भात आरोग्यासाठी चांगला की वाईट? भाताबद्दल समज-गैरसमज

भात आरोग्यासाठी चांगला की वाईट? भाताबद्दल समज-गैरसमज

भात आपल्या आरोग्यासाठी चांगला की वाईट? भाताबद्दल समज-गैरसमज या लेखात वाचा

भात खाल्याने वजन वाढते म्हणून वजन कमी करताना भात खाऊ नये, भातामुळे मधुमेह वाढण्याची शक्यता असते, भात खाल्ला की सुस्ती येते, भात खायचा तर शक्यतो दुपारीच खावा रात्री टाळावा, पांढऱ्या तांदळापेक्षा ब्राऊन राईस जास्त चांगला असतो…

अशा अनेक गोष्टी आपण सदैव ऐकत असतो.

खरेतर कोणत्याही बाबतीत दहा लोकांची दहा मते असतात आणि सगळेच आपल्या मतांच्या बाबतीत आग्रही असतात.

पण यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांचा मात्र गोंधळ उडतो.

नक्की काय खरे आणि काय खोटे असा संभ्रम निर्माण होतो आणि भात खावा का खाऊ नये, खाल्ला तर कधी आणि किती खावा असे प्रश्न उपस्थित होतात.

खरेतर आपल्या देशातच नाही, तर आशिया खंडातील अनेक देशांमधील मुख्य अन्न हे भातच आहे आणि या प्रदेशात प्रामुख्याने पांढऱ्या तांदळाचाच भात केला जातो.

या लेखात आपण आज याच भाताबद्दल असलेल्या समज-गैरसमजांबद्दल बोलणार आहोत.

भात आपल्या आरोग्यासाठी कसा चांगला आहे आणि कसा नाही हे या लेखात विस्तृतपणे आपण बघणार आहोत.

आम्हाला हे ही माहीत आहे की आपल्यापैकी अनेक जणांचा भात हा एक लाडका पदार्थ आहे त्यामुळे त्याचे गैरफायदे असले तरीही आपण तो आपल्या आहारातून पूर्णपणे वजा करू शकत नाही.

म्हणूनच या लेखाच्या शेवटी भात शिजवताना पाळायच्या काही महत्वाच्या हेल्दी टिप्स सुद्धा दिल्या आहेत,

ज्यामुळे तुम्हाला रोजच्या जेवणात भाताचा समावेश करताना कुठलीच गिल्ट वाटणार नाही.

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईस जास्त चांगला असतो असे म्हटले जाते.

खरेतर ब्राऊन राईस आणि पांढरा राईस हे काही वेगवेगळे नाहीत, फक्त आपणरोज जेवतो तो पांढरा तांदूळ हा प्रक्रिया केलेला असतो.

तांदळावर असलेले ब्रान आणि ह्स्क हे काढले की तो पांढरा होतो.

मग पांढऱ्या भाताच्या तुलनेत ब्राऊन राईस चांगला कसा?

तांदळाच्या दाण्यावर असलेल्या ब्रान आणि ह्स्कमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतात.

प्रक्रिया करून त्यावरचे फायबर काढले गेल्याने पांढऱ्या भातात केवळ कार्बोहायड्रेट्स अधिक प्रमाणात शिल्लक राहतात.

आपण अन्नातून जे कार्बोहायड्रेट्स खातो त्याचे आपल्या शरीरात साखरेत रुपांतर होते आणि ही साखर आपल्या रक्तात मिसळली जाऊन आपल्याला उर्जा मिळते.

काही पदार्थ असे असतात की त्यांच्यातील कार्बोहायड्रेट्सचे रुपांतर साखरेमध्ये अत्यंत जलद गतीने होते.

अशा पदार्थांना हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ असे म्हणतात.

अशा पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी फारसे चांगले नसते, ‘विशेषतः मधुमेह असणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करायचेत अशांसाठी‘….

यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जेवणानंतर अचानक वाढते, जे धोकादायक असू शकते.

लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ल्याने कार्बोहायड्रेट्सचे साखरेत रुपांतर होण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे दीर्घ काळासाठी पोट भरल्याची भावना राहते.

पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स ६४ आहे तर ब्राऊन राईसचा ५५. ५५ किंवा त्याच्या खाली असे पदार्थ हे लो ग्लायसेमिक इंडेक्सचे मानले जातात.

याशिवाय भाताच्या अतिजास्त सेवनाने वजन वाढते, मधुमेह, उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो.

याचे कारण वर दिलेले आहेच, ते म्हणजे जास्त प्रमाणात असलेले कार्बोहायड्रेट्स आणि कमी प्रमाणात असलेले फायबर.

अशा कोणत्याही पदार्थांमुळे हा धोका असतोच.

त्यामुळे असे म्हटले जाते की पांढऱ्या तांदळापेक्षा कोणतीच प्रक्रिया न केलेला ब्राऊन तांदूळ अधिक चांगला असतो.

पण काही व्याधी अशा असतात की ज्यामध्ये पांढरा भात अधिक लाभदायक ठरतो.

पांढऱ्या भातात फायबरचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने तो पचायला अतिशय हलका असतो.

म्हणूनच पोट बिघडल्यावर किवा ज्यांना पचनसंस्थेच्या इतर तक्रारी, पित्त, उलट्या असे त्रास असतील त्यांच्यासाठी पांढरा भात हा एक उत्तम पर्याय आहे.

बऱ्याच सर्जरीनंतर आपली पचनसंस्था अशक्त असते त्यावेळेला सुद्धा पचायला हलका, फायबरचे प्रमाण कमी असलेला असा भात खाण्याचा सल्ला दिला जातो.

हे खरे आहे की काही बाबतीत ब्राऊन राईस हा वरचढ ठरतो पण पांढऱ्या भाताचे सुद्धा बरेच फायदे आहेत.

पांढऱ्या तांदळात फोलेट जास्त प्रमाणात आढळतात. फोलेट हे रक्तातील हिमोग्लोबिन आणि तांबड्या रक्त पेशी वाढवण्यासाठी गरजेचे असते.

त्यामुळे पांढऱ्या भाताचे सेवन हे वाढत्या वयातील मुलांसाठी तसेच गरोदर महिलांसाठी लाभदायक ठरते.

वाढत्या वयाबरोबर पचनाच्या अनेक तक्रारी येतात. अशावेळी फायबरचे प्रमाण कमी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

अशा लोकांसाठी पांढरा तांदूळ लाभदायक ठरतो.

त्यामुळेच असे म्हणता येईल की या दोन्ही तांदळाच्या प्रकारात चांगला आणि वाईट असा एक प्रकार ठरवता येणार नाही.

आपल्या तब्येतीवर अवलंबून आपल्या आरोग्यासाठी योग्य तांदळाची निवड करता आली पाहिजे. या लेखात दोन्ही प्रकारच्या तांदळाची माहिती दिल्यामुळे ही निवड करणे सोपे जाईल.

पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्याला वजन कमी करायचे आहे किंवा मधुमेहाचा धोका टाळायचा आहे म्हणून पांढऱ्या तांदळाला आपल्या आहारातून पूर्णपणे वर्ज करून चालणार नाही कारण आपण लहानपणापासून तो खात आलो आहोत त्यामुळे त्याची आपल्याला सवय असते.

याशिवाय अनेकांना पांढऱ्या तांदळाचा भात मनापासून आवडतो.

बिर्याणी, पुलाव हे तर अनेकांचे जीव की प्राण असतात. काही भाताचे असे प्रकार ब्राऊन राईस वापरून केले तर चांगले लागणार नाहीत, हो न?

मग भात खाताना गिल्ट वाटू नये यासाठी तो शिजवताना काय काळजी घ्यायची, कोणत्या ट्रिक्स वापरायच्या ज्याच्यामुळे भात खाणे हे त्यातल्यात्यात हेल्दी होऊ शकेल हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

१. भात शिजवताना त्यामध्ये जास्त मीठ वापरू नये. भाताबरोबर घेत असलेल्या आमटी/वरण/कढी यामध्ये मीठ असतेच त्यामुळे भातातून जास्त मीठ घेणे कमी करता येऊ शकते.

२. भात खाताना जेवणात इतर ताज्या भाज्यांचा जास्तीतजास्त समावेश करा जेणेकरून तुमच्या शरीराला फायबर योग्य प्रमाणात मिळतील.

३. भात शिजल्यावर त्यात जिरे घालून खा. जिऱ्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण राहते.

४. भात शिजवताना त्यात अर्धा ते एक चमचा खोबरेल तेल घालून शिजवा. याने भातातील कॅलरीचे प्रमाण कमी होते.

५. भात शिजवताना त्यात एखाद दुसरी लवंग घाला. लवंग मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी लाभदायक असते.

कोणताही पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ला तर त्याचे दुष्परिणाम आहेतच. भाताचे सुद्धा काही वेगळे नाही.

आपल्या आरोग्यानुसार आणि तब्येतीनुसार आपण योग्य तांदळाची निवड केली पाहिजे आणि आहारातील इतर पदार्थांबरोबरच भात सुद्धा योग्य प्रमाणात घेतला पाहिजे.

भाताचे वेगवेगळे प्रकार करताना, वरील ट्रिक्स वापरून शिजवून खाल्ला तर ते एकदम अनहेल्दी होणार नाही जेणेकरून आपले आवडीचे पदार्थ खाताना गिल्ट येणार नाही.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो लेख भरपूर शेअर करा आणि आहाराबद्दल जागरूकता वाढवा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.