दक्षिण भारतात केला जाणारा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार : ‘फरमेंटेड राईस’

रोज सकाळी उठल्यावर ‘नाश्ता काय करायचा?’ हा यक्षप्रश्न सगळ्यांना सतावतो.

आठवड्यातले सात दिवस सात वेगवेगळे, सगळ्यांच्या आवडीचे आणि त्यात पौष्टिक असे पदार्थ करायचे म्हणजे घरच्या बाईसाठी तारेवरची कसरतच.

नेहमीचे उपमा, पोहे, शिरा, थालीपीठ वगैरे पदार्थ तर असतातच.

सहसा हे सगळ्यांचे आवडीचे पदार्थ असतात आणि छान पौष्टिक सुद्धा पण दर आठवड्यात तीन वेळा तेच खायचं म्हणजे घरातली लहान मुलंच काय, मोठी माणसं सुद्धा वैतागतील!

दक्षिण भारतात केला जाणारा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार : 'फरमेंटेड राईस'

त्यात आणि कधीतरी रात्रीच्या जेवणात काही कमी-जास्त होऊन कधी पोळी तर कधी भात उरतो मग त्याला पटकन फोडणी देऊन वर्षानुवर्षं घराघरात केली जाणारी फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात हे प्रकार आहेतच.

आजकाल मुलांच्या आवडीनुसार उरलेल्या पोळीची फ्रँकी, पोळीच्या नूडल्स आणि उरलेल्या भाताचा ‘फ्राईड राईस’ असे पदार्थ पण घराघरात होत असतात.

थोडक्यात काय, उरलेले पदार्थ वाया न घालवता त्यातून मुलांच्या आवडीचे पदार्थ नाश्त्याला करायच्या पण नामी युक्त्या हुशार बायकांनी शोधून काढल्या आहेत.

पण शेवटी त्याच त्या पदार्थांचा कंटाळा लहान-मोठ्या सगळ्यांनाच येतो आणि कीचनची मालकीण कायम नवनवीन पदार्थांच्या शोधात असतेच.

आज या लेखातून आम्ही एकूण तीन गहन प्रश्न सोडवणार आहोत…

आज आम्ही एका अशा भन्नाट पदार्थाची रेसिपी घेऊन आलोय जो नाश्त्याला करायला अतिशय उत्तम आहे, शिवाय त्यात उरलेल्या भाताचा वापर करता येतो आणि इतकं सगळं असूनही वर हा पदार्थ एकदम पौष्टिक असतो.

आणि त्याचे तब्येतीसाठी खूप फायदे आहेत!

हो, हो.. हा पदार्थ कुठला, त्याची रेसिपी काय, त्याचे फायदे काय, तो कशाबरोबर खायचा हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले आहेत हे आम्हाला माहीत आहे आणि त्याचीच उत्तरं तुम्हाला मिळावीत म्हणून हा लेख आहे.

उरलेल्या भातापासून खास नाश्त्यासाठीच केल्या जाणाऱ्या या पदार्थाचं नाव आहे – फरमेंटेड राईस.

या फरमेंटेड राईसची रेसिपी बघण्याआधी आपण हा पदार्थ नेमका भारतातल्या कुठल्या भागात केला जातो ते आणि त्याचा थोडक्यात इतिहास बघूया.

फरमेंटेड राईस ही खरंतर दक्षिण भारतात केली जाणारी पारंपरिक रेसिपी आहे पण ती इडली, दोसा यासारखी लोकप्रिय मात्र नाही.

फरमेंटेड राईस करायची पारंपरिक पद्धत म्हणजे रात्री जेवणात उरलेल्या भातात पाणी घालून ते रात्रभर मातीच्या भांड्यात भिजत ठेवायचं.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो भात पुर्णपणे फरमेन्ट झालेला असेल आणि त्यावरच्या पाण्यात सुद्धा भातावरचा पांढरारंग उतरला असेल.

मग हा भात असाच तोंडी लावायला एखादी भाजी किंवा लोणचं घेऊन नाश्त्याला खायचा.

काही ठिकाणी या उरलेल्या फरमेंटेड भाताबरोबर हिरव्या मिरचीचे आणि कांद्याचे तुकडे सुद्धा खाण्याची पद्धत आहे.

काही ठिकाणी त्याबरोबर घट्ट दही खायची सुद्धा पद्धत आहे. आणि याची चव म्हणजे लाजवाब!!

खरंतर सकाळच्या वेळी गावातल्या लोकांना इतर गोष्टी सांभाळून नाश्ता तयार करण्यासाठी वेळ मिळत नसे आणि परत दिवसभराची इतकी कामं करायची तर नाश्ता तर पोटभरीचा हवा..

म्हणूनच या फरमेंटेड राईसची कल्पना सुचली असावी आणि म्हणूनच त्याबरोबर इतर काही न करता लोणची, कांदा, मिरची किंवा दही असे तयार असणारेच पदार्थ खाल्ले जात असावेत.

तुमच्या मनात डोकावण्याऱ्या प्रश्नाचीआम्हाला कल्पना आहे….

फरमेंटेड राईस सकाळी खाताना तसाच गार खायचा की गरम करून खायचा?

खरंतर उरलेला भात फरमेन्ट होतो म्हणजे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे त्यात आपल्या शरीराला उपयोगी असे ‘गुड बॅक्टेरिया’ तयार होतात.

याचमुळे या फरमेंटेड राईसचे अनेक फायदे होतात त्यामुळे जर हा भात सकाळी उकळवला तर हे चांगले बॅक्टरीआ मरायची शक्यता असते.

असं झालं तर त्यामुळे फरमेंटेड राईसचा आपल्याला फारसा फायदा होणार नाही म्हणून सकाळी खाताना हा भात गरम करून खाऊ नये.

जर अगदीच थंड भात खायला जात नसेल तर किंचित कोमट करून खावा पण खळखळ उकळवू मात्र नये.

हा भात फरमेन्ट होतो, यात ‘गुड बॅक्टरीया’ तयार होऊन तो अत्यंत पौष्टिक होतो… तो कसा?

भातात पाणी घालून ठेवल्यावर त्यात लॅक्टिक ऍसिड, बॅक्टरीया (म्हणजेच गुड बॅक्टरीया ज्यामुळे पचनाला मदत होते आणि प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते) तयार होतात आणि ते भाताचं विघटन करतात.

त्यामुळे त्या भातामध्ये अयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम या घटकांची वाढ होते.

या पौष्टिक नाश्त्यात व्हिटॅमिन बी- 6 आणि बी-1२ सुद्धा खूप प्रमाणात आढळते.

याशिवाय उरलेल्या भातात जे पाणी घातलं जातं त्यामुळे शरीरातली उष्णता सुद्धा कमी व्हायला मदत होते.

पूर्वीच्या काळी हा दमदमीत नाश्ताकरून शेतकरी किंवा कष्टकरी वर्ग दिवसभर शेतात राबायला जात असत, याचमुळे की काय फरमेंटेड राईस हा गरीब लोकांनी खायचा नाश्ता आहे असा समज सर्वत्र पसरला आणि या पिढीच्या लोकांचा याच्या फायद्यांकडे कानाडोळा झाला.

सकाळी हा फरमेंटेड राईस नक्की कसा खायचा?

वर आपण बघितलंच आहे की हा उरलेला भात रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी तसाच थंड, किंवा किंचित कोमट करून खायचा पण उकळायचा मात्र नाही.

आता राहिला प्रश्न तोंडाला चवीला म्हणून काय घ्यायचं त्याचा.. आपल्या आवडीप्रमाणे लोणचं, पापड, दही किंवा रात्रीचीच उरलेली एखादी भाजी किंवा आमटी बरोबर हा नाश्ता खाऊ शकतो.

रात्रभर लॅक्टिक ऍसिड बॅक्टरीया भातातल्या साखरेचं आणि स्टार्चचं विघटन हे लॅक्टिक ऍसिडमध्ये करत असतात, त्यामुळे या भाताला किंचितसा आंबटसा वास आणि चव येते.

पण जर उरलेल्या भातात रात्री पाणी न घालता भात तसाच ठेवला तर तो खराब होऊ शकतो.

अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की फरमेंटेड राईस म्हणजेच आपल्याकडे खाल्ली जाणारी पेज तर नाही?

पण नाही, पेज म्हणजे भरपूर पाण्यात शिजवून मऊ केलेला पातळसर भात आणि फरमेंटेड राईस म्हणजे आधीच शिजलेल्या भातात पाणी घालून रात्रभर ठेवलेला भात.

पेजेचे सुद्धा स्वतःचे अनेक फायदे आहेत, तब्येतीसाठी पेज चांगलीच असते पण पेज आणि फरमेंटेड राईस मधला हा फरक लक्षात घेतला पाहिजे.

भारतातले विविध प्रांतातले पारंपरिक असे अनेक पदार्थ असतील पण काही कारणाने आपल्या पिढीपर्यंत ते पोहोचत नाहीत.

असे जुने, हेल्दी पदार्थ आपण जपले पाहिजेत, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे..

आपण सुद्धा घरी ते केले पाहिजेत आणि इतरांना ही त्यांच्या फायद्यांबद्दल सांगितलं पाहिजे. करताय ना मग हा लेख शेयर?

Image credit: aayesha’s kitchen &

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!