जबाबदारीचं ओझं होऊन ताण येतोय का तुमच्यावर?? मग ताणाशी दोन हात करा

‘अरे भैय्या ऑल इज वेल’ गाणं आठवतय का??

तुम्ही जर तणावाखाली असाल तर ते नक्की गुणगुणत रहा.

आयुष्य म्हटल्यावर नातेसंबंध, नोकरी, घरची जबाबदारी, एकंदर कामाचा ताण हा येणारच.

म्हणून काही या गोष्टी सोडून देता येत नाहीत.

धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय, हे होणारच.

घरातला कर्ता पुरूष असो किंवा बाई घरची कामं, बाहेरची कामं हे सगळं सांभाळताना पुरेवाट होते अगदी.

जबाबदारी तर वाढतच जाते पण बाकीच्यांची अपेक्षाही वाढत जाते.

दिवस उगवला कधी आणि मावळला कधी, काही पत्ता लागत नाही.

इतकं सगळं असताना ताणतणाव हे वाढणारच.

चुकून कधी कॉलेज मधली मैत्रिण भेटली तर म्हणालीही असेल, काय होतीस तू काय झालीस तू.

कधीतरी आठवून बघा, तुमचं अस्तित्व आधी कसं होतं, तुमचं दिसणं असणं कसं बदलत गेलं.

कधीपासून तुमचा मोकळाढाकळा स्वभाव दबत गेला, आयुष्यभर अखंड चालणारी स्पर्धा तुम्हाला कधी फरपटायला लागली.

ज्यामुळे तुमची नुसती दमछाक झाली, कितीही केलं तरी कमीच पडतयं…. असं वाटायला लागलं!!

एवढ्या गदारोळात दबून जाणं आणि स्वतःकडे दुर्लक्ष होणं हे अगदी स्वाभाविक आहे.

परिणाम असा होतो की इतरांबरोबर तुम्हीही स्वतःला गृहीत धरू लागलात….

स्वतःची तब्येत, आवडी निवडी, इच्छा अपेक्षा याकडे तुम्ही कानाडोळा करायला सुरुवात केली…

खरंतर अशा अनेक गोष्टी असतात ज्या तुमच्या आवाक्यात नसतात.

त्या धरून ठेवण्याचा अट्टाहास आपण करूही नये.

त्या एकतर स्विकाराव्यात किंवा पुढची वाटचाल सुरू करावी.

एका गोष्टीवर मात्र आपण ताबा मिळवू शकतो ते म्हणजे आपलं मन आणि विचार.

भरकटत जाणारं आपलं मन, आपले विचार आपल्या काबूत असले पाहिजेत.

याशिवाय दुसरी कुठलीही मात्रा आपल्या ताणतणावावर लागू पडत नाही.

तुम्हाला सतत काळजी वाटत असेल, दुःखी वाटत असेल, उदासिनता ग्रासत असेल तर ताबडतोब आपलं लक्ष एखाद्या आवडीच्या कामात गुंतवा.

मानसिक स्वास्थ्य ढळू न देता ते आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.

या लेखात खास हीच चर्चा करुया, आपल्या आयुष्यात येणाऱ्या ताणतणावाची तीव्रता कशी कमी करायची……

यातले १४ उपाय तुम्हाला नक्कीच आवडतील…

१. नियोजनपूर्वक काम सुरू करा :

प्रत्येक दिवसाची सुरुवातच एका नियोजनबद्ध कामाने व्हायला हवी.

कारण तेथूनच धावपळ सुरू होते.

सकाळी उठलं कामं उरकायची म्हणून सुरूवात केली आणि दिवसाच्या शेवटी फक्त दमणूक झाली.

पुढच्या दिवशी पुन्हा तेच चक्र.

ही एक शर्यत आहे असं म्हटलं तरी चालेल. या शर्यतीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी योजनापूर्वक काम करणं गरजेचं.

त्यासाठी काय करावं तर दिवसात कोणती कामं करायची ते ठरवून त्यांचा क्रम ठरवायचा.

तो लिहून ठेवला तर उत्तम. झालेल्या कामांसमोर एखादी खूण करावी.

दिवस संपताना ती यादी पाहिल्यावर थोडंस हायसं वाटेल.

इथूनच तुमचा आत्मविश्वास वाढायला सुरुवात होईल.

२. परिपूर्ण होण्याचा अट्टाहास सोडा :

समाजात प्रतिष्ठा जितकी जास्त तेवढी आपली आपल्याकडून आणि इतरांची आपल्याकडून अपेक्षा जास्त असते.

परिपूर्ण असण्याचा अट्टाहास सुरू होतो.

ते जमलं नाही तर ताणतणाव वाढायला लागतो.

आपण एक गोष्ट विसरतो की जगात कोणीही परिपूर्ण नसतो.

प्रत्येकाने गुणांबरोबर दोषही स्विकारले पाहिजे.

एखादी गोष्ट अचूक करण्याचा प्रयत्न जरूर करावा पण अट्टाहास नको.

आत्मविश्वास ढळून ताण वाढवणारा अट्टाहास घातकच.

स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा. मृगजळामागे जाऊन स्वतःलाच फसवू नका.

३. वादविवाद संपवा :

माणूस म्हटलं की मतभेद आलेच. व्यक्ती तितक्या प्रकृती.

पण हे मतभेद टोकाला जाऊ देऊ नका.

तुटेपर्यंत ताणू नका.

मग ते मतभेद तुमच्या ऑफिसमधील सहकारी, इतर कर्मचारी, अधिकारी किंवा नातेवाईक कोणाबरोबरही असोत.

ती व्यक्ती समोर आल्यावर दोघांमधून विस्तव जाण्यापेक्षा एकदा बोलून मन मोकळं करा आणि वाद संपवा.

दोन पावले माघार घ्यावी लागली तरी चालेल.

४. प्राधान्य क्रम हुशारीने ठरवा :

आपल्या रोजच्या धावपळीत सगळीच कामं महत्त्वाची वाटतात.

पण आपण एका वेळी अनेक गोष्टी जमवून घेऊ असं नाही.

आपल्याकडे अशी कुठलीही जादू नाही. त्यासाठी कामांचा प्राधान्य क्रम ठरवा.

त्यामुळे दडपण न घेता काम करता येईल.

कोणताही गोंधळ होणार नाही.

एखादी जबाबदारी योग्य व्यक्तिवर सोपवा.

त्यामुळे लहानसहान गोष्टींचा ताण येणार नाही.

५. नाही म्हणायला शिका :

तुम्ही पुष्कळ कामांसाठी योग्य असू शकता.

पण एका वेळी सगळ्या जबाबदाऱ्या झेपतील असं नाही.

काही कामांना नकार द्यावा लागेल.

पण कुठलं काम नाकारावं ते ठरवता आलं पाहिजे.

एखादी जबाबदारी नाकारली म्हणजे तुम्हाला कोणी वाईट ठरवणार नाही.

पण झेपलं नाही म्हणून अर्धवट सोडलं तर त्याचा त्रास होतो.

६. चालढकल करणं टाळा :

एखादं काम झेपत नसेल तर, अवघड वाटत असेल तर ते चालढकल करून सोडू नका.

कधीतरी तुम्हालाच ते कराव लागणार आहे.

ते टाळायचा प्रयत्न केला तर फक्त ताण वाढेल.

त्यापेक्षा कामाचे भाग करून एक एक भाग पूर्ण करा. मधे थोडा विराम घ्या.

पुन्हा उत्साहानं कामाला लागा. हळूहळू काम पूर्ण झाल्यानंतर ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढेल.

७. स्वतःसाठी वेळ द्या :

कामाच्या डोंगराखाली तुम्ही दबले असाल तर स्वतःसाठी आधी वेळ द्या.

मन ताजंतवानं करण्यासाठी वेळ काढा.

आवडीचे छंद जोपासा. गाणी म्हणा, नृत्य करा, पुस्तक वाचा, फिरायला जा, मेडिटेशन करा.

स्वतःला खरंच विचारा या गोष्टी मी यापूर्वी कधी केल्या.

रुटीन प्रत्येकाचं चालूच राहणार.

पण उमेद टिकून राहण्यासाठी आधी स्वतःकडे बघा. कधीतरी स्वतःला कुरवाळत जा.

८. पौष्टिक पदार्थ खा :

भूक नसताना केवळ मसालेदार पदार्थ खाणं, चरबी वाढवणारे पदार्थ खाणं त्रासदायक ठरु शकतं.

त्यामुळे फक्त आजारांचा धोका वाढतो.

त्यापेक्षा खाण्यापिण्याच्या योग्य सवयी लावा.

सकस आहार घ्या.

फळं खा, सलाड खा, पचनाला योग्य पदार्थ निवडा.

सात्विक आहाराने ताण नक्कीच कमी होतो.

९. पुरेशी झोप घ्या :

निरोगी शरीर, ताजंतवानं मन, कामातला उत्साह टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे.

रोज किमान ६ तास झोप आवश्यक आहे. त्यामुळे थकवा ताण दूर व्हायला मदत होते.

आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

झोपण्यापूर्वी शांत संगीत ऐका, सुविचार वाचा. त्यामुळे शांत झोप लागते. थकवा दूर होतो.

१०. ध्यानधारणा करा :

कामातील एकाग्रता वाढवण्यासाठी, ताण दूर करण्यासाठी, रोज १५ मिनीट ध्यानधारणा जरुर करावी.

मन आणि शरीर शांत ठेवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.

अर्थातच व्यक्तिमत्वातही चांगला बदल होईल. चिडचिड, काळजी, दुःखी विचार, नकारात्मक विचार कमी होतील.

११. छंद जोपासा :

कामाच्या रहाटगाडग्यात अडकलं तरी छंद जोपासण्यासाठी वेळ द्या.

त्यामुळे मनाचा उत्साह टिकेल.

नाटक सिनेमा बघा, चित्र काढा, पाककला शिका, असे अनेक पर्याय समोर येतील.

त्यामुळे नक्कीच तुमचं मन मोकळं होईल.

१२. तज्ज्ञांचा सल्ला घ्या :

ताणतणाव सहन होत नसतील तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

मोकळेपणाने बोला.

कुढत रहाल तर फक्त ताण वाढेल. तुम्हाला मिळालेला सल्ला योग्य असेल तर जरूर आचरणात आणा.

त्यामुळे तुमच्या भावना, व्यक्तिमत्व यांना योग्य वळण मिळू शकेल.

आपला ताण दूर करण्यासाठी एखाद्याला सल्ला विचारणं ही चुकीची गोष्ट नाहीये.

१३. कधीतरी सुट्टी घ्या :

कामातून विरंगुळा मिळावा म्हणून सुट्टी आवश्यक आहे.

अशा वेळी कुटुंबात रमा. खूप गप्पा मारा. लहान मुलांबरोबर खेळा.

मित्रांमध्ये वेळ घालवा. सुट्टीचा चांगला उपयोग कसा होईल ते बघा.

१४. स्वतःबद्दल चांगल्या भावना ठेवा :

‘सर सलामत तो पगडी पचास’ त्यामुळे आपणच आपल्याला चांगलं म्हणत असू तर त्याचा परिणाम असा होईल की इतरांनाही आपला आदर करावासा वाटेल.

स्वतःला ताणतणाव, जबाबदारीचं ओझं यापासून दूर ठेवा.

सकारात्मक विचार करून जगा.

जेणेकरून शक्य तितक्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतील.

जबाबदारी, ताणतणाव, अपेक्षा यांच ओझं कायम राहणारच.

फक्त आपण त्याकडे कसे बघणार हे महत्त्वाचं आहे.

तेव्हा दोस्तांनो स्वतःला खुशाल सांगा, ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएंमें उडाता चला गया’

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय