की आहे तेच पुरत नाही तर गुंतवणूक करायला बचत कुठून करणार.
पण गुंतवणूक ही मोठ्या रकमेपासूनच करावी असेही काही नाही. मित्रांनो, आपल्या उत्पन्नाचा अल्पसा भाग तरी बचतीसाठी काढण्याची सवय करून गुंतवणूक सुरू करणे जमवून आणता येईल.
यासाठी उत्पन्नाचे सोअर्स वाढवणे हाही एक पर्याय आहे. याबद्दल पूर्वी लिहिलेला एक लेख इथे बघता येईल.
इंटरनेट चा वापर करून पैसे कमावणं कसं शक्य आहे? हे सांगणाऱ्या १० टिप्स
अनेक लोक गुंतवणूक म्हणून जमीन किंवा शेती खरेदी करतात आणि त्याची दुप्पट दराने विक्री करून पैसे मिळवतात. अशी गुंतवणूक तुम्हीही करू शकता.
गुंतवणूक, बचत आणि खर्च यांचा मेळ साधा. आणि त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, योग्य ठिकाणी पैसे गुंतवा.
2) बचतीपेक्षा खर्चावर नियंत्रण ठेवा- अनेक लोकांना आपल्या बचतीपेक्षा खर्च जास्त करण्याची हौस किंवा सवय असते.
अशा लोकांची हौस मात्र हातात पैसा नाही आला तरी कमी होते. त्याचा परिणाम त्यांच्या वर्तणूकीवर होतो.
माझ्या एका मित्राला नेहमी आम्ही पैशाची बचत करायला, गुंतवणूक करायला सांगायचो. याचे कारण होते त्याचा अवाढव्य खर्च….
त्याला पगारही चांगला होता. पगारा नुसार स्टेट्स उंचावत नेलं पाहिजे, आपलं नेहमी ‘अपग्रेडेशन’ होतं या एकमेव भ्रमात तो पार्टी, आउटिंग करण्यावर तो मोठ्ठया पैसे खर्च करत असे.
मात्र, कंपनीने त्यांचे युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याच्या खर्चावर मर्यादा आल्या.
त्याला कळून चुकले की, बचतही खूप महत्वाची असते.
यासाठी आपल्या खर्चाचे प्रमाण आटोक्यात ठेवा. तुमच्या खर्चाचे प्रमाण तुमच्या पगाराच्या 60% पेक्षा जास्त नको.
यातून दोन फायदे होतात. एक म्हणजे तुमची बचत खूप होते आणि वायफळ पैसा खर्च होत नाही.
महिन्याला तुमची बचत किती व्हावी, याचे नियोजन करा. पगाराच्या 40% रक्कम खर्च होत असेल तर 60 % रक्कम बचत झाली पाहिजे. योग्य बचत करण्याची सवय लावून घ्या.
स्वतःला आर्थिक बचतीची सवय लावा. त्याचे नियोजन करा.
3) जे करताय त्यात तत्पर रहा- तत्पर राहायचं म्हणजे, अशी कुठलीही वेळ आली तर, त्यातून निभावून निघण्याची तुमची तयारी असली पाहिजे… कसं ते बघा.
तुम्ही जावा डेव्हलपर आहात का? जर असे असेल तर तुम्हाला तांत्रिक वस्तूंची माहिती असणारच. तर मग तुम्ही जगातील सर्वोच्च 5% लोकामध्ये आहात. तांत्रिक गोष्टींची माहिती असलेला माणूस, जॉब लॉस च्या अचानक आलेल्या संकटाला सहज सामोरा जाऊ शकतो.
जर तुम्ही मार्केटिंगमध्ये असाल तर, मार्केटिंग च्या अनुभवाचा वापर करून कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करून परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी तुम्ही ठेऊ शकता.
तुम्ही शेफ असाल आणि जर तुमच्या नोकरीवर गंडांतर आलं, तर केटरिंग चा व्यवसाय करू शकता.
तुम्ही जे काही करताय, त्यात ‘उत्तम’ बनण्याचा प्रयत्न करा. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होत नाही की, मी तुम्हाला असाधारण काहीतरी करायला सांगते आहे.
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रातील सर्वोत्तम ज्ञान शिका.
कधीकधी आपण आपल्या कामात खूप चांगले असतो पण, कंपनीची आर्थिक स्थिति बिघडते, नुकसान होते तेंव्हा त्यांना कामगार कपात करण्यावाचून पर्याय राहत नाही.
त्यावेळी जर तुम्हाला नोकरीतून काढून टाकले तर तुम्ही तुमच्या कामात ‘बेस्ट’ असल्याने तुम्ही कोठेही काम करू शकता.
त्यासाठी तुम्ही मानसिकरित्त्या सक्षम राहता. तुमच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्र, कोर्स शिका. त्यासाठी वेळ द्या.
काय करायचे आहे, त्याची यादी बनवा. तुम्ही करत असणारे काम, त्यासाठी गरज असणारे नवीन कोर्स, प्रगत तंत्रज्ञान शिका.
तुमच्यापेक्षा सरस आहेत त्यांच्याकडून मदत घ्या आणि उत्तम ज्ञान मिळवून नव्या कामाला प्रारंभ करा.
4) पर्यायी व्यवसाय, नोकरीचा विचार करा- तुम्ही जर म्हणालात की, मी आता जे कमावतो आहे त्यात सुखी आहे. तर तुम्हाला तेव्हढेच पैसे मिळतील. माझा सांगण्याचा अर्थ असा नाही, की असमाधानी राहा
पैसा कसा वाढत जाईल, यासाठी काही मार्ग शोधा. म्हणजे पर्यायी व्यवसाय शोधा. प्लॅन ‘A’ फेल झाला तर प्लॅन ‘B’ तुमच्याकडे तयार असेल अशी तजवीज ज्याला करता येते तो कितीही अडथळे आले तरी डगमगत नाही.
तुम्ही जे पैसे कमवताय त्याची चांगली गुंतवणूक झाली पाहिजे. त्यातून कायमस्वरूपी चांगला आर्थिक स्त्रोत निर्माण झाला पाहिजे.
त्यासाठी हळूहळू लहान गोष्टीतून प्रयत्न करा. महिन्याला किती बचत झाली पाहिजे, कुठे गुंतवणूक झाली पाहिजे, बँकेतील रकमेचे मिळणारे व्याज याचा आराखडा तयार करा.
नोकरी गेली म्हणजे जे सगळं संपलं असं नाही. त्यातून बाहेर येण्याचे बरेच मार्ग आहेत. तोपर्यंत संयम आणि आत्मविश्वास असायला हवा.
जिद्दीने पुढे जाण्याची मानसिकता हवी. यासोबतच हवे आर्थिक नियोजन.
जर तुम्हाला तुमची नोकरी जाऊ नये, असे तर वाटत असेल तर काही चुका टाळल्या पाहिजेत. त्या कोणत्या आहेत? ते जाणून घेऊयात.
1) नवीन तंत्रज्ञानाचा अभाव-
तुम्ही अजूनही 2007 च्या काळाप्रमाणे काम करता का? तुम्हाला संगणक, लॅपटॉप चालवता येत नाही का?
नवीन गोष्टी, तंत्रज्ञान शिकण्याची तुमची इच्छा नाही का?
जर याचे उत्तर हो असेल तर लवकरच तुमच्या नोकरीवर गदा येऊ शकेल असे समजा. या गोष्टी टाळा.
2) सहकाऱ्यांसोबत वाईट वर्तन-
तुम्ही काम करत असताना अनेक सहकार्यांशी तुमचा संबंध येतो. काहींशी पटते तर काहींशी नाही. जर, तुम्ही टीमचे लीडर आहात तर तुम्ही सर्वांना एकत्रितपणे प्रोत्साहित करून त्यांच्याकडून कशी कामे करून घेता? यावरही तुमच्या नोकरीचे भवितव्य अवलंबून आहे.
ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्यासोबत तुम्ही वाईट वर्तन करता का? त्यांना सतत नावे ठेवता का? भांडता का? जर तसे असेल तर तुम्ही लवकरच बाहेर फेकले जाऊ शकता. त्यामुळे सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा.
3) कामातील अपयश-
तर तुम्ही सतत जर तुमच्या कामात अपयशी होत असाल, दिलेले काम वेळेत पूर्ण करत नसाल तर तुम्हाला कंपनी काम करण्याची अधिक संधी देऊ शकत नाही.
तुमच्या कामाचा फायदा कंपनीला होत नसेल, तुमच्या कामात मोठ्या चुका सारख्या होत असतील तर ती संस्था तुम्हाला कामावरून काढून टाकेल. म्हणून कामातील चुका कमी करा, त्या सुधारण्याचा प्रयत्न करा.
4) नवीन कल्पनांचा अभाव-
तुम्ही नुसते गाढवासारखे ओझी वाहण्याचे काम करताय का? संस्थेच्या प्रगतीसाठी, ग्राहकांसाठी नवीन कल्पना सुचवत नाही का? त्यासाठी पुढाकार घेत नसाल तर, संस्थेच्या प्रगतीसाठी तुमचा काही उपयोग नाही असे समजून संस्था तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेल.
तुमचा परफॉर्मन्स दाखवा, नवीन योजना आमलात आणा.
5) स्मार्टनेसचा अभाव-
काही लोक असे दाखवतात की, ते खूप बिझी आहेत. त्यांना उगाचच छोट्याशा कामासाठी खूप वेळ घालवण्याची सवय असते. फुटकळ कामे करून दिवस ढकलतात.
अशा वेळखाऊ लोकांचा कोणतीही संस्था वेगळा विचार करते.
6) कामात चूक झाली तर ती मान्य न करण्याची सवय-
चुका या स्वाभाविक असतात. चूक ज्याच्याकडून कधीही होणार नाही, अशी व्यक्ती तुमच्या एम्प्लॉयर ना सुद्धा कधीही मिळणे शक्य नाही.
त्यामुळे कामात तुमच्याकडून जरी काही प्रमाणात चुका होत असतील तर ते स्वाभाविक आहे.
पण तरीही त्या चुका मान्य करून सकारात्मकतेने त्या सुधरवण्याची तयारी आणि कामातला प्रामाणिक पणा हे गुण असलेली व्यक्ती कोणत्याही संस्थेला आपल्याबरोबर काम करण्यासाठी हवी असते.
जर तुम्ही छोट्या ठिकाणी काम करत असाल आणि थेट संस्था चालकाशी तुमचा संबंध येत असेल तर तुमचा प्रामाणिक पणा हा तुम्हाला तारून नेणारा मोठा गुण ठरू शकतो.
त्यामुळे तुम्ही काम किती करता यापेक्षा, ते किती स्मार्टपणे आणि प्रामाणिकपणे करता यावर तुमच्या नोकरीचे भविष्य अवलबून आहे.
नोकरी जाण्यासाठी कधी त्या संस्थेची आर्थिक कमजोरी हे कारण असू शकते. पण, आपल्या कार्यक्षमतेवर, पद्धतीवर, कल्पनांवर आणि कौशल्यावर आपली नोकरी टिकवून ठेवता येते.
याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आशा आहे की, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्की सकारात्मकतेने विचार कराल आणि त्यानुसार तुमच्यात बदलही कराल.
नोकरी जाणे ही चांगली गोष्ट नक्कीच नाही पण, ती गेल्यावर त्यातून पुन्हा नवा विचार करणे आवश्यक आहे. नवीन नोकरी, व्यवसाय करणे ही रिस्क आहे पण, जोपर्यंत तुम्ही एखाद्या क्षेत्रात ‘रिस्क’ घेत नाही तोपर्यंत तुम्ही ‘परफेक्ट’ होत नाही.
ब्लॉगिंग क्या है, और इससे पैसे कैसे कमाए?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा