घराची साफसफाई करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा!

घराची साफसफाई करताना वापरण्यासाठी टिप्स

घराची साफसफाई म्हटली की सगळ्यात जास्त टेन्शन असते ते स्वयंपाकघराचे!

वापरून खराब झालेला तवा, काळी पडलेली कढई, चहाचे डाग पडलेले कप सगळे डोळ्यासमोर येतात.

वर्षभर आपण या सगळ्या गोष्टी जरी वेळच्यावेळी धुवून, स्वच्छ करून ठेवल्या तरी रोजच्या वापरामुळे त्यांची रया कितीही नाही म्हटलं तरी जातेच.

पण सण म्हटलं की आपल्याला सगळे नव्यासारखे लख्ख हवे असते.

म्हणून मग आपण या रोजच्या वापरातल्या गोष्टी काढून त्यांना स्वच्छ करून, रोजच्या वापरामुळे आलेला काळपटपणा घालवायचा प्रयत्न करतो.

पण हे करताना वस्तू घासून, रगडून आपण पार दमून गेलो तरी कित्येक वेळेला या आपल्या वस्तू आपल्या मनाप्रमाणे स्वच्छ होत नाहीत.

तुम्हाला सुद्धा हा अनुभव दर वर्षी येत असेलच.

म्हणूनच आज आपण अशा काही सोप्या टिप्स या लेखात बघणार आहोत ज्या वापरून तुमच्या स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू अगदी नव्यासारखी चमकायला लागेल.

या टिप्स नीट वाचून त्याप्रमाणे केल्यास तुमचे स्वयंपाकघर छान चमकायला लागेल आणि ते चमकवताना तुम्ही सुद्धा दमून जाणार नाही.

काही गोष्टी नुसत्या घासून पुसून उपयोग नसतो तर त्यांच्यावर काही खास उपाय करावे लागतात.

चला तर मग आपण बघूया कशाप्रकारे आपण आपल्या स्वयंपाकघरातल्या वेगवेगळ्या गोष्टी विनासायास स्वच्छ करू शकतो.

1: तांब्या पितळेची भांडी चकचकीत कशी करावी

एक अर्धे लिंबू घेऊन ते मिठात बुडवून त्या लिंबाने तांब्याचे किंवा पितळेचे भांडे चांगल्या प्रकारे रगडून घेऊन, नंतर स्क्रबनं घासून घ्यावे. आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले तर तांबे पितळेचे भांडे लखलखीत स्वच्छ होते.

मिठाच्या ठिकाणी बेकिंग सोडा वापरून सुद्धा भांडे स्वच्छ दिसू लागते.

2: काळा पडलेला लोखंडी तवा

वापरून वापरून काळा पडलेला लोखंडी तवा स्वच्छ करण्यासाठी त्यावर आपण वापरत असलेले टॉयलेट क्लिनर सगळीकडे पसरवून पाच मिनिटासाठी ठेवायचे.

त्यानंतर सॅण्ड पेपर घेऊन सगळा तवा घासून काढायचा आणि पाण्याखाली धरून धुवून घ्यायचा.

असे केल्याने लोखंडी तव्याचा काळपटपणा जाऊन तो एकदम नव्यासारखा होतो.

एका वेळेत साफ झाले नाही तर दोनदा हेच करायचे.

सॅण्ड पेपरने घासताना जर गरज वाटली तर वरून अजून टॉयलेट क्लिनर घालू शकतो.

हे करताना दोन गोष्टी मात्र लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे हातात रबर किंवा प्लास्टिकचे मोजे घालायचे आणि दुसरे म्हणजे टॉयलेट क्लिनरने घासून झाल्यावर नेहमीच्या साबणाने साफ करून, भरपूर पाण्याखालून धुवून मगच तवा वापरायला घ्यायचा.

हा उपाय फक्त लोखंडी तव्यावरच करावा, नॉनस्टिकवर करू नये.

3: गंज लागलेले चमचे

बऱ्याचदा अगदी रोजच्या वापरात नसलेल्या चमच्यांना गंज लागतो.

सणासुदीच्या वेळी किंवा पाहुणे येणार असतील की हे चमचे काढावे लागतात पण नेमके ते गंजलेले असतात आणि साध्या साबणाने घासून स्वच्छ होत नाहीत.

अशा गंजेलेल्या चमच्यांना टोमॅटो केचप आणि मीठ पाच मिनिटांसाठी व्यवस्थित चोळून ठेवायचे.

एखादा जुना दात घासायचा ब्रश घेऊन ते चमचे व्यवस्थित घासून घ्यायचे आणि नळाखाली धरून धुवून घ्यायचे.

याने चमच्यांना आलेला काळपटपणा सुद्धा दूर होतो. हाच उपाय तांब्याच्या चमच्यांवर सुद्धा करता येतो.

4: चहा कॉफीचे डाग लागलेले कप

रोजच्या धुण्यात कितीही खबरदारी बाळगली तरी काही कपांना, विशेषतः खालच्या बाजूला चहा किंवा कॉफीचे डाग पडतात जे साध्या साबणाने जात नाहीत.

यावर सोपा उपाय म्हणजे बेकिंग सोडा आणि व्हिनेगर याचे मिश्रण करून घ्यायचे.

जुन्या टूथब्रशने कपाला पडलेल्या डागांवर ते व्यवस्थित चोळून घासून घ्यायचे.

यामुळे कपांवरचे सगळे डाग जाऊन कप अगदी नव्यासारखे चमकायला लागतील.

5: भांड्यांवरचा स्टिकर काढणे

कधीकधी काही भांडी क्वचितच काही कारणाने काढली जातात.

अशा भांड्यांना बऱ्याचदा विकत घेताना असलेला स्टिकर तसाच असतो.

हे स्टिकर काढताना कधीच एकदा झटक्यात निघत नाहीत आणि मग ते अर्धवट निघालेले आणि अर्धवट चिकट स्टिकर ठेवण्यापेक्षा स्टिकर न काढलेच बरे असे आपण म्हणतो.

पण एका मोठ्या पातेल्यात किंवा टबात पाणी घेऊन त्यात आपण वापरत असलेला फेसवॉश टाकून त्यात नवीन भांडी पाच ते दहा मिनिटे भिजवत ठेवल्याने त्यांच्यावरचा स्टिकर अगदी सहजपणे काढता येतो.

6: डाग पडलेला मिक्सर

घाईच्या वेळेत कितीही नाही म्हटलं तरी मिक्सरवर सांडलवंड होतेच.

त्या त्या वेळेला जरी मिक्सर व्यवस्थित पुसून घेतला तरी काही भागांमध्ये सांडलेले पदार्थ अडकून बसतातच.

या शिवाय आपलेच इकडचे तिकडचे हात सारखे मिक्सरला लागून त्यांची बटणे काळी पडायला लागतात.

मिक्सर पाण्याखाली धरून धुता सुद्धा येत नाही.

मग तो साफ कसा करायचा? यावर सोपा उपाय म्हणजे टूथपेस्ट!

टूथपेस्ट टूथब्रशवर घेऊन मिक्सरचे अगदी कोपरे सुद्धा घासता येतात.

असे केल्याने त्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात. घासून झाल्यावर एखाद्या स्वच्छ, कोरड्या कापडाने मिक्सर पुसून घ्यायचा.

मिक्सरची काळी पडलेली वायर सुद्धा अशा प्रकारे साफ करता येते.

7: काळपटलेली किंवा तेलकट कढई

तेलामुळे कढईला हळदीचे वगैरे डाग लागतात किंवा काहीवेळा गॅसवर जास्त वेळ राहिल्याने किंवा सततच्या वापरामुळे ती हळूहळू काळी पडायला लागते.

अशी कढई बसून घासायची म्हटलं तर हात भरून येतील पण एका वेळेत ती कढई स्वच्छ होणार नाही.

पण अशी तेलकट आणि काळी पडलेली कढई जर साफ करायची असेल तर एक सोपा उपाय म्हणजे बेकिंग सोडा आई व्हिनेगर.

कढईत एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि त्याची पेस्ट होईल इतपत व्हिनेगर टाकून अर्ध्या लिंबाने ते कढईला सगळीकडून व्यवस्थित चोळून घ्यायचे.

पाच मिनिटांनी सॅण्ड पेपरचा वापर करून कढई व्यवस्थित घासून घ्यायची.

सॅण्डपेपरने घासून घेताना त्यात फेसवॉश घालायचा.

पाच मिनिटे घासल्यावर नळाखाली धरून कढई धुवून घ्यायची म्हणजे ती एकदम चकचकीत होऊन नव्यासारखी दिसायला लागेल.

8: काळा पडलेला कटिंग बोर्ड

काळ्या कटींग बोर्डला बहुतेक सगळेच वैतागलेले असतात.

कितीही काळजी घेऊन वापरल्यानंतर सुद्धा कटिंग बोर्ड काळा पडतोच.

सततच्या वापराने कटिंग बोर्डवर बारीक चिरा पडतात, ज्यामुळे त्याला काळपटपणा येतो.

हाच काळपटपणा घालवण्यासाठी बेकिंग सोडा त्यावर पसरवायचा आणि अर्ध्या लिंबाने तो रगडून घासायचा आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा.

9: काळे पडलेले गॅसचे बर्नर

गॅसचे बर्नर उष्णतेमुळे काळे पडतात. ते आपल्याकडून सहसा स्वच्छ केले जात नाहीत. पण नव्या सारखे दिसणारे गॅस बर्नर कोणाला आवडणार नाहीत?

या काळ्या पडलेल्या बर्नरचा काळपटपणा घालवून त्यांना एकदम नव्यासारखे लख्ख करायचा एक सोपा उपाय म्हणजे एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात दोन चमचे व्हिनेगर टाकून तीन ते चार तासांसाठी त्यात गॅसचे काळे पडलेले बर्नर बुडवून ठेवायचे.

नंतर ते बाहेर काढून त्यावर बेकिंग सोडा घालून तारेच्या घासणीने त्याच्यावरचा काळपटपणा जाईपर्यंत व्यवस्थित घासून घ्यायचे.

10: ओट्यावरचे डाग

कधीकधी स्वयंपाकघरातल्या ओट्यावर खूप तेलकट डाग पडलेले असतात.

हे डाग साध्या साबणाने आणि पाण्याने काढायला गेलं तर ते जास्तीच चिकट होऊन बसतात.

पण अशा डागांवर जर मीठ पसरवून ठेवले आणि चमच्याच्या चपट्या बाजूने मीठ त्यावर नीट पसरवले तर ते मीठ सगळा तेलकटपणा शोषून घेते आणि मग नुसत्या कोरड्या कापडाने ओटा स्वच्छ करून घेता येतो.

11: चहाचे डाग पडलेले गाळणे

स्टेनलेस स्टीलचे गाळणे सुद्धा चहाच्या डागाने काळे पडू शकते.

साबणाने घासून ते स्वच्छ तर होते पण यामुळे त्याच्यावर पडलेले काळे डाग जात नाहीत.

हे काळे डाग घालवून गाळणे नव्यासारखे करण्याचा सोपा उपाय म्हणजे बेकिंग सोडा आणि व्हिनेगरची पेस्ट.

गाळण्याला आतल्या आणि बाहेरच्या बाजूला ही पेस्ट पाच मिनिटांसाठी चोळून ठेवायची आणि मग ब्रशने व्यवस्थित घासायची.

डाग गेल्यावर गाळणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे.

आहेत ना या सोप्या टिप्स?

घराची साफसफाई करताना या दहा गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

स्वयंपाक घरातील चिवट डाग या उपायांनी नक्की जातील.

तुम्हाला या उपायांचा कसा फायदा होतो ते आम्हाला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका…

आणि हो, कामाला लागण्यापूर्वी या टिप्स तुमच्या मित्रमैत्रिणींना शेयर करा!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.