नकारात्मकतेवर कंट्रोल ठेऊन सकारात्मकता कशी वाढवाल!!

भावना म्हणजे काय सकारात्मक भावनांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो

२०२० हे अख्खे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच कधीच न विसरता येण्यासारखे आहे.

या वर्षात बहुतेक जणांच्या अपेक्षांपैकी काहीच घडले नाही, उलट या वर्षात जे जे काही नियोजन केले होते ते सगळे फसले असंच काहीसं सर्वांचं मत आहे..

आर्थिक नुकसान, मानसिक त्रास, तणाव, भीती, एकटेपणा अशा कितीतरी भावनांनी बरेच जणांना घेरले.

गेल्या काही महिन्यात तुम्हाला सुद्धा या सगळ्यामुळे उदास वाटत असेल, पुढे काय हा प्रश्न भेडसावून टाकत असेल, भविष्याचा विचार करून, विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा कशी बसायची हा विचार करून तुम्ही चिंताग्रस्त होत असाल तर तुम्ही एकटे नाही आहात.

या सगळ्या प्रश्नांनी आज सगळे जगच त्रासलेले आहे.

पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपल्या हाताबाहेर जशा इतर अनेक गोष्टी असतात तशीच ही महामारी सुद्धा आपल्या हाताबाहेरची आहे?

मग त्यामुळे निराश होण्यापेक्षा आपल्या हातात जे आहे त्यावर आपण लक्ष दिले तर?

बाहेर काय चालू आहे यावर आपले काही नियंत्रण असू शकत नाही पण आपल्या मनामध्ये काय चालू आहे, आपण मनात काय विचार करतो हे तर आपल्यावर असते?

आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवणे आपल्याला प्रयत्नांती का होईना पण शक्य असते.

मग असे असताना ज्यावर आपले नियंत्रण नाही अशा गोष्टीचा विचार का करत बसायाचा?

याचा अर्थ असा नाही की बाहेरच्या अवघड परिस्थितीकडे पूर्णपणे कानाडोळा करावा किंवा आपण फक्त आपल्यापुरता विचार करावा.

अशा अवघड दिवसांमध्ये तर सामाजिक भान जपायलाच हवे.

पण या परिस्थितीत सतत नकारात्मक विचार करून, टेन्शन आणि स्ट्रेस घेऊन परिस्थिती काहीच बदलणार नाही.

हे आपल्याला माहीत आहे तर आपण तसे का करावे?

यापेक्षा जर आपण आपल्या हातात जे आहे त्यावर जास्त लक्ष केंद्रित केले तर?

आपल्या प्रत्येक दिवसात सकारात्मकता आणली तर जे आपल्या हाताबाहेरचे आहे त्याचाशी आपण चांगल्या प्रकारे सामना करू शकू, हो ना?

या दिवसात, सकारात्मक राहा हा सल्ला देणारे कित्येक फेसबुक लाईव्ह, वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही पाहिले असतील, इतका की कदाचित हे ऐकून पण तुम्हाला आता कंटाळा येऊ लागला असेल.

या सल्ल्यावर एक हमखास उत्तर असे असते की ‘बोलायला सोपे असते… करायला नाही..’ बरोबर ना?

पण आम्ही या लेखात अशी काही महत्वाची माहिती दिली आहे, जी नीट वाचून, समजून घेतली तर सकारात्मकता नुसती बोलण्यापुरती मर्यादित राहणार नाही तर ती आचरणात आणणे ही सोपे होईल.

१. भावना म्हणजे नक्की काय?

आपण जेव्हा म्हणतो की ‘हा’ आयुष्यात अत्यंत सकारात्मक आहे किंवा ‘ती’ सगळ्याच बाबतीत नकारात्मक आहे तेव्हा आपल्याला नक्की काय म्हणायचे असते?

ही सकारात्मकता किंवा नकारात्मकता म्हणजे काय?

या भावना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर, आपल्या स्वतःच्या मूडवर आणि काही प्रमाणात आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वागणुकीवर अवलंबून असतात.

भावना म्हणजे काय हे समजून घेणे काही तितकीशी सोपी गोष्ट नव्हे.

पण अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे आपल्याला जे वाटते त्या आपल्या भावना असतात.

म्हणजेच आपण जर एखादा अपघात बघितला तर आपल्याला नकारात्मक वाटते, वाईट वाटते पण जर एखादे गोड कुत्र्याचे पिल्लू बघितले की आनंद होतो.

असेच आठवणींच्या बाबतीत सुद्धा होते. चांगल्या आठवणी आपल्याला आनंद देऊन जातात तर वाईट गोष्टींच्या आठवणी नकोशा होतात.

अशा या चांगल्या आणि वाईट भावना आपल्याला वेळोवेळी, वेगवेगळ्या कारणांमुळे येत असतात.

सकारात्मक भावनांचा अर्थातच आपल्या आयुष्यावर चांगला परिणाम होत असतो पण कितीही नाही म्हटले तरी या वाईट, नकारात्मक भावना सुद्धा प्रत्येकाच्या मनात येतातच.

त्यांना पूर्णपणे थोपवणे शक्य नाही.

पण जर आपल्या मनात सारख्या नकारात्मक भावना येत असतील तर ते आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारकच आहे.

मग जर या वाईट किंवा नकारात्मक भावनांवर आपला ताबा नसतो तर आपल्या हातात काय असते?

आपल्या हातात या भावनांचा समतोल राखणे आहे.

प्रयत्न करून नकारात्मक भावना कमी करून सकारात्मकता वाढवणे हेच आपल्या हातात आहे आणि त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत.

का? सकारात्मक भावनांमुळे नेमके काय होते? हे आपण पुढे बघू.

२. सकारात्मक भावनांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

सकारात्मकतेचा संबंध केवळ आपल्या मानसिक आरोग्याशीच नाही तर आपल्या शारीरिक आरोग्याशी सुद्धा आहे.

सकारात्मक विचार केल्याने आपल्या मनावरचा अतिरिक्त ताण तर कमी होतोच, पण त्याचबरोबर सकारात्मक विचारांचा आपल्याला रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आपल्या एकूण निरोगी आयुष्यासाठी फायदा होतो.

समजण्यासाठी सोपे जावे म्हणून आपण एक उदाहरण बघू.

समजा तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या चांगल्या घटनेची आठवण झाली तर काय होते?

तुम्हाला तुमच्याही नकळत हसू येते आणि एकदम उत्साही वाटायला लागते.

तुम्हाला या गोष्टीचा नक्की अनुभव आला असेल की या उत्साहाच्या भरात तुम्ही तुमची कामे किंवा इतर व्यवधाने जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकता.

पण समजा तुम्हाला अचानक एखादी वाईट घटना आठवली तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो?

नवीन काही करावेसे तर वाटत नाहीच पण असलेली उर्जा सुद्धा जाते आणि यामुळे येणाऱ्या नकारात्मकतेतून काहीच निष्पन्न होत नाही.

३. आपला आपल्या भावनांवर ताबा असतो का?

वरच्या दोन्ही मुद्यातून एक महत्वाची गोष्ट अधोरेखित झाली, ती म्हणजे आपल्या भावना या बाह्य गोष्टींवर अवलंबून असतात.

एखाद्या गोष्टीवरची आपली प्रतिक्रिया म्हणजेच आपल्याला त्या त्या वेळी वाटणाऱ्या भावना.

मग आपण त्यावर ताबा मिळवू शकतो का? तर हो!

कदाचित एखादी घटना घडल्यावर लगेच आपल्याला आपल्या भावना ताब्यात ठेवणे जमणार नाही पण थोडा वेळ गेल्यावर आपण त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर येऊ शकतो.

एखाद्या गोष्टीवर आपली उत्फूर्त प्रतिक्रिया, म्हणजे त्या वेळेची आपली भावना.

ती खरेतर तेवढ्यापुरती मर्यादित असायला हवी पण आपण सतत त्या गोष्टीचा विचार करून, त्याद्द्ल सतत बोलून त्यात अडकून पडतो.

यामुळे एक साखळीच तयार होते आणि नकारात्मक विचार तुमच्या मनात घर करायला लागतात.

पण ही साखळी तोडणे आपल्याच हातात आहे.

सतत एखाद्या वाईट गोष्टीचा विचार करत राहिल्याने तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी कशा घडतील?

त्या घडण्यासाठी आणि मनात सकारात्मक भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न तर करायला हवेत, हो ना?

४. सकारात्मक भावना कशा निर्माण करायच्या?

भावनांवर ताबा असतो, म्हणजेच आपल्याला आपल्या भवना बदलता येऊ शकतात.

वाईट वाटणे हे अत्यंत नैसर्गिक आहे, त्यामुळे असे नक्कीच होऊ शकत नाही की कसलेच वाईट वाटत नाही, कसलीही भीती वाटत नाही, पण असे नक्कीच होऊ शकते की या नकारात्मक भावना येऊन गेल्यावर आपण सकारात्मक भावना येण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करू शकतो.

ते कसे?

वर आपण बघितलेच आहे की आपल्या भावना या आपल्या विचारांवर आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतात.

मग त्या बदलायला साहजिकच आपल्याला आपले विचार बदलावे लागतील.

सुरुवातील एखाद्या नकारात्मक भावनेतून बाहेर पडणे हे तितकेसे सोपे नसेल, आपण त्याच विचारात अडकून पडू पण आपण जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर हे शक्य आहे.

तर या सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी काय करता येऊ शकते?

१. डोळे बंद करून एखाद्या छानशा आठवणीत रमल्याने मनात चांगल्या भावना निर्माण होतात आणि नकारात्मक भावना नष्ट होतात.

२. आपल्या छंदात मन रमवले तर आपल्याला आनंद होतो.

३. नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून लांब राहिल्याने आपली नकारात्मकता खूप प्रमाणात कमी होते.

४. एखाद्या लहान मुलाशी खेळण्याने आपल्याला निर्मळ आनंद मिळतो, त्यामुळे मनात नकारात्मक भावना घर करून असतील तर हा एक उत्तम पर्याय आहे.

५. कधी कधी नकारात्मक भावनांमुळे आपलाच आत्मविश्वास ढासळतो, अशा वेळी आपली एखादी जुनी कामगिरी, ज्यामुळे आपला आपल्या स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्यांना अभिमान वाटला होता, आठवून बघितली तर क्षणात आपला मूड बदलू शकतो.

भावना म्हणजे काय आणि त्या ताब्यात ठेवता येतात हे आपल्याला आज समजले.

या भावना ताब्यात ठेवण्याचे काही सोपे उपाय सुद्धा आपण बघितले. पण तुम्हाला काय वाटते?

हे वाचून तुम्ही तुमच्या नकारात्मक भावना बदलून सकारात्मकता वाढवण्यासाठी काय कराल?

हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद

आणि सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

1 COMMENT

  1. तुमच्या आयुष्यात काही समस्या, अडचणी आहेत का?
    # जर नसतील तर मग काळजी किंवा चिंता करण्याचे कारण काय?
    # जर असतील तर त्या सोडवण्यासाठी तुमच्या जवळ काही उपाय योजना असतील तर मग काळजी किंवा चिंता करण्याचे कारण काय?
    # जर असतील आणि त्या सोडवण्यासाठी तुमच्या हातात काही नाही तर मग काळजी किंवा चिंता करण्याचे कारण काय? – गौर गोपाल दास आपल्या संभाषणात नेहमी वरील उदाहरण देतात.
    आपल्या मनात काही कारणामुळे, अडचणी मुळे काळजी चिंता वाटायला लागते, नकारत्मक विचार येतात त्या वेळी आपण वरील उदाहरणाचा विचार केला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.