जेवणानंतरची आवराआवर सोपी करण्याच्या १० टिप्स

जेवणानंतरची आवराआवर सोपी करण्याच्या १० टिप्स

मनाचेTalks या आधी एक लेख आहे, ज्यात सांगितल्या आहेत जेवण बनवणं इंटरेस्टिंग बनवणाऱ्या 4 टिप्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पण त्यात बरेच कंमेंट्स असे होते की जेवण बनवण्याचा कंटाळा येत नाही, पण त्यानंतरच्या आवरा आवरीचा कंटाळा येतो. त्यासाठी आजचा हा लेख.

खासकरून पाहुणे येणार असतील तर केवळ याच कारणासाठी आपण पटकन बाहेरून काहीतरी ऑर्डर करायचा निर्णय घेतो.

खरेतर जास्तीचे पदार्थ करायचा आपल्याला कंटाळा अजिबात आलेला नसतो, पण ते करताना लागणारी जास्तीची भांडी, इतर पसारा आणि नंतरची साफसफाई यामुळे कंटाळा येऊ शकतो.

ज्यांचे कुटुंब मोठे आहे त्यांना तर या कामातून सुटकाच नसते.

रात्री कितीही उशीर झाला तरी सगळी झाकपाक, आवराआवरी करणे गरजेचेच असते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत सगळा स्वयंपाक करायचाच असतो.

थोडक्यात काय या आवराआवरीतून कोणीच सुटलेले नसते.

पण मैत्रिणींनो, एक गोष्ट तुम्हाला सुद्धा पटेल की कंटाळून, वैतागून काम करण्यात काहीच फायदा नसतो.

त्याचा उलटा त्रास आपल्यालाच होतो.

पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की स्वयंपाक करून झाल्यावर करावी लागणारी आवराआवरी कमीतकमी करायचे काही सोपे मार्ग आहेत तर तुम्हाला आनंद होईल ना?

या लेखात आम्ही हेच सांगणार आहोत. अशा काही सोप्या सवयी आहेत ज्या आपण आपल्याला सहज लावून घेऊ शकतो.

या सवयी लावून घेतल्याने आपल्याला जेवणानंतरची आवराआवरी करण्याचा कंटाळा येणार नाही, कारण ते काम एकदमच सोपे होऊन जाणार आहे.

या सवयींमुळे जेवण करतानाच काही गोष्टी केल्या, काही नियम पाळले तर त्याचा कमीतकमी पसारा होतो आणि त्यामुळे नंतर करावे लागणारे कष्ट आपोआप कमी होतात.

स्वयंपाक करता करता स्वयंपाकघर कसे आवरायचे याबद्दल काही महत्वाच्या टिप्स आपण आता जाणून घेऊ.

१. स्वयंपाकाला सुरुवात करतानाच सगळे साफ करा

समजा जर स्वयंपाकाला सुरुवात करतानाच सिंकमध्ये भांडी घासण्यासाठी पडलेली असतील किंवा घासलेली भांडी तशीच न लावता किचन ओट्यावर वाळत ठेवलेली असतील, काही खरकटे इकडे तिकडे सांडले असेल तर साहजिकच आपण स्वयंपाक करताना या पसाऱ्यात वाढच होणार असते.

मग नंतर हा दुप्पट पसारा आवरणे आपल्या अगदी जीवावर येते आणि अशाप्रकारे मग पसारा नुसता साठत जातो आणि ती सगळी आवराआवरी करायला आपल्याला एके दिवशी जास्तीचा वेळ खर्च करावा लागतो.

ही साखळी तोडण्याकरता स्वयंपाकाला लागण्याआधीच जर सगळे स्वयंपाकघर आवरून घेतले तर जेवणानंतर साफ करायला फार कमी गोष्टी उरतील.

यामुळे जेवणानंतर साफ करायचा आपण कंटाळा करणार नाही आणि पुढच्या स्वयंपाकाच्या आधी ओटा परत स्वच्छ असेल.

२. ओट्यावर कचरा टाकायला भांडे ठेवा

स्वयंपाक करायची सुरुवात सहसा भाज्या चिरण्यापासून होते.

त्या चिरताना भाज्यांची साले, देठे, बिया, भाज्यांचा नको असलेला भाग तसाच ओट्यावर काढला जातो.

याने आपले काम दुप्पट होते.

जेवण करून झाल्यावर मग तो भाज्यांचा कचरा उचलावा लागतो, याचा कंटाळा येऊ शकतो.

कधीकधी तो तसाच राहिला तर तो तसाच ओट्याला चिकटून बसतो आणि मग ओटा धुताना अजून एक काम वाढते.

यापेक्षा जर भाज्यांची चिराचिरी सुरु असतानाच तिथे एखादे भांडे ठेवले आणि भाज्यांचा कचरा ओट्यावर न ठेवता थेट त्या भांड्यातच ठेवला तर नंतरचे एक काम वाचते.

यामुळे ओटा पुसायला पण सोपे जाते आणि कचरा साठवलेले भांडे डस्टबीनमध्ये रिकामे केले की काम होते.

३. सगळी तयारी व्यवस्थित करा

आता जेवणाची किंवा स्वयंपाकाची तयारी आणि नंतर करावी लागणारी साफसफाई याचा काय संबंध?

हा प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे. पण याचा अगदी जवळचा संबंध आहे बरं का..

कसा ते बघा.

जर स्वयंपाकाची पूर्वतयारी नीट करून ठेवली नाही तर, आयत्या वेळेला फोडणी टाकल्यावर काहीतरी आठवून ती गोष्ट शोधण्यात आपला गोंधळ उडू शकतो.

यामुळे फोडणी जळणे, किंवा गडबडीत काहीतरी सांडणे, फुटणे यासारखे अपघात होऊ शकतात.

असे झाल्याने नंतरच्या साफसफाईमध्ये विनाकारण भर पडते आणि जिथे एरवीची कामे करताना कंटाळा येतो तिथे जास्तीचे काम विनाकारण पडते.

म्हणून जेवण तयार करायच्या आधीच किचन ओट्यावर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी नीट काढून ठेवल्या, सगळ्या भाज्या आधीच चिरून घेतल्या तर आयत्या वेळी गडबड होत नाही.

४. पोळी, भाकरी करताना खाली पेपर घाला

स्वयंपाकात सांडलवंड होण्याचे हमखास कारण म्हणजे पोळी किंवा भाकरी करताना उडणारे पीठ.

यामुळे नंतर ओटा पुसून घेऊन, साफ करायला जास्त वेळ लागतो.

म्हणून जर पोळी किंवा भाकरी करताना पोळपाटाखाली पेपर नॅपकिन किंवा जुने वर्तमानपत्र जरी घातले तरी हा नंतरचा त्रास वाचू शकतो.

आहे की नाही सोपं👩‍🍳

५. सांडले की लगेच पुसा

स्वयंपाक म्हटलं की सांडासांडी होणारच.

पण आपण जर काही सांडल्यावर ‘जाऊदे, नंतर बघू.’

असे म्हणत असू तर लक्षात घ्या आपण आपलेच काम वाढवत असतो.

काही डाग वेळच्यावेळी पुसले तर पटकन निघतात अन्यथा ते चिकटून बसण्याची शक्यता जास्त असते.

असे सुकून चिकट झालेले डाग नंतर काढत बसण्यापेक्षा काही जर सांडलेच तर ते ताबडतोब पुसून घेतले तर नंतर आवरायला फार काही उरत नाही आणि नंतरचे मोठे काम कमी होते.

६. भांडी भिजत घालणे

जेवणानंतर भांडी घासायचा कंटाळा येणे साहजिकच आहे.

त्यात जर जेवणात एखादी तेलकट किंवा मसालेदार भाजी असेल तर ते विचारायलाच नको.

या भांडी घासण्यातून काही सुटका नाही पण हे काम हलके नक्कीच होऊ शकते.

स्वयंपाक करतानाच ओट्यावर एका बाजूला एका मोठ्या टबात कोमट पाणी आणि डिशवॉशिन्ग सोप घालून ठेवला आणि खरकटी भांडी एकेक करून त्यात भिजत ठेवली तर नंतर ती पटकन घासून टाकायला सोपे जाते.

७. भांडी हाताबरोबर विसळून ठेवा

भांडी घासायचा कंटाळा येण्याचे मुख्य कारण हेच आहे की आपण भांडी साठवत राहतो.

आपल्याला वाटते की कुठे एकेक भांडे घासत बसा त्यापेक्षा सगळी भांडी एकत्र घासून टाकू.

पण इथेच आपले चुकते. आपण अशी कामे साठवत राहतो आणि नंतर ती हातावेगळी करताना नाकी नऊ येतात.

त्यामुळे स्वयंपाक करताना जी भांडी घासायची गरज नसते, नुसती विसळून काम होणार असते अशी भांडी हाताबरोबर विसळून ठेवली की नंतरचा पसारा कमी होतो.

८. अन्न शिजत असताना आवराआवरी सुरु करा

अन्न शिजत असताना आपल्या हातापाशी भरपूर वेळ असतो.

या वेळात तो पदार्थ करायला जे सामान कपाटातून किंवा फ्रिजमधून काढले असते ते लगेच जागच्याजागी ठेऊन दिले तर आवरायला पसाराच उरत नाही.

९. मसाल्यांचा डब्यात पेपर ठेवा

स्वयंपाकात हमखास सांडलवंड होण्याची शक्यता असलेली दुसरी गोष्ट म्हणजे मसाल्यांचा किंवा मिसळणीचा डबा.

स्वयंपाक करताना हा डबा आपण दहा वेळा तरी उघडतोच आणि कितीही सावकाश काम करायचे म्हटले तरी त्यात काहीतरी सांडतेच.

मग ते सांडलेले काढून डबा घासून, पुसून ठेवण्याचे वाढीव काम मागे लागते.

म्हणून जर मसाल्यांच्या डब्यात खाली एखादा पेपर नॅपकिन घालून ठेवला, तर दर दोन दिवसांनी डबा घासण्यापेक्षा तो पेपर बदलता येतो आणि आपले एक काम वाचते.

१०. सगळी कपाटे आवरलेली ठेवा

सगळ्या वस्तू जागच्याजागी असतील तर स्वयंपाक करताना गडबड गोंधळ उडत नाही.

एखादी गोष्ट आयत्या वेळी जरी लागलीच तर तिची नियोजित जागा जर असेल तर आपल्याला शोधायला त्रास होत नाही.

याऊलट जर कपाटे नीट आवरलेली नसतील, कोणत्या डब्यात काय आहे हे आपल्यालाच माहीत नसेल, तर एक गोष्ट शोधायच्या नादात पुष्कळ डबे उघडले जातात ज्यामुळे पसारा वाढतो.

मैत्रिणींनो, पसारा आवरण्याचा सोपा उपाय म्हणजे पसाराच न होऊ देणे.

या टिप्स नेमक्या याच कारणासाठी आहेत.

या सवयी तुम्ही लावून घेतल्या तर जेवणानंतर करावी लागणारी साफसफाई आणि आवराआवरीचे प्रमाण पटकन कमी होईल.

आधी जर तुम्हाला आवराआवरीसाठी अर्धा तास लागत असेल तर या सवयी नक्की लावून घ्या, याने तुमची आवराआवरी निम्या वेळेतच होईल!

मैत्रिणींनो, घराची साफसफाई करण्यासाठीच्या काही टिप्स सांगणारा लेख लवकरच वाचायला मिळेल. आणि हो मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.