नवीन घर बुक करताय? मग या काही गोष्टी लक्षात असु द्या

नवीन घर घेताना या गोष्टी लक्षात घ्या

आपले स्वतःचे, हक्काचे घर असावे असे सगळ्यांचे स्वप्न असते.

आपल्या घरात आपण या रंगाचे पडदे लाऊ, बेडरूममध्ये असे फर्निचर करून घेऊ, आपल्या घराला बाल्कनी असायलाच हवी, ती आपण छान झाडांनी सजवू…

हे आणि अशी अजून कितीतरी वाक्ये आपण मनाशी घोकत असतो.

आपले स्वतःचे घर झाल्यावर काय करायचे याची मोठी यादीच आपल्याकडे तयार असते.

म्हणूनच आपण कमवायला लागल्यापासूनच आपली बचत सुरु होते, ती नवीन घर घेण्याच्या दृष्टीने.

इतकी वर्ष स्वप्ने रंगवल्यावर, घरासाठी नियमित बचत केल्यावर जेव्हा प्रत्यक्ष घर घेण्याची वेळ येते तेव्हा आपण बऱ्याच प्रमाणात ‘एक्सायटेड’ असतो.

याच अति उत्साहाच्या भरात आपल्याकडू काही गोष्टींकडे कानाडोळा होण्याची शक्यता असते.

आपले स्वप्न पूर्ण करायची आपल्याला घाई होते, ज्यामुळे आपण निर्णय घ्यायची घाई करतो.

पण घर घेणे ही एक प्रचंड मोठी गोष्ट आहे, आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा माईलस्टोनच असतो.

आपण घर काही सारखे सारखे घेत नाही त्यामुळे घर निवडताना दक्षता बाळगली नाही तर आपल्यावर पश्यातापाची वेळ येऊ शकते.

भाड्याचे घर घेऊन ते आवडले नाही तर करार संपल्यावर आपल्याला दुसरे घर बघता येते पण स्वतःच्या घराच्या बाबतीत असे करता येत नाही.

घराची निवड करताना जर आपल्याकडून काही चूक झाली तर ती आपल्याला सोडवता येत नाही.

आपल्या आयुष्याच्या या महत्वाच्या निर्णयाचा परिणाम आपल्या उर्वरित आयुष्यावर आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यावर सुद्धा होणार असतो.

म्हणूनच नवीन घर खरेदी करताना काही महत्वाच्या गोष्टी असतात ज्या पण लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजेत.

बहुतेक वेळा या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतातच पण उत्साहाच्या भरत आपल्याकडून त्या विसरल्या जाण्याची शक्यता असते.

या लेखात दिलेल्या या महत्वाच्या गोष्टी तुम्ही नवीन वास्तू खरेदी करताना एका चेक लिस्ट प्रमाणे वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला नीट, विचारपूर्वक निर्णय घेता येईल.

१. बिल्डरबद्दल माहिती

नवीन स्कीममध्ये घर बुक करताना त्या बिल्डरबद्दल माहिती मिळवणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

त्या बिल्डरचे इतर प्रोजेक्ट कुठे आहेत, आधी त्याने कुठल्या कुठल्या ठिकाणी काम केले आहे, जुन्या प्रोजेक्टमध्ये काही गोंधळ झाला आहे का?

ओनरशीप द्यायला उशीर झाला का?

घरात बारीक-सारीक कामांमध्ये फिनिशिंग होते का?

या गोष्टींची नीट, खात्रीशीर माणसाकडून शहानिशा करूनच मग त्या स्कीममध्ये किंवा त्या बिल्डरबरोबर करार करायचा का नाही याचा निर्णय घेतला पाहिजे.

आत्ताच्या त्या बिल्डरचे प्रोजेक्ट कितीही आकर्षक वाटत असले तरीही त्याच्या आधीच्या स्कीमबद्दल तितकेसे गुडवील नसेल तर त्या प्रोजेक्टमध्ये पैसे न गुंतवलेलेच आपल्या हिताचे असते.

२. घर ते ऑफिस अंतर

बऱ्याचदा काही स्कीम प्रचंड आकर्षक असतात पण त्या कधीकधी शहरापासून लांबच्या अंतरावर असू शकतात.

याचा अर्थ ते आपल्या ऑफिसपासून जास्त अंतरावर असतात.

सुरुवातीला जरी आपल्याला हे अंतर विशेष वाटले नाही, आपण रोज सहज प्रवास करू असे वाटले तरी ते प्रचंड

थकवणारे असते हे आपण आधीच लक्षात घेतले पाहिजे.

रोज लांबच्या प्रवासाला लागणारा वेळ, त्यामुळे येणारा थकवा, पेट्रोलचा खर्च या सगळ्याचा हिशोब केला पाहिजे.

एखादवेळेस तरूणपणी या प्रवासाचे काही वाटणार सुद्धा नाही पण वाढत्या वयाबरोबर याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागेल.

आपले घर जर आपल्या ऑफिसच्या जवळ असेल तर वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होते आणि याशिवाय जास्त वेळ प्रवासात न गेल्यामुळे आपण सुद्धा फ्रेश राहतो.

नवीन घराची निवड करताना, घर ते ऑफिस हे अंतर ध्यानात ठेवले पाहिजे.

३. शाळा, हॉस्पिटल, बसस्टाॅप, बाजार यापासून घराचे अंतर

शहरापेक्षा अधिक आकर्षक स्कीम या शहराबाहेर असतात.

शहराबाहेर घरांची किंमत शहराच्या तुलनेत स्वस्त जाते. पण याचा मोठा तोटा हा असतो की तिथून हाकेच्या अंतरावर न चांगले दवाखाने असतात न बाजारपेठा.

म्हणूनच घर घेताना घराजवळ चांगली शाळा, कॉलेज, डॉक्टर आहेत न याची खात्री करूनच घर बुक करायला हवे.

नाहीतर घरात वाचवलेले पैसे हे प्रवासात खर्च करण्याची वेळ येऊ शकते. घराजवळ मोठे बाजार नाही तरी आपल्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू, किराणा, औषधांचे दुकान हे जवळ आहे न हे बघितले पाहिजे.

जरी आत्ता हे सगळे घराजवळ नसेल तरी तो परिसर डेव्हलपिंग आहे का?

नजीकच्या काळात तिथे या सोयी होण्याची शक्यता आहे का?

याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर घराजवळचा बसस्टाॅप कोणता आहे, ट्रेन स्टेशन किती अंतरावर आहे हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे ज्यामुळे आपला रोजचा प्रवास सुखकर होईल.

४. रीसेलची शक्यता

आपले स्वतःचे घर एकदा झाले की आपल्यावर ती विकायची वेळ येईल हा विचार काही घर बुक करतानाचा आपण करत नाही.

पण आयुष्यात प्रॅक्टीकल असणे महत्वाचे असते. आपली किवा आपल्या जोडीदाराची दुसऱ्या शहरात बदली होऊ शकते, तुम्हाला दुसरीकडे अजून मोठा, जास्त प्रशस्त घर मिळू शकते आणि हे घर सोडायची वेळ येऊ शकते.

अशावेळेला घर परत विकले जाईल का?

हा विचार घर घेण्याआधीच केलेला बरा असतो.

यासाठी घराचे लोकेशन, आजूबाजूचा परिसर, सोसायटी या गोष्टींचा विचार केला पाहिजे.

उदाहरण द्यायचे झाले तर तुम्हाला कदाचित सोसायटीत स्विमिंग पूल असावा, जिम असावे असे वाटणार नाही पण तुमच्याकडून घर विकत घेणाऱ्यांसाठी या दोन महत्वाच्या गोष्टी असू शकतात.

त्यामुळे घर घेताना अशाच पद्धतीने निवडावे की आपल्यावर ते विकायची वेळ आली तर ते दुसऱ्यांना सुद्धा पसंत पडेल.

५. घर भाड्याने जायची शक्यता

जशी अचानक घर विकण्याची गरज येऊ शकते तशाच कारणांसाठी राहते घर भाड्याने द्यायची सुद्धा गरज येऊ शकते.

तुम्हाला जर दुसरीकडे आकर्षक जागा मिळाली किंवा तुमचे ऑफिस बदलले आणि तुम्हाला ऑफिसच्या जवळ घर तात्पुरते भाड्याने घ्यायचे असेल तर राहते घर भाड्याने देण्याखेरीज पर्याय उरत नाही.

घर भाड्याने जाण्यासाठी घराजवळ शाळा, कॉलेज, दुकानं, हॉटेल, हॉस्पिटल असणे गरजेचे आहे.

त्यामुळे घर घेताना या गोष्टींचा विचार करण्याचे महत्व पुन्हा अधोरेखित होते.

६. वारा आणि उजेड

घरात जर प्रसन्नता नांदून हवी असेल तर या दोन अत्यंत महत्वाच्या आणि गांभिर्याने घ्यायच्या गोष्टी आहेत.

घरात हवा खेळती राहिली तर चांगले असते नाहीतर घुसमटल्यासारखे होते.

त्याचबरोबर घरात सूर्यप्रकाश सुद्धा यायला हवा.

अगदी सगळ्या खोल्यांमध्ये नाही तरी दोन खोल्यांमध्ये तरी रोज उजेड यायला हवा ज्यामुळे घरात प्रसन्न वाटते.

अंधाऱ्या घरात एक प्रकारचे नैराश्य आल्या सारखे वाटते.

यासाठी घराची निवड करताना त्या घरात व्यवस्थित उजेड आणि हवा येते का याची खात्री करायला पाहिजे.

यासाठी बिल्डींगच्या आसपास किती मोकळी जागा आहे, आजूबाजूला मोठ्या इमारती आहेत का या गोष्टी बघायला हव्यात.

याचबरोबर घरासमोर कसा परिसर आहे?

बाल्कनी आणि खिडकीतून चांगला व्हयू आहे का?

या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत कारण याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर होणार असतो.

७. बांधकामाचा दर्जा

घर निवडताना ही गोष्ट सुद्धा आवर्जून तपासली पाहिजे. घरात वापरली जाणारी दारे, खिडक्यांची ग्रील, भिंतीचा रंग, बाथरूममधले नळ, फ्लश आणि इतर फिटिंग्ज, घरातले वायरिंग अशा ज्या गोष्टी घर घेताना आपल्याला बिल्डरकडून मिळतात किंवा आपण रिसेलचे घर घेत असू तर त्या घरात आधीपासूनच असतात, त्याचा दर्जा कसा आहे?

हे तपासून घेतले पाहिजे कारण या गोष्टी जर चांगल्या दर्जाच्या नसतील तर त्या बदलून दुसऱ्या लावण्याचा खर्च आपल्यावर येऊ शकतो.

८. घराच्या आजूबाजूचे रस्ते

जेव्हा आपण नवीन घर घेतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचे, घराजवळचे रस्ते चांगले, बिना खड्ड्याचे आहेत न हे तपासून घ्यावे कारण या रस्त्यावरून आपल्याला रोज ये जा करायची असते.

चांगले रस्ते कालांतराने खराब होऊ शकतातच पण जर हे रस्ते आधीपासूनच खराब असतील तर ते जास्त खराब होण्याची शक्यता असते. रोजची ये जा सोयीस्कर व्हावी म्हणून ही गोष्ट आधीच तपासून घेतलेली बरी.

९. सोसायटीमध्ये दिल्या जाणाऱ्या सुखसोयी

इतर सगळ्या गोष्टींबरोबरच तुमची सोसायटी किती सुखसोयींनी सुसज्ज आहे ही गोष्ट महत्वाची आहे.

सोसायटीमध्ये मुलांना खेळायला ग्राउंड, झोपाळे, घसरगुंड्याचे पार्क, छोट्या कार्यक्रमांसाठी हाॅल, स्विमिंग पूल, जिम या सेवा आहेत का?

तसेच सोसायटीमध्ये पार्किंगसाठी मुबलक जागा आहे ना? हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे.

याचबरोबर सोसायटीमध्ये भरपूर झाडे, हिरवळ आहे का हे बघितले पाहिजे. या सगळ्या गोष्टी बघूनच घर घ्यायचा निर्णय पक्का करायला हवा.

१०. शेजार आणि आजूबाजूचा परिसर

आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय, आपला शेजार.

आपल्या बिल्डींगमधेच नव्हे तर आजूबाजूला कशी लोक आहेत?

एकूण एरिया आणि वस्ती कशी आहे? घरातील मुले-मुली संध्याकाळी एकटी ये जा करु शकतील का?

घरात वृद्ध पालक असतील तर त्यांच्या दृष्टीने सुरक्षित आहे का? हे मुद्दे सुद्धा महत्वाचे ठरतात.

कर्ज घेण्याआधी या दहा गोष्टींकडे लक्ष द्या!!

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.