मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी हे अफर्मेशन्स खास तुमच्यासाठी

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी अफर्मेशन्स

‘अफर्मेशन्स’ म्हणजे अशी काही वाक्य जी वारंवार म्हटल्याने त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो, त्याचा आपल्याला फायदा होतो. या तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी काही ‘अफर्मेशन्स’ सांगितलेली आहेत. हि अफर्मेशन्स नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील.

वजन कमी करायचंय, चिडचिड कमी करायची आहे, रोज सकाळी चालायला जायचंय, वेळेवर जेवायचं आहे, वाचन वाढवायचं आहे, आपल्या जवळच्या माणसांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत…

एक ना अनेक! रोज आपण असे अनेक निग्रह करत असतो जे आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगले असतात

मग ते वजन कमी करण्यासाठी चालायला जाणं असो किंवा मनाचा थकवा घालवण्यासाठी वाचन वाढवणं असो.

अशा रोज नव-नवीन गोष्टी आपण ठरवत असतो, त्या कधीतरी लिहून सुद्धा ठेवतो म्हणजे वारंवार नजरेसमोर राहतील पण तरी काही कारणाने त्या आपल्याकडून होत नसतात.

याचा परिणाम काय होतो? आपण आपल्या तब्येतीच्या चांगल्यासाठी ठरवलेल्या गोष्टी तर होत नाहीतच शिवाय त्या आपल्याच्याने होत नाहीयेत म्हणून आपली दुप्पट चिडचिड होऊन परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा वाईट होते.

अशा वेळेस ज्याला आपण हेल्थ अफर्मेशन्स म्हणतो, म्हणजे अशी काही वाक्य जी वारंवार म्हटल्याने त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो, त्याचा आपल्याला फायदा होतो.

यामुळे नक्की काय होतं? तर आपण जी गोष्ट करायची ठरवलेली असते त्याची आपल्याला आठवण होते, या अफर्मेशन्समुळे आपल्याला ती करायची ओढ लागते आणि पर्यायाने आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारतं.

आजच्या या लेखात आपण अशीच काही वाक्य बघणार आहोत ज्याची उजळणी करत राहणं फायदेशीर असतं.

‘हेल्थ अफर्मेशन्स’ म्हणजे नक्की काय आणि त्यांची उजळणी कशी फायदेशीर ठरू शकते हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ.

ही अशी काही सरळ, सोपी आणि साधी वाक्य असतात ज्यांचा संबंध आपल्या मानसिक आणि शारीरिक विकासाशी निगडित असतो.

बऱ्याचदा आपल्याला एखाद्या कामाचा उरक पडायचा असतो पण तसं काही कारणाने होत नाही, कामं एका मागे एक पडतच जातात आणि शेवटी कामाचा ढीग जमतो.

अशा वेळेला नेमकी कुठून सुरुवात करायची असा प्रश्न आपल्याला पडतो आणि कामं मात्र तशीच राहतात.

अशी परिस्थिती आली की आपण फक्त स्वतःला दोष देत बसतो. यातून निष्पन्न काहीच होत नाही, पडलेली कामं तर होत नाहीतच शिवाय स्वतःवर चिडचिड होऊन मूड खराब होतो तो वेगळाच.

क्वचित काही वेळेला अशी परिस्थिती असताना आपलं मानसिक संतुलन सुद्धा काहीसं बिघडतं आणि एकूण सगळीच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते.

नेमक्या अशाच वेळी ही अफर्मेशन्स आपल्या मदतीला येतात. या वाक्यांची अगदी मनातल्या मनात जरी उजळणी केली तरी आपला ताण काही प्रमाणात कमी होतो, मनात सकारात्मक ऊर्जा येते आणि तसं झालं की आपण परत पहिल्यासारखा सारासार विचार करू लागतो आणि मग कामाला सुरुवात कशी आणि कुठून करायची हे आपल्याला सुचायला लागतं.

या हेल्थ अफर्मेशन्सबद्दल एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यांवर याचा सारखाच परिणाम होईल असं नाही.

काही माणसं मनाने जरा जास्त हळवी असतात तर काही बऱ्यापैकी निग्रही असतात. त्यामुळे ही जी वाक्य आहेत त्यांची काहींना अगदी रोज उजळणी करावी लागते तर काहींना फक्त चिडचिड झाल्यावर, कंटाळा आल्यावर, कामं हातावेगळी होत नाहीयेत असं वाटायला लागल्यावर ही वाक्य स्वतःला सांगावी लागतात.

आपण नेमके कोणत्या गटात बसतो हे मात्र आपलं आपण ठरवायचं आहे.

मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं आहे ना की नेमकी ही वाक्य कोणती आहेत? त्याचसाठी आजचा हा लेख आहे.

१. मी खुश, सुरक्षित आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंदुरुस्त आहे.

२. मला माझ्या सद्सद्विवेक बुद्धीवर पूर्ण विश्वास आहे.

३. माझा आतला आवाज मला नेहमी योग्य तोच सल्ला देतो.

४. माझा स्वतःवर विश्वास आहे, मी अमुक काम उत्तम रित्या पार पाडू शकते/शकतो.

५. माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, त्यांचा मला खूप आधार आहे.

६. खुश राहणं हा माझा निर्णय आहे, त्यावर मी ठाम आहे आणि दुसरी कोणतीच गोष्ट माझा हा निर्णय बदलू शकत नाही.

७. मी जशी/जसा आहे तशी/तसा स्वतःपुरता परिपूर्ण आहे आणि माझं स्वतःवर प्रेम आहे.

८. मी माझ्या हातात जे आहे त्याचा पूर्ण वापर करून आहे ती परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

९. माझं काही चुकत असेल तर मला तशी जाणीव करून देणारी लोकं माझ्याजवळ आहेत हे मोठं वरदान आहे.

१०. (तुमची तब्बेत बरी नसल्यास) हे अवघड, कंटाळवाणे दिवस काही दिवसांचे सोबती आहेत आणि लवकरच हे अवघड दिवस संपणार आहेत.

११. मी संथ गतीने का होईना पण निश्चितच माझ्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे.

१२. माझं आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, तो मी माझ्या गतीने चालणार आहे आणि वाटेत आनंद, सुख, प्रेम, दुःख, धडे हे वेचत जाऊन परिपूर्ण होणार आहे.

मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेलच की ही वाक्य म्हणजे काहीवेळा स्वतःला स्वतःबद्दलच्या प्रेमाची जाणीव करून देणारी आहेत.

काही वेळेला आपल्या आजूबाजूच्या, आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपल्याला आहे तसं स्वीकारणाऱ्या माणसांची जाणीव करून देणारी आहेत.

तर काहीवेळेला एखाद्या अवघड परिस्थितीत आपल्याला बूस्ट करणारी आहेत. यातली काही वाक्य तर सगळं काही चांगलं असताना, आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव करून देणारी आहेत..

ही जाणीव फार महत्वाची असते, नाही?

ही बारा अफर्मेशन्स तर आपण बघितली, त्यांची उजळणी का करायची हे सुद्धा बघितलं पण ही उजळणी नेमकी कधी आणि कशी करायची हे आपण बघूया.

वर सांगितल्याप्रमाणे स्वभावानुसार काहींना याची उजळणी रोज करावी लागते तर काहींना क्वचित एखाद्या अवघड प्रसंगाचा सामना करायच्या आधी.

पण एक गोष्ट लक्षात ठेऊया, ही वाक्य रोज स्वतःला बजावल्याने हानी काहीच होणार नाही उलट फायदाच होणार आहे.
या वाक्याची उजळणी रोज सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात प्रसन्न व्हावी म्हणून आरशासमोर उभं राहून करू शकतो, याने आत्मविश्वास वाढायला सुद्धा मदत होईल.

मेडिटेशन करायच्या आधी मोठ्याने ही वाक्य म्हटली तर त्याचा खूपच फायदा होईल. परीक्षेला जायच्या आधी, interview च्या आधी किंवा दिवसभरात कधीही आपला आत्मविश्वास ढासळतोय असं वाटलं, निराश किंवा हताश वाटलं किंवा एखादं अवघड काम आहे असं वाटलं तर अगदी कधीही डोळे मिटून ही वाक्य म्हणण्यासारखी आहेत..

पटलं ना तुम्हाला? मग वाट कसली बघताय? पटकन ही वाक्य एका कागदावर लिहून तुम्हाला दिसतील अशा जागी लावा किंवा त्यापेक्षा ही सोपं म्हणजे हा लेख तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा.. म्हणजे तुम्हाला कधीही, कुठेही याचा लाभ घेता येईल.

आणि मित्र-मैत्रिणींना लेख शेअर करा कारण, ‘शेअरिंग इज केअरिंग’

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!