एकाकीपणात स्वतःला रमवण्यासाठी या गोष्टी करून बघा!!

एकटं वाटत असल्यास काय करावे

एकाकीपणाच्या भावनेने आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांनाच कधीनाकधीतरी घेरले असेलच.

एकाकीपणा हा काही फक्त एकटे असताना येत नाही.

एकाकीपणा ही आपल्या मनाची एक अशी भयंकर स्थिती आहे जी अगदी लोकांच्या घोळक्यात सुद्धा आपल्याला घेरू शकते.

मनात कसलीतरी अस्वस्थता, कशाबद्दल किंवा कोणाबद्दल तरी काळजी, आयुष्यात कसलीतरी पोकळी अशा अनेक कारणाने आपल्याला एकाकी वाटू शकते..

अगदी आजूबाजूला चार लोक असतील तरीही.

आजकाल तर कामाचा स्ट्रेस, कामाचे वाढलेले तास आणि त्रास, घरच्यांपासून लांब असणे, नात्यात सारखे चढउतार येणे हे अगदी सर्रास चालते.

अशावेळेस अनेक लोक या एकाकीपणाचे बळी होत आहेत.

कधीकधी सगळ्यांपासून दूर जाऊन, स्वतःला वेळ देणे चांगलेच असते आणि तसे करावे सुद्धा पण ते निरोगी मनस्वास्थ्य जपण्यासाठी..

पण याऊलट बळजबरीने आलेला, काहीवेळा ओढवून घेतलेला एकाकीपणा नकोनकोसा असतो.

मित्रांनो, याच नको असलेल्या एकाकीपणामुळे बरेचदा नैराश्य येते.

याच एकाकीपणाला धीराने तोंड देता यावे, एकाकीपणात होणार त्रास कमीतकमी व्हावा यासाठी आपले मन रमवणे फार महत्वाचे असते.

काही गोष्टी कळतात पण वळत नाहीत, ही त्यातलीच एक आहे.

या लेखातून आज आम्ही अशाच काही कल्पना तुम्हाला देणार आहोत..

एकाकीपणामुळे निराशा येऊ न देता आपले मन रमवून आनंदी राहण्यासाठी या काही गोष्टी बघण्याअगोदर आपण आधी एका प्रश्नाचे उत्तर शोधूया.

तुम्हाला एकाकी नक्की कशाने वाटते?

कोणतेही उपाय करण्याआधी समस्या काय आहे हे जाणून घेणे सगळ्यात महत्वाचे आहे.

तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे मन लागत नाही का? तिकडे तुमचे चांगले मित्रमैत्रिणी होत नाहीयेत का?

घरी आल्यावर संध्याकाळचा वेळ तुम्हाला एकटेपणाची जाणीव करून देतो का?

की सुट्टीचा दिवस खायला उठतो?

अशी नेमकी कोणती वेळ किंवा घटना आहे ज्यामुळे तुम्हाला एकाकी वाटते ती शोधून काढली तर त्यावर उपाय शोधणे सोपे जाईल.

तुमच्या एकाकी वाटण्याच्या वेळेत तुम्ही काय करू शकता हे मग तुम्हाला ठरवता येईल.

१. वाचन करा

मन हलके होईल असे वाचन केले तर एकाकीपणाशी सामना करणे सोपे जाते.

एखादे हलके पुस्तक- कथासंग्रह, किंवा एखादी कादंबरी वाचली तर मन चांगले रमते.

अशावेळी जड पुस्तके किंवा विचार करायला भाग पाडणारे विषय सहसा वाचू नयेत.

वाचन हा एकाकीपणात मन रमवण्यासाठी फार चांगला पर्याय आहे.

२. छान अंघोळ करा

वाचून विचित्र वाटले तरी हा उपाय एकदम फायदेशीर आहे.

अंघोळ करताना आपल्याला बऱ्याचदा नवीन कल्पना सुचत असतात, वेगवेगळे विचार डोक्यात येत असतात.

यामुळे जर एकाकीपणात एखादा विषय आपल्याला त्रास देत असेल, एखादा नकारात्मक विचार मनातून जात नसेल तर तो विसरून लक्ष दुसरीकडे लागावे यासाठी अंघोळ हा त्यावर सोपा उपाय आहे.

अंघोळ करताना तुम्हाला आवडेल त्या वासाचा साबण, पाण्यात टाकायचे सुगंधी द्रव्य याचा वापर केलात तर तुम्हाला तुमचा मूड चांगला झाल्याचे लगेच जाणवेल.

३. बाहेर चालायला जा

मोकळ्या हवेचा, हिरव्यागार निसर्गाचा आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतो.

व्यायामाने शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात. म्हणून एकाकीपणात वेळ घालवायचा असेल, कंटाळा घालवून आपला मूड चांगला होऊन हवा असेल तर घरातून बाहेर पडा.

घरातून बाहेर पडणे हेच सगळ्यात अवघड आहे पण एकदा का हा कंटाळा घालवून तुम्ही बाहेर गेलात की तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल.

४. YouTube वर मजेशीर व्हिडीओ बघा

असे कित्येक व्हिडीओ आहेत ज्यामुळे आपल्याला हसू येते, आपले नैराश्य दूर होते.

आपल्या हातात फोन सतत असतोच, कधीकधी एकटे असताना सोशल मीडियावर इतरांच्या पोस्ट वाचून, फोटो बघून आपल्याला अजूनच एकाकी वाटण्याची शक्यता असते.

यापेक्षा जर फोन बघण्याची आपली वेळ आपण असे मजेशीर व्हिडीओ बघण्यात घालवली तर आपला वेळ पण चांगला जाईल आणि मूड सुद्धा चांगला होईल.

५. एकटेच कॉफी प्यायला जा

आजकाल असे बरेच कॅफे, कॉफी शॉप्स आहेत जिथे बसायला छान जागा असते, गाणी लावलेली असतात, छान सजावट केलेली असते.

अशा कॉफी शॉप्समध्ये अनेक जण एकेकटी बसलेली सुद्धा दिसतात.

कधीकधी घरात आपल्याला एकटेपणा खायला उठतो.

अशावेळी अनोळखी असतील तरी लोकांची सोबत बरी वाटते.

म्हणूनच अनेक जण असे कॉफी शॉपमध्ये बसून काम करतात किंवा पुस्तक वाचत बसतात.

घरापेक्षा वेगळे वातावरण, छान कॉफी, सोबत काहीतरी खायला या सगळ्यामुळे आपल्याला सुद्धा बदल जाणवतो आणि आपले मन चांगले रमते.

६. आवरा-आवरी करा

मन रमवण्यासाठी हा एक चांगला उपाय असेल. तुम्हाला पसारा घालायची सवय असेल तर एखाद्या एकाकी, कंटाळवाण्या संध्याकाळी छान तुमच्या आवडीची गाणी ऐकत घर आवरायला घ्या.

तुमचे घर आवरलेलेच असेल तरीही तुम्ही एखादे कपाट किंवा स्वयंपाकघरातला एखादा खण किंवा अगदी फ्रिज सुद्धा आवरायला घेऊ शकता.

मनातल्या विचारांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. आवरलेल्या घरात वावरायला, घासून स्वच्छ केलेल्या ओट्यावर स्वयंपाक करायला तुम्हाला जास्त छान वाटेल, उत्साह वाटेल हा अजून एक फायदा.

७. जुने फोटो बघा

एकाकी वाटले, एकटेपणा जाणवला की आपण जास्त काळ झोपूनच, मोबाईल बघत काढतो यामुळे उत्साह अजून कमी होतो.

म्हणूनच बाहेर एखाद्या कॉफी शॉपमध्ये जायचा उपाय वर आपण बघितला.

पण जर काही कारणाने बाहेर जाणे जमणार नसेल तर घरीच स्वतःसाठी छान कॉफी करून, जुने अल्बम घेऊन बसलो तर वेळ चांगला जाईल आणि एकाकी सुद्धा वाटणार नाही.

८. नवीन काहीतरी शिका

अशी एखादी वेळ आहे का जेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त एकाकी वाटते?

असे असेल तर त्या वेळेत करण्यासारखी एखादी गोष्ट शोधा.

चित्रकला, हस्तकला, एखादा नाचाचा प्रकार, फोटोग्राफी..

अनेक गोष्टी ज्या शिकायच्या राहून गेल्या असतील.

ऑनलाईन व्हिडीओ बघून किंवा एखादा क्लास लावून या गोष्टी सहज शिकता येतील.

एकाकी वाटण्याच्या या वैशिष्ट्य वेळेत स्वतःला गुंतवून घेणे हा अत्यंत सोपा आणि खात्रीशीर उपाय आहे.

९. सुट्टी घ्या

काहींना रुटीनने दमून जायला होते. रोज त्याच गोष्टी करून कंटाळा येतो आणि रिकाम्या वेळेत मग एकटेपणा जाणवतो.

शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून लांब राहणाऱ्या लोकांना या प्रकारचा एकटेपणा खूप त्रास देतो..

अशावेळेस सरळ सुट्टी घेऊन घरी जाणे किंवा घरच्यांना घेऊन कुठेतरी लांब फिरायला जाणे हा खूप चांगला उपाय आहे.

१०. कलाकुसर करा

तुम्हाला कलाकुसर जमत असो वा नसो, हा उपाय मन रमवण्यासाठी सगळ्यात चांगला आहे.

तुम्हाला येते तसे, जमेल तसे करत काहीतरी नवीन करा..

एखादे वॉल हँगिंग, चित्र, जुन्या गोष्टींपासून नवीन काहीतरी शोभेची वस्तू. कोणाचीही भीड न बाळगता या गोष्टींसाठी वेळ काढा.

यावरच मार्गदर्शन करणारे अनेक व्हिडीओ आहेत त्याची मदत तुम्ही घेऊ शकता.

११. मित्रांशी संपर्कात राहा

मित्रांशी बोलणे, मनातल्या गोष्टी त्यांना सांगणे, त्यांच्या काही गोष्टी ऐकून घेणे हे एक हेल्दी लाईफस्टाईलचे फार मोठे आणि महत्वाचे लक्षण आहे.

मित्रांशी बोलून मन हलके होते, एकाकीपणा, नैराश्य यासारख्या भावना दूर होतात.

मित्राने आपल्याला फोन करायची वाट न बघता आपणच मित्रांना फोन करून त्यांच्याशी मोकळा संवाद केला पाहिजे..

१२. इतरांना मदत करा

कधीकधी आपला प्रॉब्लेम किती लहान आहे हे कळण्यासाठी आपल्याला इतरांचे प्रॉब्लेम्स समजून घ्यायची गरज असते.

म्हणून आपल्या एकाकीपणावर उपाय म्हणून आपण एखाद्या संस्थेला मदत करू शकतो.

ही मदत आर्थिक न करता आपण स्वतः जाऊन केली पाहिजे..

त्यामुळे आपला वेळ सत्कारणी लागेल आणि एकटेपणा सुद्धा जाणवणार नाही.

एखादे वृद्धाश्रमाशी किंवा अनाथाश्रमाशी जोडून घेऊन आठवड्यातून एकदा आपण तिथे जाऊन मदत करू शकतो.

इतरही काही एनजीओला त्यांच्या विविध उपक्रमात मदत करू शकतो. यामुळे काही माणसे सुद्धा जोडली जातील.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो.. रिकाम्या वेळेत एकाकीपणाची भावना सगळ्यांच्याच मनात घर करते.

अशा वेळेस आपण त्यावर मात कशी करतो हे महत्वाचे असते. म्हणूनच रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठी हे काही सोपे उपाय आहेत ज्यामुळे एकटेपणा जाणवणार नाही.

हे उपाय तुम्ही तर करून बघाच पण त्याचबरोबर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सुद्धा हे शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.