मनाची अस्वस्थता, बेचैनी घालवण्याचे ८ प्रभावी उपाय

मनाची अस्वस्थता बेचैनी घालवण्याचे ८ प्रभावी उपाय

अस्वस्थता, बेचैनीमुळे कामात लक्ष लागत नाही? मनात सतत विचारांचं चक्र चालू राहतं? मग या लेखात दिलेले ८ उपाय करून फरक बघा..

काहीवेळा एका कामात आपलं लक्ष लागतच नाही, कितीही प्रयत्न केला तरी नाही.

अशामुळे जे काम एका तासात पूर्ण होणं अपेक्षित असतं ते करायला आपल्याला दुप्पट वेळ लागतो कारण आपलं मन जास्त चंचल असतं.

विचारांचा वेग इतका प्रचंड असतो की त्यामुळे सतत बैचैन वाटायला लागतं.

आजकाल आपल्या आजूबाजूला परिस्थितीच अशी आहे की आपल्याला सतत अस्वस्थ वाटणं साहजिक आहे.

या दिवसात बैचैन वाटणं, कामात लक्ष न लागण, मन सैरभैर होणं हे सुद्धा अगदी समजण्यासारखं आहे.

कधी भीती, टेन्शन कधी आत्मविश्वासाची कमतरता या सगळ्यामुळे सतत मनात अस्वस्थता असणं आणि त्यामुळे हातात असलेल्या कामात लक्ष न लागता मनात सारखे विचार येणं आणि त्यामुळे अस्वस्थ वाटणं, विचारांबरोबर श्वासाचा वेग सुद्धा वाढणं हे अविरत चक्र सुरूच राहतं…..

या सगळ्या गोष्टी साहजिक असल्या तरी तशा होऊन चालणार नाहीत कारण, एक म्हणजे आपल्या एकंदरीत स्वास्थ्यासाठी या गोष्टी बऱ्या नाहीत आणि दुसरं म्हणजे कामावर दुर्लक्ष करणं हे सुद्धा चांगलं नाही.

उलट या विचारांना दूर थोपवून, मनाची अस्वथता घालवण्यासाठी कोणत्याही कामात स्वतःला गुंतून ठेवणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे.

खरंतर हे सगळं तुम्हाला सुद्धा माहितीये.. पण कळतंय पण वळत नाही अशी गत झालीये आणि म्हणूनच आजचा हा लेख आहे.

शांत राहा, त्रासदायक विचार करू नका, सकारात्मक विचारच करा, कामात मन गुंतवा हे आपल्याला सगळेच सांगतात पण हे नेमकं करायचं कसं हे आपल्याला समजत नाही.

हे झालं सध्याच्या परिस्थितीबद्दल पण काहींचा स्वभावच मुळी असा असतो, टेन्शन घेण्याचा.

या लोकांना सगळ्या गोष्टींची भीती वाटत असते आणि विचारांनी डोक्यात थैमान घातलेलं असतं तर हेच सैरभर झालेलं मन थाऱ्यावर कसं आणायचं?

सततची अस्वस्थता घालवून मन शांत ठेऊन जगणं सुखकर कसं करायचं हे आज आपण या लेखातून बघणार आहोत.

१. एका वेळेस एकच काम करा

असं बऱ्याचदा होतं की एखादं काम करताना आपलं कामात लक्ष लागतच नाही.

पण कामं तर भरपूर असतात. आजकाल मल्टीटास्किंगचं महत्व सारखं सांगितलं जातं.

वेळेचा पुरेपूर नव्हे तर जास्तीतजास्त वापर केला पाहिजे हे जरी खरं असलं तरी काही लोकांना मात्र याचा त्रास होऊ शकतो.

एका वेळेला दोन किंवा जास्त कामात मन गुंतलं असेल तर धड एका कामात लक्ष लागत नाही.

एक काम करताना दुसऱ्याचा विचार, दुसरं करताना पहिल्याबद्दल शंका..

अशाने मन थाऱ्यावर राहत नाही आणि कोणतंच काम नीट पार पडत नाही.

म्हणून एका वेळेला एकच काम हातात घ्यायचं आणि त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करून आधी ते संपवायचं आणि मगच दुसऱ्या कामाकडे वळायचं.

म्हणजे लक्ष विचलित होणार नाही, करतोय त्या कामात लक्ष केंद्रित होईल आणि अशा पद्धतीने मल्टी टास्किंग न करता सुद्धा कामं लवकर पार पडतील.

२. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा

बऱ्याचदा नकारात्मक विचार अशाच वेळेला येतात जेव्हा हातात काही काम नसतं. आपण रिकामे बसलेलो असतो.

हीच विचारांची चक्र मग फिरत राहतात आणि शेवटी आपल्याला सगळ्या शक्यतांचा विचार करून करून अस्वस्थ वाटायला लागतं.

त्यातल्या त्यात काही विचारांनी अगदी बैचैन सुद्धा व्हायला होतं, इतकं की मग मन कशातच लागत नाही.

साधी, रोजची कामं सुद्धा हातावेगळी करणं अवघड होऊन जातं.

अशावेळेस काय करायचं?

दिवसातून आपल्याला जो काही रिकामा वेळ मिळतो त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करायचा.

कुठेतरी एकटंच बसून विचार करत राहण्यापेक्षा आपल्याला आवडतील अशा गोष्टी करायच्या.

गाणी ऐकणे, सिनेमा बघणे, पुस्तक वाचणे यापैकी आपल्या आवडीची कोणतीही गोष्ट आपण रिकाम्या वेळात करू शकतो.

अगदी यातली कोणतीच गोष्ट करायची जर नसली तर आपल्या एखाद्या मित्र-मैत्रिणीला फोन करून गप्पा मारल्याने सुद्धा मूड हलका होतो.

आणि रिकाम्या वेळेत, एकटेपणात वाईट विचार मनात येत नाही जेणेकरून मन शांत राहतं.

३. चहा/कॉफी जास्त प्रमाणात घेऊ नका

चहा/कॉफीच्या किंवा एरिएटेड ड्रिंक्सच्या प्रमाणाबाहेरच्या सेवनाने आपल्या झोपेवर परिणाम होतो.

हे तर आपल्याला माहीत आहेच. वेळेत झोप न झाल्याने किंवा अपुरी झोप झाल्याने कधीकधी बैचैन व्हायला होतं.

रात्री एखादवेळेस झोप येत नसेल तर मनात एकसारखे विचार येत राहतात आणि हे जे विचार येतात ते दर वेळेला चांगलेच असतील असं नाही.

मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात.

मग उगाच झोपेवर परिणाम झाला की येणाऱ्या विचारांमुळे अस्वस्थता येते.

हे सगळं टाळण्यासाठी रोज केवळ एक किंवा दोन कपच चहा किंवा कॉफी प्यावी.

४. व्यायाम करा

व्यायामाचे आपल्या शारीरिक स्वाथ्यासाठी फायदे आहेतच पण व्यायामामुळे आपल्या शरीरात काही असे हार्मोन्स तयार होतात ज्याने आपल्याला शांत वाटतं.

बैचेन, अस्वस्थ वाटायची सहसा संध्याकाळ ही वेळ असते त्यामुळे संध्याकाळी जर आपला वेळ व्यायामात घालवला तर त्याचा फायदा नक्की होईल.

हा व्यायाम जिममधेच जाऊन करायला हवा असं नाही.

आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण चक्कर मारून येऊ शकतो, सायकल घेऊन फिरायला जाऊ शकतो किंवा घरच्याघरी ऐरोबिक्स किंवा झुंबा डान्सचे व्हिडीओ बघून ते करू शकतो.

५. कामांची यादी करा

सतत अस्वस्थ, बैचैन असलं की लक्ष लागत नाही हे तर माहीतच आहे पण याचाच अजून एक परिणाम म्हणजे विसराळूपणा.

कायम लक्ष विचलित असलं तर कामं लक्षात राहत नाही आणि मग एक काम करताना दुसरं आठवतं पण नंतर मात्र परत विसरायला होतं कारण मन थाऱ्यावर नसतं.

अशावेळेला जर सगळ्या कामांची यादी केली तर त्याचा फायदा होतो आणि एकामागोमाग एक अशी कामं करता येतात.

ही यादी आपण आपल्या फोनमध्ये सुद्धा करू शकतो ज्यामुळे त्यात कामं लिहायला सुद्धा सोपं जाईल.

६. लक्ष विचलित करण्याऱ्या गोष्टी लांब ठेवा

काम करत असताना सारखा फोन समोर दिसला तर बऱ्यचदा लक्ष सारखं फोनमध्येच जातं आणि कामात लागत नाही.

यामुळे वेळ खूप वाया जातो आणि काम सुद्धा मनासारखं होत नाही.

म्हणून एखाद महत्वाचं काम करताना आपला फोन किंवा अशी कोणतीही गोष्ट ज्यामुळे लक्ष विचलित होतं लांब ठेवलेलीच चांगली.

एकदा आपल्या मनासारखं काम झालं की मग आपण आरामात आपल्याला हवी ती गोष्ट करू शकू.

७. मनाविरुद्ध कोणतीच गोष्ट करू नका

असं किती वेळा होतं की आपल्याला एखादी गोष्ट करायची नसते किंवा एखाद्या ठिकाणी जायचं नसतं.

तरी आपण आपल्या मनाविरुद्ध ती करतो कारण, जनरीत!!!

पण असं जेव्हा होतं, तेव्हा त्या ठिकाणी आपण फक्त शरीराने असतो आणि मनाने मात्र दुसरीकडेच.

खरंतर अशामुळे आपण जिथे आहोत तिथे आपलं मन लागत नाही विचारांची तंद्री लागते आणि भरकटायला होतं.

आपल्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करणं वाईटच. त्यामुळे आपल्या मनात नसेल तर सरळ नकार द्यायला आपण शिकलं पाहिजे.

८. आवडत्या व्यक्तीशी बोला

आपल्या आयुष्यात अशा कितीतरी व्यक्ती असतात ज्यांच्याकडे नुसतं बघूनच प्रसन्न वाटतं आणि ज्यांच्याशी बोलून मनावरचं सगळं मळभ दूर होतं.

आठवून बघा, तुम्हाला तुमच्या जवळची चार ते पाच माणसं तरी नक्की आठवतील.

कधी वाईट विचार येऊन मन सैरभैर व्हायला लागलं, लक्ष लागत नसलं की अशा व्यक्तींना फोन करून त्यांच्याशी अवांतर गप्पा पाचच मिनिटासाठी जरी मारल्या तरी त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि मनाला शांतता मिळते.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या वेळेला अस्वस्थ वाटलं की या गोष्टी नक्की करून बघा!!

आणि कंमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला अशी बेचैनी जाणवते का कधी आणि त्यासाठी तुम्ही काय करता?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.