शेअर बाजार म्हणजे पैशांचा व्यवहार पण तो सुद्धा एका प्रेमिके सारखा!! कसा ते बघा

शेअर बाजार

कॉलेजच्या आठवणी किती रम्य असतात की नाही? आर्किटेक्चर कॉलेजमध्ये असताना पहील्या वर्षी, खुपच गंमत असायची. आमच्या वर्गात आपोआपच एक जोडी बनली होती, एक चुणचुणीत देखणा मुलगा आणि एक सुंदर मुलगी दोघेही कॉलेजात, सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले होते. दोघेही अभ्यासु होते, ते नेहमी टॉपर्स असायचे, ते आम्हा सार्यांपेक्षा ते सगळ्याच बाबतीत हुशार होते.

पण ते एकमेकांना बोलायचे कमी आणि भांडायचेच जास्त, त्यांच्या रुसव्याफुगव्यातही गंमत होती, इतकी की आम्हालाही त्यांचं भांडणं हवहवसं वाटायचं. त्या दोघात बिनसलं की सगळं वातावरण शांत शांत असायचं, सगळीकडे चिडीचुप आणि स्मशानशांतता असायची आणि एकदा का त्यांचं मेतकूट जमलं की ते सगळ्यांनाच खुप हसवायचे, खेळ खेळवायचे, अगदी भरभरुन आनंद वाटायचे…

माझ्यासाठी ही गोष्ट तेव्हा खुप नवीन होती, नंतर आजुबाजुला ‘प्रेम’ करणारी इतकी थिल्लर जोडपी 💑 पाहीली की प्रेमाचं अप्रुप संपलं, पण पहील्यांदा बघितलेलं ते बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंडचं मस्तीखोर नातं आणि प्रेमिकेचं ते रुप मनात पक्कं ठसलं.

आपण कादंबऱ्यांतुन वाचतो की स्त्री खुप चंचळ स्वभावची असते, तिचा मुड आता एक आणि क्षणात दुसरा असतो. तिच्या मनात काय चाललयं याचा थांगपत्ता लागत नाही, सतत मुड बदलणारी, सगळ्यांना बोटावर खेळवणारी अशीच दुसरी एक चंचळ प्रेमिका असते, ती म्हणजे शेअर बाजार.

आता शेअर बाजार ला ‘तो’ का ‘ती’ म्हणावे हाही तसा एक प्रश्नच आहे म्हणा! लातुरला पाणी सप्लाय करणाऱ्या एक्सप्रेसला शासनाने ‘जलदुत एक्स्प्रेस’ नाव दिलं, पण वर्तमानपत्र वाले तिला ‘जलपरी’च म्हणायचे, कदाचित त्याचं कारण माणसाला स्त्री रुपकांचच उपजत आकर्षण असेल. असो, आपल्या सोईसाठी आपण शेअर मार्केट ला चंचल स्त्री मानलं, तर त्यांच्यात काही साम्य नक्कीच दिसतील.

जशी शृंगार केलेली, भरजरी कपडे घातलेली आणि नखशिखान्त नटलेली, सुंदर नवयौवना आपल्या रुपाने साऱ्यांना आपल्याकडे पुन्हा पुन्हा वळुन बघायला भाग पाडते, भुरळ पाडते तसं शेअर मार्केट स्वतःला आर्थिक बुद्धिमान मानणार्यांना नक्कीच आकर्षित करतं. सुंदर स्त्री आपल्या कटाक्षांनी घायाळ करते, आणि मार्केट आपल्या रिटर्न्स नी. मुख्य म्हणजे दोघांवरही आपलं कधीच नियंत्रण नसतं, शेवटी आपल्याला त्यांच्या कलानेच चालावं लागतं, त्यातच आपलं भलं असतं😭 . असो….

प्रेयसी जशी प्रियकराला बोटावर खेळवते, तसं मार्केट गुंतवणुकदाराला. दोघीही मुडी असतात, यांच्याशी कितीही गट्टी जमली, तरी दोघींनाही रागावायला, बिथरायला आणि रुसायला पाच मिनीटेही लागत नाहीत.

तर शेअरमार्केटमध्ये असतात वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स, वेगवेगळ्या स्वभावाच्या स्त्रियांसारख्या, त्यांचे स्वभावही वेगवेगळे, आणि त्यांचे नखरेही वेगवेगळे, कोणी असतात अगदी कुलीन, शालीन, अगदी खानदानी त्यांना म्हणायचं की ब्ल्यु चिप, म्हणजे ह्या धोका देत नाहीत असं सगळे म्हणतात, म्ह्णुन आपणही यांच्यावर विश्वास ठेवायचा…….. आणि कोणी असतातं, नुसत्याचं शाईन मारणाऱ्या, आकर्षक वेष्टणात गुंडाळलेल्या पण पक्क्या धुर्त, कावेबाज आणि धोखेबाज, यांची नादी लागलं की पैशाचा बट्ट्याबोळ नक्की.

प्रेयसी जोपर्यंत गोडीगुलाबीने वागते, सेवा करते, लाड करते, तोपर्यंत आपण अगदी स्वर्गसुखात असतो, तसं निफ्टी आणि सेंसेंक्स तेजीत असताना एखाद्याला नुसतेच कॉम्प्युटर वरचे आकडे पाहुन उकळ्या फुटतात, अगदी जग जिंकल्याचा भास होतो. इतर लोक कष्टाने पै पै जमवतात आणि मी डोकं वापरुन, ही मिजास काही औरच.., ज्यांनी अनुभवलयं त्यांना हे नक्की समजेल!…

जसा निसर्गाचा नियम आहे, की भरती नंतर ओहोटी येतेच येते, जशी पौर्णिमेनंतर अमावस्या, तशी येते तेजीनंतर मंदी आणि अवेळी मार्केटमध्ये घुसलेला कात्रीत सापडतो. भाव रोज थोडे-थोडे खाली येऊ लागतात तेव्हा मनाला खुप खुप यातना आणि वेदना होतात, अगदी कोणीतरी ह्ळुहळु गळ्यावर करवत चालवताना होतात तशा, रोज थोडा थोडा लॉस खुप खुप निराश करतो, एके दिवशी ही वेदना सहन होत नाही, यातुन सुटका करुन घ्यावी, असे वाटते, काडीमोड करण्याची मानसिक तयारी होते, त्यातच भविष्य खुप खराब आहे अशी जोरदार आवई उठवली जाते व माणुस, असेल त्या पडेल भावात स्क्रिप्ट विकुन मोकळा होतो, अगदी जीवापाड जपलेल्या प्रेमिकेला रागारागात घराबाहेर काढल्यासारखा.

वादळ शांत झालेलं असतं, सगळं रितं रितं वाटत असतं, आणि नजर प्रेमिकेलाच शोधत असते, काहीतरी चुकल्या सारखे वाटत असते, मन कशातच लागत नाही.

माणुस दुसरं कसलही अपयश पचवु शकतो पण प्रेमभंगाचं दुःख पचवायला सर्वात अवघड आहे. प्रेमात उध्वस्त झालेल्यांना वेळीच भावनिक आधार नाही मिळाला तर तो कोसळतो, आयुष्यातुन उठतो, रात्रंदिवस हुरहुर करत राहतो, त्याचं मन कशातच लागत नाही, अगदी तसंच, जुगार खेळल्यासारखा, उथळपणे ह्या शेअरमार्केटच्या नादी लागलेल्यांना ही प्रेमिका अलगद उध्वस्त करते. मग प्रेमिकेला ‘सनम-बेवफा’ ठरवुन शिव्याशाप दिले जातात.

आणि निसर्ग-चक्राप्रमाणेच, अगदी थोड्याच दिवसात अकल्पनीयपणे पुन्हा भाव पुन्हा भराभर वाढ्त जातात आणि आता शेअर बाजार वाकुल्या दाखवत चिढवतं राहतं. व्यक्ति विरहरसाने व्याकुळ होतो, पण आता काही फायदा नसतो. जीवापाड प्रेम केलेली, जपलेली, त्याची प्रेमिका, आता दुसर्याची झालेली असते. आता फक्त तिच्या आठवणीने हळहळायचंच आपल्या हातात असतं. मग ती व्यक्ती पुन्हा प्रेमिकेला मिळवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये हात टाकते हे अगदी नक्की…

ह्या प्रेयसीचं मन जिंकण्याचा काही उपाय आहे का? प्रेयसीचं मन जिंकणं ही एक कला आहे, तिने न सांगता, नुसत्या हावभावावरुन, तिच्या मनात काय चाललं आहे हे सांगता आलं पाहीजे. शेअर बाजार जर एखादी प्रेमीका असेल तर म्युचअल फंड हे लग्नाच्या पत्नीसारखे प्रामाणिक असतात. गर्लफ्रेंड सहजासहजी बदलता येते, पण कितीही इच्छा असली तरी बायको तितकी सहज बदलता येत नाही.

पत्नी आयुष्याला स्थिरता देते, आकार देते, तसेच म्युचअल फंडही आयुष्य सावरतात, आधार देतात. एस. आय. पी. करुन, यांच्यात आपण जर नियमितपणे उत्कट प्रेमाने गुंतवणुक करत राहीलो, तर लवकरच आयुष्य पालटतं. महान शास्त्रज्ञ आईनस्टाईनने म्ह्ण्टलयं, की चक्रवाढ व्याज हे जगातलं आठवं आश्चर्य आहे, तसं पत्नीवर आणि म्युचल फंड यांच्यावर नियमित केलेल्या प्रेमाची चक्रवाढ व्याजाने प्रचंड भरभराट होते. जीवन खुप-खुप सुखकर होतं. भाकरीसाठी असणारा रोजचा संघर्ष संपतो, मनावरचं दडपण नाहीसं होवुन आपण आयुष्याचे सर्व रंग अनुभवण्यासाठी सज्ज होतो.

वाचण्यासारखे आणखी काही…..

शेअरबाजार- आक्षेप आणि गैरसमज
Low Cost Housing – बांधकामाची किंमत कमी कशी कराल?
श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Khup sundar lekh, aani share bajarachi presyashishi keleli tulana atulniy..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!