केळीच्या पिठाबद्दल नाविन्यपूर्ण माहिती या लेखात वाचा!

केळीच्या पिठाबद्दल माहिती

आरोग्याच्या दृष्टीने आजकाल आपल्या सगळ्यांचाच आपल्या खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी बदलण्याकडे कल असतो.

ज्यांना आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये ‘हेल्दी’ बदल करायचे आहेत, अगदी रोजच्या जेवणात सुद्धा ज्यांना कमीतकमी कॅलरी घेऊन ऊर्जावर्धक आहार घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी स्वयंपाकात मैद्याच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या ऐवजी कच्च्या केळ्यांचे पीठ वापरणे हा एक चांगला बदल असू शकतो.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हा बदल सहज शक्य आहे, अगदी केक सुद्धा हे केळीचे पीठ वापरून करता येतो.

मित्रांनो, आज आपण वेगळीच माहिती मिळवणार आहोत.

हे केळीचे पीठ नेमके कसे करायचे, त्यापासून काय काय पदार्थ करता येतात आणि मुख्य म्हणजे आपल्या आहाराचा महत्वाचा भाग व्हायला या केळीच्या पिठाचे फायदे कोणते आहेत, हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून ‘हेल्दी चॉईस’ करणे तुम्हाला सोपे जाईल.

दिवसेंदिवस जेवणातला एक हेल्दी बदल म्हणून लोकप्रिय होत चाललेले हे केळीचे पीठ नेमके करतात कसे?

कच्ची केळी सोलून, त्याचे काप करून, ते कडकडीत वाळवून आणि मग दळून हे पीठ तयार केले जाते.

ज्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

केळीचे पीठ हे खरोखर एक हेल्दी पर्याय कसा आहे?

१. मधुमेहींसाठी वरदान

स्वयंपाकात केळीचे पीठ वापरल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते, कारण हे केळीचे पीठ कच्च्या केळ्यांपासून बनवलेले असते आणि कच्च्या केळ्यात साखरेचे प्रमाण पिकलेल्या केळ्यापेक्षा कमी असते.

कणिक किंवा मैद्याच्या तुलनेत कच्च्या केळीचे हे पीठ पचायला लागणारा वेळ हा जास्त असतो.

यामुळे ज्याला आपण ग्लुको. स्पाईक म्हणतो ते, म्हणजे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही.

कच्च्या केळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या स्टार्चमुळे हा पचनासाठी लागणारा वेळ वाढतो.

२. पचनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त

केळीच्या पिठात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते.

फायबरमुळे पचनक्रिया सुधारते व कॉन्स्टिपेशन सारख्या अपचनाच्या तक्रारी सुद्धा नाहीशा होतात.

फायबरयुक्त आहार हा वजन कमी करण्याची इच्छा असलेल्यांना अतिशय उपयुक्त आहे.

कारण फायबरमुळे पोट लवकर भरते आणि ते जास्त वेळासाठी भरलेले राहते.

यामुळे दोन जेवणाच्या मध्ये भूक लागत नाही आणि त्यामुळे खाणे एकंदरीत कमी होते.

फायबरचे प्रमाण आहारात जास्त असल्यास अजून एक होणार महत्वाचा फायदा म्हणजे, फायबर आपल्या आतड्यातल्या गुड बॅक्टरीयाच्या (जसे की लॅक्टोबॅसिलस) वाढीसाठी फायदेशीर असतो.

हे बॅक्टरीया आपल्या पचनक्रियेसाठी फायदेशीर असतात.

आपल्या आहारातल्या बदलांनी पचनक्रियेत सुधारणा घडवून आणणे ही वजन कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची पायरी असते.

३. प्रमाण कमी तरी फायदे जास्त

कच्च्या केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतात.

यामुळे स्वयंपाकात इतर पिठाच्या ऐवजी हे पीठ वापरताना त्याचे प्रमाण इतर पिठाच्या तुलनेत कमी घ्यावे लागते.

म्हणजेच एखाद्या रेसिपीसाठी जर १ कप मैदा लागणार असेल, तर त्या जागी साधारण पाऊण कप केळीचे पीठ पुरेसे होते.

कमी प्रमाणात वापर करून सुद्धा या पिठाचे फायदे इतर कोणत्याही पीठापेक्षा जास्त आहेत..

म्हणूनच हे मॅजिक पीठ अत्यंत लाभदायक आहे.

४. वजन घटवण्यास फायदेशीर

कणिक किंवा मैद्याशी जर तुलना केली तर कच्च्या केळीच्या पीठात खूप कमी कॅलरीज असतात.

शिवाय फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट भरल्याची भावना लवकर निर्माण होते.

या दोन्ही गोष्टींचा एकत्रित फायदा होऊन वजन कमी होते.

म्हणूनच ज्यांना आपल्या आहारात काही बदल करून, वजन उतरवायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

अगदी बिस्कीट किंवा केक सुद्धा केळीचे पीठ वापरून करता येतो. ही डायटिंग करणाऱ्या लोकांसाठी गुड न्यूजच आहे.

५. चवीवर फारसा परिणाम होत नाही

लेखाच्या सुरुवातीला जेव्हा केकमध्ये सुद्धा मैद्याऐवजी कच्च्या केळीचे पीठ वापरता येते हे वाचले तेव्हा अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आले असेल?

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना कधी कधी काही चांगल्या चवींचा त्याग करण्यावाचून पर्याय नसतो.

पण केळीचे पीठ वापरत असाल तर त्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही.

केळीच्या पीठाने पदार्थाच्या चवीवर फारसा परिणाम होत नाही.

कोणत्याही पदार्थात अगदी बिनधास्त या पिठाचा वापर केला जाऊ शकतो.

यामुळे फक्त वजन कमी करण्यांसाठीच नव्हे तर ज्यांना आयुष्यात आरोग्यपूर्ण बदल करायचे आहेत त्यांच्यासाठी पण हा चांगला पर्याय आहे.

६. अत्यंत पौष्टिक

कच्च्या केळीचे पीठ अनेक महत्वपूर्ण खनिजे आणि व्हिटॅमिन्सने परिपूर्ण असते.

झिंक, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजे कच्या केळीच्या पिठात जास्त प्रमाणात आढळतात.

झिंकमुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते.

पोटॅशिअम हे बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

कच्च्या केळीच्या पिठात व्हिटॅमिन ‘ई’ जास्त प्रमाणात आढळतात.

व्हिटॅमिन ‘ई’ आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.

व्हिटॅमिन ‘ई’ आपल्या शरीरातील मसल्स साठी सुद्धा फायदेशीर असते.

थोडक्यात, केळीचे पीठ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

७. ग्लूटेन फ्री

कणिक आणि मैदा भिजवून पिठ मळताना जो चिकट पदार्थ तयार होतो त्याला ग्लूटेन म्हणतात.

ग्लूटेनची काही लोकांना ऍलर्जी असते. ग्लूटेन युक्त आहाराने या लोकांना अपचन, जुलाब यासारखे त्रास होऊ शकतात.

कणिक आणि मैद्याचा वापर सगळ्याच पदार्थांमध्ये कमीजास्त प्रमाणात होत असल्यामुळे ही ऍलर्जी असलेल्यांना खाण्याबाबत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यांच्या या समस्यांवर सोपा तोडगा म्हणजे कणिक, मैद्यावर काट मारून त्याजागी कच्च्या केळीचे पीठ, जे की ग्लूटेन फ्री आहे ते वापरणे.

कच्च्या केळीचे पीठ वापरून पास्ता, ब्रेड किंवा केक यासारखे पदार्थ तर करता येतातच पण त्याचबरोबर आपल्या भारतीय स्वयंपाकात सुद्धा हे कच्च्या केळीचे पीठ अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते.

कच्च्या केळीच्या पिठाचे थालीपीठ करता येते, इडली किंवा ढोकळ्यामधे सुद्धा वापरता येते..

आणि हो हे पीठ उपवासाला सुद्धा चालेल!!

आम्हाला माहितीये तुमच्याकडे पण अशा काही रेसिपीच्या कल्पना असतीलच..

त्या कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा कच्च्या केळीच्या पिठाचे महत्व सांगणारा लेख जास्तीत जास्त शेयर करा.

ऍमेझॉन वरून केळीचे पीठ खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.