मुलांचा आळशीपणा घालवण्यासाठी हे उपाय करून बघा

मुलांचा आळशीपणा घालवण्यासाठी हे उपाय करून बघा

तुमची मुलं आळशीपणा करतात? मग त्यांना वेळीच शिस्त लावण्यासाठी हा लेख नक्की वाचा

आपल्या मुलांमध्ये अभ्यास करून मार्क मिळवण्याची क्षमता आहे, पण केवळ त्यांचा आळशीपणा नडतो असं तुम्हाला वाटतं का?

मुलांना शिस्त लावून, त्यांच्यातला आळशीपणा घालवण्यासाठी या १० टिप्स नक्की वाचा आणि करून बघा.

अनेक पालकांच्या तक्रारी असतात की, मुलं अभ्यास करत नाही, एका जागी बसायचा कंटाळा करतात, सारखं मोबाईलमध्ये खेळतात किंवा टीव्ही बघत बसतात किंवा त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही..

किंवा घरात मदत करत नाहीत, कामाची सवय नाही, स्वतःची खोली आवरत नाहीत, अभ्यासाचे सामान अस्ताव्यस्त असते..

थोडक्यात मुले सगळ्याच बाबतीत आळशीपणा करतात अशी तक्रार खूप पालक करतात.

गेले काही महिने तर मुलांचे क्लास, शाळा सगळेच घरून ऑनलाईन सुरु आहे.

अशात सकाळी मुले उशिरा उठून फक्त दात घासून लॅपटॉप पुढे शाळेत बसतात आणि शाळा झाल्यावर अभ्यासाचा कंटाळा करतात अशा तक्रारी असतात.

मुलांना सवयी लावणे ही पालकांची जबाबदारी असते, मुले जर कुठे काही चुकत असतील किंवा एखाद्या गोष्टीत कमी पडत असतील, तर तसे होऊ नये म्हणून प्रयत्न पालकांनी केले पाहिजेत कारण मुलांना घडवायचे काम हे पालकांचे असते.

म्हणूनच पालकांनी आपल्या वागण्यात कोणते बदल केले पाहिजेत ज्यामुळे मुलांचा आळशीपणा घालवून त्यांना अभ्यासाची गोडी लागेल, त्यांना इतर कामांची सवय कशी लावायची..

थोडक्यात त्यांना आळशीपणा घालवण्यासाठी मोटिव्हेट कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत.

1. मुलांना पैशांची आणि गोष्टींची किंमत ठेवायला शिकवा

मुलांनी एखादी गोष्ट मागितली आणि ती लगेच त्यांना आणून दिली तर त्यांना त्या गोष्टीची किंमत राहत नाही.

मुलांचे लाड अवश्य करावेत. त्यांना आवडलेल्या, हव्या असणाऱ्या वस्तू त्यांना घेऊन दिल्याच पाहिजेत, पण त्याच बरोबर त्यांना त्याची किंमत सुद्धा ठेवायला शिकवले पाहिजे?

ते कसे?

2. मुलांसाठी आदर्श बना

मुलांना अमुक करा, तमुक करा असे फक्त सांगून, शिकवून ती शिकत नाहीत.

ती शिकतात ती आईबाबांकडे बघून त्यामुळे मुलांना एखादी गोष्ट शिकवायची असेल तर त्याबद्दल त्यांना फक्त सांगत न बसता, आई बाबांनी स्वतः त्या गोष्टी केल्या पाहिजेत.

आईबाबा मुलांचे पहिले गुरु असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्याचा मुलांवर परिणाम होत असतो.

त्यामुळे मुलांचा आळशीपणा घालवायचा असेल तर आईबाबांनी स्वतः उत्साही राहून घरातले वातावरण उत्साही केले पाहिजे.

वेळच्यावेळी कामे करायचे महत्व किंवा आजचे काम उद्यावर ढकलणे कसे वाईट असते याची शिकवण आईबाबांनी त्यांच्या वागण्यातून मुलांना दिली पाहिजे.

3. मुलांना तुमच्या अपेक्षांची जाणीव करून द्या

मुलांच्या वागण्यात तुम्हाला काय बदल अपेक्षित आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या वेळा काय असल्या पाहिजेत किंवा टीव्ही बघायला त्यांनी दिवसातले किती तास घालवले पाहिजेत, त्यांनी घरातली कोणती कामे केली पाहिजेत या कामांचे हसत्या-खेळत्या वातावरणात मुलांच्याच उपस्थितत एक वेळापत्रक बनवून बघा.

मुले ज्या इयत्तेत शिकतात त्यानुसार त्यांचा अभ्यासाचा वेळ ठरवा.

मुलांना योग्य वयात योग्य कामाची सवय व्हावी म्हणून त्यांना त्यांच्या वयाला झेपतील अशा, घरातल्या काही जबाबदाऱ्या द्या.

या सगळ्याची मुलांशी मोकळेपणाने चर्चा करून त्यांना तुमच्या या अपेक्षा समजावून सांगितल्या पाहिजेत आणि त्या पूर्ण करायची एक वेळ पण ठेवून द्यायला हवी.

4. मुलांना कामाची सवय लावा

मुलांना हातात सगळ्या गोष्टी आणून दिल्या तर ते आळशी होणारच.

त्यांना जागच्याजागी सगळ्या गोष्टी मिळायची सवय लागणार.

त्यामुळे मुलांना त्यांना करता येतील अशी कामे जर दिली तर त्यांना कामांची सवय लागते आणि कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव सुद्धा होते.

याचा अर्थ असा नाही की मुलांना सतत कामातच ठेवायचे, त्यांच्या अभ्यासाच्या आणि खेळाच्या वेळा सांभाळून त्यांना आपल्या रोजच्या कामात मदतीची सवय ठेवली पाहिजे.

त्यांनी केलेले काम कितीही किरकोळ असले तरी त्यांच्यामुळे ते झाले याबद्दल त्यांचे कौतुक सुद्धा केले पाहिजे.

5. मुलांना बाहेर, मोकळ्या हवेत खेळायची सवय लावा

सतत घरात बसल्याने कंटाळा येतो. काम करायला, अभ्यास करायला उत्साह वाटत नाही आणि यामुळेच मुलं आळशी होतात.

मुलांमध्ये तर प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते, ती बाहेर पडणे गरजेचे असते.

मोबाईल गेम्स आणि व्हिडीओ गेम्स खेळून ती बाहेर पडत नाही उलट त्यामुळे मुलांना अजूनच कंटाळा येतो.

म्हणूनच मुलांना बाहेर मोकळ्या हवेत खेळायची सवय लावली पाहिजे.

बाहेर धावायचे खेळ खेळल्याने त्यांचा व्यायाम सुद्धा होतो. यामुळे त्यांचा उत्साह वाढतो आणि आळशीपणा नाहीसा होतो.

6. मुलांना सतत टोचून बोलू नका

एखादवेळेस मुलांना कमी मार्क मिळाले किंवा त्यांच्याकडून एखादे काम नीट झाले नाही.

अनेक प्रयत्न करून सुद्धा त्यांना एखादी गोष्ट नीट जमत नसेल तर त्याबद्दल त्यांना टोचून बोलून, त्यांना दोष देण्यात काहीच हशील होत नाही.

यामुळे मुलांना न्यूनगंड येण्याचीच शक्यता जास्त असते आणि त्यातून त्यांना काहीच न करावेसे वाटू शकते.

अशाने नवीन काही शिकायला किंवा पुन्हा प्रयत्न करायला मुले बिचकतात.

आणि ती आळशी आहेत असा त्यांच्याबद्दल समज होतो.

याऊलट जर पालक मुलांना सतत नवीन गोष्टी करून बघण्यासाठी प्रवृत्त करत राहिले, कमी मार्क मिळाले तरी त्याबद्दल त्यांना एकदाच समज देऊन मार्गदर्शन करत राहिले, त्यांना एखादी गोष्ट जमत नसेल तर ती शिकवण्यासाठी पालक स्वतः प्रयत्न करू लागले तर मुलांना मोटिव्हेटेड वाटते.

पालकांनी त्यांचा मुलांवर विश्वास आहे ही जाणीव मुलांना करून दिली तर मुले सतत उत्साही राहून नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करतात.

7. मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घ्या

मुलांना पालकांनी घरातली कामे तर सांगवीतच, खास करून अशी कामे जे करायचा मुले कंटाळा करतात.

यामुळे त्यांना सगळी कामे करायची सवय लागते आणि प्रत्येक कामामागच्या कष्टांची जाणीव होते.

पण याचबरोबर त्यांना त्यांच्या आवडीची कामे किंवा त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला सुद्धा वेळ दिला पाहिजे.

आपल्या अपेक्षा सतत त्यांच्यावर लादताना आपण त्यांच्या आवडीनिवडी खुंटवत नाही ना याचा विचार आईबाबांनी केला पाहिजे.

मुलांना दिवसातला तासभर त्यांच्या स्वतःसाठी दिला तर त्यांना ते आवडेल आणि त्यामुळे ते इतर कामे करायला किंवा अभ्यास करायला कंटाळा करणार नाहीत.

8. मुलांना त्यांच्या कामाचं बक्षीस द्या

मुलांना सगळ्यात जास्त मोटिव्हेट करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे कौतुक.

त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे सतत कौतुक केले ते त्यांना अजून जास्त कामे करण्यासाठी उत्साह वाटेल.

त्यांना प्रोत्साहन द्यायला, कामाची सवय लागायला त्यांना कायमस्वरूपी एखादे काम दिले आणि त्याबद्दल त्यांना मोबदला दिला तर त्यांना त्यांच्या कष्टाचे चीज होतेय म्हणून कामाचा कंटाळा येणार नाही.

आणि या निमित्ताने त्यांना पैशांची किंमत सुद्धा कळेल.

उदाहरणार्थ, आठवड्याची भाजी आणायचे काम मुलांना सांगून त्यासाठी त्यांना ठरविक रक्कम कबूल करून द्यायची किंवा मुलांना आठवड्यातून एकदा बागेत साफसफाई करायला सांगून त्याबद्दल त्यांना मोबदला द्यायचा.

या मोबदल्यामागे परतफेड नाही तर कौतुकाचा भाव अधोरेखित करायला मात्र विसरू नका.

मुलांना एखाद्या कामाची सवय लावायला ही सगळ्यात चांगली पद्धत आहे.

9. घरात उत्साहाचे वातावरण ठेवा

घरातच नेहमी कंटाळवाणे चेहरे असतील तर मुलांना सुद्धा उत्साह वाटत नाही आणि ती आळशी होत जातात.

म्हणून घरात नेहमी हसते खेळते वातावरण हवे. यासाठी सकाळी लवकर उठणे, काम करताना गाणी ऐकणे, अभ्यास झाल्यावर सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारणे, काही कामे घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून करणे जसे की सुटीच्या दिवशी कपाटे आवरणे, पाहुणे जेवायला येणार असतील तर एकत्र भाज्या निवडणे, चिरणे.

यामुळे घरात खेळीमेळीचे वातावरण राहते आणि सगळ्यांबरोबर आपला उत्साह द्विगुणित होऊन आळशीपणा नाहीसा होतो.

10. मुलांना एकदम मोठी कामे सांगू नका

मुलांना मोठी कामे तुकड्यातुकड्यात सांगितली आणि तशी करून घेतली तर त्यांना सुद्धा ते सोपे वाटते.

एकदम मोठे काम करायला त्यांना कंटाळा येतो, सुरुवात उत्साहात झाली तरी ते काम बऱ्याचदा अर्ध्यावरच सोडून देतात.

त्यामुळे एकच काम त्यांच्याकडून हळूहळू करून घेतले तर ते न कंटाळता, उत्साहाने करतात.

यामुळे आळस दूर होतो आणि कामे सुद्धा हळूहळू का होईना पण होत राहतात.

मुलांचे कपाट आवरायचे असेल तर त्यांना एकदम अख्खे कपाट आवरायला न सांगता एकेक कप्पा रोज आवरायला सांगितला तर ते काम व्यवस्थित करतात.

तसेच त्यांना एकदम दहा गणिते सोडवायला न सांगता रोज दोन गणिते दिली तर त्यांच्या अभ्यासात नियमितपणा येतो आणि कंटाळ्यामुळे आलेला आळशीपणा सुद्धा दूर होतो.

मित्रांनो, मुलांना वाढवणे ही एक कला आहे. प्रत्येक आईबाबांना ती शिकावी लागते आणि ती शिकत असताना आपल्या वाटणीच्या चुका कराव्या लागतात, त्यातून शिकावे लागते.

हे करत असतानाच पालकांना आधार मिळावा म्हणून या काही टिप्स आहेत..

याचा वापर करून पालकांनी स्वतःमध्ये, मुलांच्या वेळापत्रकात आणि अभ्यास पद्धतीत बदल घडवून आणले तर त्यांना मुलांमध्ये फरक नक्की जाणवेल.

तरीही तुमचं मूल जरा वेगळं असू शकतं, त्यामुळे सरसकट सगळ्या मुलांमध्ये एकच फॉर्म्युला लागू होईल असंही नाही…

मुलांचा आळशीपणा घालवून त्यांच्यात उत्स्फूर्तपणे काही करण्याची सवय लावण्यासाठी तुम्ही सुद्धा काही गोष्टी केल्या असतील तर कंमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या मित्र मैत्रिणींना हा लेख शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!