आजच्या लेखाची सुरुवात आपण एका गोष्टीने करूया. ही गोष्ट कोलंबसची.
कोलंबसची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे पण आज याच गोष्टीकडे आपण एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघूया.
कोलंबसने अमेरीकेचा शोध लावला.
म्हणजे खरेतर तो काही अमेरीकेचा शोध लावायला निघाला नव्हता पण त्याने तो शोध लाऊन इतिहास रचला.
हा शोध लावण्यासाठी कोलंबसने अशी कोणती गोष्ट वेगळी गोष्ट केली? इतर कोणी ते का करू शकले नाहीत?
याचे उत्तर सोपे आहे.
त्यावेळेस कोणतीही व्यक्ती समुद्राच्या आत जाण्यासाठी घाबरत असे.
ते त्यांचे जहाज नेहमी किनाऱ्याला समांतर रेषेत चालवत असत.
जेणेकरून किनारा त्यांच्या नजरेच्या टप्यात राहील.
पण कोलंबसने या पेक्षा वेगळी कामगिरी केली.
त्याने न घाबरता आपली नाव समुद्रात आत, सरळ रेषेत घातली.
किनाऱ्याचा आधार न घेता त्याने हे धैर्य दाखवले आणि त्याचच परिणाम म्हणजे त्याने अमेरीकेचा शोध लावला!
या गोष्टीचे तात्पर्य काय? आयुष्यात कुठेतरी तुम्हाला तुमची कम्फर्ट लेव्हल सोडावी लागते.
किनारा नजरेच्या टप्यात दिसणे ही नाविकांसाठी कम्फर्ट लेवल होती.
याचसाठी ते किनाऱ्याला समांतरच राहायचे. पण कोलंबस याने ती कम्फर्ट लेव्हल ओलांडली आणि किनाऱ्याच्या काटकोनात आपली नाव घातली.
रॉबिन शर्मा यांनी सुद्धा आपल्या पुस्तकात हेच सांगितले आहे – go perpendicular! म्हणजेच कसलाही इतर विचार न करता, स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे चला!
आयुष्यात जर काही प्राप्त करायचे असेल तर हे करणे अतिशय महत्वाचे आहे.
तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आयुष्यात हवे ते मिळत नाही, तर स्वतःला हे प्रश्न विचारा की…
- आयुष्यात तुम्ही तुमची कम्फर्ट लेव्हल कधी सोडली आहे का?
- कधी नेहमीच्या परिघाबाहेर जाऊन काही गोष्टी केल्या आहेत का?
जर तुम्हाला आयुष्यात, तुमच्या मनासारखे घडून हवे असेल, नोकरी व्यवसायात उंची गाठायची असेल, भरपूर पैसा कमवून समृद्ध आयुष्य जगायचं स्वप्न तुम्ही बघत असाल, तर त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आयुष्यात वेगळे काहीतरी करायची हिंमत दाखवायची आणि ते वेगळे काहीतरी करून निभावून न्यायचे….
तुम्हाला तुमची स्वप्ने सत्यात उतरवून आयुष्यात काहीतरी हशील करायचे असेल तर तुम्हाला तुमची कम्फर्ट लेव्हल सोडावी लागेल.
हे करणे सुरुवातीला कठीण जाईल, प्रश्नच नाही.
पण ही सुरुवातच कठीण असते.
एकदा का हा सगळ्यात मोठा टप्पा तुम्ही पार केला की मग पुढे सगळे त्या मानाने सोपे जाते.
आता कम्फर्ट लेव्हल सोडायची म्हणजे नेमके काय करायचे?
याचसाठी या लेखाच्या सुरुवातीला आपण कोलंबसचे उदाहरण बघितले, पण हे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे कळावे म्हणून आपण आजू एक उदाहरण बघूया.
धीरूभाई अंबानी.. हे पेट्रोल पंपावर नोकरी करून उदरनिर्वाह करायचे.
पण त्यांची स्वप्ने मोठी होती. त्यांना आयुष्यात मोठे व्हायचे होते आणि ते पेट्रोल पंपावर नोकरी करून त्यांना करता येणार नव्हते.
पण असा एक महत्वाच्या क्षण त्यांच्या आयुष्यात आला जेव्हा त्यांनी ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला….
आपली कम्फर्ट लेव्हल सोडायचा निर्णय घेतला.
त्यानंतर त्यांच्या मेहनतीने चमत्कार झाला.
पण त्या मेहनतीपेक्षा पण महत्वाचा होता तो क्षण. ज्या क्षणी त्यांनी त्यांची ‘कम्फर्ट लेव्हल’ ओलांडली
त्यांनी जर त्यांची पेट्रोल पंपावरची नोकरी सोडलीच नसती तर त्यांना हे शक्य झाले असते का?
नाही…. तुमच्याही आयुष्यात असे अनेक क्षण आले असतील, जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ जाण्याची संधी मिळते.
काहीवेळा तुम्ही ते क्षण अचूक हेरले असतीलही तर काहीवेळा तुमच्याकडून ते सुटूनही गेले असतील.
पण इथून पुढे मात्र तुम्हाला कधी अशी संधी मिळाली तर तुम्ही तुमचा कम्फर्ट सोडायची तयारी ठेवली पाहिजे.
तसे झाले तर असे समजायला हरकत नाही की तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
काहीही परिस्थिती असली तरीही हे पहिले पाऊल उचलायची हिंमत दाखवली पाहिजे,
त्यासाठी घाबरून उपयोग नाही. जास्तीतजास्त काय होईल?
तुम्ही असफल व्हाल. पण तुमच्या मनात जेव्हा अशी शंका येईल आणि त्याची तुम्हाला भीती वाटेल तेव्हा, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रयत्न करून असफल होणे हे प्रयत्न न करण्यापेक्षा कधीही चांगलेच.
बरोबर ना?
अपयशी होण्याच्या शक्यतेचा विचार करण्यापेक्षा, यश मिळणार, हा दृढविश्वास तुम्हाला तुमचा ‘कम्फर्ट झोन’ तोडण्याचं बळ देईल!!
समजा जरी तुम्ही प्रयत्न केले, अगदी मनापासून कष्ट केलेत तरीही असफल झालात तरी तुमच्याकडे अनुभव येतो.
पण तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नच केला नाही तर मात्र तुमच्याकडे उरतो तो केवळ पश्चाताप.
यासाठीच महत्वाचे आहे ते पहिले पाऊल.
यासाठी काय करायचे?
१. अल्पसंतुष्ट राहू नका
आयुष्यात तुम्ही मोठी स्वप्ने बघायचे ट्रेनिंग स्वतःला दिले पाहिजे.
तुमची परिस्थिती जास्तीत जास्त कशी सुधारेल यासाठी तुम्ही प्रयत्नशील असले पाहिजे.
आयुष्यात समाधानी असणे वेगळे आणि अल्पसंतुष्ट असणे वेगळे.
धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावरची नोकरी सोडली नसती तर?
ते तीच नोकरी करत राहिले असते आणि त्यातच समाधान मानून आपले व आपल्या परिवाराचे पोट भरत गेले असते.
पण त्यांनी पकडला तो महत्वाचा क्षण.
त्यांनी बघितले ते स्वप्न त्या पेक्षा मोठे होते. त्यांनी त्यांचे ध्येय ठरवले होते आणि त्यासाठी ‘perpendicular’ वाटचाल करायची तयारी सुद्धा त्यांनी दाखवली.
२. रिस्क घ्यायची तयारी ठेवा
तुम्हाला जर आयुष्यात तुमची ध्येय पूर्ण करायची असतील, तुमची स्वप्ने सत्यात उतरवायची असतील तर त्यासाठी तुम्हाला रिस्क घेणे गरजेचे आहे.
कदाचित तुमच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना तुम्हाला भीती वाटू शकते.
तुम्ही अयशस्वी झालात तर काय? ही भीती वाटणे साहजिक आहे.
पण या भीतीच्या पुढचा विचार तुम्ही करायला हवा.
किनाऱ्याला सोडून समुद्राच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कोलंबसला सुद्धा भीती वाटलीच असेल,
पण त्या भीतीवर मात करून त्याने पहिले पाऊल उचलले.
तुम्ही सुद्धा हेच उदाहरण मनात ठेऊन तुमची ‘perpendicular’ वाटचाल सुरु केली पाहिजे.
३. अडचणींचा सामना करा
आयुष्य खडतर असते. त्यात सुद्धा जर तुम्ही तुमची कम्फर्ट लेव्हल सोडून काही करायला बघत असाल तर ते जास्तच खडतर वाटू शकते.
पण या खडतर प्रवासानंतरचे ठिकाण हे सुंदर असते.
एकदा तुम्ही हे अडथळे, अडचणी पार केल्या की त्यानंतर तुमची स्वप्ने पूर्ण होणार असतात. म्हणूनच तुम्ही पहिले पाऊल उचलतानाच याची तयारी ठेवली पाहिजे.
कितीही अडचणी आल्या तरी तुमची ‘perpendicular’ वाटचाल थांबता कामा नये.
मित्रमैत्रिणींनो, हे अवघड वाटत असेल कदाचित पण ते अशक्य मात्र नाही.
तुमची इच्छा असेल, मेहनतीची तयारी असेल तर तुम्ही सहज तुमची स्वप्ने साकारू शकता.
तुम्ही कधी तुमची ‘perpendicular’ वाटचाल सुरु करताय?
तुमच्या आयुष्यात असा कोणता कम्फर्ट झोन आहे, जो तुमच्या यशाच्या आड येतो तो शोधून कमेंट मध्ये मला सांगा…
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.