उगाच खर्च होणार पैसा वाचवण्यासाठी ‘या’ चुका टाळा

उगाचंच खर्च होणारे पैसे कसे वाचवायचे

‘पैसे वाचवणे’ ही एक रीत आहे.. पूर्वापार चालत आलेली.. आपले बाबा, आजोबा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे वाचवायचे आणि चांगली संपत्ती वाढवायचे..

पण स्मार्ट सेव्हिंग्ज मात्र आई आणि आज्जी करायच्या नाही का?? स्वयंपाकघर धुंडाळलत तर हजारो रुपये मिळून जातील असे सेव्हिंग्ज..!! अक्कलहुषारीने त्या पैसे बाजूला टाकायच्या.. आणि अडीअडचणीला तेच कामी यायचे..

आपणही काही प्रमाणात पैसे वाचवतो.. पै-पै जोडतो.. मात्र एकेक पैसा जोडण्याची ही कला सध्याच्या युगात कामाला येते का?

छोट्या मोठ्या कामात उपयोगाला नक्कीच येते.. मात्र तरीही कमीच पडते.. ह्याचाच अर्थ असा की आपल्याला जरा हटके पद्धतीने पैशांची छन छन वाढवता आली पाहिजे..

पण पैसा वाढवणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही.. अचानक लॉटरी लागेल आणि श्रीमंत होऊ अशातला भाग ही नाही..

इन्स्टंटली आपण धनवान होणार नाही.. हे लक्षात घ्या.. पण आपण पैसा वाढवू शकतो हे मात्र नक्की..

थोडा वेळ द्या आणि छोट्या छोट्या पायऱ्या चढत राहा.. कालांतराने तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल तुमचे सेव्हिंग्ज पाहून..

ह्या साठी काय करावे लागेल? तर थोड्या स्मार्ट सवयी लावून घ्याव्या लागतील.. पैसे वाचवायच्या, साठवायच्या आणि वाढवायच्या चलाख सवयी..!!

ह्या सवयी तुमचे भविष्य पैशांच्या कटकटी पासून मुक्त करेल.. चला तर मग सुरुवात करूया

१. चाराणे आठाणे साठवणे जुने झाले.. आता किमान शे दोनशे चा विचार करा:

कुठे २ – ४ % डिस्काउंट, कुठे ५ – १० रुपये ऑफ अशा ऑफर्स ना आपण नेहमीच भुलतो.. असे वाटते की तेवढेच बारा पंधरा रुपये सुटतील.. पण हे काही खूप मोठे सेव्हिंग्ज नक्कीच नाहीत.. आपण साठवणार किती? वर्षाकाठी फार तर एखाद दोन हजार..!!

त्यापेक्षा खूप मोठे सेविंगस टार्गेट करा.. म्हणजे तुमच्या मोठ्या खरेदी मध्ये कुठे कमी व्याजाने हफ्ते भरायचे आहेत ते ऑप्शन निवडा.

किंवा महिन्यातील कोणता खर्च संपूर्ण बंद करता येईल किंवा एकेक महिन्या आड करा येईल ते शोधा.. त्यातून महिन्याकाठी तुमचे शेकड्याने पैसे वाचतील..

काही वेळेस तितकीशी गरज नसलेले खर्च बंद करता आले तर उत्तम. भले तुमच्याकडे कार आहे.. पण ऑफिसला ऑफिसच्या बसनेच जा.. नाहीतर कार पूलिंग करा.. तुमचे महिन्याचे २ ते ५ हजारांपर्यंतचा पेट्रोल चा खर्च नक्कीच वाचेल..

ऑनलाइन शॉपिंग करताना ‘प्राईस – लोवर टू हायर’ असे ऑप्शन सेट करूनच खरेदी करा.. ह्याचा फायदा असा होतो की लागणारी वस्तू अवास्तव पैसे देऊन खरेदी करण्यापेक्षा बेस्ट डील निवडून पैसे वाचवून घेतली तर तुम्हालाच फायदा मिळेल.

२. कोणतीही खूप मोठी गोष्ट मिळवायची असल्यास थोडे थांबा, वेळ घ्या:

घाई आपल्याला विनाशाच्या दारी नेई, ही म्हण पैशांच्या व्यवहारात सुद्धा सार्थ आहे.. घाई घाईत घेतलेले निर्णय जसे अंगलट येतात तसेच घाई घाईत केलेले आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्याला अडचणीत आणतात..

मनुष्यप्राण्याला अगदी लहानपणा पासून दिसेल ती वस्तू हवीच असे वाटत असते. मोठेपणी देखील ही सवय सहजासहजी जात नाही..

कित्येक वस्तू आपल्याला दिसता क्षणी घ्यायचा मोह होतो.. असे वाटते फार काही अवघड नाही घेऊन टाकू..

उदाहरणार्थ, तुमचा टीव्ही तुम्ही ५ वर्ष वापरलात आणि सहज विंडो शॉपिंग करता करता, नवीन फीचर्स चे स्मार्ट टीव्ही पाहिलेत.. किमती खूप जास्ती असतात खऱ्या..

मात्र आपल्याला फक्त इतकेच दिसते की आपला टीव्ही आउटडेटेड झालाय आणि आता नवीन घ्यालाच हवा कारण आता बिल्डिंगमध्ये सगळ्यांच्याच भिंतीवर महागडे टीव्ही लागलेत..

नवीन स्मार्ट टीव्ही च्या शोधात एक्सचेंज ऑफर, डिस्काउंट ऑफर आणि कित्येक गोष्टी तुम्हाला खुणावतीलही.. पण हीच वेळ आहे स्वतःला थोडेसे मागे खेचण्याची.

जरा विचार करा.. टीव्ही का बदलायचा आहे?

आपला जुना टीव्ही खरंच खराब झाला आहे का??

उत्तर हो असेल तर जरूर पाऊल पुढे जाऊद्या.. पण उत्तर नाही असेल तर कशाला लागतोय नवीन टीव्ही? लोक हसतील म्हणून? मग पैसे देतील का ते नवीन भारीतला टीव्ही घ्यायला? नाही ना?

थोडे समजुतीने वस्तूंवर पैसे खर्च करायची सवय लावा.. गरज आणि उधळपट्टी ह्यातली बारीक रेषा सांभाळा..

३. आपल्याला जी लाईफस्टाईल जगणे शक्य आहे त्यापेक्षा थोडी / एक पायरी खालची लाईफस्टाईल जगायला सुरुवात करा:

फारच अवघड वाटतंय ना हे? पण दिसतंय तितकं अवघड नाही.. लहानपणी आपल्याला पॉकेटमनी मिळायची.. ती महिनाभर पुरवायला आणि त्यातून काही पैसे वाचवायला आपण जी स्ट्रेटर्जी वापरायचो ना?? तीच ही..

म्हणजे समजा भरीतले शाईचे पेन २५ रुपयाला मिळायचे म्हणून सगळी पॉकेटमनी आपण त्यावर कधीच उडवत नसू.. आपण १० रुपये वाले दणकट टिकाऊ पेन घ्यायचो. का? तर वाचलेले १५ रुपये मोठे काहीतरी घेण्यासाठी बाजूला ठेवायचे असायचे.

मग हे आत्ता का नाही करू शकत? महागडे टाकाऊ काहीही घेण्यापेक्षा स्वस्त पण टिकाऊ घेणे खूपच उपयोगाचे आहे..

३ बेडरूम, हॉल, किचन चा फ्लॅट २ माणसांसाठी भाड्याने घ्यायची काय गरज आहे..??

पाहुणे आल्यावर लागेल म्हणून? पण पाहुणे ४ – ५ दिवस येणार, तेही कधीतरी… मग १ बेडरूम, हॉल, किचन असलेला फ्लॅट घेतला तर भाडे वाचेल.

मोठे घर, मोठी कार, मोठ्या महागड्या वस्तू उगीचच घेण्यात काय हाशील आहे? गरजेपुरत्या घेतलात तर तुमचा उगीचच उधळला जाणार पैसा तुमच्या बँकेत आराम करेल.. जगाच्या बरोबरीने बदलणे गरजेचे नक्कीच आहे पण त्यासाठी वायफळ खर्च किती करायचा? ह्यावर थोडा लगाम लावणे गरजेचे आहे..

https://www.manachetalks.com/9881/six-tips-of-financial-planning-marathi/

४. वाणसामानाची खरेदी सुद्धा स्मार्टली करायला शिका:

वाणसामान खरेदी करायला जाणे म्हणजे खूप मोठे काम असते. कारण फूड शॉपिंग हे आपल्या महिन्याच्या बजेटचा खूप मोठा हिस्सा खाऊन टाकते.. आणि इथे आपण सावध असायलाच हवे. नाहीतर आपले सगळे बजेट कधी ह्यात संपून जाईल सांगताच येणार नाही..

हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. ह्याची हुशारीने कशी काळजी घ्यायची ते पाहू

अ. घरून निघायच्या आधी यादी बनवा आणि बजेटही ठरवून ठेवा:

हे खूपच कडक शिस्तीने केले पाहिजे. जेवढे समान यादीत लिहिले आहे तेवढेच घ्या.. सुपरमार्केट तर सतत सामानाने ओसंडून वाहत असते. आपल्याला खुणावत असते..

लेकिन जाने का नही..!! जेवढे यादीत लिहिले आहे तेवढेच आपल्या सामानाच्या ट्रॉलीत पडतेय ना ह्याकडे लक्ष ठेवा.

सहसा लहान मुलांना घेऊन जाऊ नका नाहीतर तुम्हाला अनुभव आहेच किती गोष्टी त्या ट्रॉलीत विनाकारण भरल्या जातात.😅

असे न केल्यास तुम्ही वाणसामानावर नाहक पैसे उधळून याल.

ब. खरेदीला जाताना खाऊन पिऊन पोट भरून जा:

ह्याच्या मागे एक कारण आहे.. माणसाचा स्वभाव असतो की जर समोर खाण्याचे चमचमीत पदार्थ असतील तर त्याची चव लगेच चाखली पाहिजे.

वाणसामान घेताना वेगवेगळे पदार्थाचे पॅकेट दिसतच असतात.. जर उपाशी पोटी गेलो तर हे सगळे पॅकेट घरी गेल्यावर खाऊ म्हणून आपण उचलतो. अर्धे अधिक तर पौष्टिक सुद्धा नसते. मात्र पोट भरलेले असेल तर अशा वस्तूंकडे लक्षही जात नाही. आणि हव्या तितक्याच वस्तू घेऊन, वायफळ खर्च न करता आपण घरी येतो..

सध्याच्या सोशल डिस्टंसिंगच्या काळात बाहेर जाऊन किराणा खरेदी करणं हे तितकंसं सुरक्षित सुद्धा नाही. या लेखाच्या शेवटी अमेझॉन च्या स्टोअरची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये हळद, जिरे इथपासून ते काजू बदाम पर्यंत सर्व काही विशेष ऑफर्स सह खरेदी करण्याची सोय आहे.

५. मोठ्या कालावधीची जिम ची मेम्बरशीप कॅन्सल करा:

होय.. त्यामागे कारणही तसेच आहे. जिम ची मेम्बरशीप तुम्ही स्वस्त मिळते म्हणून एका वर्षाची घेता. हो ना.? आणि पुढे ३६५ दिवस जिम ला जाता..?? नाही ना.!

मग कशाला वर्षभराचे एकदम सात आठ हजार रुपये उगीच भरून ठेवायचे?

त्यापेक्षा ज्या महिन्यात तुम्ही ठरवाल ह्या महिन्यात जायचे तेव्हा पैसे भरा आणि तो महिना जिम करा.. नाहीतर इंटरनेट वर भरपूर फ्री व्हीडीओ असतात जे तुम्हाला व्यायाम करायला आणि वजन कमी करायला मदत करतात. त्यांचा वापर करा.

व्यायामासाठी योग हा उत्तम पर्याय आपल्याकडे उपलब्ध असताना जिमचा विचार करण्याची तितकीशी आवश्यकता सुद्धा नाही.

ज्यावेळी तुम्ही मनापासून जिमला जायचे ठरवाल आणि रोज जाणारच असे मनाशी पक्के कराल तेव्हाच जिम च्या नादी लागा.. तो पर्यंत जितके फ्री पर्याय उपलब्ध आहेत त्यांचे उपयोग करून घ्या..

ह्या छोट्या छोट्या क्लृप्त्या तुम्हाला खूप मोठा बदल घडवून आणताना दिसतील.. लहान मुले छोटी छोटी पावले टाकतच मोठ्या मोठ्या ढांगा टाकायला शिकतात. त्याच प्रमाणे आपले हे छोटे कदम भविष्यात खूप मदत करतील.

पैसे कमवायला खूप कष्ट पडतात, ते घालवायला नाही.. म्हणून जरा स्मार्ट होऊया आणि आपला पैसा वाढवूया..!!

Manachetalks

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा 

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!