तुमच्या मुलांना इतर मुलांशी मैत्री करायला त्रास होत असेल तर हा लेख वाचा

खरेतर कोणाशी मैत्री करणे, अनोळखी लोकांशी संवाद साधणे, या अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असतात.

आपण कोणाचा मूळ स्वभाव बदलू शकत नाही हे जरी खरे असले तरी एक पालक म्हणून मुलांना जगायला योग्य दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य असते.

मुलांना जितक्या चांगल्या सवयी लावता येतील तितक्या आपण लावण्याचा सगळेच प्रयत्न करत असतात.

मुलांना एखादी गोष्ट जमत नसेल तर त्यासाठी त्यांना दोष न देता आपणच त्यांना ती समजून घ्यायला, त्यासाठी प्रयत्न करायला शिकवले पाहिजे.

लोकांशी मैत्री करणे ही अशीच एक महत्वाची गोष्ट आहे.

आपल्या मुलाचे सहजासहजी मित्र-मैत्रिणी होत नसतील तर ती काहीशी चिंता करण्यासारखी गोष्ट आहे, कारण मैत्री होणे ही सुद्धा एक कला आहे आणि त्यासाठी लोकांशी बोलणे, त्यांचे ऐकून घेणे, त्यांना मदत करणे अशा अनेक गोष्टींची गरज असते.

या पैकी कशात आपले मूल कमी पडत असेल तर त्यात सुधारणा होण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो असा प्रश्न अनेक आईबाबांना पडतो..

त्याचेच उत्तर आज हा लेख वाचल्यावर मिळणार आहे.

मुलांना इतरांशी मैत्री करायला प्रवृत्त कसे करायचे हे आपण पुढे बघणार आहोतच, पण त्या आधी मुलांना मैत्री करायला जड का जात असावे हे आपण जाणून घेऊ.

यामागे मुख्यतः दोन कारणे असतात, एक म्हणजे तुमचे मूल अतिशय लाजरे असू शकते.

अशी मुले इतरांसमोर बुजून जातात, त्यांना काही आपणहून बोलायची, मागायची लाज वाटते.

काही वेळा समोरच्याने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायला सुद्धा अशा मुलांना जमत नाही.

तर याउलट काही मुले चिडकी असतात, त्यांचे कोणाशीच पटत नाही, त्यांना आपली वस्तू इतरांबरोबर वाटून घेणे पटत नाही म्हणून, त्यांच्या वागण्याचा इतरांना कंटाळा येतो आणि कोणाशीच मैत्री होत नाही.

या दोन्ही पैकी कारण काहीही असुदे मुलांना मदत आपल्यालाच करायची आहे कारण हे दोन्ही स्वभाव त्यांच्या एकूण व्यक्तिमत्व विकासासाठी घातकच आहेत.

इतरांशी मैत्री करायची म्हणजे त्यांच्याशी बोलून, त्यांना समजून घेऊन, मदत केली पाहिजे.

बोलण्यात मोकळेपणा हवा, इतरांवर विश्वास ठेवायला जमायला हवा, आपणहून संवाद साधता यायला हवा, वेळेप्रसंगी माफी मागता यावी.

आणि दुसऱ्यांच्या चुका सुद्धा माफ करता याव्यात.

कोणाशी ही मैत्री करण्यासाठी या काही महत्वाच्या गोष्टी आहेत.

मग आपण अशा कोणत्या गोष्टी करू शकतो ज्याने मुलांचा स्वभाव बदलून त्यांना अगदी सहजपणे इतरांशी मैत्री करता येईल?

हेच या लेखात पुढे आपण बघणार आहोत.

यातले उपाय तुमच्या मुलांच्या स्वभावानुसार तुम्ही करून बघितले तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

१. मुलांवर कसलीच जोरजबरदस्ती करू नका

मुलांना कशासाठी जबरदस्ती न करणे, त्यांना एखाद्या गोष्टी साठी धमकावणे, एखादी चूक झाल्यास टोचून बोलणे, सतत शिक्षा करणे किंवा ज्याला आपण इमोशनल blackmail म्हणतो ते करणे आईबाबांनी टाळले पाहिजे.

आता याचा आणि मुलांचे मित्र मैत्रिणी होण्याचा नेमका काय संबंध असा प्रश्न पडणे अत्यंत स्वाभाविक आहे.

पण या दोन गोष्टींचा अगदी जवळचा संबंध आहे. आपण जसे वागतो, बोलतो त्याचा परिणाम मुलांवर होत असतो.

आपण मुलांवर सतत ओरडत असलो, त्यांच्या मागे लागत असलो, त्यांच्याकडून एखादी गोष्ट करून घ्यायला त्यांना भीती दाखवत असलो तर या गोष्टी नकळतपणे त्यांच्या मनावर कोरल्या जातात.

असे वागण्यात काहीच गैर नाही, ही जगाची रीतच आहे अशी त्यांची समजूत होते आणि त्यांचा स्वभाव सुद्धा असाच होतो.

पण सतत दुसऱ्याला जबरदस्ती करणे, टोचून बोलणे हे जर मुलांनी केले तर त्यांचे मित्र होणारच नाहीत.

म्हणूनच मुलांना चांगल्या सवयी लावताना, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देताना आपण योग्य शब्द आणि योग्य भावनांचा वापर केला पाहिजे.

त्यांना शांतपणे समजावून सांगणे, प्रेमाने चूक दाखवून देणे अशा गोष्टी केल्या तर त्यांचा स्वभाव सुद्धा प्रेमळ होईल.

यामुळे मुले मितभाषी होतील आणि त्यांना नवीन मित्रमैत्रिणी करण्यास मदत होईल.

२. मुलांच्या समस्या ऐकून घ्या

ज्याप्रमाणे आपले मोठ्यांचे मूड स्वीन्ग्स असतात, ज्याप्रमाणे आपल्याला राग येतो किंवा वाईट वाटते त्याचप्रमाणे आजूबाजूच्या अनेक गोष्टींमुळे लहान मुलांना पण राग येत असतो, वाईट वाटत असते.

आपण परिपक्व असल्याने हा राग इतरांवर काढत नाही पण लहान मुलांचे तसे नसते.

एखाद्या गोष्टीचा राग ते पटकन दुसऱ्यावर काढून त्याचे मन दुखवू शकतात.

अशा स्वभावाच्या मुलांशी सहसा कोणी मैत्री करत नाही.

पण जर आपण वेळ देऊन मुलांचे हे त्रास ऐकून घेतले तर?

मुलांना काहीच त्रास नसतात असे गृहीत धरण्यापेक्षा, कधी मुले त्यांचे मन मोकळे करत असतांना शांतपणे ऐकून घ्यावे.

आपले ऐकणारे, समजून घेणारे कोणीतरी आहे ही जाणीव मुलांना होऊ द्यावी.

असे केल्याने आपल्याला दोन गोष्टी साध्य होतील.

एक तर मुलांचे मन मोकळे झाल्याने त्यांची इतरांवर चिडचिड होणार नाही.

दुसरे म्हणजे आपले बघून मुलांना सुद्धा इतरांचे ऐकून घेण्याची आणि त्यांना समजून घेण्याची सवय लागेल जी मैत्रीत अत्यंत गरजेची असते.

३. दुसऱ्यांना समजून घ्यायची सवय मुलांना लावा

आता दुसऱ्यांना समजून घेणे, समोरच्याला काय हवे आहे ते त्याने न सांगताच ओळखणे या गोष्टी ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असतात.

अशा गोष्टी दुसऱ्याने शिकवून येत नसल्या हे खरे असले तरी तरी आईबाबा मुलांना या गोष्टी शिकण्यासाठी प्रवृत्त करूच शकतात.

एखाद्या प्रसंगात आपणच जर मुलांना समोरच्याची मनस्थिती समजावून सांगितली तर निदान असे करता येते हे तरी त्यांना समजेल.

आपल्या बोलण्यातून जर ‘असे केल्याने अमुकला वाईट वाटेल.’ किंवा ‘हे केले तर तमुकला आनंद होईल.’ अशी वाक्ये त्यांच्या कानावर पडू लागली तर त्यांचे विचार सुद्धा त्या दिशेने जायला लागतील.

अशाने हळूहळू इतरांच्या मनाचा ते विचार करायला लागतील आणि त्यांच्या या गुणामुळे त्यांना मैत्री करणे आणि ती निभावणे सोपे होऊन जाईल.

४. मुलांचा आत्मविश्वास वाढवा

काही मुले अतिशय अबोल असतात.

आपल्याला ही मुले शांत, समंजस वाटत असली तरी बहुतेक वेळा त्यांचा आत्मविश्वास कमी असतो.

इतरांशी बोलायची त्यांना भीती वाटते. बाकीची लोक आपल्यापेक्षा हुशार आहेत असा त्यांचा गैरसमज झालेला असतो.

बऱ्याचदा तर अशी मुले घरी एकदम बोलकी आणि खेळकर असतात पण बाहेर गेली की बुजतात.

आपल्या मुलांना जर हा त्रास असेल तर यासाठी त्यांना ओरडण्यापेक्षा त्यांचा आत्मविश्वास वाढवायला मदत केली पाहिजे.

शाळेत शिक्षकांशी बोलून त्यांची मदत घेऊन मुलांचा वर्गात सहभाग वाढवायला पाहिजे.

बाहेर सुद्धा त्यांना इतरांशी बोलण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.

यासाठी बाहेर गेल्यावर मुद्दाम मुलांना काही विचारायच्या निमित्ताने अनोळखी व्यक्तीशी बोलायला लावणे, हॉटेलमध्ये आपली ऑर्डर स्वतः द्यायला लावणे यासारख्या सोप्या गोष्टी करता येतील.

५. मुलांचा चिडखोरपणा वेळीच कमी करा

सतत चिडचिड करणे, लहानातल्या लहान गोष्टींचा राग येणे हे स्वभावातले असे काही दोष आहेत ज्यामुळे मैत्री करणे आणि ती निभावणे अवघड होऊन जाते.

म्हणूनच मुले चिडचिड करत असतील तर त्यांना समजावून सांगणे, काही वेळा ओरडणे असे करून रागावर ताबा ठेवायला शिकवायला हवे.

राग आलातरी रागात बोलण्या-वागण्यावर ताबा सुटू न देण्याचे कसब मुलांना योग्य वयातच शिकवायला हवे.

६. मुलांना बोलते ठेवा

खरेतर मुलांकडे सांगण्यासारखे बरेच काही असते पण दर वेळेला ते मनातले बोलतातच असे नाही. त्यांना बऱ्याचदा मनातले बोलायची भीती वाटते, मोठी माणसे आपल्याला हसतील, आपले काहीतरी चुकेल अशा प्रकारची ही भीती असते.

कोणाशीही मैत्री करायची तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या व्यक्तीशी वेगवेगळ्या विषयांवर बोलता येणे.

म्हणूनच पालकांनी मुलांना घरात चालू संभाषणात भाग घेऊ दिला पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या विषयावर मते मांडू दिली पाहिजेत.

याचबरोबर मुलांना संभाषण सुरु करण्यासाठी पण उद्युक्त केले पाहिजे.

७. मुलांना ‘शेयरिंग’ची सवय लावा

मैत्रीत अनेक गोष्टी वाटून घ्याव्या लागतात. मुलांना जर आपल्या गोष्टी दुसऱ्यांना द्यायची आजिबातच सवय नसेल तर त्यांचे इतर मुलांबरोबर पटणे अवघड आहे.

यासाठी मुलांना लहानपणापासूनच खेळणी, खाऊ हा इतरांबरोबर वाटून खायची सवय लावली पाहिजे म्हणजे मोठे झाल्यावर त्यांना कोणाशी मैत्री करताना अडचण येणार नाही.

८. मुलांना माफी मागायला आणि माफ करायला शिकवा

कोणतेही नाते असो, त्यात लहानमोठ्या कुरबुरी होणारच.

काही वेळा मोठी भांडणे सुद्धा होतात. पण आपले नाते हे त्या भांडणापेक्षा मोठे आहे हे मुलांना शिकवायला पाहिजे.

याचसाठी चूक झाल्यास माफी मागताना काहीच कमीपणा नाही हे त्यांना समजवायला हवे.

याचप्रमाणे कधी समोरचा चुकला तर त्याला पटकन माफ करायला ही शिकवायला हवे.

अशामुळे कोणतेही नाते टिकवायचे कसब मुले शिकतील आणि नवीन मित्रमैत्रिणी केल्यावर ती मैत्री त्यांना टिकवून सुद्धा ठेवता येईल.

आयुष्यात मित्रमैत्रिणी महत्वाचे असतात.

त्यांच्या साथीने अवघड दिवस पार पाडण्याचे बळ आपल्याला मिळते.

नवनवीन मित्रमैत्रिणी करणे ही सुद्धा एक कला आहे.. ती लहान वयातच साध्य झाली तर पुढे आयुष्यभर त्याचा मुलांच्या एकूण आयुष्यावर आणि व्यक्तिमत्वावर परिणाम होणार असतो..

ही कला साध्य करायला आपल्या मुलांना सगळ्याच पालकांनी मदत केली पाहिजे.

ही झाली लहान असतांना पर्यंतची गोष्ट. पण मुलं जशी मोठी होतात.

तेव्हा त्यांचा स्वभाव समजू लागतो. आणि ती मुळात इन्ट्रॅव्हर्ट असल्याने आपल्या कामात लक्ष घालणे, भारंभार मित्र-मैत्रिणी करण्यापेक्षा मोजकेच मित्र असणे या कडे त्यांचा कल असतो.

असे असेल तर हे एबनॉर्मल न समजता, इतरांशी चांगले संबंध असणं गरजेचं आहे एवढं मात्र त्यांना पालक म्हणून समजावून द्यावं. कारण, सर्वात महत्त्वाची मैत्री म्हणजे आई-बाबांची आणि मुलांची!! काय पटतंय ना राव!!

बालक आणि पालक यांच्यात चांगली बॉण्डिंग निर्माण करण्याच्या ९ टिप्स

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय