काहीच मनासारखं घडत नसताना उमेद टिकवून ठेवण्यासाठी पाच मंत्र

काहीच मनासारखं घडत नसताना उमेद टिकवून कशी ठेवायची

तुमचे सगळे प्लॅन्स फसताहेत? मनासारखं काहीच घडत नाही? अशा परिस्थितीत सुद्धा तग धरून पुढे जाण्यासाठी हा लेख वाचा

असं आपल्यासोबत कितीतरी वेळा होतं की, आपण करायचं एक असं म्हणतो, मनाशी सगळं ठरवतो, नियोजन करून त्यानुसार तयारी करतो पण प्रत्यक्षात मात्र काहीतरी अडचणी येतच जातात.

आणि आपण ठरवलेल्यापैकी काहीएक घडत नाही.

साधंच उदाहरण द्यायचं तर आपण आठवडाभराची साचलेली सगळी कामं रविवारी संध्याकाळी करायची ठरवतो पण त्या दिवशी ऐन वेळी घरी पाहुणे येतात आणि आपल्या प्लॅनचा ओम फस करतात!

मित्रांनो, हा झाला मजेचा भाग पण आपण ठरवू त्याप्रमाणेच आयुष्यात गोष्टी घडत जातील असं आजिबात नाहीये.

उलट आपण ठरवू त्यात अनेक अडथळे येऊन, अनेक संकटांचा सामना करून, मनाविरुद्ध काही गोष्टी करून शेवटी आपल्याला हवं ते मिळवणं.. जिंदगी इसी को कहते हैं.. हो ना?

सध्याच्या या महामारीच्या अवघड काळात तर याचा प्रत्यय सगळ्यांनाच आला असेल.

सगळ्यांचं थोडंथोडकं नाही तर तब्ब्ल सहा महिन्याचं नियोजन फसलं आहे.

कोणाच्या फॉरेन ट्रिप्स, कोणाचे नवीन बिझिनेस प्लॅन्स रद्द झाले तर कोणाच्या चालू व्यवसायावर टांगती तलवार आली इतकंच काय मुलांच्या शाळांच्या सुद्धा अडचणी उभ्या राहिल्या…

आपण ज्या ज्या म्हणून गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या त्यातल्या काहीच करता आल्या नाहीत.

पण मित्रांनो, म्हणून आयुष्य थांबतं का?

तर नाही.

आपल्या मनाप्रमाणे, आपण ठरवलेल्या प्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत की वाईट वाटणं, दुःख होणं, राग येणं, निराश होणं या सगळ्या गोष्टी होतीलच..

अगदी साहजिक आहे ते, पण या नंतर काय होणं अपेक्षित असलं पाहिजे?

तर नवी उभारी..

जेव्हा सगळं संपतंय असं वाटतं तेव्हाच नव्याने सुरुवात करून वर यायचा प्रयत्न करायचा असतो, त्यातच आपली अर्धी जीत पक्की झालेली असते..

या गोष्टी लिहायला वाचायला सोप्या आहेत पण आचरणात आणायला तितक्या सोप्प्या नाहीत.

हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी या पाच टिप्स घेऊन आलोय..

तुमच्या मनासारखं घडलं नाही, घडत नसेल तर काय करायचं?

उम्मेद कशी टिकवून ठेवायची हे जाणून घेण्यासाठी पुढे शेवटपर्यंत नीट मन लावून वाचा..

१. तुम्ही आहात त्या परिस्थितीचा शांत डोक्याने विचार करा

आपल्या मनाविरुद्ध घडलं किंवा आपण जे आपल्यासाठी किंवा इतरांसाठी ठरवलं होतं त्याप्रमाणे घडलं नाही.

तर आपली पहिली प्रतिक्रिया काय असते?

राग!

आणि दुसरी प्रतिक्रिया?

दुःख!

पण मित्रांनो, रागाने दुसऱ्या कोणाचं नाही तर आपलंच नुकसान होत असतं आणि वाईट वाटून घेत बसलो तर पुढे जाणं आपल्यालाच अशक्य होतं.

हे घडलं ते आपल्याबाबतीतच का? आपल्याच नशिबात असं का? असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, काहीच गैर नाही, पण त्या प्रश्नांनाच धरून बसणं मात्र गैर आहे.

त्यापेक्षा आपल्या मनाविरुद्ध काही घडलं की शांतपणे सगळ्या परिस्थितीचा विचार करून स्वतः ला फक्त दोन प्रश्न विचारायचे,

१) माझ्या हितासाठी आहे त्या परिस्थितीत मी काय करू शकते/शकतो?

२) आत्ताच्या या परिस्थितीचा अजून काही वर्षांनी मला फरक तरी पडणार आहे का?

पहिला प्रश्न तुम्हाला तुमच्या परिस्थितीच्या सकारात्मक बाजूकडे बघून पुढे जायला मदत करेल.

तर दुसरा प्रश्न तुम्हाला त्या परिस्थितीला किती महत्व द्यायचं किंवा ती परिस्थिती सुधारण्यासाठी किती धडपड करायची याचा अंदाज देईल.

२. तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी आठवा

परिस्थिती कितीही गंभीर असली, सगळं आपल्या मनाविरुद्ध होत असलं, आपण ठरवल्याप्रमाणे काहीच घडत नसलं, आपलं कितीही नुकसान होत असलं तरी आयुष्यात अशा काही गोष्टी असतातच ज्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असतो, असायला पाहिजे!!!

आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याबाबतीत सगळंच चुकीचं घडत आहे, आपल्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही त्यावेळी या गोष्टी आठवायच्या.

कधीकधी या गोष्टी अगदी छोट्यातल्या छोट्या सुद्धा असू शकतात, जसं की माझ्या डोक्यावर छप्पर शाबूत आहे, माझ्या हातात काम करायला बळ आहे.

या अगदी लहातल्या लहान गोष्टीच अवघड काळात आपल्याला बळ देतात आणि त्यामुळेच आपण ठरल्याप्रमाणे काहीच होत नसलं तरी आपली प्रयत्न करायची आणि पुढे जायची जिद्द कायम राहते.

चांगल्या आठवणींना उजाळा देऊन मानसिक आरोग्य उत्तम कसं राखता येईल

३. तुमच्या मनातील विचार शांत करण्यासाठी प्रयत्न करा

काही वेळेला सतत विचार करून काहीच निष्पन्न होत नाही.

उलट विचार करून कधीकधी आपण आपल्यालाच त्रास करून घेतो.

काही वेळेला परिस्थितीपासून थोडं लांब जायची गरज असते.

काही उत्तरं शोधून सापडणारी नसतात, त्यामुळे ती शोधायचा प्रयत्न करू नये.

काही वेळा नकारात्मक विचार मनात येतात, ते टाळण्यासाठी, मनातले विचार शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

त्यासाठी आपण आपल्या आवडीची गाणी ऐकू शकतो, फिरायला जाऊ शकतो, गाडी घेऊन चक्कर मारून येऊ शकतो किंवा चक्क एक झोप काढू शकतो!

आपल्या मनातले विचार कशामुळे शांत होतात हे एकदा समजलं की तो उपाय आपल्यासाठी कायमचा होऊन जातो.

४. तुमचे प्रेरणा स्रोत ओळखा

आपल्याला अनेक ठिकाणहून, अनेक माणसांकडून ऊर्जा मिळत असते.

असे तुमचे प्रेरणा स्रोत कोणते आहेत?

तुम्हाला कोणत्या तरी मोटिव्हेशनल स्पिकरला ऐकून बरं वाटत असेल, एखादं पुस्तक वाचायला आवडत असेल, कोणाच्या सक्सेस स्टोरीज वाचायला आवडत असेल

किंवा प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटून प्रेरणा, सकारात्मक ऊर्जा मिळत असेल.

जेव्हा मन खट्टू होतं तेव्हा अशा प्रेरणा देणाऱ्या ठिकाणी किंवा व्यक्तीकडे जाऊन बसायचं.

किंवा सरळ मनाचेTalks तुमच्या मनःस्थिती चा लेख शोधून वाचायचा….

हे करूनही, कदाचित आपल्या समस्येला अगदी थेट उत्तर मिळणार नाही, ‘पुढे काय?’

हा आपल्या मनातला प्रश्न सुटणार नाही पण आपलं मन तर ‘फ्रेश’ होईल! काही नवीन कल्पना सुचतील.

आणि फ्रेश मनाने आपण फ्रेश विचार करायला सज्ज होऊ, बरोबर ना?

५. अपयशातून गिरवलेले धडे लिहून काढा

तुम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीयेत, तुमच्या मनासारखं होत नाहीये, या मागे प्रतिकूल परिस्थिती कारणीभूत असेलही कदाचित, पण तुमचं कुठे काही चुकलं का?

तुमच्या योजना आखायला चुकल्या का? आखलेल्या योजना अमलात आणताना काही गडबड झाली का?

एखादे संकट येऊ शकते ही शक्यता तुम्ही गृहीत धरली नाही का?

डोकं शांत झाल्यावर या गोष्टींचा विचार करणं पण गरजेचं आहे.

आपलं कुठे काय आणि कसं चुकलं? हे आपलं आपल्याच लक्षात आलं की पुढच्या वेळेला आपण त्यात सुधारणा करू शकतो.

आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या संकटाकडे साक्षीभावाने बघणं तुम्हाला जमायला लागतं…

चुका सगळ्यांकडूनच होतात आणि त्या व्हाव्यात सुद्धा कारण या चुकांमधूनच शिकून आपण प्रगती करणार असतो..

फक्त आपल्या चुका मान्य करून त्यातून धडे गिरवायची तयारी मात्र हवी.

आयुष्यात असे एक नाहीतर अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्या सगळ्या योजना फसतात, आपल्या मनाप्रमाणे काहीच घडत नाही.

जेव्हा पुढे काय हा प्रश्न आपल्याला सतावत असतो आणि त्याचं उत्तर आपल्याकडे नसतं.

पण या अशा परिस्थितीतून बाहेर पडून नवीन सुरुवात करणं गरजेचं असतं..

काहीवेळा परिस्थितीच प्रतिकूल असते तर काहीवेळा आपण कुठेतरी कमी पडतो..

काहीही असलं तरी आयुष्यात पुढे जाणं भाग असतं आणि त्याचसाठी हे पाच मंत्र आहेत ज्याचा तुम्हाला आणि तुमच्या जवळच्यांना सुद्धा फायदा होईल.. मग करताय ना हा लेख ‘शेयर?’

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.