दूहेरी हेरगिरीचा बळी : माता हरी

स्त्रीयांच्या सौंदर्यावर आज पयर्त जितके साहित्य,चित्र,शिल्प निर्माण झाले आहे तितके खचितच इतर कोणावर निर्माण झाले असेल. ही प्रक्रिया आजही निरंतर चालू आहे. शोषणाच्या मुळाशी स्त्री सौंदर्याचे घडीव कोरीव दगड असतात आणि पुरूषी वर्चस्व् या वर आपले मालकी हक्क् गाजवत असतात. जणूकाही स्त्रीचे सौंदर्य हे फक्त पुरूषी अहंकाराच्या वापरासाठीच निर्माण झाले आहे याची प्रचिती वारंवार येत रहाते. भारतीय वैदीक ग्रंथ् आणि लोककथांमध्ये विषकन्येचा नेहमीच उल्लेख आलेला आहे. आपल्या शत्रूचा विनाश करण्यासाठी एखाद्या सौंदर्यवती कुमारीकेला थोडे थोडे मात्रा विष देऊन आणि विषारी प्राण्यांसोबत ठेवून खास तयार केले जात असे. या शिवाय तिला संगीत नृत्याचे शिक्षणही दिले जाई. छळ आणि कपटाचे विविध प्रकार तिला शिकवले जात असत. मग संधी मिळताच तिला शत्रू राज्यात पोहचविले जाई. विषकन्येचा श्वास देखील विषायुक्त असे आणि ती तोंडातही विष ठेवत असे जेणे करून श्रृगांर करताना ते शत्रूच्या मुखात सोडले जाई व शत्रूला मृत्यू येई. थोडक्यात काय तर स्त्रीच्या सौंदर्याचा वापर केला जाई. स्त्रीयांचा हा वापर आजही थांबलेला नाही आणि तो भविष्यात संपुष्टात येईल असेही मानण्याचे काही कारण नाही.

Mata Hariयुरोपच्या इतिहासात १९१४ ते १९१८ हा कालखंड प्रचंड विध्वंसकारी ठरला. या काळात जगातील पहिले महायुद्ध लढले गेले. या युद्धाची समाप्ती होता होता रशिया, जर्मनी, ऑस्ट्रीया-हंगेरी व उस्मानिया ही चार साम्राज्ये खिळखिळी झाली. या युद्धात फ्रान्स आणि जर्मनी समोरा समोर होते. मार्गारेट झेल ही अत्यंत सौंदर्यवान तरूणी ही या दोन देशाची केंद्रबिंदू ठरली. युद्ध कोणत्याही दोन देशा मधील असो स्त्रिया नेहमी अत्याचाराच्या पहिल्या बळी असतात. स्त्री असणं हा एक शापित प्रकार असल्या सारखा आहे. लियुवर्डेन या नेदरलँड मधील एक छोटेखानी शहरात एका डच कुटूबांत मार्गारेटचा १८७६ मध्ये जन्म झाला. तिचे मूळ नाव “मार्गरेट गर्ट्‌यूड मारग्रीत मैकला ऑयद” असे होते. वडिलांचे म्हणजे श्रीमान अडम झेल यांचे हॅट विकण्याचे छोटेसे दुकान होते. मार्गारेट ही त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी. त्यांनी मग तेल व्यवसायात पैसे गुतंवले आणि ते बऱ्यापैकी श्रीमंत झाले. मार्गारेट लहानपणी सुखातच वाढली. अनेकदा सुखात वाढणाऱ्या लोकांना दु:ख ही त्याची दुसरी बाजू आहे हे माहितच नसते. मार्गारेटला पूढच्या आयुष्यात ही बाजू माहिती होणार होती आणि तिचे प्रचंड वळणावळणाचे आयुष्य सुरू होणार होते.

मार्गारेट नंतर ज्या टोपण नावाने ओळखली गेली त्यावर अनेक अफवा पसरल्या गेल्या की ती आशियन किंवा मध्य आशियन आहे. तिचे आई वडील दोघेही डच होते. १८८९ मध्ये वडील कर्जबाजारी झाले व आई वडीलांचा घटस्फोट झाला. या प्रसंगाने तिच्या आयुष्यात सर्वप्रथम दु:खाने प्रवेश केला. घटस्फोट झाला तेव्हा मार्गारेट तेव्हा केवळ १३ वर्षांची होती. मुलं असणारे पतीपत्नी जेव्हा घटस्फोस्ट घेत असतात त्यावेळी ते स्वत: दोघे आणि असलेली मुलं याचं भविष्य अधंकारमय करत असतात हे अत्यंत भयप्रद असतं. विशेषत: किशोरवयीन मुलांचं भावविश्व या निर्णयामुळे पार कोमेजुन जातं. मार्गारेटच्या वडीलांनी दुसरं लग्न केलं पण त्यानां मुल नाही झालं. कुटूंब नावाचे सुरक्षित छप्पर मार्गारेटच्या डोक्यावरून उडाले. तिला तिच्या एका गॉडफादरने आपल्या सोबत नेले. मिस्टर विस्सर हे गॉडफादरचे नाव. विस्सरने तिला शाळेत टाकले पण काही महिन्यातच शाळेतुन नाव काढून घेतले कारण शाळेतल्या एक शिक्षकाने तिच्याशी अतिप्रसंग करायला सुरूवात केली होती. अतिप्रसंग………हा प्रश्नही आजही तितकाच गंभीर आहे. मुली खरंच नेमक्या कुठं सुरक्षित असतात? की त्या सुरक्षित राहूच नये म्हणून समाजव्यवस्थाच तशी निर्माण केली गेली? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आजही जगभरातले धूरीण घेत आहेत. आजही स्त्री पूर्णपणे सुरक्षित नाहीच… मग ती जगातील कोणत्याही देशाची असो. शेवटी मार्गारेट आपल्या अंकलच्या घरी हेग या ठिकाणी वास्तव्यास आली.

Mata Hari and her husband Rudolph.
माताहारी आणि रूडॉल्फ मॅक्लिऑड

मार्गारेट आता १८ वर्षांची झाली होती आणि या वयाच्या ज्या काही मागण्या असतात त्या तिलाही छळू लागल्या होत्या. एक दिवस तिने वर्तमानपत्रात लग्नाची जाहिरात बघितली. एका डच आर्मी कॅप्टन रूडॉल्फ मॅक्लिऑडने ही जाहिरात दिली होती. त्यावेळी तो “डच ईस्ट इंडीज” म्हणजे आताच्या इंडोनेशिया येथे राहत होता. मार्गारेटने त्यांच्याशी १८९५ मध्ये अम्स्टरडॅम येथे लग्न केले. या लग्नाने ती डच कुटूंबाच्या वरच्या श्रेणीत गेली व पुन्हा एकदा तिला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली. नवऱ्या सोबत मार्गारेट मलंग या जावा बेटाच्या पूर्वेला असलेल्या ठिकाणी वास्तव्यास आली. एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ये या दापंत्याला झाली. पण सुखाच्या या समुद्राला लवकरच ओहटी लागायला सुरूवात झाली. रूडॉल्फ मॅक्लिऑडला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो सैन्यातला कॅप्टनच असल्यामुळे दारू ही नित्याचीच बाब. आमच्या देशात तर ग्रामीण भागात असे हजारोंनी कॅप्टन आजही अस्तित्वात आहेत. फक्त ते सैन्यात नसतात तर गावातच असतात आणि चिक्कार पितात. आम्ही दारू, तंबाखू वा तत्सम पदार्थांच्या उत्पादनावर बंदी घालू नाही शकत कारण तो आमच्या अर्थकारणांचा मूख्य स्त्रोत आहे. मात्र वापरावर बंदी घालू शकतो व त्याचे कायदेही करू शकतो. हा विरोधाभास राज्यकर्त्या इतकाच आम्हालाही मुळीच खटकत नाही. तर सांगायचा मूद्दा असा की मॅक्लिओड चिक्कार दारू प्यायचा व नवरा आणि पुरूषपणाचे कर्तव्यही बजावायचा अर्थात मार्गारेटला मारहाण करायचा. ती त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होती.

नवऱ्याच्या त्रासाला वैतागुन मग तिने दुसऱ्या एका कॅप्टनचा आधार घेतला. इथल्या वास्तव्यात तिने इंडोनेशियन कला संस्कृतीचा जवळून अभ्यास केला व एका नृत्याच्या ग्रूपमध्ये सामिल झाली. १८९७ मध्ये मार्गारेटने “माता हरी” हे रंगभूमीसाठी टोपण नाव धारण केले (मलायी भाषेत “माताहारी” (Matahari) म्हणजे दिवसाचा डोळा अर्थात सूर्य) आणि याच नावाने मग आयुष्याच्या अंता सोबत तिची साथ केली. मी सुरूवातीस तिच्या नावाच्या अफवांचा जो उल्लेख केला आहे ते हेच नाव. या नावामुळे अनेकानां ती आशियन वाटत असे. “माता हरी” या मलय शब्दांचा इंग्रजीत “eye of the day” असा अर्थ आहे. १९०६ मध्ये तिचा घटस्फोट होण्या आगोदरच्या काळात तिच्या मुलाला सिफलिस रोगाने घेरले व त्यात तो मरण पावला. पूढे मुलगीही याच रोगाचा प्रादूर्भाव होऊन २१ व्या वर्षी मृत्यूमुखी पडली. एक वर्तुळ पूर्ण झाले. ती परत एकटी पडली. यावेळी मात्र ती तरूण आणि नृत्यागंना असल्यामुळे तिची पावलं पॅरीसच्या दिशेने वळली. पॅरीस हे एक असे शहर आहे जिथे जगातल्या सगळ्याच कलावंताना आश्रय मिळतो. युरोपची मुंबईच म्हणा ना !!! १९०३ मध्ये ती पॅरीसला आली आणि लेडी मॅक्लिओड या नावाने सर्कस मधील घोडेस्वार बनली. मुख्य प्रश्न पोटापाण्याचे असतात व त्यासाठी पैसा हवा असतो, मग मार्ग कुठलेही का असेनात. या कामा सोबत ती मॉडल म्हणून तासन तास चित्रकाराच्या समोर बसायची.

Matahari ManacheTalks१९०५ च्या दरम्यान तिला प्रसिद्धी मिळायला सुरूवात झाली. कारण ती उत्तान नृत्ये करण्यात तरबेज होऊ लागली होती. याच काळात आधुनिक नृत्यशैलीची चळवळ जोमाने सुरू झाली होती. आणि माता हरी या समकालीन नृत्य कलावंताच्या जोडीने वेगळी वाट चोखाळत होती. आमच्याकडील चित्रपटात हे नृत्य कॅबेरा या प्रकारात ५० च्या दशकात सुरू झाले व ८०चे दशक येईपर्यंत संपूष्टात आले. माता हरीने नृत्याद्वारे देह प्रदर्शनात चांगलेच कसब प्राप्त केले आणि ती प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात आली. त्यावेळी तिला याची कल्पना नव्हती की तिच्या या देहबोलीने ती वेगळ्याच विश्वात दाखल होणार आहे. हळूहळू तीने मॉडेलिंगमध्येही आपले पाय मजबूत केले. नृत्य करतानां ती आपल्या शरीराशी मिळताजुळते पारदर्शक आवरण घालत असे त्यामुळे संपूर्ण देह विवस्त्र दिसत असे. १९१२ पर्यंत कायम प्रकाश झोतात असलेली माता हरीची जादू हळूहळू उतरायला सुरूवात झाली.१३ मार्च १९१५ ला तिने शेवटचा शो सादर केला.

मात्र तिच्या या प्रसिद्धीच्या काळात तिच्या ओळखी हाय प्रोफाईल म्हणवणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांशी झाल्या. यात उच्च दर्जाचे सैन्य अधिकारी, वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि राजकारणीही सामील होते. विशेषत: सैन्यातील उच्च अधिकाऱ्यांशी तिची अत्यंत जवळीक होती. तिने जेव्हा आपला शेवटचा शो सादर केला होता तेव्हा पहिले महायुद्ध सुरू होऊन १ वर्षांचा काळ लोटला होता. या युद्धात तिची मातृभूमी नेदरलँड मात्र तटस्थ होता. ती डच असल्यामुळे देशाच्या सीमा पार करतानां कोणतीच अडचण येत नसे. या काळात तिचा २५ वर्षीय रशियन पायलट कॅप्टन वदीम मसलोव्ह सोबत रोमांस सुरू झाला. ती वदीमला आपले खरे प्रेम मानत असे. वदीम पश्चीम आघाडीतल्या अनेक सैनिकापैकी एक होता. १९१६ मधील एका युद्ध प्रसंगी वदीम गंभीर जखमी झाला व त्याचे दोन्ही डोळे निकामी झाले. माता हरी त्याला भेटायला सैनिक छावणीत गेली. ती एका न्युट्रल देशाची नागरिक असल्यामुळे तिला कोणी अडवले नाही. मात्र तेथिल अधिकाऱ्याने तिच्या समोर एक अट ठेवली ती अशी- “जर ती जर्मनांसाठी हेरगिरी करण्यास तयार असेल तरच तिला वदीमशी भेट घेता येईल.” तिला नकार देण्यासाठी कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. कारण माता हरी त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. तिच्या आय़ुष्यातील हे वळण तिला थेट मृत्यूच्या दाढेकडे खेचून नेणारे होते पण त्याची तमा तिला मुळीच नव्हती.

Matahari Manachetalksयुद्ध सुरू होण्यापूर्वी माता हरीने युवराज विल्हेम यांच्या समोर आपली कला सादर केली होती. ते कैसर विल्हेम-२ यांचे सुपूत्र होते आणि कैसर विल्हेम-२ हे पश्चिम आघाडीचे जनरल होते. त्यामुळे माता हारीला जर गुप्तहेर केले तर ती महत्वाची सैन्य गुपिते पुरवू शकेल असा एक तर्क तिला गुप्तहेर करण्यामागे होता. तिने जर युवराज विल्हेमला आपल्या जाळ्यात ओढून जर्मन सैन्यातील महत्वाची बातमी पोहचविली तर तिला एक दशलक्ष फ्रँक्स मोबदला मिळणार होता. सैन्यातील मोठे अधिकारी सुंदर स्त्रियांच्या जाळयात लवकर ओढले जातात. सौंदर्याच्या बळावर देहाचे तर्पण हा या कामातला सर्वात महत्वाचा भाग असतो. खरं तर गुप्तहेरच नव्हे तर सर्व जगभरात स्त्रियांचा असा वापर आजही “लेदर करन्सी” या नावाखाली होत असतो. शासन आणि प्रशासन या दूहेरी कात्रीत आजही स्त्रीचे स्त्रीत्व पणाला लागते. यासाठी अनेक प्रलोभनांचा मोहक गुलदस्ता स्त्रियांच्या समोर सादर केला जातो, “कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है” अशा गोंडस शब्दांची पाखरण करत शोषणाच्या विविध वाटा पळवाटा शोधल्या जातात. पुरूषी वर्चस्वाचा हा गाळ आजही मनाच्या तळाशी साचलेला आढळतो.

१९१६च्या नोव्हेंबर महिन्यात माता हरी वाफेच्या बोटीने स्पेनला निघाली. तिची बोट जेव्हा ब्रिटनच्या बंदरावर लागली तेव्हा तिला अटक करण्यात आली आणि चौकशीसाठी लंडनला आणण्यात आले. न्यूस्कॉटलँडयार्डचे असिस्टंट कमिशनर सर बसिल थॉम्सन यांनी चौकशी केली आणि माता हरीने कबुलीजबाबात बऱ्याच बाबी स्विकारल्या. १९१६ मध्ये ती माद्रिदला गेली. तिथे तीने “ विश्वास संपादन करण्यासाठी अनेक फ्रेच गुपिते देखिल जर्मनानां पुरविली. ही अशी खेळी म्हणजे दुधारी तलवार असते. कारण यातील सत्य कळले तर दोन्ही कडून मरण हे अटळ असते. जानेवारी १९१७ मध्ये जर्मन मेजर अर्नोल्ड यांनी- “जर्मन गूप्तहेर एच-२१ ने महत्वाची माहिती पुरवली आहे” असा एक रेडियो संदेश बर्लिनला पाठवला. या गूप्तहेर एच-२१ चे सर्व वर्णन माता हरीशी जुळणारे होते. १३ फेब्रुवारी १९१७ ला पॅरीसच्या एका हॉटेल मधून माता हरीला अटक झाली. २४ जुलै रोजी तिच्यावर जर्मनीसाठी हेरगिरीसाठीचा खटला दाखल झाला. ५० हजार सैनिकांचा तिच्यामुळे जीव गेला असा आरोप ठेवण्यात आला. तिच्या रूममधून “गुप्त शाई” पूरावा म्हणून सादर करण्यात आला जो त्यावेळी महत्वाचा पूरावा समजला जाई. २० हजार फ्रँक आपण जर्मन डिप्लोमॅट कडून घेतल्याचे तिने मान्य केले. ती डच होती पण फ्रान्सला ती आपला दत्तक देश मानायची व फ्रान्सच्या प्रती ती प्रामाणिक होती.

Mata Hari Executionतिने पॅरीस मधील डच दूतावासाला एक पत्र पाठवले होते ज्यात तिने- “मी एक नृत्य कलाकार आहे आणि विविध देशात कार्यक्रमासाठी प्रवास करते. मी गुप्तहेर नाही आणि आपण ते निरपराधत्व सिद्ध करू शकत नाही याची खंत वाटते.” असे लिहले. जर्मनीसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी आपण पैसे घेतले हे तिने मान्य केले. तिच्या वरचा गुन्हा सिद्ध झाला. १५ ऑक्टोबर १९१७ रोजी तिला फ्रेंच फायरिंग स्क्वॅडने मैदानात आणले. फाशी दिली जाणाऱ्या व्यक्तीचे हात नॉर्मल् बांधण्यात येतात मात्र तिचे हात मोकळे ठेवण्यात आले. ती खाली गुडघ्यावर बसली पण तिने मान मात्र खाली झुकवली नाही. तिने एक फ्लाईंग किस समोरच्या सैनिकानां दिला. एकाचवेळी स्क्वॅडने फायरिंग केले. गोळ्यांनी चाळणी झालेले तिचे शरीर मागच्या बाजूने पूर्ण झुकले. एक नॉन् कमिशन ऑफिसर मग तिच्या जवळ चालत गेला. तिच्याकडे असलेले रिव्हॅल्वर त्याने काढले व जवळून तिच्या डोक्यात गोळी झाडली. ज्या सुंदर देहाच्या बळावर तिने तिचे एक साम्राज्य उभे केले होते ते पार कोसळले. ४१ वर्षांची माता हरी दुहेरी हेरगिरीचा बळी ठरली. तिचा देह ताब्यात घेण्यासाठी एकही नातेवाईक पूढे आला नाही. मग तिचे पार्थिव मेडिकल स्टडीसाठी पाठविण्यात आले व तिचे डोके पॅरीसच्या शरीरशास्त्र संग्राहलयात जतन करून ठेवण्यात आले. सन २००० मध्ये हे डोके गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. मृत्यू नंतर देखिल तिची परवड थांबली नाही. तिच्या या संपूर्ण खटल्याची कागदपत्रे तिला फाशी दिल्याच्या तारखे नंतर तब्बल १०० वर्षांनंतर म्हणजे २०१७ फ्रेंच लष्कराने सर्वांसाठी खुले केले. हेरगिरी करणाऱ्या व्यक्तींचा बहुतांशी वेळा असाच शेवट होतो. जिथे पकडले जातात तो देश अशा व्यक्तीना श्यक्यतो क्षमा करत नाही. शारीरीक छळ हे देखिल नागडे वास्तव आहे पण सर्वात दु:खद हे असते की ज्या देशाचेहे हेर असतात तो देशही पाठ फिरवतो. सत्य नेमके काय असते हे अनेकदा इतिहासाच्या पानात दडविण्यात येते………

सर्वप्रथम १९२७ मध्ये तिच्या जीवनावर एक चित्रपट काढण्यात आला होता. मात्र सन १९३१ मध्ये मेट्रो गोल्डविन मेअर या कंपनीने काढलेला “माता हरी” या नावाचा चित्रपट बराच गाजला. यात माता हरीची भूमिका ग्रेटा गार्बो या अभिनेत्रीने साकार केली. तर दुसऱ्यांदा कर्टीस हॅरिग्टंन या दिग्दर्शकाने १९८५ मध्ये याच नावाचा चित्रपट दिग्दर्शीत केला. सिल्वीया क्रिस्टेल या अभिनेत्रीने माता हरीची भूमिका साकार केली.

वाचण्यासारखे आणखी काही…..

श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….
Mata Hari: The True Story
डिएसके, तुमचं चुकलंच…

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय