चोंदलेलं नाक मोकळं करण्याचे १५ घरगुती उपाय वाचा या लेखात.

चोंदलेलं नाक मोकळं करण्याचे घरगुती उपाय

Sinusitis म्हणजे काय? नाक चोंदते, सर्दी वाहून जात नाही? म्हणजे काय आणि त्यापासून सुटका कशी मिळवायची हे या लेखात वाचा.

सायनसचा त्रास सहन करायची वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये असं ज्याला हा त्रास माहीत अशा प्रत्येकालाच वाटत असेल.

काही लोकांची प्रकृतीच सर्दी होण्याची असते.

वातावरणात जरा बदल झाला किंवा जागा बदलली, एखाद्या वासाची किंवा धुळीची ऍलर्जी, थोडी दगदग झाली..

काहीही कारण पुरतं आणि एकदा सर्दी झाली की ती बरी होईपर्यंत जीव अर्धा होऊन जातो.

सर्दीचा सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे नाक चोंदणे.

बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की खूप सर्दी झाली, नाकातून सर्दी बाहेर पडत नसली (सर्दी वाहून जात नसली) की नाक चोंदतं.

पण नाक चोंदण्यामागचं खरं कारण असं आहे की आपल्या नाकात असलेल्या सायनस या कॅव्हिटीमधल्या आतल्या बाजूच्या रक्तवाहिन्यांना इन्फेकशन किंवा ऍलर्जीमुळे सूज आलेली असते.

त्यामुळे तिथलं प्रेशर वाढतं आणि म्हणून नाक चोंदून आपल्याला डोकेदुखी, श्वास घ्यायाला त्रास अशी लक्षणं दिसून येतात.

यालाच वैद्यकीय भाषेत ‘सायनुसायटिस’ असं म्हणतात.

सर्दीबद्दल एक मजेशीर गोष्ट आहे, एकदा एका माणसाला खूप सर्दी झाली असते म्हणून तो डॉक्टरांकडे जातो आणि औषध मागतो.

डॉक्टर सुद्धा त्याला तपासून औषध लिहून देतात. निघताना तो माणूस डॉक्टरांना विचारतो,
“डॉक्टर, मला किती दिवसात बरं वाटेल?”

यावर डॉक्टर उत्तर देतात, “औषध घेतलंस तर सात दिवसांनी बरा होशील आणि नाही घेतलं तर आराम करून आठवडाभरात.”

म्हणजेच सर्दीसाठी जितकं औषध महत्वाचं आहे तितकाच आराम, शिवाय ज्यांची अशी सारखी सारखी सर्दी होण्याची प्रकृती असते त्यांना सारख्या सारख्या औषधांनी सुद्धा फरक पडत नाही..

मग यावर उपाय काय? खरंतर हे उपाय आपल्या घरातच आहेत अगदी जुन्या काळापासून..

आपल्या आजीच्या बटव्यात..

पण या उपायांसाठी वेळ द्यावा लागतो, त्यासाठी कष्ट करावे लागतात आणि मुख्य म्हणजे संयम ठेवावा लागतो.

गोळीच्या पाकिटातून गोळी घेऊन, तासभर झोप काढली की वाटलं बरं असं या उपायांबाबतीत होत नाही.

कदाचित एकदा दोनदा करून मनासारखा फरक पडणार नाही पण त्या नंतर या उपचारांची जादू तुम्हाला नक्की पटेल..

वर म्हटल्याप्रमाणे हे उपाय बरेच जुने आहेत, आजच्या या लेखाचा हेतू तुम्हाला त्याची आठवण करून देणं इतकाच आहे.

१. नाकाला गरम शेक द्या

एखादा टॉवेल किंवा नॅपकिन गरम पाण्यात बुडवून, पिळून घेऊन नाकावर, नाकाच्या बाजूला, डोळ्यांच्या खाली आणि कपाळावर ठेऊन शेकल्यास सायनस चोक झालेल्या नसा मोकळ्या होतात आणि त्यावरची सूज सुद्धा कमी होते.

आणि बऱ्यापैकी आराम मिळतो. हा उपाय दिवसातून दोनदा तीनदा सुद्धा करायला हरकत नसते फक्त शेकताना पाण्याचं तापमान खूप जास्त सुद्धा नको, सहन होईल इतपतच गरम पाणी घ्यावं कारण त्यामुळे चेहऱ्यावरच्या नाजूक त्वचेला चटके लागून ती लाल होऊ शकते.

२. भरपूर पाणी प्या

पाण्याचं प्रमाण वाढवल्याने सायनसमधलं प्रेशर कमी होतं आणि त्यामुळे नाक साफ होण्यास मदत होते.

सर्दी असताना गरम नाहीतर कोमट पाणी प्यायलेलं चांगलं.

दर दोन तासांनी पाणी प्यायल्याने लगेच फरक पडेल.

पाण्याव्यतिरिक्त गरम सूप, चहा, कॉफी किंवा रूम टेम्परेचरचा एखादा फ्रुट ज्युस सुद्धा पिऊ शकता.. त्यामुळे इन्स्टंट एनर्जी सुद्धा मिळेल.

३. गरम पाण्याची वाफ घ्या

गरम पाण्याच्या वाफेमुळे चोंदलेलं नाक मोकळं होतंच पण त्याचबरोबर फ्लू, सायनुसायटिस, ऍलर्जी, दमा अशा अनेक आजारांवरचा रामबाण उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ.

यासाठी तुम्ही बाजारात मिळणारा स्टीमर वापरू शकता किंवा तो नसेल तर साध्या पातेल्यात पाणी गरम करून, डोक्यावरून टॉवेल घेऊन वाफ घेऊ शकता.

घरगुती भाषेत ज्याला आपण ‘सर्दी विरघळते’ असं म्हणतो, ते म्हणजे काय हे, नाक चोंदलेलं असताना वाफ घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल.

पाण्याची वाफ घेताना त्यात इतर काही घालायची आवश्यकता नाही.

४. निलगिरी तेलाचा वास घ्या

चोंदलेल्या नाकाला मोकळं करण्याचा एक प्रभावी उपाय म्हणजे निलगिरीचं तेल.

एक कपभर पाण्यात एक चमचा निलगिरीचं तेल टाकून त्या मिश्रणाचा दहा ते पंधरा मिनिटं वास घेऊन किंवा रुमालावर चार थेंब निलगिरी तेल टाकून सुद्धा थोड्या थोड्या वेळाने वास घेतला तर नाक मोकळं होतं.

झोपताना उशीवर दोन थेंब निलगिरीचं तेल टाकणं हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.

५. सलाईन

एक कप पाण्यात एक चमचा मीठ घालून ड्रॉपरचा वापर करून एकेका नाकपुडीत हळूच हे सलाईनचे पाणी सोडले तर नाक साफ होऊन मोकळा श्वास घेता येतो.

६. लसूण

लसणाच्या तीन चार पाकळ्या गरम पाण्यात उकळून ते पाणी प्यायलं तर सर्दी लवकर बरी होते.

दिवसातून तीन वेळा लसणाची एक पाकळी नुसती चावून खाल्ली तरी फरक पडतो.

७. कांदा

कांदा सोलून त्याचा पाच मिनिटं वास घेतला तर नाक मोकळं होतं आणि श्वास घेताना होणारा त्रास कमी होतो. असं दिवसातून एकदा जरी केलं तरी पुरे होतं.

८. लिंबू आणि मिरपूड

वाचायला अघोरी वाटत असला तरी चोंदलेलं नाक मोकळं करण्यासाठी हा उपाय नक्की करून बघा, चोंदलेलं नाक पाच मिनिटात मोकळं होईल.

दोन चमचे लिंबाच्या रसात अर्धा चमचा मिरपूड आणि चिमूटभर मीठ घालून हे मिश्रण पाच मिनिटांसाठी नाकावर लावावं.

९. टोमॅटो ज्युस

एक ग्लास टोमॅटोच्या रसात दोन तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घालून चवीपुरतं मीठ घालून घेऊन दिवसातून दोनदा प्यायला तरी खूप फायदेशीर असतं.

टोमॅटोमुळे सायनसवरची सूज कमी होते आणि लसणामुळे नाक मोकळं होतं.

१०. तुळस

तुळशीचे कितीतरी फायदे आपल्याला माहीत आहेत.

आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुळशीची पानं हा एक उत्तम पर्याय आहे.

रोज सकाळी अंशा पोटी आणि रात्री झोपायच्या आधी तुळशीची दोन तीन पानं खाल्यास प्रतिकार शक्ती वाढते

आणि त्यामुळे सायनसमध्ये इन्फेक्शन पकडायची शक्यता कमी होते.

रोजच्या चहात दोन तुळशीची पानं टाकणं सुद्धा चांगला पर्याय आहे.

११. आलं

आल्यामधल्या अँटी इंफ्लेमेट्री प्रॉपर्टीजमुळे सुजलेल्या सायनसपासून त्वरित आराम मिळतो.

आल्याचा चहा, आलं पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने फायदा होतो.

याचबरोबर पहिल्या उपायात सांगितल्याप्रमाणे गरम पाण्याने शेकताना जर त्या पाण्यात आल्याचा तुकडा घातला तर अजून लवकर आराम मिळू शकतो.

१२. मोहरीचं तेल

नाकपुडीत दोन थेंब मोहरीचं तेल सोडलं तर अगदी पटकन नाक मोकळं होतं.

हा उपाय करताना अगदी सावकाश करावा कारण जास्त तेल चुकून नाकात गेलं तर त्रास होऊ शकतो.

१३. मध आणि मिरपूड

मधाचे सर्दी, खोकला या विकारात अनेक फायदे आहेत.

रोज सकाळ, संध्याकाळ एक चमचा मध नुसता किंवा कोमट पाण्यातून घेतला तरी त्याचा सर्दी कमी करण्यासाठी उपयोग होतो.

चोंदलेल्या नाकापासून सुटका मिळवायची असे तर एक चमचा मधात पाव चमचा मिरपूड टाकून ते कोमट पाण्याबोरबर घेतलं तर पटकन आराम मिळतो.

१४. मेथी

छोटा चमचाभर भिजवलेल्या मेथ्या कोमट पाण्यात घालून ते पाणी दिवसातून दोन तीन वेळा घेतलं तर सायनस लवकर मोकळे होतात.

१५. काढा

आपल्या घरातच अनेक औषधं असतात, तुळस, गवतीचहा, मिरे, दालचिनी, सुंठ, हळद, जेष्ठमध, गूळ, जवस हे कपभर पाणी घेऊन उकळायचं.

एक कपाचं साधारण अर्धाकप पाणी होईपर्यंत उकळायचं आणि गरम गरम प्यायचं. हा सर्दीवरचा रामबाण उपाय आहे.

या घरगुती उपायांचे फायदेच फायदे आहेत, तोटे मात्र आजिबात नाही. त्यामुळे सर्दी झाल्यावर हे घरच्याघरी करायचे सोपे पण पॉवरफुल उपाय सुद्धा तुम्ही करून बघू शकता.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!