सतत कंटाळल्या सारखे वाटते? जाणून घ्या, त्या मागची कारणे आणि उपाय

सतत कंटाळल्या सारखे वाटते? जाणून घ्या त्या मागची कारणे आणि उपाय

तुम्हाला सुद्धा ‘कंटाळा’ येत असेलच ना बरेचदा!! आणि हा कंटाळा आला की सगळंच निरस वाटायला लागतं. तुमची इफीशीयन्सी कमी होते.

या लेखात आपण दैनदिन जीवनात काम करताना विनाकारण अथवा काही कारणांमुळे येणारा कंटाळा, त्याची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यासंबंधी माहिती घेणार आहोत.

पण ‘कंटाळा न येण्यासाठी काय करावे’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी आपल्या कंटाळ्याचं मूळ काय हे आधी तुम्हाला शोधावे लागेल…

१. काम नसल्याने येणारा कंटाळा

आजच्या काळात आपण सर्वचजण कोरोनाच्या संकटकाळातुन जात आहोत.

गेले काही महिने सगळ्या जगासाठी आत्यंतिक तणावपूर्ण गेलेत.

कित्येकांनी आपल्या नोकऱ्या, आपल्या कुटूंबातील जिवलग व्यक्ती असं काही काही गमवलं आहे.

सगळे यातून हळूहळू सावरत आहोत. आणि संकटातून बाहेर येत आहोत.

चार महिने घरात राहून सगळेच कंटाळले आहेत. आणि आता लॉकडाऊन अनलॉक होत आहे.

सतत घरात असल्याने आणि काहीच काम नसल्याने आता सगळ्यांना ऑफिसमध्ये जाण्याचा, बाहेर जाऊन खरेदी वगैरे करण्याचा देखील कंटाळा येत आहे.

एकदम चार महिने आराम आणि मग अचानक दैनंदिन दिवसाच्या कामकाजा संबंधी काम सुरू झाल्याने, काम करण्याचा अनेकांना अतिशय कंटाळा येत असल्याचे चित्र दिसून यायला लागले.

लॉकडाऊनमुळे अनेकजण सुस्तावल्या सारखे झाले.

काम करण्यात कंटाळा येत असल्याने लोकांमध्ये कमालीचा निरुत्साह आला असल्याचे दिसते.

२. शारीरिक समस्या

सध्याची परिस्थिती लक्षात घेता माणसाचे आयुष्य सुखासीनतेकडे वळत असल्याचे दिसून येते.

प्रत्येक क्षेत्रातली कमालीची स्पर्धा, वाढत्या गरजा, त्या भागवण्यासाठी धावाधाव…

यशाच्या मागे वेगाने धावता धावता आपल्याला अनेक शारीरिक समस्या ही उद्भवतात, पण परिस्थितीमुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करून आपली वाटचाल चालू ठेवतो आणि मग त्याचे पर्यवसन बरेचदा मोठ्या दुखण्यामध्ये सुद्धा होते.

आणि शिवाय वेगवेगळ्या कारणांनी शारीरिक मानसिक तणाव हे आजच्या जगात नॉर्मल होऊन गेलेले आहे.

अशा वेळी दिवसरात्र मेहनत केल्याने अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.

पण कामाच्या नादात त्याकडे दुर्लक्ष होते. आणि कालांतराने त्याचा परिणाम म्हणून माणसाला थकवा जाणवू लागतो आणि याची परिणीती नंतर कंटाळा येण्यात, निरुत्साह होण्यात होते.

तुम्ही स्वतः सुद्धा अनुभवलं असेलंच की, खूपवेळा कंटाळा येण्याचे ‘शारीरिक थकवा’ हे देखील महत्वाचे कारण ठरते.

जेवणाच्या वेळा न पाळल्याने, पुरेशी झोप न झाल्याने, सतत डोकं दुखल्याने देखील काम करण्याबाबत माणसाची चिडचिड होते आणि तो आपले काम पूर्ण करू शकत नाही.

३. प्रगतीपथावर पोहोचण्यात अडथळा

माणसाच्या आयुष्यात प्रगतीसाठी विशेष स्थान मिळाले आहे.

किंबहुना माणसाची प्रगती झाली म्हणजे तो यशस्वी आहे अशीच माणसाची ओळख निर्माण होते.

विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केली तर प्रगतीचा मार्ग अजून सुकर होतो असो म्हणतात.

म्हणूनच यशाच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी माणसाने सतत प्रयत्नशील असावे हे तर ओघाने येतेच…

पण आपले ध्येय गाठताना मार्गात अनेक प्रकारच्या अडीअडचणींचा सामना माणसाला करावा लागतो.

कित्येकदा यश समोर असून देखील आपण त्याच्या पर्यंत पोहोचूनही ध्येयप्राप्ती पासून वंचित राहतो.

सतत असे होत राहिल्याने देखील एखादाच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात.

व तो मनुष्य पुढे काम करण्यात सतत अपयश येते म्हणून प्रयत्न देखील करण्याचे सोडून देतो.

आणि पुढे जाऊन त्यास कामाचा कंटाळा देखील येतो.

काम करण्यास नेहमी कंटाळा केल्याने त्या माणसाची प्रगती खुंटते.

आणि माणसाची उत्तरोत्तर अधोगती होत जाते.

४. तणावपूर्ण परिस्थिती असेल तर

असं म्हणतात माणसाचे मन हे मोठ्या कृष्णविवरा सारखे अथांग असते.

ज्याच्यात अगणित विचार सतत सुरू असतात.

त्याच विचारांचा प्रभाव त्याच्या वागणुकीवर होत असतो.

सतत नकारात्मक विचार मनात आल्यास माणूस काम करण्यास कंटाळा करू लागतो.

सतत विचारात राहिल्याने त्याच्या मनात देखील काम करण्याबाबत नकारात्मक ऊर्जा तयार होत राहते.

अशी व्यक्ती कोणतेही काम सलग पूर्ण करू शकत नाही.

काम न झाल्याने भरपूर चिडचिड त्याच्या वागणुकीमध्ये होते.

आणि कामाचा सतत कंटाळा केल्याने कोणतेही काम करण्याची इच्छा देखील त्या व्यक्ती मध्ये राहत नाही.

आपण करायची कामं ती वयक्ती, दुसऱ्यावर ढकलू लागते.

याचे आणखी एक कारण म्हणजे, व्यक्ती एखाद्या आवडीच्या व्यक्ती पासून दुरावली असेल तर, किंवा तिच्या एखाद्या जिवलग व्यक्तीचा मृत्यु झाला असेल, अथवा कोर्ट-कचरेच्या तारखा असं काही क्लेशदायक परिस्थिती चालू असेल तरीही माणसाचे मन काहीही गोष्टी करण्यासाठी कचरते.

सतत एकाच विचारात मग्न असल्याने माणूस बाहेरच्या जगातून जवळ जवळ अलिप्तच होतो आणि एकाकी पडल्याने कामाच्या बाबतीत अजूनच आळशी होतो.

कोणतेही काम करण्याचा त्यास अतिशय कंटाळा येतो.

पण तरीही वरील काही कारणांमुळे अथवा काही वेगळ्या परिस्थितीमुळे तुम्हास सतत थकवा येत असल्यास तुम्हाला थोडावेळ थांबण्याची आणि त्याच्या मागच्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे.

वरील काही कारणांमुळे माणसाला कामाच्या बाबतीत येणारा कंटाळा आणि परिणाम आपण जाणून घेतले.

आता यावर करण्यात येऊ शकणाऱ्या उपाययोजना आपण पाहू.

कंटाळा घालवण्याचे सोपे उपाय

कामाचा कंटाळा नाहीसा करण्यासाठी आणि तणावरहित जीवन जगण्यासाठी आपण आपले छंद जोपासू शकता.

दैनंदिन कामाच्या व्यापातून थोडावेळ काढून गाणी ऐकावी, अथवा चित्र काढावे, छानसा चहा अथवा कॉफी ब्रेक घ्यावा, लांब कुठंतरी आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत फिरायला जावे.

ट्रेकची आवड असल्यास गड किल्ल्यांवर फिरायला जावे.

जेणेकरून परत आल्यावर काम करण्यास नवीन उत्साह मनात निर्माण होईल.

तसेच मनात कामाबाबत सतत निरुत्साह येत असेल, कंटाळा येत असेल तर वडीलधाऱ्या माणसांसोबत या समस्येवर चर्चा करावी, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

समुपदेशन वर्गात जाऊन त्यांची मदत घ्यावी.

आणि हा कंटाळा, निरुत्साह जर तुम्हाला निराशेच्या गर्तेत घेऊन घेऊन जात असेल तर चांगल्या मनोविकार तज्ञांचा सल्ला सुद्धा घ्यावा.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा कंटाळा घालवू शकता आणि आयुष्य कंटाळवाणे न जगता with Thriller नक्कीच जगू शकता..!

https://www.manachetalks.com/11493/how-to-avoid-laziness-marathi-personality-development/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!