ऐक सखे! सखीच्या आठवणींचा “अल्बम”!

रविवारचा दिवस अनेकांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येतो. पण खरंच असं होतं का प्रत्यक्षात? उलट आठवडाभराचं काम एकाच दिवशी करावं लागत असल्याने दिवस कसा जातो ते कळतदेखील नाही! या कामाच्या रहाटगाड्यात सुट्टी कशी गेली ते कळतही नाही आणि वळतही नाही. संध्याकाळी थकलेल्या अवस्थेत आपण आठवडाभराचा शीण घालवण्यासाठी आवडीची गाणी ऐकतो. चित्रपट पाहतो किंवा पुस्तक तरी वाचतो. अशाच एका सुट्टीच्या संध्याकाळी मंद आवाजात आवडीची गाणी लावली आणि भुतकाळाचे मोरपीस कधी मानेवरुन गेले ते कळलंदेखील नाही!

पक्षी ज्याप्रमाणे अन्न आणि पाण्याच्या शोधात स्थलांतर करतात त्याचप्रमाणे तेव्हा महाविद्यालयात शिकायला गेल्यानंतर मला जाणवत होतं, वेगवेगळ्या गावांतून आणि शहरांतून शिकायला आलेली मुलं बघून! त्याचकाळात माझ्या एका मित्राने आपली ओळख करुन दिली होती. त्यादिवशी त्याचा वाढदिवस होता. मला तर वाटलंही नव्हतं की, आपली ही छोटीशी ओळख एक दिवस संपूर्ण जीवनच व्यापून टाकेल…… आज मागे वळून पाहताना तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण न् क्षण मंतरलेला होता याची जाणीव होते. खरंच ते मंतरलेले दिवस पुन्हा जगावेसे वाटतात गं थोडं मागे जाऊन.

ज्याप्रमाणे कोळशाच्या खाणीतून आणलेल्या एखाद्या सामन्य दगडाला कसबी कारागिराच्या हातून पैलू पाडल्याशिवाय हिर्‍याचं मूल्य प्राप्त होत नाही, तसंच माझ्या मैत्रिला तुझ्या परिस स्पर्शाशिवाय सोनेरी किनार लाभण अशक्य होतं. तुझ्या साथीनं आणि साक्षीनंच या मैत्रीरुपी रोपट्याचा महावृक्ष झालाय आणि आज त्याला रसाळ फळं आली आहेत. याचं सगळं श्रेय तुझं आणि फक्त तुझच आहे….

एक दिवस तुला सिनेमा बघायचा होता. मी अ‍ॅडव्हान्स बुकींग करुन दुसर्‍या दिवशीची तिकीटं मिळवली होती. थिएटरवर भेटण्याचं आपलं ठरलं होतं. तुझी वाट पाहून चित्रपटाची वेळ निघून गेली, पण तू काही आली नाहीस. शेवटी रागाच्या भरात तुझ्या घरासमोर येऊन तिकीटं फेकून दिली. दुसर्‍या दिवशी कळलं तू आजारी होतीस. तेव्हा खूप वाईट वाटलं.

एकदा आपण पिकनिकला गेलो होतो. वेगळीच दुनिया होती ती! सोबत फोटो काढणे, फिरणे, खाणे-पिणे आणि आपण खरेदी केलेल्या वस्तू आजही आहेत माझ्याकडे! खरचं ती सहल तर आयुष्यात कधीच विसरता येणार नाही. तुला बर्फाचा गोळा आवडतो म्हणून लहान मुलांसारखे कपड्यांना डाग पडेपर्यंत गोळे खात होतो दिवसभर आपण! पण त्याचे परिणामही तुला भोगावे लागलेच शेवटी. सहलीदरम्यानच तू आजारी पडली होतीस. तरीही ती सहल कधी संपूच नये असं मनापासून वाटत होतं.

शेवटच्या वर्षी तर तुला कॉलेजमध्ये मुलं माझं नाव घेऊनच चिडवायची. तेव्हा त्यांना ओरडायचीस खरं, पण मनातून मात्र मोहरुन गेलेली असायचीस. खरंच सांगायचं झालं तर मलाही असंच व्हायचं, जेव्हा मित्र मला तुझं नाव घेऊन चिडवायचे! तुला आठवते, आपल्या निरोप समारंभाच्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम होता. सगळे जण जेवत होते. तुला वाटत होतं मी तुला बोलवेन आणि मला वाटत होतं तू मला बोलावशील! शेवटी काय दोघांनाही सक्तीचा उपास घडला होता.

गॅदरिंगच्या दिवशी तर आपल्यावर हमखास फिशपाँड पडायचे….. हा अलिखित नियम कधीच मोडला नाही. तेव्हा तर तुझा चेहरा अगदी बघण्यासारखा असायचा. विशेष म्हणजे शेवटच्या वर्षीचे गॅदरींग आपण एकत्र बसून बघितले होते, त्यामुळे तर त्या फिशपाँडलाही रंगतच आली होती.

खरंतर ते सगळे दिवस म्हणजे डिग्रीची तीन वर्षे मैत्री नावाच्या कैफात कशी निघून गेली ते कळलंच नाही. मैत्रीच्या बेटावरचे आपण अनभिषिक्त कलंदर सम्राट आहोत असंच इतके दिवस वाटत होतं. मात्र जसजसे परीक्षेचे दिवस जवळ येत होते, तसतशी मैत्रीची झिंग उतरुन वास्तवतेची जाणीव होऊ लागली होती. थोड्याच दिवसांत हा दोस्तीचा कट्टा, सगळे मित्र, कॉलेजचा परिसर यापासून आपण कायमचे दुरावणार हा विचारच मनाला चटका लावून जात होता.

परीक्षेच्या शेवटच्या दिवशी तू मला भेटण्यासाठी परीक्षा केंद्राच्या बाहेर गेटवर माझी वाट पाहत थांबली होतीस. मला बाहेर यायला उशीर झाला तरीही तू अगदी उन्हात उभी होतीस. मी येताच चेहर्‍यावर थोडं उसणं स्मित आणून दुसर्‍या दिवशी रात्री आठच्या गाडीने जाणार म्हणून सांगितलंस. का कुणास ठाऊक त्या दिवशी मी रात्रभर झोपू शकलो नाही. कुठेतरी काहीतरी चुकतंय असं सारखं वाटत होतं.

दुसर्‍या दिवशी साडेसात वाजता स्टेशनवर पोहोचलो. तू माझ्या अगोदर पोहोचली होतीस. मला येताना बघताच सुहास्य देऊन माझं स्वागत केलंस. त्यानंतर कितीतरी वेळ निःशब्द शांतता होती. ती शांतता भंग करण्याचं कुणाचंही धाडस होत नव्हतं. नेहमी प्रत्येक विषयातील तज्ज्ञ असल्यासारखे बोलणारे आपण त्या दिवशी मात्र प्रत्येक शब्द मोजून बोलत होतो. इतक्यात, तुझी गाडी आली. तू बॅगेतून काढलेलं एक पाकीट माझ्या हातावर ठेवलंस. ती अनोखा संदेश देणारी भेट अजूनही मी जपून ठेवली आहे. विचारांनी वेग घेतला. त्याच वेगाने फलाटावरुन गाडी हलली. तुला डोळ्यांत साठवून घेण्याच्या नादात पापण्यांच्या काठावर अश्रू टचटचून आले. कसल्याशा आवाजाने जेव्हा भानावर आलो, तेव्हा कानावर गाण्याचे शब्द तेवढे पडत होते…

कधी सांजवेळी मला आठवुनी, तुझ्या भोवताली जराशी वळुनी,
पाहशील का?…पाहशील का?…पाहशील का?

वाचण्यासारखे आणखी काही…..

श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….
शिमगा
“अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”- आक्रमक व्हा आणि जिंका!!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय