आपल्या गरजा आणि खर्च याचा ताळमेळ बसवण्यासाठी ८ सूत्रं

आपल्या सर्व गरजांचा विचार करून आपले महिन्याचे बजेट कसे बनवावे या प्रश्नाचे उत्तर सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा लेख.

यातील काही गोष्टी आपल्याला माहीत आहे, असे जरी वाटत असेल तरी हा लेख शेवटपर्यंत नीट वाचला तर आपले महिन्याचे सुयोग्य बजेट बनवण्याची सवय तुम्हाला लागेल.

पैसे कमावणे जितके महत्वाचे आहे तितकीच बचत महत्वाची आहे.

बचत करण्यामागचा हेतू भविष्याची तरतूद, मुलांचे शिक्षण, रिटायरमेंट नंतर साठी, नवीन गाडी किंवा घर घेण्यासाठी असा काहीही असू शकतो.

कमावलेल्या पैशांची बचत कशी करायची याबद्दल मागे एका लेखात सांगितले होते.

या लेखाच्या सुरुवातीला सुद्धा बचतीचे महत्व याचसाठी अधोरेखीर करत आहोत की ही बचत करण्यासाठी सगळ्यात मोठी आणि गरजेची जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे पैशांचे योग्य नियोजन म्हणजे आपल्या गरजा बघून आपल्यासाठी योग्य असे बजेट आखणे.

आलेल्याकडचे किती पैसे खर्चासाठी ठेवायचे आणि कितीची बचत करायची हे एक गणित आहे आणि ते जर आपल्याला सोडवता आले तर आपल्याला नक्कीच बचत कशी करायची हे समजेल.

या लेखात आज आपण हेच बघणार आहोत की पैशांची बचत करायला सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या गरजा बघून बजेट कसे आखावे.

१. महिन्याच्या जमा होणाऱ्या पैशांचा हिशोब मांडा

पैशांचे नियोजन करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे दर महिन्याला आपल्या घरात एकूण येणारे पैसे किती आहेत याची अचूकपणे नोंद ठेवणे.

आपल्याकडे एकूण किती पैसे येतात हे जरी आपल्याला साधारणपणे माहीत असले तरी. योग्य पध्दतीने नियोजन घरातील करण्यासाठी एकूण मिळकतीची नोंद ठेवणे गरजेचे आहे.

जे नोकरी करतात त्यांच्यासाठी हे अगदी सोपे आहे. महिन्याला सॅलरी अकाऊंटमध्ये जमा होणारे पैसे ही त्या महिन्याची मिळकत.

त्यात मग काही एफडी असतील तर त्याचे व्याज, इतर काही ठिकाणहून पैसे येत असतील, जसे की एखादे घर भाड्याने दिले असेल तर त्या घराचे भाडे, या सगळ्याची बेरीज करून आपल्याकडे बँकेच्या खात्यात आणि कॅश स्वरूपात किती पैसे येतात याचा हिशोब करून त्याची नोंद आपण ठेऊ शकतो.

बिझिनेस किंवा फ्री लान्सिंग करणाऱ्या लोकांसाठी हे जरा किचकट काम असू शकते पण अशावेळी या लोकांना महिन्याचे सारासार उत्पन्न ठरवून त्याची नोंद करून ठेवता येते.

२. महिन्याच्या खर्चाचा हिशोब मांडा

तुम्हाला जमत असेल तर एक्सेलमध्ये किंवा साधा कागद पेन वापरून सुद्धा हे करता येईल.

एकदा आपल्याकडे जमा होणाऱ्या पैशांचा आकडा समजला की खर्चाचा हिशोब मांडणे ही पैशांचे योग्य पद्धतीने नियोजन करण्याची दुसरी पायरी आहे.

महिन्याला आपले किती खर्च आहेत हे लिहून काढून खर्चाचा हिशोब मांडण्याची सुरुवात करता येते.

महिन्याला घर भाडे असेल तर त्यासाठी किती पैसे खर्च होतात, घर किंवा गाडीच्या हफ्त्याला किती पैसे जातात, पेट्रोल, बस/रिक्षा, किराणा, भाजी, हॉटेलिंग हे सगळे खर्च लिहून काढायचे.

हे खर्च नक्की किती होतात हे समजण्यासाठी कदाचित एक दोन महिने लागतील पण एकदा सगळ्याचा अंदाज आला की मग हा जमा-खर्चाचा हिशोब मांडणे सोपे होऊन जाईल.

या हिशोब मांडल्यावर आपल्याला आपण कोणत्या गोष्टींसाठी किती पैसे खर्च करतो आणि तो खर्च योग्य आहे का हे समजते.

यासाठी आपण खर्चाचे वर्गीकरण करू शकतो, उदाहरणार्थ, प्रवासासाठी लागणारा खर्च, शानशौकीसाठी होणारा खर्च, महिन्याचे सामान भरण्याचा खर्च, औषधांसाठी होणारा खर्च इतर खरेदीसाठी होणारा खर्च.

यावरून आपल्याला आपल्या गरजेचे खर्च आणि वायफळ खर्च यांचे वर्गीकरण करून महिन्याचे बजेट ठरवता येईल.

३. खर्चाचे प्राधान्य ठरवा

महिन्याचे आपल्यापुरते बजेट ठरवण्याआधीची ही महत्वाची पायरी.

आपल्याला महिन्याभरात अनेक खर्च असतात, काही खर्च अचानक सुद्धा येऊ शकतात. पण हे अचानक येणारे खर्च सोडले तर कुठल्या कामासाठी आधी खर्च करायचा आणि कुठले काम नंतर केले तरी चालण्यासारखे आहे हे ठरवून घेतले पाहिजे.

समजायला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर घराचा हफ्ता या खर्चाला प्राधान्य दिले पाहिजे, एखाद्या समारंभासाठी नवीन ड्रेस घ्यायला नाही.

ही अगदी साधी वाटणारी गोष्ट असली तरी बऱ्याचदा आपल्याकडून तसे होत नाही, कारण आपण या लेखातील वरची पायरी आचरणात आणत नाही.

त्यामुळे पैसे खर्च करताना आपल्याला भान राहत नाही आणि महिन्याच्या शेवटी मात्र आपल्याला धक्का बसतो.

म्हणूनच जमा-खर्चाचा हिशोब मांडून झाल्यावर त्यात तातडीने आणि करायलाच हवेत अशा खर्चांना हायलाईट करून ठेवायचे म्हणजे आपल्याला बजेट आखणे ही पुढची पायरी व्यवस्थितपणे करता येते.

४. महिन्याचे बजेट आखा

आता आपल्याला तीन गोष्टी माहीत आहेत – आपण महिन्याला किती कमावतो, किती खर्च करतो आणि कोणत्या खर्चाला आपल्याला प्राधान्य द्यायचे आहे.

त्यामुळे आता महिन्याचे बजेट ठरवणे ही एक महत्वाची पायरी आपल्याला करायची आहे.

आपल्याला काय महत्वाचे आहे हे ठरवल्यानंतर त्यासाठी आपण महिन्याला किती खर्च करू शकतो, कुठे खर्च कमी करण्यासाठी वाव आहे का याचा आढावा घेतला पाहिजे.

प्रत्येक महिन्याचे साधारण ठरलेले बजेट असले तरी दर महिन्याला काही गोष्टींचे प्राधन्य बदलू शकते म्हणून हे बजेटचे काम दर महिन्याच्या सुरुवातीला केले पाहिजे.

एखाद्या महिन्यात जर काही कारणाने एखाद्या गोष्टीवर आपला खर्च जास्त होणार असेल तर त्या महिन्यात इतर कुठल्या खर्चाला आपण आळा घालू शकतो हे ओळखले तर टाळता न येण्यासारखा जो खर्च असतो तो करता येतो आणि तसे करताना आपले बजेट सुद्धा हलत नाही.

५. तुमच्या बजेटचे नेमाने पालन करा

महिन्याला बजेट ठरवताना जो उत्साह असतो तो सहसा एक दोन आठवडे टिकतो.

पण बऱ्याचदा असे होऊ शकते की नंतर आपल्याला सतत बजेट बघून खर्च करायचा कंटाळा यायला लागतो.

पण कितीही कंटाळा आला तरी बजेटप्रमाणे खर्च करायची सवयच आपण लाऊन घेतली पाहिजे.

कदाचित हे करताना, सुरुवातीला एकदोन महिने अंदाज घ्यावा लागेल, काही वेळा बजेट चुकेल पण या गोष्टी गुहीत धरूनच या नियोजनाला सुरुवात केली तर आपली निराशा होणार नाही.

तर पुढे याचा फायदा तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी होईल हे निश्चित.

म्हणूनच सुरुवातीला वेळ लागला तरी चालेल, पण हे बजेटचे गणित नीट जमवून ते नेमाने आणि मनापासून पाळण्याचा पण केला पाहिजे.

६. अचानक येणारे खर्च गृहीत धरा

एखादा समारंभ, त्यासाठी घ्यावी लागणारी गिफ्ट, किरकोळ किंवा गंभीर आजारपण, औषधे घरातली एखादी वस्तू बिघडली तर ती दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन वस्तू घेण्यासाठी लागणारे पैसे हे काही आपण बजेटमध्ये धरू शकत नाही.

हे खर्च अचानक येणारे असतात त्यामुळे ते किती येतील, कधी येतील हे सांगता येत नाही. पण हे खर्च गृहीत धरून त्यासाठी काही सेव्हिंग तयार पाहिजेत जेणेकरून आपत्कालीन परीस्थितीत ते वापरता येतील.

या अचानक येणाऱ्या खर्चांसाठी महिन्याच्या खर्चातून काही पैसे बाजूला ठेवायची सवय लाऊन घेतली तर आपल्याला अडीअडचणीच्या काळात ते वापरायला होतील.

याचा विचार करून योग्य ते नियोजन केले पाहिजे. यासाठी आपल्या बँकेच्या खात्यातील काही ठराविक रक्कम कायम तशीच राहावी, खर्च होऊ नये याच्यासाठी तरतूद केली पाहिजे.

अशा रिझर्व्ह फंड बद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेला लेख वाचता येईल.

https://www.manachetalks.com/11130/what-is-imergency-fund-marathi/

७. दर महिन्याला काही बचत कराच

तुम्ही तरुण असलात, बचतीची तितकीशी गरज वाटत नसली तरी हातात पैसे यायला लागल्यापासून ठराविक रकमेची बचत करण्याची सवयच घालून घ्या.

यासाठी वेगळे बचत खाते उघडले तर फारच चांगले. या खात्यात दर महिन्याला बजेट ठरवून झाल्यावर अमुक एक रक्कम ठेवण्याची सवय लावून घेता येईल.

दर महिन्याला काही एक ठरलेली रक्कम ठेवता येईल असे नाही, काही महिन्यात खर्च जास्त होतील तर काही महिन्यात कमी.

पण कितीही जास्त खर्च झाले तरी छोटीशी का होईना पण बचत ही केलीच पाहिजे. महिन्याचे बजेट आखताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

८. वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ घ्या

आपल्या आजूबाजूला सतत अनेक ऑफर्स चालू असतात.

बऱ्याचदा आपण या ऑफर्सचा नीट अभ्यास करण्याचा आळशीपणा करतो पण कोणत्या बँकेच्या कार्डवर कोणत्या ऑफर्स आहेत, कोणते मोबाईल नेटवर्क जास्त स्वस्त आहे या गोष्टी आपण बारकाईने बघितल्या पाहिजेत.

या गोष्टी अगदी किरकोळ वाटत असल्या तरी ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या युक्तीने त्याचा बराच फायदा होतो.

हा फायदा करून घेण्यात आपल्याला कोणताही कमीपणा वाटता कामा नये.

अनेकदा आपल्या नोकरीतून सुद्धा आपल्याला अनेक फायदे असतात जसे की काहींचे फोन बिल कंपनी भरते, काहींना पेट्रोलचा खर्च कंपनीकडून मिळतो.

ही सगळी माहिती मिळवून आपण योग्य पद्धतीने नियोजन केले तर बरेच खर्च कमी होऊ शकतात.

या ऑफर्समध्ये केवळ वेगवेगळे सेल्स किंवा डिस्काऊंट हे अभिप्रेत नाहीत.

खरेतर हे डिस्काऊंट सेल असतात तेव्हा त्यात आपल्याला विकत घ्यावीशी वाटणारी जो गोष्ट असते तिची आपल्याला खरोखर गरज आहे का केवळ त्या ऑफरला भुलून आपण ती विकत घेत आहोत हा प्रश्न स्वतःला विचारल्याने अनेक खर्च टळू शकतात.

इलेक्ट्रिसिटी बिल वेळेच्या आधी भरून त्यातील सूट मिळवता येऊ शकते. शिवाय कामाचे नियोजन करण्याची सुद्धा सवय लागते.

हे सगळे करणे सोपे नाही. या सगळ्या टिप्स फॉलो करून, आपले बजेट सेट व्हायला तीन चार महिने सहज लागू शकतात.

या महिन्यात ठरवले आणि लगेच जमले असे होणार नाहीच.

पण यामुळे खचून न जाता या ८ गोष्टी जर कटाक्षाने पाळून आपल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन केले तर त्याचा बचतीसाठी नक्कीच फायदा होईल.

महिन्याचे बजेट नीट आखण्याची पूर्वतयारी कशी करावी यासाठी हा लेख वाचा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “आपल्या गरजा आणि खर्च याचा ताळमेळ बसवण्यासाठी ८ सूत्रं”

  1. अर्थसाक्षर साठी खुप उपयुक्त माहिती.
    धन्यवाद.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय