गिळताना घशात दुखते का? त्यामागची कारणे आणि उपाय

गिळताना घशात दुखते

कधीकधी अन्न किंवा अगदी पाणी गिळताना सुद्धा घशात दुखते.

खोकला व्हायच्या आधी किंवा घसा बसल्यावर जे घशात दुखते त्यापेक्षा हे वेगळे असते.

जेव्हा या दोन कारणांमुळे घशात दुखते तेव्हा ते तात्पुरते असते, इन्फेक्शनमुळे.

त्यावर उपाय केले, औषधे घेतली की घसा बरा होतो.

आज या लेखात आपण बघणार आहोत ते घशाच्या वेगळ्या प्रकारच्या दुखण्याबद्दल. हे दुखणे कायमस्वरूपी असते.

घशात एरवी दुखत नाही, खवखव वैगेरे सुद्धा जाणवत नाही फक्त काहीही खाऊन किंवा पाणी पिऊन सुद्धा ते गिळताना घशात दुखते.

अशाप्रकारच्या गिळताना होणाऱ्या घसेदुखीला वैद्यकीय भाषेत डीसफेजीया असे म्हणतात. 

हे होण्यामागे काय कारणे असतात?

अन्ननलिकेत काही विकार असतील तर हा त्रास होण्याची शक्यता असते.

अन्ननलिकेतून अन्न, पाणी गिळल्यानंतर पोटात जात असते.

अन्न पोटात जायला अन्ननलिकेचे आकुंचन आणि प्रसरण होते, ज्यामुळे अन्न त्यातून पोटापर्यंतसहजपणे जाते.

पण काही कारणाने जर अन्ननलिकेच्या मसल्सचे योग्य पद्धतीने आकुंचन आणि प्रसरण होत नसेल तर अन्न त्यातून सहजासहजी जात नाही.

यामुळे अन्न त्यातून खाली जाताना, म्हणजेच आपली जेव्हा गिळण्याची प्रक्रिया होते तेव्हा घशात दुखते.

पण असे काय होते ज्यामुळे अन्ननलिका व्यवस्थितपणे आपले काम करत नाही? 

यामागे दोन कारणे असू शकतात.

एकतर वर म्हटल्याप्रमाणे अन्ननलीकेचे स्नान्यू काही कारणाने आकुंचले जात नाहीत.

मज्जारज्जूची दुखापत, स्ट्रोक असे त्रास असतील तर हे होण्याची शक्यता असते.

दुसरे कारण म्हणजे जर अन्ननलिका अरुंद झाली असेल तर. अन्ननलिकेत पित्तामुळे अल्सर्स होण्याची शक्यता असते.

यामुळे ती अरुंद होते आणि त्यातून अन्न पोटापर्यंत जायला त्रास होतो.

काही वेळा अन्ननलिकेत गाठी (ट्युमर) सुद्धा तयार होतात.

यामध्ये कॅन्सरच्या गाठी असण्याची सुद्धा शक्यता असते.

या गाठी, ज्या प्रत्येक वेळी कॅन्सरच्या असतीलच असे नाही.

अन्ननलिकेत वाढून अन्न खाली सहजपणे जाण्यापासून रोखतात. याचा परिणाम म्हणजे गिळताना वेदना होतात. 

गिळतान घशात दुख्ण्यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे तोंडाचा कोरडेपणा. जर तुमचे तोंड सतत कोरडे पडत असेल तर खाल्लेले अन्न मऊ करायला तोंडात पुरेशी लाळ तयार होत नाही ज्यामुळे ते अन्न अन्ननलिकेतून सहजपणे खाली जात नाही. 

तोंडाचा कोरडेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय या लेखात तुम्ही वाचू शकता. 

तोंडाला कोरडेपणा येण्याची कारणे आणि घरगुती उपाय वाचा या लेखात

खरेतर गिळताना घशात दुखणे हे खूप तीव्र प्रकारचे दुखणे दर वेळेला असतेच असे नाही.

कधी कधी तर काही दिवसांनी दुखणे अपोआप कमी होण्याची सुद्धा शक्यता असते.

पण याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही कारण जर घशात गिळताना दुखत असले तर त्यामागे काय कारणे असू शकतात हे आपण बघितलेच.

यातली काही कारणे चिंताजनक नक्कीच आहेत.  याशिवाय याचे परिणाम सुद्धा भयंकर होऊ शकतात. 

तुम्हाला डीसफेजिया आहे हे कसे ओळखाल? 

डीसफेजियाची काही लक्षणे आहेत, ती कोणती ते बघूया 

१. गिळताना वेदना होणे. 

२. अन्न किंवा पाणी गिळण्यासाठी एकदोनदा प्रयत्न करावा लागणे. 

३. गिळताना ठसका लागणे. 

४. क्वचित अन्न गिळल्यावर ते लगेच उलटे बाहेर येणे. 

५. गिळल्यावर छातीत जड वाटून दुखणे. 

हे दुखणे जर जास्त प्रमाणात असेल तर ठसका लागण्याचा धोका असतो. या व्यतिरिक्त गिळताना त्रास होतो म्हणून जेवण कमी होऊन, वजन सुद्धा कमी व्हायची शक्यता असते.

यासाठी या त्रासाचे निदान वेळेत होणे गरजेचे आहे. 

तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांना जर असा त्रास होत असेल, ही लक्षणे असतील तर तुम्ही वेळीच सावध व्हावे यासाठी हा लेख आहे.

काही वेळापुरते घशात दुखत असल्यास त्याची फार काळजी करायची गरज नाही पण ही लक्षणे जर नेहमीच दिसत असतील तर मात्र वेळीच वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत.  

याचे निदान कसे होते? 

जर गिळताना दुखत असल्याची तक्रार घेऊन तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर सगळ्यात आधी ते तुम्हाला काही प्रश्न विचारून हे दुखणे नक्की कशामुळे आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतील.

वर सांगितलेल्या कारणांपैकी नक्की कोणते कारण आहे हे त्यांना किती दिवस दुखते, कुठे दुखते असे प्रश्न विचारून आणि तुम्हाला तपासून समजेल.

काही वेळा एक्सरे काढायची गरज लागू शकते. मग त्यानुसार तुमच्या उपचारांबद्द्ल ठरवता येते. 

हे दुखणे नक्की कशामुळे आहे हे जाणून घ्यायला कधीकधी इंडोस्कोपी सुद्धा करण्याची गरज लागू शकते.

यासाठी तुमच्या घशात एक स्कोप नावाची बारीक नळी सोडली जाते.

यामधून तिथे काही अडकले आहे का?

अल्सर्स आहेत का?

ट्युमर आहे का? याचा शोध घेतला जातो.

काहीवेळा या एन्डोस्कोपीच्या वेळेस आतील टिश्यूचा काही भाग तपासणीसाठी बाहेर देखील काढला जातो. 

यावर उपाय काय? 

खरेतर यावर काय उपचार घ्यायचे हे कशामुळे या त्रासाची सुरुवात झाली आहे यावर अवलंबून आहे. 

१. व्यायाम 

जर तुम्हाला मज्जारज्जूच्या त्रासामुळे डीसफेजिया चा त्रास असेल, त्यामुळे स्नायूंच्या हालचाली योग्य पद्धतीने होत नसतील तर त्यासाठी काही व्यायाम असतात.

डॉक्टरांच्या सल्ल्याने हे व्यायाम करता येतात. हे व्यायाम नियमितपणे केल्याने तुम्ही तुमच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवू शकता.

घास तोंडात टाकताना कसे टाकायचे, किंवा गिळताना सुद्धा मान कशी ठेवायची हे नीट समजून घेतले पाहिजे.

काय केल्यावर दुखणे कमी होते याचा नीट तपास करून गिळताना योग्य ती खबरदारी बाळगली पाहिजे जेणेकरून कमीतकमी त्रास होईल. 

२. आहारात बदल 

काही पदार्थ गिळायला मूलतःच अवघड असतात. काही कडक पदार्थ व्यवस्थित चावून खाल्ले तरी गिळताना त्रासदायक ठरू शकतात.

डीसफेजिया नसणाऱ्या लोकांना सुद्धा काही पदार्थ गिळताना त्रास होऊ शकतो.

त्यामुळे हा त्रास असेल तर आहारात योग्य ते बदल केलेच पाहिजेत.

तुम्हाला काय खाताना किंवा पिताना जास्त दुखते याकडे लक्ष ठेऊन तो पदार्थ आहारातून वर्ज केला पाहिजे. 

३. डायलेशन 

ही एक वैदकीय प्रोसिजर आहे. जर काही करणाने तुमची अन्ननलिका अरुंद झाली असेल तर ती रुंद करण्यासाठी याचा वापर केला जातो.

यामध्ये घशात एक यंत्र घातले जाते ज्यामुळे अन्ननलिका रुंद केली जाते.

या प्रोसिजर नंतर काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी बरे वाटू शकते.

गिळण्याची क्रिया सोपी होऊन दुखणे गायब होते. पण कालांतराने पुन्हा अन्ननलिका अरुंद होण्याची शक्यता असते त्यामुळे ही वैद्यकीय प्रोसिजर परत करयला लागू शकते. 

४. एन्डोस्कोपी 

काही वेळेला चुकून कोणती वस्तू गिळली गेली असेल तर ती पोटात न जाता अन्ननलिकेत अडकून बसण्याची शक्यता असते.

अशावेळेला घास गिळताना दुखणे, ठसका लागणे, श्वास न घेता येणे सारखे त्रास होत असतात.

यासाठी एन्डोस्कोपी केली जाते.

यामध्ये घशात एक बारीक नळी सोडली जाते, जे काही अडकलेले असेल तर या नळीमधून बाहेर काढता येते. 

५. सर्जरी 

जर अन्ननलिकेमध्ये एखादा ट्युमर आला असेल, अल्सर्स असतील ज्यामुळे अन्ननलिका अरुंद होऊन घास गिळायला त्रास होत असेल तर ऑपरेशन करून तो ट्युमर काढावा लागतो.

६. औषधे 

काही वेळेला पोटात खूप पित्त झाले तर अन्न उलटून बाहेर पडते. या पित्ताच्या उलट्यांमुळे अन्ननलिकेत अल्सर्स होण्याची शक्यता असते हे अल्सर्स तयार झाले की गिळताना त्रास व्हायला लागतो.

यासाठी पित्त वाढू नये, पित्ताचा त्रास कमी व्हावा म्हणून औषधे घेणे हा एक चांगला पर्याय आहे. 

मित्रांनो, हा त्रास इतका गंभीर जरी वाटत नसला तरी त्याची योग्य वेळी दखल घेऊन त्यावर उपचार घेतले पाहिजेत जेणेकरून त्यातून काही गंभीर परिणाम उत्भवणार नाहीत.

तुम्हाला असा त्रास होत असेल तर हा त्रास कशामुळे होतो, तो बरा कसा करायचा याबद्दल प्राथमिक माहिती या लेखातून तुम्हाला मिळाली असेल.

या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

हे दुखणे जरी कॉमन नसले तरी दुखण्याचे प्रकार आणि कारण आपल्याला माहित असली पाहिजेत. लवकरच टॉन्सिल्स बद्दल वाचा येणाऱ्या लेखात.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.