चाळिशीनंतर पुरुषांनी आवर्जून करण्याच्या तपासण्या कोणत्या, वाचा या लेखात

chalishanantr purushanni krnyachya tapasnya

म्हणतात की वयाच्या साधारण चाळीशी नंतर आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी आणि ते बरोबरच आहे.

जे आजार पूर्वी साठीत व्हायचे ते आजकाल चाळीशीत काय अगदी तिशीत सुद्धा होतात.

अतिरिक्त ताण, खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी हे सगळं जरी याला कारणीभूत असलं तर सध्याच्या या काळात, जिथे स्पर्धा अनिवार्य आहे, ते पूर्णपणे बदलणं शक्य नाही.

पण त्याचमुळे आपल्या तब्येतीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायची गरज असते.

बरेच असे आजार असतात ज्यांचं निदान वेळेत झालं तर पुढचे धोके टळतात.

वेळेतच उपचार मिळाले की काही आजार लवकर बरे सुद्धा होतात तर काहींना दीर्घ काळ उपचारांची गरज सुद्धा भासत नाही, आपल्या राहणीमानात थोडासा बदल केला तरी त्याचा फायदा होतो.

चाळिशीनंतर पुरुषांनी करण्याच्या तपासण्या

मित्रांनो, या सगळ्यात महत्वाचं काय आहे हे तुमच्या लक्षात आलं आहे का?

आजाराचं वेळेतच लक्षात येणं..

असं कधी होईल?

जेव्हा आपण नियमितपणे हेल्थ चेक अप करू.

आजवर स्त्रियांनी चाळिशीनंतर कोणती काळजी घ्यायची, कोणत्या तपासण्या करून घ्यायच्या याबद्दल अनेकवेळा लिहिलं वाचलं गेलं आहे पण पुरुषांनी नक्की काय काळजी घ्यायची?

चाळीशी नंतर त्यांना कसले आजार होऊ शकतात?

त्यासाठी त्यांनी कोणत्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे याविषयी त्या मानाने कमी लिहिलं गेलं आहे.

म्हणूनच आज आम्ही अशा काही तपासण्यांची नावं आणि प्राथमिक माहिती घेऊन आलोय जी वयाची चाळीशी आली, की प्रत्येक पुरुषाने वर्षातून निदान एकदा तरी करायलाच हवी.

सर्वप्रथम या चाचण्यांचे दोन प्रकार आहेत, एक सेल्फ एक्झामीनेशन, म्हणजे घरीच आपली आपण तपासणी करून काही बदल जाणवला किंवा काहीतरी वेगळं वाटलं तर त्वरित डॉक्टरांकडे जायचं.

या तपासण्या आपल्या आपण महिन्यातून एकदा घरच्याघरी, कोणाच्यातरी मदतीने किंवा आरशासमोर करू शकतो.

दुसरा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन हेल्थ केयर प्रोफेशनलकडून करून घ्यायच्या तपासण्या किंवा रक्त चाचण्या.

घरच्या घरी करायच्या तपासण्या:

१. त्वचेचं निरीक्षण

त्वचेवर कुठे नवीन तीळ आले आहेत का? जुने तीळ असतील तर त्यांच्यात काही बदल झाले आहेत का?

तिळाचा रंग कधीतरी बदलू शकतो तसाच त्याचा आकार सुद्धा वाढू शकतो.

क्वचित एखादा तीळ फुगीर होऊन त्यावर केसांची वाढ होऊ शकते.

हे असे काही बदल जर असतील तर त्याकडे लक्ष ठेऊन वेगळीच डर्माटॉलॉजिस्ट म्हणजेच त्वचेच्या डॉक्टरांकडे गेलेलं बरं.

याशिवाय त्वचेवर कुठे काळे किंवा पांढरे डाग पडत नाहीत ना? याकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

२. दातांची तपासणी

जसजसं वय वाढत जातं तसतसं दातांचे आणि हिरड्यांचे प्रॉब्लेम्स उत्भवतात.

दातांची कोणतीही ट्रीटमेंट प्रचंड वेदनादायी आणि वेळखाऊ असते. हे आपण जाणतोच पण त्या बऱ्याच खर्चिक सुद्धा असतात.

त्यामुळे रोज दोनदा दात घासताना हिरड्या चोळणं, आरशात बघून दाताला कीड आली नाही ना हे तपासणं फार गरजेचं आहे.

खासकरून ज्या पुरुषांना सिगारेट, तंबाखू याचं व्यसन असतं, त्यांनी ही तपासणी नियमितपणे केली पाहिजे कारण अशा वेळी पुरुषांना कर्करोगाचा धोका जास्त असतो.

३. टेस्टीजची तपासणी

खरंतर वयात आल्यापासून प्रत्येक मुलाला हे करायला शिकवलं पाहिजे पण साधारण चाळीशी नंतर तर ही तपासणी घरच्याघरी नियमितपणे करणं अगदी गरजेचं आहे.

अशी तपासणी करताना जर कधी काही वेगळं जाणवलं जसं की एखादी गाठ तर लगेच डॉक्टरांकडून तपासून घेणं फार महत्वाचं आहे.

हॉस्पिटलमध्ये जाऊन वर्षातून एकदा करायच्या तपासण्या

१. रक्तदाब

चाळिशीनंतर सहसा पुरुषांना उच्चरक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

वर्षातून निदान एकदा तरी रक्तदाब डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेऊन त्याबाबत त्यांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

बऱ्याच पुरुषांना उच्च रक्तदाबाची फॅमिली हिस्ट्री असते, अशा पुरुषांनी याबद्दल जास्त सतर्क राहिलं पाहिजे.

याशिवाय ज्यांना सिगारेट, दारू या गोष्टींचं व्यसन असतं, ज्यांचं वजन जास्त आणि व्यायाम कमी असतो अशांनाही रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

२. कॉलेस्टेरॉल

शरीरातलं कॉलेस्टरॉलचं प्रमाण वाढलं तर ते हृदयासाठी धोकादायक असतं हे आपण जाणतोच.

अशा पुरुषांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळे वर्षातून एकदा तरी ही चाचणी करावी, काही कमी जास्त असेल तर डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा आणि त्याचं पालन करावं.

३. ECG

या टेस्टमध्ये हृदयाची ऍक्टिव्हिटी टिपता येते.

जर का हृदयात काही प्रॉब्लेम असेल, काही बदल झाले असतील तर त्या टेस्टमध्ये डॉक्टरांच्या ते लक्षात येतं आणि मग त्यावर औषधोपचार किंवा गरज असेल तर अजून काही तपासण्या ते सांगतात.

ज्यांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास असतो त्यांनी ही टेस्ट करायलाच पाहिजे.

४. शुगर

खरंतर रक्तदाब काय किंवा शुगर काय या महिन्यातून एकदा करायच्या तपासण्या असल्या पाहिजेत पण ते जमत नसेल तर निदान वर्षातून एकदा तरी त्या वेळात वेळ काढून केल्याचं पाहिजेत.

आजकाल आपली लाइफस्टाइल फार बदलत चालली आहे, फास्ट फूड, कोल्डड्रींक्स हे नेहमीचंच झालं आहे अशामुळे डायबेटीसचा धोका वाढतो.

याशिवाय एका जागी बसून काम, व्यायामाचा अभाव या गोष्टी आहेतच. काही जणांना डायबेटिसची फॅमिली हिस्ट्री असते.

अशांनी जास्त काळजी घेऊन वेळोवेळी शुगर चेक केली पाहिजे.

५. PSA test

PSA test म्हणजे Prostate Specific Antigen Test.

वाढत्या वयामुळे पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथी (ग्लॅन्ड) मध्ये कर्करोग होण्याचा धोका असतो.

जर असं काही असेलच तर त्याचं वेळेतच निदान व्हावं यासाठी वर्षातून एकदा ही टेस्ट केली पाहिजे.

कर्करोगाचं वेळेत निदान झालं तर उपचार लगेच सुरु करता येतात.

पुढची गुंतागुंत टाळता येते आणि मुख्य म्हणजे बहुतेक वेळेला अगदी वेळेत उपचार सुरु केले तर कर्करोग बरा होऊन पेशन्टचं आयुष्य पुन्हा पूर्वपदावर सुद्धा येऊ शकतं.

६. faecal occult blood test (FOBT)

faecal occult blood test (FOBT) मलाशयाची तपासणी. पुरुषांमध्ये मलाशयाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो, खास करून ज्या पुरुषांना दारू पिण्याची सवय असते त्यांना.

वर्षातून एकदा करायच्या तपासण्यांमध्ये ही तपासणी सुद्धा केलेली केव्हाही चांगली.

जर या कर्करोगाची फॅमिली हिस्ट्री असेल तर मात्र फक्त ही टेस्ट करून भागत नाही, दर वर्षाला मलाशयाची ‘कोलोनोस्कोपी’ करायचा सल्ला सुद्धा डॉक्टर देतील.

७. डोळ्यांची तपासणी

चाळिशीनंतर डोळे कमकुवत होत जातातच, वाचायचा चष्मा चाळीशीत लागतोच पण दूर बघायच्या सुद्धा लागू शकतो किंवा आधीपासून असेल तर नंबर वाढू शकतो त्यामुळे डोळ्यांच्या डॉक्टरला वार्षिक भेट देणं गरजेचं आहे.

ज्या पुरुषांना कॅटरॅक्ट, ग्लावकोमा (Glaucoma) ची फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि डोळ्यांची तपासणी चुकवू नये. याशिवाय डायबेटीस असलेल्या पुरुषांनी सुद्धा याबद्दल सतर्क असायला हवं.

बायका काय किंवा पुरुष काय, सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की जर आपण तंदुरुस्त असू तरंच आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू.

वर्षातून एकदा तर याच कारणासाठी या सगळ्या तपासण्या केलेल्या सगळ्या दृष्टीने चांगल्या. कधी काही तपासण्यांमधून काहीतरी वेळेतच निदान होईल आणि लगेच उपचार झाल्याने पुढील सगळे धोके टळतील.

या लेखाचा हेतू कोणाला घाबरवायचा नसून आपल्या आरोग्याबद्दल सतर्क राहण्याला प्रवूत्त करणं हा आहे.

या सगळ्या तपासण्यांची माहिती वाचून त्या वर्षातून एकदा करायचा निग्रह तुम्ही केला असेलच.. मग जर या तपासण्या तुम्ही तुमच्या वाढदिवसाला केल्या तर? म्हणजे तपासणीचा दिवस कधीच चुकणार नाही.. बरोबर ना?

लेख कसा वाटला आणि तुम्ही या तपासण्या करता का? ते कमेंट्स मध्ये सांगा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. कारण “Shreaing is caring”

आणि वाईट गोष्टी तर आपोआपच पसरतात हो, पण चांगल्या आणि कामाच्या गोष्टी पसरवण हे आजच्या घडीला गरजेचं आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!