मुलांना समजून घेऊन त्यांचा कल ओळखण्याच्या ५ टिप्स

एवढ्यातच आमच्याकडे एक प्रश्न आला कि, मुलांचे करियर कसे निवडावे…

खरंतर मुलांचे करियर पालकांनी निवडण्याची किंवा काही टेस्ट देऊन त्यावरून निर्णय घेण्याची काहीही गरज नाही.

तुमच्या मुलांना तुम्ही वर्षानुवर्षांच्या सहवासात जितकं ओळखाल, तितकं करियर निवडीसाठी मदत करणारा कोणताही कौन्सिलर काही तासात कसं ओळखू शकेल?

मुलांच्या करिअरबाबत विचार करणाऱ्या पालकांचे सहसा दोन गट असतात.

एकतर पालक अत्यंत लहान वयापासून मुलांच्या करिअरबद्दल जागरूक असतात.

त्यासाठी त्यांना वेगवेगळे क्लास लावतात, अगदी लहानपणापासून आईबाबांनीच मुलांच्या करिअरची सगळी सोय करून ठेवली असते.

त्या मुलाला फक्त मोठे व्हायचे असते.

तर काही पालक या विरुद्ध वागतात, मुलांना जे काही करायचे असेल ते त्यांना करू द्यावे असे त्यांचे म्हणणे असते.

पण हे करताना ते मुलांना लहान वयात वेगवेगळ्या करिअर विषयी माहिती द्यायला, वेगवेगळ्या क्षेत्रांची तोंडओळख करून द्यायला विसरतात

तसे बघायला गेलो, तर या दोन्ही प्रकारच्या पालकांना काही चूक म्हणता येणार नाही.

आपल्या मुलासाठी बेस्ट करिअर निवडणे, त्याबद्दल महत्वाकांक्षी असणे साहजिकच आहे.

यामागे आपल्या मुलांनी प्रगती करावी हाच हेतू असतो.

तर आपल्या मुलांना जे शिकायचे आहे ते निवडण्याची मुभा देणे हे सुद्धा बरोबरच आहे.

आपल्या अपेक्षा त्यांच्यावर न लादता त्यांना त्यांचे करिअर घडवू देण्यामागे सुद्धा पालकांचा काय स्वार्थ असणार?

पण तुम्ही ही दोन उदाहरणे जर नीट बघितली तर तुमच्या लक्षात येईल की यात वरवर जरी काही चुकीचे दिसत नसले तरी हे वाटते तितके योग्य आहे का?

पहिल्या उदाहरणात कदाचित पालकांना हवा तो सपोर्ट, हवा तो गायडन्स त्यांच्या लहानपणी मिळाला नसल्याची शक्यता आहे त्यामुळे ते मुलांच्या करिअरबाबतीत जास्तच जागरूक असतात.

दुसऱ्या उदाहरणात, कदाचित पालकांना त्यांच्या मनाविरुद्ध कोणत्यातरी क्षेत्रात शिक्षण घेऊन करिअर करावे लागले असेल.

आपल्या बाबतीत जे झाले तेच आपल्या मुलांच्या बाबतीत होऊ नये या इच्छेपोटी ते मुलांना त्यांचे करिअर निवडायची सूट देत असतील.

आता ही दोन्ही उदाहरणे बघितली तर यात एक होणारी चूक आहे, ती म्हणजे मुलांना एकतर एकाच करिअरच्या पर्यायाबद्दल लहानपणापासून सांगत राहायचे नाहीतर त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांची, वेगवेगळ्या करिअरची माहिती लहानपणापासून अजिबातच न देणे.

मित्रमैत्रिणींनो, एव्हाना तुम्हाला या लेखाचा रोख कळला असेल.

तुमच्या मुलांना करिअर निवडायला सोपे जावे, त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र शोधता यावे, त्यात हवे असलेले शिक्षण घेऊन उत्तरोत्तर प्रगती त्यांनी करावी, हे तुम्हाला वाटत असणारच.

त्यासाठी एक जबाबदार पालक म्हणून तुम्ही प्रयत्न सुद्धा करत असणारच.

तुमच्या नकळत जर तुमच्याकडून या चुका होत असतील तर त्या सुद्धा तुमच्या लक्षात आल्या असतील.

मग प्रश्न उरतोच की मुलांना योग्य करिअर निवडायला मदत कशी करायची?

या लेखात आम्ही तुम्हाला त्याचसाठी काही टिप्स देणार आहोत.

१. मुलांना लहानपणापासून वेगवेगळ्या क्षेत्रांची ओळख करून द्या

लहान मुलांना प्रत्येक गोष्टीचे प्रचंड कुतूहल असते.

याच कुतूहलचा वापर करून त्यांना कळायला लागल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रांची ओळख करून द्यायला हळूहळू सुरुवात करायची.

म्हणजे, मुलांना साधारण लिहिता-वाचता आले की त्यांच्यापेक्षा लहान भावडांना काही शिकवायला सांगणे, त्यांना अमुक एक रक्कम देऊन त्यातून काही खरेदी करायला सांगून सगळ्या खरेदीचा जमा-खर्च पद्धतीने हिशोब लिहून घेणे,

कधी तुमच्या महिन्याच्या खर्च त्यांच्याकडून मुद्दाम एक्सेलमध्ये लिहून घेणे, त्यांच्याकडून बँकेच्या स्लीप्स भरून घेणे, मोठी असतील तर आपल्या देखरेखीखाली त्यांना स्वतःला पैसे भरायला लावणे, घरात स्वयंपाकात मदत करणे, वेगवेगळ्या रीसिपीचे व्हीडीओ बघून त्यातील सोपे पदार्थ करून बघायला उद्युक्त करणे..

ही आणि अशी कितीतरी कामे त्यांच्याकडून करून घेऊन त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांची मुद्दाम ओळख करून द्यायला हवी.

त्यासाठी त्यांना मोबदला दिला तर त्यांना त्या कामाचे महत्व सुद्धा पटेल आणि ते न कंटाळता, आवडीने ती कामे शिकतील सुद्धा.

लहानपणापासून त्यांना वेगवेगळ्या करिअरबद्दल सांगणे, त्याविषयी गप्पा मारणे या गोष्टी केल्याने त्यांचे भावविश्व भव्य व्हायला सुरुवात होते.

आपल्याला मोठे होऊन काय व्हायला आवडेल याचा विचार ते करू लागतात आणि तुम्ही त्यांना देत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कामांमुळे त्यांना प्रात्यक्षिक सुद्धा मिळत असते.

२. त्यांना ‘स्पूनफीडिंग’ करू नका

तुमच्या मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रांची ओळख करून देणे हे झाले तुमचे काम.

या नंतर जशी मुले मोठी होतील, त्यांना त्यांच्या आवडीनिवडी समजतील तशी त्यांना नेमके काय करायचे आहे याबद्दल कल्पना येईल.

तुम्ही एकदा त्यांना वाट दाखवली की त्या वाटेवरून त्यांना स्वतंत्रपणे चालू द्या.

त्यांच्या अडीअडणीला त्यांना मदत करणे, त्यांचे काही चुकत असेल तर त्यांना बरोबर मार्ग दाखवणे, ही आईबाबा म्हणून तुमची जबाबदारी.

पण मुले चुकूच नयेत, त्यांना काही अडचणी येउच नयेत, असा विचार करून सतत त्यांना मदत करत राहणे,

त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रवृत्त न करणे या गोष्टी जर तुम्ही काळजीपोटी, अनवधानाने करत असाल तर त्या कटाक्षाने टाळा.

मुलांना मार्ग दाखवला की त्यांना त्यावरून वाटचाल करू द्यायची, आपण हात धरून न्यायचे नाही..

आणि पालक म्हणून ती लांबून, अंतरावरून आपण बघत राहायची, जेणेकरून त्यांना गरज लागली तर त्यांना मदत करायला आपण असू…

आणि हा विश्वास त्यांना असला पाहिजे…

३. चर्चा करा

तुमच्या स्वतःच्या शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल त्यांच्याशी चर्चा करा.

त्यात कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, त्यात काय करावे लागते, कसे करावे लागते हे त्यांना सांगा.

एखादा प्रसंग असेल ज्यात तुम्हाला तुमच्या कामामुळे यश आले असेल, तर तो त्यांच्यारोबर अवश्य शेयर करा.

ते यश संपादन करण्यासाठी तुम्ही काय केले, कसे काम केले, किती कष्ट घेतले हे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या.

तुमचा सीव्ही सुद्धा त्यांना बघायला द्या. तुम्ही कधी एखादे ओफ़िशिअल लेटर लिहित असाल तर मुद्दाम त्यांना ते टाईप करायला सांगा म्हणजे त्यांना सुद्धा ओफ़िशिअल कसे लिहितात याचे लहानपणीच प्रशिक्षण मिळेल.

मुलांना सुटी असेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये नेऊ शकता.

तिथे काय काम चालते हे बघण्याची त्यांना प्रत्यक्ष संधी मिळेल.

शाळेतल्या इंडस्ट्रीयल व्हिजिट पेक्षा आपल्या आई बाबांचे ऑफिस आणि तिथले काम त्यांना जास्त लक्षात राहते, हे कधीही विसरू नका.

त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील कामे समजावीत यासाठी तुमच्या इतर क्षेत्रातील मित्रमैत्रिणींना विनंती करून त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा मुलांना नेऊ शकता ज्यामुळे शिक्षणानंतर काय करायचे, कशा पद्धतीचे काम करावे लागते हा अंदाज त्यांना लहानपणीच येईल आणि त्यांना त्यांचे करिअर निवडायला एक दिशा मिळेल.

४. मुलांचे गुण ओळखा

लहानपणीच आईबाबांना खरेतर मुलांना कशात गती आहे ते समजते.

यावरूनच बहुतेक आईबाबा मुलांना करिअरची ओळख करून देतात.

उदाहरणार्थ, एखाद्या मुल गणितात चांगले असेल तर लगेच त्याला इंजिनीअर होण्याचा सल्ला दिला जातो.

असे झाले तर मुले नकळत फक्त त्याच दिशेने विचार करायला लागतात.

तर असे न करता जर तुमच्या मुलाला एखाद्या विषयात गती असेल तर त्या विषयात काय काय करिअर करता येतात या सगळ्याची माहिती द्यावी.

त्या क्षेत्रातील करिअर करायला शिक्षण काय घ्यावे लागते हे सांगावे.

एखाद्या विषयात चांगला आहे म्हणून सरसटीकरण करू नये.

मुलांना फक्त योग्य ती माहिती पुरवून पुढचे सगळे निर्णय त्यांच्यावर सोपवावे.

५. वेगवेगळ्या करिअरची माहिती तुम्ही स्वतः मिळवा

जग खूप झपाट्याने वाढत आहे.

आपल्या पिढीला माहीत नसलेली अनेक नवनवीन क्षेत्र आता आहेत.

यामुळे तुम्ही स्वतः फक्त जुन्या करिअरच्या पर्यायांमध्ये न अडकता आता वेगवेगळे काय पर्याय आहेत, कोणते शैक्षणिक कोर्स उपलब्ध आहेत याची माहिती मिळवली पाहिजे.

यामुळे जर मुलांनी एखाद्या नवीन कोर्स करायची इच्चा व्यक्त केली तर त्याबद्दल योग्य मार्गदर्शन तुम्हाला करता येईल.

आपले तेच चांगले हा विचार सोडून आजकालची पिढी कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, यशस्वी आहे याची माहिती मिळवून, ती माहिती तुम्ही मुलांना दिली पाहिजे.

तसेच त्या क्षेत्रातील लोकांचे साधारण आयुष्य कसे असते, कामाचे तास किती असतात, पगार किती मिळतो याची जाणीव सुद्धा कळत्या वयात मुलांना करून दिली पाहिजे.

ओळखीच्या लोकांशी याबाबत चर्चा करता येते.

मित्रांनो, मुलांना वेगवेगळ्या करिअर्सची ओळख करू देणे, त्याचे फायदे, तोटे समजावून सांगणे हे तुम्ही पालक म्हणून आवर्जून केले पाहिजे.

पण तुम्हाला जे वाटते, तुम्हाला जे करिअर मुलांसाठी चांगले वाटते त्यात पुढे जायला त्यांना प्रवृत्त न करता त्यांची आवड बघितली पाहिजे, कारण शेवटी तो त्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो.

मुले जर त्यांच्या कामात खुश असतील तर त्यांच्या आयुष्यात देखील खुश होतील.. त्यांना फक्त गरज असते ती या मार्गदर्शनाची.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय