सुट्टीनंतर कामावर परत जाणे जीवावर आले आहे ना? मग हा लेख वाचा

साधा शनिवार रविवारला जोडून एखादी सुट्टी आली तरी ती संपवून परत कामाला सुरुवात करताना आपल्याला कंटाळा येतो.

मग आता तर दिवाळी संपून कामाला जायचे, म्हणजे अनेक लोकांच्या खरोखरच जीवावर आले असेल.

फराळ, मिठाई खाऊन, खरेदी करून, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याबरोबर वेळ घालवून परत काम सुरु करायचा कंटाळा नाही आला, तरच नवल आहे.

पण काही झाले तरी कामाला परत सुरुवात करावी लागतेच.

त्याला काहीच पर्याय नसतो. आता दिवाळी संपून दोन दिवस होऊन गेले, काहींची सुटी संपून कामाला सुरुवात झाली सुद्धा असेल तर काहींची येत्या एकदोन दिवसात होईल.

ज्यांनी कामाला सुरुवात केली आहे त्यांना कामाला गेल्यावर सुद्धा कामात लक्ष न लागणे, काम करावेसे न वाटणे, कंटाळा येणे, वेळेत कामे पूर्ण न होणे यासारखे त्रास कदाचित होत असतील.

ते साहजिकच आहे. सुटीनंतर परत रुटीन सुरु करणे अवघड जातेच.

पण आपण जे काही काम करतो त्यात आपले अगदी १०० टक्के लक्ष असले पाहिजे, आपले काम मन लाऊन केले तरच आपली प्रगती होते.

आपले काम वेळेत आणि योग्य तर्हेने पूर्ण झाले की आपल्याला सुद्धा समाधान मिळते हो ना?

पण सुटीनंतर मात्र हे करणे अवघड जाते.

म्हणूनच या लेखात आम्ही अशा काही सोप्या टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा हा कंटाळा जाऊन तुम्ही परत कामात लक्ष एकाग्र करू शकाल.

दिवाळी संपून कामाला सुरुवात केली असेल तरीही किंवा कामावर पुन्हा रुजू होण्याच्या आधी ही, हा लेख वाचून नक्कीच फायदा होईल.

इतकेच काय, अगदी गृहिणींना सुद्धा सुटीनंतर, सगळे आपापल्या कामाला लागल्यावर घर आवरणे, न वापरातल्या वस्तू परत जागच्या जागी ठेऊन देणे, गोडाधोडाचे संपवून परत नेहमीच्या स्वयंपाकाला लागणे या गोष्टी करायचा कंटाळा आलेला असतो.

पण या लेखातल्या टिप्स त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक ठरतील याची आम्हाला नक्कीच खात्री आहे.

१. सलग कामे संपवण्याच्या पाठीमागे लागू नका

सुटीनंतर कामाची मोठी यादीच आपल्यासमोर असते. सुटीत साठलेली, आधीची काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करायची असतात.

पण ही कामे सलग जर एकामागोमाग एक आपण करायला लागलो तर काही वेळाने आपले लक्ष विचलित होऊ शकते.

मग आपण करत असलेली कामे व्यवस्थित पूर्ण तर होत नाहीतच शिवाय सलग, सतत काम करत राहिल्याने आपल्याला कंटाळा येतो.

म्हणूनच जर तुमच्या पुढे कामाची यादी असेल तर त्यातले एकेक काम करावे, ते करून झाल्यावर दुसरे काम करण्याआधी दहा मिनिटे इतर काहीतरी करावे.

या वेळात आपल्या एखाद्या सहकार्याशी बोलणे, उठून हात वर करून, थोडे चालून येऊन अंग मोकळे करणे, घरी फोन करणे किंवा अगदी आपल्या जागेवर शांत बसणे यापैकी काहीतरी करता येईल.

फक्त हे करताना एका गोष्टीचे भान बाळगले पाहिजे की दोन कामांच्या मध्ये ठेवत असलेला ब्रेक हा ठराविक वेळेचाच हवा नाहीतर ब्रेक मध्ये इतर गोष्टीत रमून कामे तशीच राहायची शक्यता असते.

असे केल्याने दोन कामांच्या मध्ये ब्रेक मिळेल आणि एक काम संपले की दुसरे सुरु करताना कंटाळा न येता उत्साह टिकून राहील.

यामुळे कदाचित कामांची यादी संपायला जास्त वेळ लागेल ही पण फ्रेश मनाने केल्यामुळे सगळी कामे व्यवस्थित होतील आणि त्यामुळे ती परत परत करावी लागणार नाहीत.

२. काम संपवल्यावर स्वतःला छोटीशी ट्रीट द्या

लहान मुलांना आपण एखादे काम करण्यासाठी काहीतरी आमिष दाखवतो, जसे की आज तू तुझे कपाट आवरलेस तर रात्री जेवणात तुझ्या आवडीची भाजी करू.

मग आपल्याला आवडीचे जेवायला मिळणार या उत्साहात मुले त्यांना सांगितलेली काम पूर्ण करतात.

आपले मोठ्या माणसांचे ही मन फार काही वेगळे नसते.

फक्त आपल्याला अशी आमिषे दाखवणारे कोणी नसते.

म्हणूनच मग आपणच आपल्याला ही आमिषे दाखवून आपल्या हातातील काम पूर्ण झाले की छोटीशी ट्रीट द्यायची.

समजा हातात कंटाळवाणी फाईल असेल आणि ती संपवण्याचा अगदी कंटाळा आला असेल तर ते काम संपल्यावर आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची, कॉफी प्यायची किंवा काहीतरी खायचे असे आधीच ठरवून ठेवायचे.

मग आपल्याला आपल्या आवडीची गोष्ट करायला मिळणार याचा विचार करता करता आपले काम पटकन होऊन जाते.

अशी युक्ती फक्त कंटाळवाण्या कामासाठीच नाही तर एरवी सुद्धा वापरल्याने कामे लवकर पूर्ण होतात.

आपली ही ट्रीट काही ठराविक कामा पुरती मर्यादित न ठेवता आपली सगळे कामे आटोपल्यावर सुद्धा देता येते.

जसे की आज सगळी कामे पूर्ण झाली तर दिवसाच्या शेवटी घरी जाताना आपल्या आवडीचे काहीतरी खायला घेऊन जाऊ, किंवा रात्री आवडीचे पुस्तक वाचू असे स्वतःला सांगून कामाची सुरुवात केली तर दिवसभर उत्साह नक्की टिकून राहील.

आपल्याला कोणती ट्रीट आवडेल, दिवसाच्या शेवटी एकदम मोठी? का मध्ये मध्ये लहान लहान?

याचा विचार करून या युक्तीचा वापर करता येईल.

घर आवरताना सुद्धा ही युक्ती वापरता येऊ शकेल.

एक खोली आवरून झाली की काही वेळ आराम करताना आपल्या आवडीची एखादी गोष्ट आवर्जून करायची म्हणजे उत्साह टिकून राहतो.

३. कामांची यादी करायची पद्धत बदला

आपल्याला टू डू लिस्ट करायची सवय असतेच पण सुटीनंतर काय होते की कामांची ही यादी प्रचंड लांबलचक झालेली असते.

आणि नवनवीन कामे येत असतातच.

अशावेळेला आपण आपल्या टू डू लिस्ट मध्ये ही कामे येतील तशी लिहित जातो.

ही यादी मोठीच्या मोठी बघूनच टेन्शन येते.

यादीतील नेमकी कोणती कामे करायची हेच आपल्याला समजेनासे होते.

अशावेळेस मग आपण त्या यादीतील आपल्याला सोपी वाटणारी कामे आधी करायला घेतो.

पण काही वेळा ही सोपी कामे बिनमहत्वाची असू शकतात आणि केवळ ती सोपी आहेत म्हणून आपण ती करायला घेतो.

यामुळे महत्वाची कामे राहून जातात. म्हणून आपल्या टू डू लिस्ट मधून चार अतिशय महत्वाची कामे बाजूला काढायची आणि त्यांची वेगळी यादी करायची.

आता आपल्या यादीत चारच कामे असतात त्यामुळे ती करायला सुद्धा आपल्याला उत्साह वाटतो.

छोट्या यादीतील चार कामे संपली की मग मोठ्या यादीतून आणखी चार कामे निवडून त्यात लिहायची.

अशाप्रकारे आपली टू डू लिस्ट तुकड्यातुकड्यात पूर्ण केली तर आपली कामे लवकर होतात आणि मुख्य म्हणजे महत्वाची कामे आधी पूर्ण होतात.

४. इतरांची मदत घ्या

बहुतेक वेळा आपल्याला इतरांची मदत घ्यायला कमीपणा किंवा भीती वाटते पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सगळीच कामे आपण स्वतः करायची काहीच गरज नाही.

त्यामुळे शक्य असल्यास काही कामांसाठी इतरांची मदत घेतली पाहिजे.

कधीकधी आपल्याला उत्साह वाटत नाही, कामच करावेसे वाटत नाही अशावेळेला सुद्धा आपण आपल्या एखाद्या मित्राशी किंवा सहकार्याशी बोलून, गप्पा मारून एकप्रकारे त्याची मदतच घेऊ शकतो.

कामाचा कंटाळा येणे हे साहजिकच आहे. मोठ्या सुटीनंतर किंवा कामाचा अति ताण असेल तरीही हा कंटाळा येऊ शकतो पण त्यासाठी आपण कोणाची मदत कशी घेतो हे महत्वाचे आहे.

एखाद्या मित्राबरोबर कॉफी प्यायला गेल्याने, बसून गप्पा मारल्याने, कधीतरी फोन करून बोलल्याने आपली मरगळ जाते आणि आपल्याला परत उत्साह वाटू लागतो.

म्हणूनच आपली समस्या काहीही असो, इतरांची मदत मागताना किंवा स्वीकारताना आपल्याला लाज वाटता कामा नये.

५. कितीही कंटाळा असला तरी सुरुवात करा

सगळ्यात कठीण असते ती सुरुवात. कंटाळा, मरगळ दूर सारून सुरुवात करायला आपले मन नकार देत असते.

पण बहुतेक वेळा एकदा का सुरुवात झाली की आपण आपल्या सवयीने कामे करू लागतो आणि आपल्या सरावाची कामे आपल्याकडून व्यवस्थित पूर्ण सुद्धा होतात.

पण ही सुरुवात करायलाच आपण तयार नसतो. म्हणूनच सुरुवातीला सोप्या, लहान कामापासून सुरुवात केली तर आपल्यात अपोआप उत्साह येतो.

अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर कामाच्या आधी टेबल आवरताना बराच पसारा असेल तर आपल्याला सुरुवात कुठून करायची हा प्रश्न पडतो.

अशावेळेला इतर काही आवरण्यापेक्षा टेबलवरची पेन्स उचलून नीट ठेवायची.

ही लहानशी सुरुवात एकदा केली की उरलेले टेबल आपले व्यवस्थित आवरून होते. पण नक्की काय करू?

टेबल हे एक उदाहरण झालं, कपाट आवरण्याच्या बाबतीत हा उपाय करून बघायला काहीही हरकत नाही.

काय उचलू? कसे उचलू? याचा विचार आपण करत राहिलो तर आपले काम होणार नाही.

म्हणूनच कितीही लहान असली तरी सुरुवात आपण केली पाहिजे, आणि ही सुरुवात करायला वरील चार टिप्स आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरतीलच..

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “सुट्टीनंतर कामावर परत जाणे जीवावर आले आहे ना? मग हा लेख वाचा”

  1. खुप मस्त टिप्स दिल्या आहेत.
    धन्यवाद 🙏

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय