थंडीच्या दिवसांत आरोग्यदायी आहार कसा असावा, ते वाचा या लेखात

थंडीच्या दिवसांत आरोग्यदायी आहार कसा असावा

आता हळूहळू थंडी सुरु होत आहे. थंडीत अनेक लहान सहान आजार आपल्याला होत असतात.

वातावरण बदलले की सर्दी, खोकला, किरकोळ ताप हे तर बऱ्याच जणांना होते.

म्हणून थंडीच्या दिवसात आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्याची विशेष गरज असते.

थंडीच्या दिवसात आपल्याला उन्हाळ्याच्या मानाने भूक पण जास्त लागते.

त्यात बाहेर गारवा असताना घरात बसून गरम गरम एखादी पोळी तर जास्तीची सहज खाल्ली जाते.

थंडीच्या दिवसात थोडे जास्त खाल्ल्याने काही बिघडत नाही पण त्याचबरोबर आपल्याला गरजेचे सगळे पोषणद्रवे मिळत आहेत ना?

याकडे लक्ष देणे सुद्धा गरजेचे असते. काहीवेळा भूक जास्त लागते म्हणून आपण काहीतरी जंक फूड खाऊन वेळ मारून नेतो.

एखाद दुसऱ्या वेळेला असे केल्याने काहीच बिघडत नसते, पण असे सतत केले तर ते आपल्यासाठी चांगले नाहीच.

शिवाय यामुळे आपण वेगवेगळ्या रोगांना नकळतपणे आमंत्रणच देत असतो.

म्हणून थंडीच्या दिवसात असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढेल आणि थंड वातावरणात आपल्याला आवश्यक असलेली सगळी पोषणद्रवे आपल्याला मिळतील, हे माहीत असणे गरजेचे आहे.

थंडीच्या दिवसात रोगराई दूर ठेवण्यासाठी आहारातल्या बदलांबरोबरच नियमितपणे व्यायाम आणि पुरेशी झोप सुद्धा गरजेची आहे.

आपल्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो.

त्यासाठी आपली जीवनशैली सुधारणे गरजेचे आहेच. पण आज या लेखात मात्र आपण बदलत्या वातावरणाबरोबर, हवेत गारवा वाढू लागला की आपल्या आहारात कोणते बदल करायचे आणि कोणते पदार्थ जास्त प्रमाणात खायचे हे जाणून घेणार आहोत.

१. नाश्त्याला पोटभरीचे ओट्स

नाश्ता सगळ्यात महत्वाचा असतो.

खासकरून थंडीच्या दिवसात पोटभर नाश्ता केला तर जेवायच्या वेळेपर्यंत पोट शांत राहते.

ओट्सचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. यातला एक महत्वाचा फायदा म्हणजे ओट्समधे फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात.

या फायबरमुळे आपले पोट लवकर भरते व ते खाल्ल्यानंतर लगेच भूक सुद्धा लागत नाही.

त्यामुळे थंडीच्या दिवसात पोटभर नाश्ता करायला ओट्स एक उत्तम पर्याय आहे.

ओट्स गरम दुधात शिजवून त्यात ड्रायफ्रूट घालून खाल्ले तरी थंडीच्या दिवसात सहज पचते.

ड्रायफ्रुट ऐवजी एखादे फळ किंवा दोन खजूर खाल्ले तरी पोट व्यवस्थित भरते आणि यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते.

https://www.manachetalks.com/13059/health-benefits-of-oatmeal-marathi/

२. व्हिटामिन ‘सी’ युक्त फळे आणि भाज्या

थंडीच्या दिवसात आपल्याला सर्दी खोकल्यासारखे आजार अगदी सहज होतात.

त्यामुळे खासकरून या दिवसात आपल्याला असे पदार्थ खायला हवेत ज्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या वाढेल.

यासाठी व्हिटामिन ‘सी’ युक्त फळे आणि भाज्या हा एक उत्तम पर्याय आहे.

व्हिटामिन ‘सी’ चा अजून एक फायदा म्हणजे यामुळे आपल्या शरीराची उर्जा सुद्धा टिकून राहते.

म्हणूनच नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांना व्हिटामिन ‘सी’ ची सगळ्यात जास्त गरज असते.

कोबी, रताळी, टोमाटो, ढोबळी मिरची, फ्लॉवर, ब्रोकोली यासारख्या भाज्यांमध्ये व्हिटामिन ‘सी’ जास्त प्रमाणात आढळतात.

तसेच लिंबू, संत्री, मोसंबी यासारख्या फळांमधून सुद्धा जास्त प्रमाणात व्हिटामिन ‘सी’ मिळतात.

म्हणून थंडीच्या दिवसात या भाज्यांचा आणि फळांचा आपल्या आहारात जास्त प्रमाणात समावेश करावा.

थंडीच्या दिवसात कोमट पाण्यातले लिंबू पाणी नियमितपणे घेतल्याने सर्दी सारखे विकार दूर राहतात.

३. झिंकचे प्रमाण वाढवा

झिंक हे खनिज सुद्धा आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते.

थंडीच्या दिवसात हवेत व्हायरस जास्त काळ टिकून राहतात.

यामुळेच या दिवसात कॉमन फ्लू, म्हणजेच इन्फ़्लुएन्झा सारखे व्हायरल इन्फेक्शन्स जास्त पसरतात.

म्हणूनच खासकरून या थंडीच्या दिवसांमध्ये आपण आपल्या रोग प्रतिकारशक्तीची विशेष काळजी घेतली पाहिजे.

आहारात झिंक या खनिजाचा वापर यासाठी महत्वाचा आहे.

पालक, मोड आलेली कडधान्ये यामधून आपल्याला झिंक जास्त प्रमाणात मिळते.

म्हणून थंडीच्या दिवसात या पदार्थांचा वापर आपल्या जेवणात जास्त प्रमाणात केला पाहिजे.

४. आहारात आयर्नचे प्रमाण जास्त ठेवावे

आयर्न हे खनिज आपल्या एकूण आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

आयर्नमुळे रक्तातील तांबड्या पेशींची संख्या वाढते.

आयर्नमुळे आपली ओग प्रतिकारशक्ती सुद्धा सुधारते.

शरीरात आयर्नची कमतरता असेल तर एनेमिया सारखे आजार होतात, ज्यामध्ये रक्तातील तांबड्या रक्तपेशींचे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने शरीरातील पेशींना पुरेसा प्राणवायू मिळत नाही.

थंडीत आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते त्यामुळे आजारी पडू नये यासाठी आहारातील आयर्नचे प्रमाण वाढवले पाहिजे.

खजूर, काळ्या मनुका, डाळिंब, पालक या पदार्थांमधून जास्त प्रमाणात आयर्न आपल्याला मिळते.

५. व्हिटामिन बी-12 चे प्रमाण वाढवा

व्हिटामिन ‘बी’ च्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो.

आहारात व्हिटामिन बी-12 चे प्रमाण व्यवस्थित असेल तर ते आपल्या रोग प्रतिकारशक्तीसाठी सुद्धा फायदेशीर असते.

म्हणूनच एरवी सुद्धा आणि खास करून थंडीच्या दिवसात थकवा जाणवू नये आणि शरीरात सतत कामे करायला उर्जा हवी म्हणून आहारातून व्हिटामिन बी-12 योग्य प्रमाणात घेतले पाहिजे.

मांसाहार करत असणाऱ्यांसाठी मासे आणि अंडी हे व्हिटामिन बी 12 चे चांगले स्त्रोत आहेत.

शाकाहारी लोकांना दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून व्हिटामिन बी 12 मिळते.

६. गोड कमी करा

थंडीच्या दिवसात भूक लागण्याचे प्रमाण वाढते. अशामध्ये बऱ्याचदा गोड खाण्याचा मोह होऊ शकतो.

पण जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढायचा धोका असतो.

म्हणूनच गोड खावे वाटले तरी योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजे. काहीवेळा जास्त गोड पदार्थ खायची इच्छा झालीच तर रताळे, खजूर अशा भाज्या-फळांचा वापर करून नवनवीन पदार्थ करून खाण्याकडे भर दिला पाहिजे.

थोडक्यात, थंडीत भूक वाढत जरी असली आणि काहीवेळा गोड खायची इच्छा जरी होत असली तरी वजन आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे ठरते.

७. वेगवेगळी सूप प्या

उन्हाळ्यात सारखा घाम येऊन आपले पाणी पिण्याचे प्रमाण अपोआप वाढते पण थंडीत मात्र आठवणीने पाणी प्यावे लागते.

कधीकधी आपल्या नकळत थंडीच्या दिवसात आपल्याकडून कमी प्रमाणात पाणी प्यायले जाते.

यासाठी संध्याकाळच्या वेळेला वेगवेगळी सूप केली तर त्याचे तीन फायदे होतात, एकतर संध्याकाळच्या भुकेचा प्रश्न मिटतो, आपले पाण्याचे प्रमाण वाढते आणि गरम गरम सूपमुळे घसा दुखत असेल किंवा थंडीमुळे खोकला येत असेल तर बरे वाटते.

सूप करताना थंडीच्या दिवसात भरपूर आले आणि लसूण वापरले जाऊ शकतात. लसणामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिअम, पोटाशीअम आणि सल्फर असतात ज्यामुळे इन्फेक्शन्स दूर राहतात.

८. बाजरी

बाजरीमध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात असतात त्याचबरोबर आयर्न या खनिजासाठी पण बाजरी एक उत्तम स्त्रोत आहे.

यामुळे थंडीच्या दिवसात एनेमिया सारखे विकार होत नाहीत.

बाजरीमध्ये कॅल्शियम सुद्धा जास्त प्रमाणात आढळते त्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी सुद्धा नियमितपणे बाजरी खाल्ली तर फायदा होऊ शकतो.

थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खायचा पर्याय तर आहेच पण त्याचबरोबर ओट्स सारखाच एक भरपेट नाश्ता म्हणून बाजरीचा उपमा खाल्ला जाऊ शकतो.

थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहेच.

म्हणूनच या दिवसात सारखे बाहेरचे पदार्थ आणि ते ही अधिक प्रमाणात खाण्याकडे आपला कल वाढलेला असतो.

हे आपल्या तब्येतीसाठी चांगले नाही. यामुळे वजन वाढू शकते शिवाय हायपरटेन्शन, डायबेटीस यासारखे आजार होऊ शकतात.

अशावेळेला वर दिलेले पदार्थ वापरून नवनवीन रेसिपी ट्राय करून काहीतरी आरोग्यपूर्ण पण तरीही चविष्ट असे खाता येईल.

थंडीच्या दिवसात खायचे हे पदार्थ तुम्हाला कसे वाटले आणि यातले काय काय तुम्ही आवर्जून खाणार हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 Response

  1. Saiprasad Prabhakar Panhalkar says:

    Mast 👍

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!