अंटार्क्टिकावर ४०३ दिवस राहून इस्रो ची मोहीम फत्ते करणाऱ्या ‘मंगला मणी’ कोण आहेत?

Mangala Mani

जागतिक महिला दिवस येऊन गेला आणि नारी शक्ती ने भरलेले रकाने पुन्हा वर्षभरासाठी रिक्त झाले. एका दिवसासाठी नारी सन्मान केला कि तो वर्षभर पुरत असल्याने हे होणं साहजिक असतं. मंगला मणी हे नाव तसं सगळ्यांसाठी अपरिचित असेल. खऱ्याखुऱ्या नारी शक्तीचं प्रतिनिधित्व आणि अटकेपार झेंडे रोवणाऱ्या स्त्रिया ह्या अश्याच आभासी जगापासून लांब राहून आपलं कार्य करत असतात. त्यांची दखल जरी घेतली तरी अश्या बातम्या पेपरच्या एखाद्या कोपऱ्यात येतात आणि तिकडून रद्दीत जातात. मंगला मणी ह्या इंडियन स्पेस रिसर्च सेंटर अर्थात इस्रो च्या वैज्ञानिक असून ह्या डिसेंबर मध्ये एक कठीण असं लक्ष्य पूर्ण करून परतल्या आहेत.

अंटार्क्टिका पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडील एक खंड जो अजूनहि मानवाच्या अस्तित्वापासून दूर आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे इथलं गोठवणारं तपमान काही वेळा उणे ९० डिग्री सेल्सिअस पर्यंत उतरणारं तपमान म्हणजे प्रतिकूल परिस्थितीचं एक टोक. हाडं गोठवणाऱ्या ह्या तपमानात मुळात पोहचणे अतिशय अवघड आणि खडतर मानले जाते. त्यामुळेच मानवाच्या इतक्या प्रगतीनंतरसुद्धा इकडे लोकवस्ती हि दूरच आहे. अश्या ठिकाणी २३ लोकांचा एक ग्रुप भारताच्या “भारती” ह्या रिसर्च स्टेशनसाठी रवाना होतो. ह्या २३ लोकांमध्ये एकमेव स्त्री असणाऱ्या मंगला मणी एका भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करत एक दोन नाही तर तब्बल ४०३ दिवस ह्या ठिकाणी नुसत्या राहतच नाहीत तर आपलं काम करत इस्रो च्या उपग्रहांकडून मिळणारी माहिती घेत, इस्रो च्या भारतातील केंद्रात ती पाठवत, अनेक भारतीय सर्विस तसेच इतर संशोधनांना उपलब्ध करून देण्याच्या महत्वपूर्ण कामाची जोखीम अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हाताळत आपलं काम योग्य रीतीने पूर्ण करतात. त्याचं कार्य हे भारतीय स्त्री आजच्या युगात कुठेही कमी नाही हे दाखवून देते.

‘भारती’ हे केंद्र अंटार्टिकालाच उभारण्यामागे काही कारणं आहेत. भारतातून रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या दोन ते तीन प्रदक्षिणा होत असताना अंटार्क्टिका सारख्या ठिकाणी स्टेशन उभारण्याने इस्रो ह्या उपग्रहांच्या तब्बल १० ते १४ प्रदक्षिणा मॉनीटर करून प्रत्येक वेळेस मिळणाऱ्या माहितीचं आकलन करू शकते. जितके वेळा आपण त्याच्याशी संपर्क साधू तितकी जास्त माहिती ह्या उपग्रहाकडून आपल्याकडे ट्रांसमिट केली जाते. त्यामुळेच अंटार्क्टिका सारख्या ठिकाणी भारतासोबत, रशिया, चीन तसेच इतर देशांची अशी केंद्र आहेत. इकडून मिळालेली माहिती भारतात इस्रोच्या इतर केंद्रांकडे पोहचवली जाते. तिथून तिचं वितरण केलं जातं. अश्या तऱ्हेने अतिशय महत्वपूर्ण असणारी हि जबाबदारी मंगला मणी ह्यांनी ४०० पेक्षा जास्त दिवस खडतर परिस्थिती मध्ये योग्य रीतीने पूर्ण केली. त्यांच्या ह्या कामासाठी बी.बी.सी. ने “१०० वूमन चॅलेंज” ह्या कार्यक्रमात जगातील पहिल्या १०० स्त्रियांमध्ये निवड केली आहे.

पेपरात आलेल्या नासाच्या मंगळ मोहिमेवरील लेखाने स्फूर्ती घेऊन अवकाश क्षेत्र हेच आपलं लक्ष्य ठरवणाऱ्या मंगला मणी ह्यांनी इस्रो मध्ये प्रवेश केला. अवकाश क्षेत्र हे काहीतरी नवीन म्हणून आई वडिलांनी विरोध केल्यावर आपल्या काकांच्या पाठींब्यावर त्यांनी इस्रो मधील आपलं करियर सुरु केलं. मागे वळून न बघता एक एक पाउल पुढे टाकत राहिल्या. सध्या त्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैद्राबादमध्ये पोस्टेड आहेत. अंटार्क्टिका च्या मोहिमेसाठी रवाना होण्यासाठी त्यांना खडतर प्रशिक्षण दिलं गेलं. वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या, अतिउंचावरील विरळ हवामान आणि अतिशीत तापमानात राहण्याचं प्रशिक्षण तसेच वजन आपल्या पाठीवर घेऊन अतिशय दुर्गम भागातले ट्रेक्स ज्यामुळे फिजिकल फिटनेस वाढेल, अश्या सगळ्या चाचण्यातून पास झाल्यावर खऱ्या परीक्षेत अनेक आव्हानांचा सामना त्यांना करावा लागला. तपमाना खेरीज घरापासून लांब एकटं तसेच सगळ्या पुरुषांमध्ये एक स्त्री म्हणून तब्बल ४०० पेक्षा जास्त दिवस राहताना किती कस लागला असेल ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

मंगला मणी ह्यांच्यापासून स्फूर्ती घेत इस्रो च्या आणखी एका स्त्री वैज्ञानिकेने स्वतःहून भारती केंद्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या सध्या भारती केंद्रात पोस्टेड असून मंगला सारखंच वर्षभर देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. मंगला मणी ह्यांनी आपल्या कर्तुत्वाने अवकाश क्षेत्रातहि ‘स्काय इज द लिमिट’ हे दाखवून दिल आहे. त्यांच्या ह्या कार्यास माझा सलाम आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.

वाचण्यासारखे आणखी काही…

नियतीला झुंज देणारा शास्त्रज्ञ: स्टीफन हॉकींग
माहित आहे का, हिग्स बोसॉनच्या शोधात भारताचे योगदान!!
आपल्या सौरमालेत प्रवेश करणारा पहिला एलिअन ऑब्जेक्ट- “ओयुमुआमुआ”


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!