किंग साईझ आयुष्य जगण्यासाठी हे पाच प्रश्न स्वतःला विचारून बघा

मराठी प्रेरणादायी

आपल्यापैकी सगळ्यांनाच आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात एकदा तरी पोकळी किंवा ज्याला आपण रिकामपण म्हणतो ते जाणवले असेलच.

कुठेतरी हरवल्यासारखे होणे, कशातच लक्ष न लागणे, कसली तरी नीट शब्दात न सांगण्यासारखी अस्वस्थता जाणवणे किंवा मनाची एकंदरीतच गोंधळलेली अवस्था असणे.

एखाद्या मोठ्या दुखातून जाताना, किंवा गेल्यावर, आयुष्याच्या खडतर काळात, मोठे संकट आल्यावर असे वाटणे साहजिकच आहे.

त्या वेळेला आपल्या समोरचे संकट दूर झाले की आपल्या मनाची ही अवस्था सुद्धा नाहीशी होते.

पण आयुष्यात अशी कुठलीच बिकट परिस्थिती नसताना, आपला घर, संसार, मुलं-बाळ सगळ्यांचे आरोग्य उत्तम असताना, आपले आपल्या जीवलगांशी सुद्धा चांगले संबंध असताना अशी पोकळी जाणवली तर?

अशा वेळेला आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला समजून घेणे तर दूरच आपल्याला स्वतःला सुद्धा आपले आश्चर्य वाटते.

आपल्या या मनस्थितीबद्दल आपण स्वतःला दोष देत राहतो आणि त्यामुळे विनाकारण अपराधीपणाची भावना आपल्याला येते.

पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्याला असे वाटत असते तेव्हा आपण एकटे नसतो..

अशी अनेक लोक आहेत ज्यांना भरल्या घरात सुद्धा रिकामपण वाटू शकते.

म्हणजेच काय? तर असे वाटणे हे अगदी ‘नॉर्मल’ आहे!

म्हणूनच त्याबद्दल स्वतःला दोष न देत बसता, त्यातून बाहेर पडण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न केले पाहिजेत.

आपल्याला असे वाटते याचे कारण हेच असते की कुठेतरी काहीतरी कमी आहे.

ही कमी नेमकी कुठे आहे? काय आहे?

आणि ती पूर्ण करण्यासाठी काय करायचे हे आपल्याला साधले की आपली ही मनस्थिती दूर करण्यात आपण यशस्वी होऊ.

आज या लेखातून आम्ही तुम्हाला याचसाठी उपयोगी पडतील असे काही उपाय सांगणार आहोत.

तुमच्या आयुष्यात पोकळी आहे हे स्वीकारणे फार महत्वाचे आहे.

जर एखादी समस्या असेल पण आपण ती मान्यच केली नाही तर ती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नच करणार नाही.

या उलट जर एखाद्या समस्येचा आपण पूर्णपणे स्वीकार केला तर ती सोडवायला सोपी जाते.

आजूबाजूचे सर्व आलबेल असताना, घरात सुखसोयी असताना हे असे रिकामपण वाटत असेल तर आपण ते आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा बोलून दाखवत नाही कारण ते काय म्हणणार याची आपल्याला कल्पना असते, “तुला कुठे काय कमी आहे?”

यामुळे आपण सुद्धा अशाच भ्रमात राहतो की खरेच आपल्याला काही कमी नाही आणि आपल्या या पोकळीची दखल आपण घेणे सोडून देतो.

पण त्यामुळे ती पोकळी नष्ट होत नाही तर जास्तच वाढत जाते.

म्हणून इतर कोण काय म्हणेल याचा विचार न करता आपण सर्वात आधी आपली मनस्थिती स्वीकारली पाहिजे.

एकदा आपण हे स्वतःशी मान्य केले की आपल्याला अर्धे बरे वाटते कारण यानंतरच त्यावर उपाय करण्याची सुरुवात होणार असते.

२. तुमच्या सगळ्या गरजा पुरवल्या जात आहेत का?

भलेही तुम्हाला काही सुखसोयींची कमी नसेल पण आपल्या गरजा तेवढ्यापुरत्याच मर्यादित आहेत का?

प्रत्येक व्यक्तीच्या काही प्राथमिक गरजा असतात, जसे की स्वतःला वेळ देणे, मन मोकळे करायला एखादी हक्काची जागा असणे, आपले छंद जोपासता येणे, आपल्या आवडीचे काम करता येणे.

या नंतर येतात त्या गरजा वेगळ्या असतात, जसे की घरात सर्व सुखसोयी हव्यात, फिरायला अमुक कार हवी, मोठे घर हवे.. इत्यादी.

आपण याच गरजा भागवण्याच्या मागे लागलेलो असतो. अर्थात, आपल्या प्रगतीसाठी ते गरजेचे आहेच पण तसे करताना आपल्या या प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना?

तसे होत असेल तर ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक असते व त्यामुळे अशी पोकळी जाणवते.

प्रगतीच्या मागे लागताना आपण हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि आपल्या दिवसात निदान काही वेळ तरी आपले छंद जोपासायला, आपल्या आवडीनिवडी जपायला दिला पाहिजे.

३. तुमच्या आयुष्यात नातेसंबधांना महत्व आहे का?

आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती करणे, यशाची प्रत्येक पायरी सर करणे हे जितके महत्वाचे आहे तितकेच आपल्या आयुष्यात आपले जवळचे लोक, मित्रमंडळी महत्वाची आहेत.

आपण सहज बोलू शकू, मन मोकळे करू शकू अशी किती नाती आपल्या आयुष्यात आहेत?

याचबरोबर आपल्याकडे कोणीतरी मन मोकळे करू शकेल अशी खात्री आपल्याबद्दल किती लोकांना वाटत असेल?

हे दोन्ही प्रश्न फार महत्वाचे आहेत.

आपल्या आयुष्यात अशी माणसे नसतील तर ती जोडायच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत.

आयुष्यात कामानिमित्त अनेक माणसे आपल्याला भेटत असतातच पण सहज, काहीच हेतू मनात न बाळगता आपण किती जणांना भेटू शकतो?

थोडक्यात, आपल्याला अशी पोकळी जाणवत असेल तर त्यामागचे हे एक महत्वाचे कारण असते की आपण योग्य माणसे जोडली नाहीत म्हणूनच आयुष्यात मित्रांना, स्वकीयांना महत्व दिले पाहिजे आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे.

यामुळे आपले मनस्वास्थ चांगले राहते.

४. तुमच्या आयुष्यात काही आव्हाने आहेत का?

घर छान आहे, फिरायला हवी ती गाडी आहे, सगळ्या सुखसोयी आहेत, आरोग्य उत्तम आहे मग कसले रिकामपण?

असा प्रश्न पडू शकतो पण जर सगळेच आलबेल असेल तर काय उपयोग?

आयुष्यात पुढे जाण्यासाठी, खरेतर जगण्यासाठीच आपल्याला सतत काहीतरी ध्येय लागते, काहीतरी आव्हानात्मक असावे लागते.

या गोष्टीशी तुम्ही देखील सहमत असाल की काहीतरी ध्येय असेल तर त्यासाठी वाटचाल करणे, कष्ट करणे यामुळे आपल्याला समाधान मिळते आणि आयुष्याला अर्थ मिळतो.

त्यामुळे आयुष्यात इतके सुद्धा समाधानी असणे बरोबर नाही की त्या समाधानामुळे पोकळी निर्माण होईल.

अशी अवस्था असेल तर नवीन काहीतरी शिकायची, शिकवायची, नवा छंद जोपासायची, नवीन सवयी लाऊन घ्यायची अशी काहीतरी आव्हाने आपण आपल्यापुरती ठरवून घेतली पाहिजेत.

५. तुम्ही इतरांसाठी काय करता?

स्वतःसाठी आपण सगळेच जगतो. आपल्याला आवडते ते खून, पिऊन आपण खुश होतो.

सुटीच्या दिवशी आपले आवडीचे पुस्तक वाचून किंवा आपल्या आवडीचा सिनेमा बघून आपल्याला छान वाटते पण हे सगळे करताना आपण इतरांसाठी काय करतो हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.

स्वतःला इतके महत्व देताना आपण दुसऱ्यांकडे दुर्लक्ष तर करत नाही न?

पण जर स्वतःसाठी इतके करून सुद्धा आपल्या आयुष्यात पोकळी असेल तर आपल्याला विचार करायची पद्धत बदलायला हवी.

दुसऱ्यांसाठी काही करून आपल्याला वेगळाच आनंद मिळतो.

आपली कोणालातरी मदत होत आहे, कोणाला तरी आपण उपयोगी पडतो आहे ही भावना आपल्याला आनंद देणारी असते.

म्हणून आपण तसे वागण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केला पाहिजे.

यासाठी कुठे आश्रमात पैसे दान करायची सुद्धा गरज नाही.

आपण अगदी आपल्या घरापासून सुरुवात करू शकतो. घरातल्या लोकांसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ करणे, घरात आवर्जून मदत करणे, सतत काम करणाऱ्या व्यक्तीला आराम देणे इतक्या साध्या गोष्टी जरी आपण इतरांसाठी केल्या तरी त्यामुळे आपल्यालाच आनंद मिळणार असतो.

म्हणूनच आपण आपला आनंद मिळवताना दुसऱ्यांसाठी सुद्धा अगदी लक्षात ठेऊन काही गोष्टी केल्या तर आपला हा आनंद द्विगुणीत होतो.

मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात पोकळी वाटणे, हरवल्यासारखे होणे, गोंधळून जाणे हे काही नवीन नाही.

सगळेच या न त्या प्रकारे यातून जात असतात…

फक्त आपल्या या समस्येला तोंड देऊन आपण त्यावर तोडगा कसा काढतो हे महत्वाचे आहे.

आणि म्हणूनच आयुष्य भरभरून जगण्याच्या शुभेच्छे सोबतच धन्यवाद… आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!