कमी केलेले वजन परत का वाढते याची कारणे

कमी केलेले वजन परत का वाढते

डायट आणि व्यायाम करून कमी केलेले वजन परत का वाढते याची कारणे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

जिभेवर ताबा ठेऊन, व्यायाम करून घाम गाळून कमी केलेले वजन परत काही दिवसांनी पूर्वपदावर येते.

मग परत डायट, व्यायाम करून वजन उतरवायचे आणि काही महिन्यांनी परत पहिले पाढे पंचावन्न….

कित्येकदा तर व्यायाम आणि डायट चालू असताना सुद्धा वजन वाढत असते.

मग व्यायाम वाढवायचा का? डायट अजून कडक करायचे हे कळत नाही!!

या सगळ्यामुळे भयंकर त्रास होतो, नक्की काय करावे समजत नाही….

म्हणूनच आम्ही या लेखातून तुम्हाला अशी काही कारणे सांगणार आहोत ज्यामुळे कमी झालेले वजन पुन्हा वाढू शकते.

कदाचित यापैकी काहीतरी तुमच्याकडून अनावधानाने होत असेल आणि हा लेख वाचून तुम्हाला ते लक्षात येईल आणि ती गोष्ट तुम्ही सुधारू शकाल.

तुम्हाला तुम्ही करत असलेल्या व्यायामाचे छान रिजल्ट्स मिळावेत, तुम्हाला अपेक्षित असलेला वेट लॉस करता यावा म्हणून आज आपण बघूया व्यायाम न करणे आणि जिभेवर ताबा न ठेवणे या व्यतिरिक्त अशी नेमकी कोणती कारणे आहेत जी वजन वाढवण्यासाठी कारणीभूत असतात.

१. व्यायामाचा अतिरेक

होय, तुम्ही बरोबरच वाचले. हे जे व्यायामामुळे वाढलेले वजन असते ते शरीरातील फॅटमुळे असट्स असा गैरसमज बहुतेकदा होतो आणि कदाचित यामुळे निराशा येऊन व्यायाम करण्याचा उत्साह मावळू शकतो.

पण मित्रमैत्रिणींनो, वजन उतरावे म्हणून खूप जास्त व्यायाम केल्याने आपल्या मसलच्या टिश्यूला ठिकठिकाणी टीअर जाऊ शकतो.

यामुळे आपले शरीर ती जखम भरून येण्यासाठी दुप्पट वेगाने मसल पेशींचे उत्पादन करते आणि या दरम्यान शरीरात होणाऱ्या बदलांमुळे वजन तात्पुरते वाढू शकते.

त्यामुळे जर तुम्ही खूप व्यायामाला सुरुवात केली असेल आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे वजन कमी न होता वाढले, तर खचून जाऊ नका कारण हे वाढलेले वजन तात्पुरतेच असते.

म्हणून व्यायाम सुरु ठेवा.

२. डायटिंग करून सोडून देणे

डायटिंगमुळे खरेतर वजन कमी व्हायला हवे, आणि तसे ते होते असा सगळ्यांचा अनुभव सुद्धा असतो.

साखर बंद, भात, बटाटा, तेलकट, तुपकट, मैदा… असे काय काय बंद करून आपण सुरुवातीला झपाट्याने वजन उतरवतो, पण हे आपल्या आहारात आपण केलेले बदल कायमस्वरूपी टिकवून ठेवणे अवघड असते.

आपल्या आवडीनिवडी कधीतरी आपले तोंड वरती काढतातच आणि मग आपण सोडून दिलेले पदार्थ एरवीपेक्षा जास्त खायला लागतो.

याचाच परिणाम म्हणजे आपले कमी झालेले वजन परत दुपटीने वाढते.

यासाठी जे आपल्याला आयुष्यभर पाळायला जमणार नाही असे डायट शक्यतो करायचे नाही.

डायट करण्यापेक्षा ‘हेल्दी इटिंग’ हा एक चांगला पर्याय आहे.

यामध्ये कोणतेही कडक डायट करून मन मारण्यापेक्षा आपल्या आहारात सकारात्मक बदल केले जातात, जसे की साखरेचे प्रमाण कमी करायचे, बाहेरचे फास्ट फूड आणि प्रोसेसज्ड फूड कमी करायचे.

आणि फळे, भाज्या, कडधान्य याचे प्रमाण वाढवायचे.

आपल्या आवडीच्या पदार्थांवर पूर्णपणे काट मारणे हे शक्य नसते.

आपण तसे करायला गेलो तर काही महिन्याने आपला धीर गळून जातो आणि मग डायट, परत वजनवाढ, परत डायट अशी एक सायकल तयार होते. हे टाळण्यासाठी डायटपेक्षा हेल्दी इटिंगचा पर्याय चांगला आहे.

३. आहारातील प्रोटीन आणि फायबरची कमरता

आपल्या आहारात कार्बोहायड्रेटचे आणि फॅटचे प्रमाण जास्त आणि प्रोटीन आणि फायबरचे त्या मानाने कमी असते.

हे बरोबर उलटे असायला हवे.

फायबरमुळे आपली पचनशक्ती सुधारते.

फायबरचे प्रमाण आहारात जास्त असेल तर आपल्याला पोट भरल्याची भावना लगेच येते आणि ती दीर्घकाळासाठी राहते.

यामुळे सारखी भूक लागून जास्तीच्या कॅलरीज पोटात जात नाहीत. ताज्या भाज्या, फळं यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते.

प्रोटीन हे आपल्या मसल्सच्या आरोग्यासाठी चांगले असते. मसल्सचे वजन वाढवणे आणि फॅटमुळे वाढलेले वजन कमी करणे हे महत्वाचे असते.

आहारात जर प्रोटीनचे प्रमाण कमी असेल तर नेमके उलटे होऊन मसल कमी होऊन फॅट वाढते.

दूध, मोड आलेली कडधान्ये, अंडी, चिकन यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात.

४. तुमचे मित्रमैत्रिणी

मित्रमैत्रिणी, आयुष्यात हव्यातच याबद्दल दुमत नाही पण मग मित्रमैत्रिणी हे वजन वाढण्यासाठी कसे कारणीभूत असू शकतील असा प्रश्न पडतो ना?

उत्तर थोडे मजेशीर आहे.. आपले जेवढे मित्रमैत्रिणी जास्त तेवढे आपले त्यांच्याबरोबर बाहेर जाणे जास्त होते.

बाहेर गेल्यावर मित्रांच्या आग्रहाखातर एक कोल्ड्रिंक, वेफर्स, वडापाव अशा खाण्यामुळे अनावश्यक कॅलरीज पोटात जातात.

मित्रमैत्रीणींबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर बाहेर जाणे चांगलेच आणि याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण मित्रांना टाळायचे..

फक्त बाहेर गेल्यावर आपण काय खातोय, किती खातोय याचे भान ठेवले पाहिजे आणि आपल्या नकळत आपल्या पोटावर होणार हा कॅलरीचा मारा टाळला पाहिजे.

५. अनावश्यक खरेदी

आपण दुकानात यादी न करता गेलो की बऱ्याचदा दिसेल ते घेत राहतो.

यामध्ये गरज नसताना बिस्किटे, चिवडा, फरसाण या सारखे पदार्थ सुद्धा आपण घेतो.

बऱ्याचदा असेही होते की आपल्याला भूक लागलेली असताना जर खरेदी करायला गेलो तर जास्तीची खरेदी करतो. म्हणून खरेदीला जाताना काय हवे आहे याची यादी केली तर आपल्याला हव्या असलेल्याच गोष्टी आपण घेऊन दुकानाबाहेर पडतो आणि इतर नको असलेल्या पदार्थांकडे आपले लक्ष जात नाही.

६. कोल्ड ड्रिंक, फ्रुट ज्युस

खास करून उन्हाळ्यात आपण कोल्डड्रिंक आणि फ्रुट ज्युस जास्त प्रमाणात घेतो.

यात होते असे की आपण कॅलरी मोजताना फक्त जेवणातल्या मोजतो पण कोल्डड्रिंकमध्ये साखर प्रचंड प्रमाणात असते, तसेच विकतच्या ज्युसमध्ये पण साखर सहसा असतेच.

आपण दिवसभरात दोन ग्लास ज्युस किंवा कोल्डड्रिंक जरी प्यायले तर भरपूर कॅलरी आपल्या पोटात जातात.

आणि आपण त्या मोजायला सुद्धा विसरतो आणि वजन झपाट्याने वाढत जाते.

७. कामामुळे होणारी दमणूक

व्यायामामुळे दमणे वेगळे आणि दिवसभर काम करून, धावपळ करून दमणे वेगळे.

दिवसभरात कामानिमित्त जरी आपले चालणे, उभे राहणे होत असले तरी तो काही व्यायाम नाही.

उलट अशा दमण्यामुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही. हे वजन वाढीचे एक महत्वाचे कारण आहे.

८. अपुरी झोप

रात्रभराची सलग सात तास झोप न मिळणे हे सुद्धा वजन वाढायला कारणीभूत असते.

झोप अपूर्ण राहिली तर आपल्या शरीरातील ग्रेलीन नावाचे हॉर्मोन वाढते.

या हॉर्मोनचा संबंध आपल्याला भूक लागण्याशी असतो. त्यामुळे झोप अपूर्ण असेल तर भूक जास्त लागते आणि वजन वाढते.

तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर आहारात बदल आणि व्यायाम हे महत्वाचे आहेतच पण कमी झालेले वजन पुन्हा वाढू नये यासाठी या टिप्स सुद्धा तुमच्यासाठी नक्की फायद्याच्या ठरतील.

वजन कमी करायची इच्छा असणाऱ्या आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर या टिप्स नक्की शेअर करा.

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा.

वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.